19 September 2020

News Flash

व्हायरलची साथ : बाहुबली चिंतनसैर

समस्यांचं आगार बाजूला सारून मनोरंजनाच्या आगारात जाणं हा किती मोठा विचार.

टू बी ऑर नॉट डू बी यापेक्षाही गहन प्रश्न म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारलं? सार्वकालीन महान साहित्यकार शेक्सपिअरजींना पडलेल्या या प्रश्नाला मागे टाकण्याचं काम बाहुबलीने केलं. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या बाहुबली चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पॉइंटररूपी मुद्दय़ांची मालिकाच काढली.

  • साधी राहणी, उच्च विचारसरणी या उक्तीचा जीर्णोद्धार करण्याची हीच ती वेळ असं आमच्या लक्षात आलं आहे. ‘भव्य राहणी आणि लार्जर दॅन लाइफ विचारसरणी’ अशी ही उक्ती बाहुबलीतेतर म्हणजे पोस्टट्रथ असतं तशा कालखंडात विकसित झाली आहे.
  • चित्रपटाविषयी पडलेले प्रश्न, चित्रपट पाहतानाच्या भावना, चित्रपटगृह सोडल्यानंतरच्या भावना हे तातडीने सोशल मीडियावर टाकणं मस्ट आहे. नुसतं पिक्चर पाहणं अगदीच पॅसिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी. या चित्रपटाने हा केवढा मोठा मूलभूत बदल घडवला आहे. कृतीप्रवण फेसबुक साहित्यिक निर्मिण्याचं श्रेय बाहुबलीला जातं.
  • देशात काय घडतंय, सीमेवर काय होतंय, राज्यात तुरीचं काय होतंय यांनी जराही विचलित न होता चित्रपट पाहता येऊ शकतो ही मनोवृत्ती फारच विलक्षण. एवढय़ा मोठय़ा देशात समस्यांचा ढीग असणारच. सारखं त्यांना कुरवाळत बसण्यात काय हशील? बरं आपण सनदशीर वागूनही समस्या कमी झाल्यात का- नाही. मग समस्यांचं आगार बाजूला सारून मनोरंजनाच्या आगारात जाणं हा किती मोठा विचार.
  • कालसुसंगत राहणं फारच आवश्यक असतं. म्हणजे बघा पूर्वी लोक ट्रेन, बसमध्ये, मेट्रोमध्ये अँग्री बर्ड खेळायचे. आता ल्युडो खेळतात. गटागटानेही खेळतात. हा बदल जसा अंगीकारला जातो तसं चित्रपट ग्राहक म्हणून बदल घडतो. कथा, पटकथा, गाणी, कॅमेरा या सगळ्यांनी मिळून चित्रपट नावाची गंमत तयार होते. पण तेवढं पुरेसं नाही आता. स्पेशल इफेक्ट्स नामक अद्भुत शक्तींनी चित्रपटाला दिलेलं परिमाण अनुभवणं नितांत गरजेचं. कथा काय हो- चालू राहते मागच्या फ्रेममधून पुढच्या फ्रेममध्ये. सायफाय, गिझ्मो, हायटेक या सगळ्या करामतींमुळे चित्रपट म्हणजे कलात्मक नव्हे तर अभियांत्रिकी आविष्कार असल्याचं लक्षात आलंय आमच्या. हा पॅराडियम शिफ्ट मराठी चित्रपटांनी कधीच ओळखला होता हे ध्यानी आल्यावर आम्हाला भरून आलं. तात्या विंचूसदृश डॅम इट प्रकार आपल्याकडे मागच्या दशकात आला होता.
  • कपोलकल्पित जग अर्थात फँटसी वर्ल्ड ही संकल्पनाच किती भारी. आपल्या मनात खूप असलं तरी आपण मारामारी करत नाही. गदेने कोणाला तरी चोपटवून काढावं किंवा बाणांनी कोणाला तरी घायाळ करावं असं अनेकांना अनेकांविषयी वाटत असतं. पण रिअल टाइममध्ये ते शक्य होत नाही. त्यासाठी हा चित्रपट. ७० एमएम भव्य पडद्यावर फायटिंग सुरू झाली की क्षणभर डोळे मिटावेत. समोरच्या गदाधारी इसमात स्वत:चं रूप न्याहाळावं. डोळे उघडावेत. समरसून मारामारी एन्जॉय करावी. फील येणं म्हणजे काय याची अनुभूती तुम्हाला येईल. जो घेताना आपण ‘फ्लॅट’ होतो ते आपलं घर असतं. व्हिला, मॅन्शन, प्रासाद, राजवाडा, महाल अशा बहुविध वास्तूंमध्ये तुम्ही कधी वावरणार? बरं गाडी टेस्टड्राइव्हला देतात तशी सिस्टम घरांबाबत नाही. ते काम असे चित्रपट पाहताना होतं. शाळाकॉलेजात मोठं झाल्यानंतरच्या अनेक सुरम्य कल्पना आपण रेखाटलेल्या असतात. नोकरीला लागल्यावर किंवा व्यवसाय सुरू केल्यावर कल्पना प्रत्यक्षात आणणं किती कठीण आहे याची जाणीव होते. तर अशा अनेक अतृप्त, दुर्लक्षित, उपेक्षित राहिलेल्या कल्पना अडीच तासांत तुम्हाला जगता येतील. आपल्या केदारदादांनी हा विचार कधीच अमलात आणला होता. बायकांच्या मनातलं ओळखण्याची शक्ती त्यांच्या पात्राला ‘अगं बाई अरेच्चा’मध्ये मिळते. मराठी माणूस द्रष्टा असतो याची खूणगाठ आम्ही मनाशी पक्की केली.
  • सुमित्रा भावे आणि सुनील कथनकर यांच्या कासव चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. असंख्य फेस्टिव्हल्समध्ये गौरवण्यात आलेल्या या चित्रपटाचा थिएटरबारीपर्यंतचा प्रवास कासवगतीने सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या वर्षांसाठी डिप्रेशन ही थीम निवडली आहे. योगायोगाने हा चित्रपटही याबाबतच आहे. चित्रपटाचं तिकीट साधारण दीडशे-दोनशे रुपये, पॉपकॉर्न-कोल्ड्रिंक-समोसे सगळं मिळून तीनशे, पिक्चरनंतर लंच किंवा डिनर- सहाशे. आता खिशाला एवढी चाट बसणार नक्की असताना आत गेल्यावर प्रश्न मांडणारा, डोक्याला खाद्य वगैरे देणारा चित्रपट बघाच कशाला! डोअरकीपरला र्अध तिकीट आणि पूर्ण डोकं द्यायचं आणि सीट मागे रेलून रममाण व्हायचं.
  • प्रमोशन जंक्शन या सदराखाली चीप विनोदाचे कार्यक्रम सुरू असतात. तिथे न येताही बाहुबली हिट व्हावा! रूढ प्रथांना बाजूला सारायला हिंमत लागते. आमचा चित्रपट कसा वेगळा हे मधाळ चेहऱ्यानं प्रत्येकानं सांगायचं, मग जराही हसू न येणाऱ्या विनोदावर हसून लोळण वगैरे घ्यायची, ते सांगतील त्या चमचागोटी अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा हे असलं काहीही न करता बाहुबली मंडळी यशस्वी झाली आहेत.
  • हॅरी पॉटरसदृश कथानकांनी तमाम भारतीय किशोरवयीन मुलांना गारुड घातलंय. या आंग्ल आक्रमणातून बाहेर काढण्याचं काम बाहुबलीने केलंय अशी वार्ता कानी आहे. आपल्या पौराणिक कथा तसंच संस्कृती याच्याशी साधम्र्य साधणाऱ्या मात्र तरीही काल्पनिक असणाऱ्या या कथेचा पगडा जादुई आहे. कठीण नावांची पात्रं आणि त्यांच्या भोवतीचं जग लक्षात ठेवू लागलीय तरुण पिढी. सकारात्मकतेची सुनामीच म्हणायला हवी.

(हे वानगीदाखल काही मुद्दे. स्पेसक्रंच असल्याने आम्ही थांबलोय. तुम्ही तुमचे मुद्दे जरूर पाठवा.) 

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:26 am

Web Title: bahubali 2 effect on social media
Next Stories
1 ‘ताण’लेल्या गोष्टी : कल्चर शॉक
2 कॅलरी मीटर : प्रोटिन्सबद्दल बरंच काही
3 आठवणींची साठवण
Just Now!
X