रश्मि वारंग

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

काही दरवळ सदा सर्वकाळ आपल्याला हवेहवेसे वाटतात. कॉफीचा दरवळ याच श्रेणीत मोडणारा! कॉफीच्या जोडीला गप्पांची मैफल असेल तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अमदानीत अशी अनेक कॉफी हाऊ सेस कॉफीपेक्षा त्या गप्पांच्या अड्डय़ासाठी गाजली. त्याच कॉफी हाऊसेसचा आधुनिक अवतार नव्याने आणि पहिल्यांदा भारतात साकारला २००० साली. निमित्त होतं ‘कॅ फे बरिस्ता’चं. नवं कॉफी कल्चर भारतीय जनमानसात रुजवण्याचं श्रेय ज्या ब्रॅण्डला मिळतं तोच हा ब्रॅण्ड!

‘बरिस्ता कॉफी कंपनी लिमिटेड’कडून हा ब्रॅण्ड प्रत्यक्षात आला. दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये पहिलं आऊ टलेट सुरू झालं. दाक्षिणात्य कॉफी संस्कृती पलीकडे जगभरात कॉफी बनवण्याच्या असंख्य पद्धती आहेत. त्यातील इटालियन ब्रुइंग यानिमित्ताने बरिस्ताने भारतात आणलं आणि लोकप्रिय केलं. एस्प्रेसो कॉफी बनवण्याची विशिष्ट पद्धती त्यामुळे भारतीय लोकांना कळली.

‘बरिस्ता’ या नावातच सारं काही आहे. इटालियन भाषेत बरिस्ता म्हणजे बारटेंडर, पण मद्यापेक्षा विशिष्ट पद्धतीने कॉफी बनवणारा याच अर्थाने हा शब्द अधिक प्रसिद्ध झाला आहे. कॅ फेबरिस्ताने कॉफी हाऊसचं रूप अधिक चकचकीत केलं. शहरी भागातील धावपळीत, गर्दीत गप्पा मारत मारत कॉफी प्यायची एक निवांत जागा या ब्रॅण्डने दिली, पण लगेच पुढच्या वर्षी २०११ मध्ये ‘कॅ फे कॉफी डे’ सुरू झालं आणि बरिस्ताला तगडी टक्कर तयार झाली.

तरीही गेल्या १८ वर्षांत २०० आऊटलेटसह भारतात आणि म्यानमार, नेपाळ, बांगलादेश, मालदीव या देशांत हा ब्रॅण्ड पोहचला आहे. मध्यंतरी अशा ब्रॅण्डचा एक अभ्यास करण्यात आला ज्यांनी भारताचा चेहरा मोहरा बदलला. त्यात पहिल्या पन्नास क्रमांकात बरिस्ताचं स्थान होतं. शिवाय ‘ब्रॅण्ड ऑफ द इयर’ या सन्मानाने या ब्रॅण्डला २००२ साली  गौरवण्यात आलं आहे. २००७ मध्ये ‘लवाझा’ कंपनीने हा ब्रॅण्ड विकत घेतला.

या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे, ‘एक्स्पिरिअरन्स इट’. कॉफीची फक्त अनुभुती घ्या. लोगोतला वाफाळता कॉफी कलर मगसुद्धा कॉफीविषयी आपल्याला काही सांगत असतो. बरिस्ता हा कॅ फे कल्चरमधला संस्थापक असला तरी तो सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड नाही. सीसीडी, स्टारबक्स या कॉफी हाऊसची मोठी स्पर्धा या ब्रॅण्डला आहे.

अस्सल कॉफी प्रेमींचा हा आवडता ब्रॅण्ड. गरमागरम कॉफी हे कॉफीचं मुख्य लक्षण मानलं तर हा ब्रॅण्ड इतरांच्या तुलनेत हे लक्षण अधिक पूर्ण करतो. तरीही याला मिळालेलं यश मर्यादित आहे. सीसीडी सारखं गल्लोगल्ली जाळं विणण्यात आलेलं अपयश कदाचित याला कारणीभूत असू शकतं. तरी कॉफी संस्कृती भारतात रुजवण्याच्या बाबतीत आद्यत्वाचा मान या ब्रॅण्डला द्यावाच लागतो. अजूनही इटालियन कॉफीची ही गंमत अनुभवणं बाकी असेल तर ही कॉफी आणि बरंच काही अवश्य अनुभवून पहा. एक्स्पिरिअरन्स इट!

viva@expressindia.com