गेल्या वर्षीची दिवाळी डायहार्ड शॉपिंगप्रेमींना चांगलीच लक्षात राहिली असणार. भारतात गेल्या वर्षीपासून ऑनलाइन शॉपिंगमध्ये हा एक नवीन पायंडा पाडला गेला. ऑनलाईन सवलतींचा. या फेस्टिव्ह सीझनमध्ये खरं तर पारंपरिक दुकानदार कोणतीही सवलत देत नाहीत. कारण दुकानांमधला सेल नेहमीच ‘एण्ड ऑफ सीझन’ किंवा ‘रिडक्शन सेल’ या प्रकारातला असतो. येणाऱ्या नवीन सीझनला साजेसं कलेक्शन दुकानात भरण्यासाठी आधीचा उरलेला माल खपवण्यासाठी हे सेल असतात. दिवाळीपूर्वीच नवा माल दुकानांमध्ये लागल्याने या दिवसात सेल किंवा सवलत देणं तसं शक्य नसतं. नेमक्या याच कालावधीत ऑनलाइन शॉपिंग साइट्सचा सेलोत्सव सुरू होतो.

यंदाही दसऱ्यानंतर वेगवेगळ्या शॉपिंग साइट्सनी सवलतींची पर्वणी खुली करून दिली. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन, ईबे, मिन्त्रा, जबाँग, लाइम रोड या शॉपिंग साइट्स यामध्ये आघाडीवर होत्या. यातल्या अध्र्याअधिक शॉपिंग साइट्स आता केवळ मोबाइल अ‍ॅपवरून काम करतात. ‘ईबे’ने जाहीर केलेल्या ऑनलाइन शॉपिंग ट्रेण्डनुसार कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजची खरेदी यंदा जास्त केली जातेय. त्याखालोखाल फिटनेस आणि क्रीडासाहित्याला मागणी आहे. गेल्या वर्षीच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये कॅमेरे, चष्मे, घडय़ाळं यांची ऑनलाइन खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाली होती. त्याची जागा आता कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजने घेतली आहे. ऑनलाइन संकेतस्थळावर मोठय़ा फॅशन ब्रॅण्ड्सवरही त्यामुळे हल्ली सवलत मिळते. अनेक सेलेब्रिटींनी स्वत:च्या फॅशन ब्रॅण्डची सुरुवात अशा ऑनलाइन शॉपिंग साइट्सच्या मदतीनेच केली आहे. मिन्त्राच्या ऑल अबाउट यू या कलेक्शनचं दीपिका पदुकोणने, तर आलिया भट्ट हिने जबाँगसाठी सादरीकरण केलं. त्यामुळे सेलेब्रिटी वलय प्राप्त झालेल्या ब्रॅण्डचा भाव या सणासुदीला देखील वधारेल.

ईबे इंडिया या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या चाडेचार लाख ग्राहकांपैकी ८.५ टक्के ग्राहक एकटय़ा मुंबईतले आहेत. ‘ईबे’चे विक्री आणि सेवा विभागाचे संचालक पंकज उके म्हणाले, ‘आम्ही यंदा लाउडेस्ट दिवाली एव्हर’ या नावानं सेल सुरू केला होता. आमच्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण उत्पादनं एकाच ठिकाणी अतिशय सुलभ आणि सुरक्षित प्रकारे उपलब्ध करून देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.’

‘पेटीएम’सारख्या मोबाइल कॉमर्स प्लॅटफॉर्मने या बाजारपेठेत पाऊल ठेवल्यापासून यंदाचा त्यांचा पहिलाच सेल होता. नेहमीच्या सवलतींबरोबरच त्यांनी कॅशबॅकपर्यंत अनेक फायदे ग्राहकांना दिले. सणासुदीच्या सेलदरम्यान दिला जाणारा कॅशबॅक ग्राहकांच्या थेट पेटीएम वॉलेटमध्ये जमा होतो. ग्राहकांना ही रक्कम भविष्यातील खरेदी किंवा मोबाइल/ डीटीएच रिचार्ज/ शुल्कभरणा अशा गोष्टींसाठी वापरता येईल. हा कॅशबॅक दुसऱ्या पेटीएम वॉलेटधारकाच्या खात्यात स्थलांतरही करता येईल, असं पेटीएमतर्फे सांगण्यात आलं.

टीव्हीवरची जाहिरात बघून खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टीव्हीसी शॉपिंगमध्ये नापतोल, डेन स्नॅपडील टीव्ही शॉप आदी मोठय़ा कंपन्या आहेत. त्यांनीही ऑफर्सचा वर्षांव केलाय. याबद्दल सांगताना डेन स्नॅपडील टीव्ही शॉपचे कार्यकारी प्रमुख मनीष गोयल म्हणाले की, ‘आमचं हे पदार्पणाचं वर्ष आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना शक्य तितकी सूट आणि बरोबर भेटवस्तूही देण्याचा निर्णय घेतलाय.’ फेस्टीव्ह सीझनचा फायदा घेत नवीन कंपन्या स्वत:चा जम बसवत असल्याचं यातून दिसतं.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन सोशल मीडियाचा देखील वापर केला जातो. फेसबुक, यूटय़ूबसारख्या सोशल मीडियावर अशा जाहिराती मोठय़ा प्रमाणावर दिसतात. ‘लाइम रोड’ या स्त्रियांसाठीच्या फॅशन वेबसाइटच्या संचालिका सूची मुखर्जी म्हणाल्या की, ‘आम्ही आमच्या महिला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा वापर करतो. टीव्ही हे आमच्यासाठी एक नवीन माध्यम आहे. २०१६ पर्यंत भारतात २३६ दशलक्ष इतकी मोबाइल इंटरनेटधारकांची संख्या होणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे भविष्यकाळात हा मोठा ग्राहक वर्ग टॅप करण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ एकूणच ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी देऊ केलेल्या विविध सवलती तरुण ग्राहकांना नक्कीच आकर्षित करतील असं चित्र आहे.
कोमल आचरेकर – viva.loksatta@gmail.com