News Flash

व्हायरलची साथ : खरी कसोटी

जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना ओबामा यांनी तब्बल आठ वर्षे अमेरिकेची महासत्ता ही ओळख टिकवून ठेवली.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी आजच्या डिजिटल आणि सोशल लाइफस्टाइलमधील सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे ट्विटर. प्रत्येक क्षणाला टाइमलाइनवर खाली सरकणाऱ्या या खिडकीत एकशेचाळीस अक्षरांमध्ये खरं तर काय काय लिहिणार, असा प्रश्न नवख्या माणसाला पडू शकतो आणि एखादा सरावलेला तेवढय़ाच अक्षरांमध्ये जगावेगळं काही तरी सांगून जातो. फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांप्रमाणे अनेकांना आजही ट्विटर वापरणं थोडं जड जात असलं तरी ट्विटरची परिणामकारकता लक्षात घेता लोकांना फार काळ त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ट्रोलिंग हा प्रकार अलीकडे खूप ऐकायला येतो आणि ट्विटर हे त्याचं जन्मस्थळ. पण एखाद्याला सळो की पळो करून सोडण्याबरोबरच चांगल्या कामासाठी कौतुकाचा वर्षांव आणि आनंद द्विगुणित करण्यासाठीही या माध्यमाचा वापर झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

या वर्षांच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले बराक ओबामा हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते. आपल्या पूर्वसुरींच्या नावे बोटे मोडत बसण्यापेक्षा ओबामा यांनी ‘येस वुई कॅन’ हा आशावाद लोकांना दिला आणि तो अनेक अर्थानी खरा करून दाखवला. जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना ओबामा यांनी तब्बल आठ वर्षे अमेरिकेची महासत्ता ही ओळख टिकवून ठेवली. प्रशासक म्हणून त्यांनी आपली छाप पाडलीच पण नवरा आणि बाप म्हणूनही छोटय़ा छोटय़ा कृतींमधून जगभरातील लोकांची मनं जिंकली. आपल्या कारकीर्दीत घेतलेले त्यांचे निर्णय तर परिणामकारक ठरलेच पण त्यांच्या खासगी आयुष्यातीलही गोष्टी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या. अध्यक्षपद सोडल्यानंतरही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सोडलेली नाही, याची नुकतीच प्रचीती आली. व्हर्जिनियाच्या चार्लोट्सविले येथील ताज्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी केलेलं ट्वीट जगातील आजवरचं सर्वात पॉप्युलर ट्वीट असल्याचं ट्विटरनेच नुकतंच जाहीर केलं. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या विधानाचा आसरा घेत ओबामांनी हसतमुखाने एका खिडकीत उभ्या असलेल्या विविध वंशांच्या चिमुकल्यांशी संवाद साधतानाचा फोटो ट्वीट करून त्याखाली No one is born hating another person because of the color of his skin or his background or his religion… असं म्हटलं आहे.

खरं तर हा संदेश काही नवीन नाही. आजवर अनेक विचारवंतांनी किंवा धर्मगुरूंनीही या अर्थाचा संदेश दिला असेल. बऱ्याचदा आपल्याला गोष्टी कळत असतात पण त्याची अंमलबजावणी करण्यास आपण मागे पडत असतो. बराक ओबामा हे नोव्हेंबर २००८ मध्ये अध्यक्षपदी निवडून आलेले अमेरिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय नेते. अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु शहरात जन्मलेल्या बराक यांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया या देशातील जकार्तामध्ये झाले. त्यांच्या आजी-आजोबांनीच त्यांना वाढवले. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र या विषयात पदवी, हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि शिकागो विद्यापीठामध्ये अध्यापन, नंतर डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड ते थेट अमेरिकेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास डोळे दिपवणारा आहे. राजकारण किंवा समाजकारणाची कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताही बराक ओबामा यांनी मारलेली मजल उल्लेखनीय आहे. त्यामुळे ते करत असलेलं प्रत्येक विधान आणि कृती आजही दखल घेण्यासारखी असते.

जगभरात सामाजिक विषमता वाढत असताना प्रत्येक जण आपला देश, भाषा, पेहराव, धर्म, रंग, संस्कृती याची भिंत आपल्या आजूबाजूला निर्माण करत आहे आणि म्हणूनच की काय ओबामा यांचं विधान अनेकांना पटलं असेल. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत रिट्वीट आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. त्वचेचा रंग, कौटुंबिक पाश्र्वभूमी आणि धर्म या गोष्टी जन्माला येताना निवडण्याचा अधिकार कोणालाच मिळत नाही. त्यामुळे या निकषांच्या आधारे आपण कोणाचाही तिरस्कार करता कामा नये. ओबामांनी या विचाराला पुन्हा एकदा खतपाणी घातलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. पदावरून पायउतार झाल्यानंतरही जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागण्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. म्हणूनच देशांच्या आणि मानवी संवेदनांच्या सीमा तोकडय़ा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर जगभरातील लोकांनी ओबामांच्या ट्वीटला सर्वाधिक लोकप्रिय ट्वीट म्हणून मान तर मिळवून दिला, पण या वाक्याचं अनुकरण करणं ही आता या काळातली खरी कसोटी असणार आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:33 am

Web Title: barack obama white house barack obama viral photo us government
Next Stories
1 ‘ताण’लेल्या गोष्टी : गरज सेक्स एज्युकेशनची!
2 नैवेद्याचे पान
3 ओ साथी चल..