सोशल मीडियावर प्रेग्नन्सी फोटोशूट हा प्रकार गेल्या वर्षांपासून ट्रेडिंगमध्ये आहे. विशेषत: इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर गेल्या वर्षभरात असे अनेक फोटो शेअर, लाइक केले गेले आणि गुगलवर प्रेग्नन्सी फोटोशूट आयडियाज सर्च केल्या गेल्या. ‘बेबी शॉवर’च्या या नव्या ‘फोटो शॉवर’ ट्रेण्डविषयी..

आपल्याकडचं डोहाळजेवण किंवा पाश्चिमात्यांचं ‘बेबी शॉवर’ या तशा निगुतीनं जपलेल्या प्रथा, परंपरा. मातृत्वाची चाहूल सेलिब्रेट करण्याचे हे सोहळे. होणाऱ्या आईला आवडीच्या वस्तू द्यायच्या, तिचे डोहाळे अर्थात चोचले पुरवायचे आणि तिनेदेखील हे सगळे लाड साजरे करायचे, यात नवीन काही नाही. पण आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात यात भर पडतेय ती स्पेशल फोटो सेशन्सची आणि ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची. यालाच हल्ली म्हणतात प्रेग्नन्सी किंवा मॅटर्निटी फोटोशूट. सध्या असे प्रेग्नन्सी फोटो जगभरात सोशल मीडियावर ट्रेण्डिंग आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीनं सोहळ्याचे फोटो काढण्याऐवजी प्रेग्नन्सी.. सर्जनाचं प्रतीक, स्त्रीचं रूपांतर या अशा थीम घेऊन होणाऱ्या आईचं फोटोशूट केलं जातं.

हे फोटोशूट हे सामान्यपणे गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात केलं जातं. तीन-चार वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये, वेगवेगळ्या लोकेशन्स, बॅकग्राऊंडसह हे फोटो काढले जातात. होणाऱ्या आईच्या सोयीनुसार घरात, बागेत किंवा जवळपासच्या समुद्रकिनाऱ्यावर, रम्य ठिकाणी हे फोटोशूट केलं जातं. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे हा ट्रेण्ड वाढतोय. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आदींमुळे हे फोटोशूट इन्स्टंट हिट झालंय.

गरोदरपणाच्या काळात स्त्री अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरी जात असते. त्यामुळे त्यादरम्यान ती अगदी संवेदनशील होते. फोटोशूटदरम्यान ती फोटोग्राफरबरोबर कम्फर्टेबल असणं त्यामुळे आवश्यक असतं. मोठय़ा शहरांत हल्ली महिला फोटोग्राफरची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्याकडूनच असं फोटोशूट करून घ्यायला प्राधान्य दिलं जातं, असं तरुण फोटोग्राफर श्रेया सेन म्हणाली.

या ट्रेण्डबद्दल सांगताना श्रेया सांगते, ‘मी २०११ पासून मॅटर्निटी फोटोग्राफी करतेय. आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर फोटोशूट केलं जातं किंवा डोहाळेजेवणासारख्या कार्यक्रमाचं शूट करतात. पण गेल्या वर्षभरात मुंबई आणि इतर शहरांत हे आधुनिक पद्धतीचं प्रेग्नन्सी फोटोशूट करून घेतलं जातंय. होणारी आईच नाही तर बाबासुद्धा या फोटोशूटबाबत उत्सुक असल्याने आणि फोटोशूट करून घेण्यात पुढाकार घेताना दिसतात. तसंच फोटोमध्ये पोजेससोबत सुंदर संदेश, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित गोष्टी, आवडनिवड आणि उभयतांच्या त्या काळातील भावना फोटोमधून दाखवण्याकडे कल असतो.’
असंच प्रेग्नन्सी फोटोशूट करून घेणारी प्रांजली डांगे म्हणाली, ‘आमच्या मित्रमैत्रिणींनी केलेली अशी फोटोशूट्स मी आणि माझा नवरा नीलेशने पाहिली होती. इंटरनेटवरदेखील असे प्रेग्नसी फोटोशूट पाहिली होती. हा प्रकार आम्हाला आवडला. हे फोटोशूट करण्यामागचं कारण म्हणजे आमच्या नवीन पालकत्वाची ही एक सुंदर आठवण म्हणून आम्हाला जपता आली. आम्हाला एक मुलगी आहे. तिच्या वेळी आम्ही असं काहीच केलं नव्हतं. या फोटोशूटमुळे आमच्या मोठय़ा मुलीला येणाऱ्या बाळाविषयी ओढ आणि त्यासोबतच ती मोठी ताई होणार असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली जे आम्हाला हवं होतं. नीलेशला फोटोग्राफीची आवड आहे. त्यानेच हे फोटोशूट केलं. आमची मैत्रीण नम्रता पाठक हिनेही आम्हाला मदत केली. हा अनुभव खूपच छान होता.’

प्रेग्नन्सी फोटोशूट म्हणजे एक प्रकारचा आनंदाचा खजिना आहे. आईवडिलांचं बाळ येण्यापूर्वीपासूनचं त्याच्यावर असलेलं प्रेम, त्या आठवणी जपणं पालकत्वाची रुजलेली भावना जणू ते फोटो व्यक्त करत असतात. त्यामुळे या गोड आठवणी हृदयात कायम कोरल्या जात आहेत. त्यामुळे मॅटर्निटी फोटोशूट हा इन ट्रेण्ड आहे व पुढेही राहील असं म्हणायला हरकत नाही.
आमच्या मित्रमैत्रिणींनी केलेली प्रेग्नन्सी फोटोशूट्स पाहिली होती. इंटरनेटवरदेखील अशी फोटो शूट्स पाहिली. तिथून काही आयडिया घेतल्या आणि काही आमच्या मित्रांनी दिल्या. नवीन पालकत्त्वाची एक सुंदर आठवण म्हणून आम्हाला ते क्षण जपता आले आणि ते या फोटोंच्या माध्यमातून कायम आमच्याजवळ राहतील. शिवाय आमच्या मोठय़ा मुलीला येणाऱ्या बाळाविषयी ओढ निर्माण करायलादेखील हे उपयोगी पडलं.
– प्रांजली आणि नीलेश डांगे