पंकज भोसले

गेल्या काही वर्षांपासून आपल्या लोकप्रिय सिनेसंगीतामध्ये बेमालूमपणे एक बदल घडत आहे. अगदी जुन्या नाही तर मधल्या काळातील गाण्यांना नव्याने सादर केली जात आहेत. हा ट्रेण्ड आपसूक आला नाही. सुरुवातीला नव्या गाण्यांमधून मेलडी हरविल्याची तक्रार सर्वच पिढी करीत असताना बॉम्बे व्हायकिंग्ज नामक बॅण्डने रिमिक्सची सहनीय गाणी तयार केली. ‘क्या सूरत है’, ‘ओ मेरे मोना रे, मोना’पासून ‘छोड दो आँचल’, तेरा मेरा प्यार सनम’ ही हिंग्लिश भाषेतील गाणी बरीच लोकप्रिय झाली. त्यानंतर एकाच काळात जुन्या गाण्यांना रिमिक्सने नव्याने फार-फार वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा खुळनाद सुरू झाला. यामध्ये पॉप गाण्यांची एक रुजू पाहत असलेली चळवळ संपुष्टात आली आणि बॉलीवूड सिनेसंगीत भरकटलेल्या अवस्थेत बनले. मग चित्रविचित्र गाण्यांचा ट्रेण्ड सुरू झाला. मायकी मॅक्क्लेरी या प्रयोगी संगीतकाराने अभिजात बॉलीवूड गाण्यांच्या नव्या आवृत्त्या काढल्या. ‘खोया खोया चाँद’, ‘हवा हवाई’. ‘कभी कभी मेरे दिल में’ या बारटेण्डर मिक्समधील त्याच्या गाण्यांना ऐकताना रिमिक्सही श्रवणीय कसे होऊ शकते हे कळते. रिमिक्स किंवा रेट्रो म्युझिकचा ट्रेण्ड आपल्याकडे चालला आहे, तसाच जगभरामध्येही सुरू आहे. याचे पहिले कारण संगीततंत्रात कितीही श्रीमंती आली असली, तरी शब्द आणि कल्पनेमध्ये प्रचंड गरिबी आली आहे. आपल्या सिनेमांमध्येही ‘तम्मा तम्मा’ किंवा ‘हम्मा-हम्मा’सारखी मधल्याच काळातील गाणी वाजवली जात आहेत आणि एफएम रेडिओतील वाहिन्यांना अलीकडच्या श्रवणीय गीतांसाठी नव्वदीच्याच दशकाला झुकते माप द्यावे लागत आहे. इतकेच काय तर रिक्षा-टॅक्सी आणि कॅॅब-इकोमधील म्युझिक लिस्टही नव्वदच्या दशकातील गाण्यांचीच असते.

नुसता रविवारचा टोरंट किंवा फाईल शेअरिंग वेबसाइट्सचा जगभरातील डाऊनलोडिंगमधील कल पाहिला तरी १९९० ते २००० च्या गाण्यांच्या डाऊनलोड्सनाच पसंती पाहायला मिळते. प्रत्येक कलाकारांचे ‘बेस्ट ऑफ’ आणि ‘हिट्स ऑफ’ अल्बम्स सर्वाधिक मागणीचे दिसतात. असाच एक अल्बम काही दिवसांपूर्वी डाऊनलोड ट्रेंडिंगमध्ये जोमात होता. दोन हजारच्या दशकामध्ये गाजलेल्या उत्तम वीस गाण्यांना २०१८ मध्ये पुन्हा ऐकण्यासाठी एकत्रित करण्याचा तो प्रयत्न होता. डाऊनलोड केल्यानंतर यातली कित्येक गाणी आता ‘भुले बिसरे गीत’ बनल्याचे लक्षात आले. या अल्बममधील कित्येक व्हिडीओ एमटीव्हीवर २००२ सालात गाजले होते. यातले सर्वात पहिले आवडणारे गाणे होते ‘व्हॉट आय गो टू स्कूल फॉर’ हे बस्टेड या बॅण्डचे गाणे. हा बॅण्ड आपल्याकडे बॅकस्ट्रीट बॉइज किंवा बॉयझोन होऊ शकला नाही. हे गाणे सुरू असतानाच आपल्याकडे टीव्हीवर भारत सरकारतर्फे जनहितार्थ ‘स्कूल चले हम’ हे फारच सोज्ज्वळ आणि सुसंस्कृत गाणे सुरू होते. या गाण्याच्या बरोबर उलट शाळेला का जातो, याचे ‘सत्याचे प्रयोग’ गाण्यातून मांडणारे हे गाणे ऐकण्यासोबत त्यांच्या गिटारसह खास उडी मारणारे नृत्य पाहताना अनुभवणेही गंमत आहे. हा बॅण्ड २००५ नंतर वेगळा झाला. काही वर्षांपूर्वी पुन्हा एकत्र आला. पण त्यांचे कुठलेही गाणे शाळेतल्या बाईंवर लिहिलेल्या पहिल्या गाण्याइतके लोकप्रिय झाले नाही.

याच अल्बममध्ये रेझरलाइट या बॅण्डचे ‘अमेरिका’ नावाचे उत्तम गाणे आहे. हे गाणे आले त्या वेळी आपल्याकडेही सारख्याच प्रमाणामध्ये अमेरिकीकरण होत होते. चॅनलमुळे, गाण्यांमुळे, सिनेमांमुळे आणि पुस्तकांमुळेदेखील. गाण्यातील गिटार आणि चाल सारेच आवडण्यासारखे आहे. आशय भारतातीलच कुणी गीतकाराने लिहिल्यासारखा भासेल. अल्बममध्ये हनीड्रय़ू नावाचे केटी टनस्टॉल या स्कॉटिश गायिकेचेही गाणे सापडू शकते. हे गाणे आपल्याकडे कधीच लागले नव्हते. पण केटी टनस्टॉलचे ‘सडनली आय सी’ आणि ‘ब्लॅक हॉर्स अ‍ॅण्ड चेरी ट्री’ ही गाणी एमटीव्ही आणि एफएमची एक पूर्ण इंग्रजी वाहिनी असताना २००३-२००४ सालात कायम ऐकायला मिळायची. ही गायिका उत्तम गिटारवादक असून, ‘सडनली आय सी’चे कित्येक गिटार व्हर्जन यूटय़ूबवर तिच्या रांगडय़ा आवाजात पाहणे आनंददायी अनुभव ठरू शकतो. कुक या बॅण्डचे ‘शी मूव्ह्ज अन हर ऑन वे’ नावाचे आणखी एक उत्तम गाणे या बॅण्डमध्ये ओळखीचे होऊ शकते. यातील कित्येक आपल्याला माहिती नसली, तर त्याचे कारण हे सारे कलाकार ब्रिटिश आहेत. बिटल्सनंतर त्यांच्याइतकी जगभर प्रसिद्धी मिळविलेले ब्रिटिश गायक-बॅण्ड कमीच आहेत. आजही कित्येक ब्रिटिश गाणी अमेरिकी बिलबोर्ड यादीत आल्यानंतरच आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या अल्बमधील मधल्या काळातील ही सारीच गाणी कानांना सुखावण्यासाठी चांगला आणि वेगळा शोध आहे.

म्युझिक बॉक्स

Busted – What I Go To School For

Razorlight – America

The Kooks – She Moves In Her Own Way

KT Tunstall – Suddenly I See

KT Tunstall – Black Horse and the Cherry Tree

Cheryl Cole – Fight For This Love

Johnny Flynn – The Wrote & The Writ

viva@expressindia.com