26 February 2021

News Flash

उकडावं का तळावं?

बॉइल्ड एग भुर्जी त्याहीपेक्षा वेगळी आणि उत्तम होती.

 

अंडय़ाचे अनेक अवतार खाबू मोशायला आवडतात. पुण्याला खाल्लेल्या अंडा हटेला किंवा अंडा घोटाला यांची चवही खाबू विसरलेला नाही. त्याच काही प्रकारांपैकी खाबूचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे भुर्जी. या भुर्जीतही काही हटके मिळालं तर?

खाबू मोशायचा आणि विज्ञानाचा तसा फारसा संबंध नसतो. खाबूने लहानपणापासून विज्ञानाची कास धरली असली, तरी विज्ञानाने सुरुवातीपासूनच म्हणजे खाबूच्या लहानपणापासूनच खाबूची कास सोडली आहे. विज्ञानातील अनेक सिद्धांतांनी खाबूला नेहमीच आश्चर्यचकित केलं आहे. त्यातलाच एक सिद्धांत म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत! माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालेला प्राणी आहे, या सिद्धांताबाबत खाबूचं दुमत नाही. पण त्याही पुढे जाऊन खाबूला असं वाटतं की, उत्क्रांतीची ही प्रक्रिया अजूनहीच चालूच आहे. म्हणजे खाबूच्या लहानपणी खाबू आणि त्याच्या आसपास वावरणारी छळवाद कार्टी आणि सध्या खाबूच्या आसपास वावरणारी लहान मुलं, यांच्यातल्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक श्रेणीत खूपच फरक पडला आहे. खाबुगिरी, खाबू मोशाय, विज्ञान, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत वगैरे या सगळ्याचा आपसात काय संबंध आहे, हा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ  शकेल. पण एकदम सोपं आहे. माणूस जसा उत्क्रांत होत गेला, तशाच त्याच्या खाण्याच्या सवयीही बदलत गेल्या. खाबूचे आजोबा, बाबा या पिढीपर्यंत पोहे, सांजा, उपमा, डांगर (आहाहा..), पापडाच्या लाटय़ा (इकडे खाबूच्या तोंडाला पाणी सुटलं आहे), तांदळाच्या ओल्या फेण्या, थालीपीठ (उच्चारी थाल्पिठ), कडबोळी, चकल्या इत्यादी इत्यादी पौष्टिक आहाराद्वारे आपली दोन जेवणांमधली भूक भागवली जात होती. खाबूच्या लहानपणापासून यात हळूहळू बदल होत गेला. हळूहळू ब्रेड, फरसाण यांच्याबरोबर मॅगीने शिरकाव केला. अंडय़ाने फ्रिजमधल्या त्या गोलाकार ट्रेमध्ये आपली जागा निश्चित केली, ती याच काळात. तेव्हापासून अंडं आणि खाबू यांचं नातं घट्टं झालं.

पुढे तुमच्याप्रमाणे कधी कधी खाबूवर एकटं राहायची वेळ आली, त्या वेळीही दोन साथीदार कायम खाबूबरोबर होते. मॅगी आणि अंडं! अंडय़ापासून तयार होणाऱ्या एकेका पदार्थावर खाबू प्रचंड खूश होऊन प्रेम करत राहिला. पण त्यातही खाबूची विशेष आवड म्हणजे अंडा भुर्जी! काही दिवसांपूर्वी फोर्ट परिसरातील एका भुर्जीच्या गाडीबद्दल खाबूने लिहिलं होतं. मग पुन्हा एकदा भुर्जीबाबतच लिहिण्याची वेळ खाबूवर का बरं आली असावी! त्याला कारण आहे, या भुर्जीचं वेगळेपण! जुन्या पदार्थामध्ये काहीतरी प्रयोग करून एकादा नवीन पदार्थ तयार करणाऱ्यांचं खाबूला मनापासून कौतुक वाटतं. त्या अर्थाने खाबू प्रचंड पुरोगामी आहे. खाबूला भुर्जीतलं हे वेगळेपण सापडलं ते गिरगावमधील एका हॉटेलमध्ये. गिरगावला ठाकूरद्वार चौकात सनशाइन नावाचं एक हॉटेल आहे. वरकरणी इराण्याच्या हॉटेलसारखं दिसणारं आणि तसंच एका कोपऱ्यावर असलेलं हे हॉटेल काही गिरगावकरांचा अगदी ठरलेला अड्डा! या हॉटेलमध्ये बॉइल्ड एग भुर्जी मिळते, असं खाबूला फ्राइड मन्यानं सांगितलं.

खरं तर फायर पान चाखल्यापासून खाबूचा फ्राइड मन्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला होता. हा माणूस काहीतरी हटके शोधून खायला घालणार, याबाबत खाबूच्या मनात कोणतीच शंका नव्हती. पण फ्राइड मन्या पडला माळरानावरच्या मोरासारखा! तो दिसावा अशी इच्छा असली की नेमका झुडुपांमध्ये लपणारा! खाबूने त्याला अनेकदा मेसेज केले, फोन करण्याचा प्रयत्न केला. पण फ्राइड मन्या गायब तो गायबच झाला होता. अखेर एका दुपारी खाबू मस्त माशांचं जेवण जेऊन मगर किंवा सुसरीप्रमाणे सुस्तावलेला असताना खाबूचा मोबाइल खणखणला. स्क्रीनवर ‘फ्राइड मन्या’ ही अक्षरं वाचून खाबूने आपल्या पापण्या बळेबळे उध्र्व दिशेला नेऊन फोन उचलला. फ्राइडने खाबूला या बॉइल्ड एग भुर्जीबद्दल सांगितलं आणि दुसऱ्या दिवशीची अपॉइण्टमेण्ट देऊन टाकली.

ठरल्याप्रमाणे खाबू चर्नी रोड स्टेशनला उतरून ठाकूरद्वार चौकाकडे चालत निघाला. आजूबाजूची भंगार विक्रीची, फर्निचरची दुकानं मागे टाकत असतानाच खाबूच्या नाकपुडय़ांचा ताबा एका घमघमाटाने घेतला. पाहतो तो, एका यंत्रातून शेंगदाणे, गूळ आणि राजगिरा यांची गरमागरम सरमिसळ होऊन एका ट्रेमध्ये पडली होती. बसलेला माणूस त्या सगळ्या गोळ्याला चिकीचा आकार देत होता. खाबूच्या तोंडाला पाणी सुटलं, पण त्याने बॉइल्ड एग भुर्जीचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत त्या चिकीकडे दुर्लक्ष केलं. ठाकूरद्वार नाक्यावरच पाठारे प्रभू समाजाची इमारत आणि हॉटेल सनशाइन दोन्ही एकमेकांकडे तोंड करून उभी आहेत. हॉटेल सनशाइनच्या दारातच फ्राइड मन्या खाबूचा इंतजार करत उभा होता.

आतमध्ये गेल्या गेल्या दोघांनी एक टेबल पटकावलं. या हॉटेलची रचना साधारण कोणत्याही उडुपी हॉटेलासारखी होती. तशीच सनमायका लावलेली आयताकृती टेबलं आणि त्यांच्यासमोर तसेच बाक, भिंतींना टांगलेले पंखे, टेबलावर ठेवलेले ग्लास सगळा तामझाम तसाच होता. फ्राइड मन्याने ऑर्डरीचा ताबा स्वत:कडे घेत एक बॉइल्ड एग भुर्जी आणि पाव मागवले. या हॉटेलात खाली बसलेल्यांना खाण्याचा आनंद लुटता येतो, तर वरच्या मजल्यावरील लोकांना खाण्याबरोबरच बीअर पिण्याचं सुखही मिळू शकतं. लोक बीअर पिऊन ‘हाय’ होण्यापेक्षा आधीच वरती बसलेली बरी, असा एक दृष्टिकोन ठेवूनच कदाचित ही बीअरची सोय वरच्या मजल्यावर केली असावी. पण त्या दिवशी चक्क फ्राइड मन्याही फक्त बॉइल्ड एग भुर्जीवर सेटल झाला होता तिथे खाबूची काय कथा!

थोडय़ाच वेळात वेटरने दोन ताटल्यांमध्ये दोन भुर्जी आणि बाजूला चार पाव आणून ठेवले. भुर्जी बनवताना कांदा-टॉमेटो वगैरेच्या त्या आदिम मिश्रणात उकडलेली अंडी तुकडे करून टाकली, तर कशी लागतील? बॉइल्ड एग भुर्जी त्याहीपेक्षा वेगळी आणि उत्तम होती. इथे त्या आदिम मिश्रणात कच्च्या अंडय़ांबरोबच ही उकडलेली अंडी एकत्र केली होती. त्या अंडय़ाच्या पांढऱ्या मऊशार कवचालाही तो मसाला व्यवस्थित लागला होता. त्यामुळे खाताना कुठेही चव फिकी पडत नव्हती. नाहीतर उकडलेलं अंडं खातानाही अंडय़ाच्या पिवळ्या बलकावर मीठ, मीरपुड कितीही टाकली, तरी ते तोंडात टाकल्यावर बाजूचं पांढरं कवच चवीत समतोल साधतं. पण इथे त्या अलौकिक मसाल्याने त्या कवचाला संधीच दिली नाही. खाबू आणि फ्राइड मन्या या दोघांनीही अक्षरश: बोटं चाटत त्या भुर्जीचा फन्ना उडवला.

दोन अंडय़ांची ही भुर्जी खाऊनही फ्राइड मन्याची भूक भागली नव्हती. मग त्याने खिमाही मागवला. इथे एक गोष्ट खाबूला मान्य करायलाच हवी. इथला खिमा काही फार अतुलनीय वगैरे नाही. त्यामुळे या हॉटेलात येऊन फक्त फ्राइड भुर्जीवर काम भागवलं तरी चालू शकेल. सोबतीला फ्राइड मन्यासारखा खादाड मित्र असला, तरच त्या खिम्याच्या वाटय़ाला जा!

ठाकूरद्वार नाक्यावरच्या त्या हॉटेलातून बाहेर पडताना खाबूने फ्राइड मन्याला कडकडून मिठी मारली. ती फक्त मैत्री खात्यात नव्हती, तर अगदी आठवण ठेवून एक वेगळाच पदार्थ खाबूला खायला घातल्याबद्दलही होती.

कुठे : हॉटेल सनशाइन

कसे जाल : चर्नी रोड स्थानकात उतरून चर्चगेटच्या दिशेकडील पुलावरून पूर्वेकडे बाहेर पडल्यानंतर सरळ चालत राहा. पाचच मिनिटांमध्ये एक सिग्नल लागेल. हाच तो ठाकूरद्वार चौक. तिथेच उजव्या हाताला हॉटेल सनशाइन दिसेल. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून जाणार असाल, तर ६६, ६९, १२६ अशी कोणतीही बस पकडून ठाकूरद्वार स्टॉपला उतरा. जवळच हॉटेल सनशाइन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:07 am

Web Title: best egg dish in mumbai
Next Stories
1 एका बिनधास्त मुलीची गोष्ट
2 टिपिकल ते कलात्मक नवरात्र फॅशनचा नवा फ्यूजन फंडा
3 यंदा ब्रेकअप आहे..!
Just Now!
X