शिवम गायकवाड, ओमाहा, यू.एस.ए.

ओमाहा हे अमेरिकेच्या बरोबर मध्यभागी वसलेल्या नेब्रास्का राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेलं हे शहर वनसंपदेमुळे प्रकाशझोतात आलं. तेथील खाणउद्योग एकेकाळी बहरात होता. ओमाहा हे शहर आयोवा आणि नेब्रास्का या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. आयोवामधील कौन्सिल ब्लफ्स हे त्याच्या अगदी शेजारचं शहर. या दोन शहरांच्यामधून मिजौरी नदी वाहते. एकेकाळचं दुर्लक्षित असलेलं शहर आज ‘गेटवे ऑफ द वेस्ट’ म्हणून नावारूपाला आले आहे. देशाच्या मधोमध असल्याने ओमाहाला ‘ट्रान्सपोर्ट हब ऑफ अमेरिका’ म्हटलं जातं. भारतात ओमाहाबद्दल कमी माहिती असलं तरी जाणकारांना येथे चार ‘फोर्चून ५००’ कंपन्या असल्याचं नक्की माहिती आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले वॉरेन बफे यांची ‘बर्कशायर हाथवे’, ‘किव्हीट कॉर्पोरेशन’, ‘म्युच्युअल ऑफ ओमाहा’ आणि ‘युनियन पॅसिफिक’ यांची मुख्यालयं याच शहरात आहेत.

मी मूळचा नाशिकचा. मागील वर्षी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या आवडीच्या ‘जीवशास्त्र’ विषयातील जगातील उत्तम शिक्षण देणारी ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का अ‍ॅट ओमाहा’मध्ये मला दाखला मिळाला आणि मी ‘ओमाहा’कर झालो. नाशिकसारख्या मध्यम शहरातून एकदम अमेरिकेत जाणं आणि शिकणं तसं खूप अवघड होतं. मी भारताबाहेरही पहिल्यांदाच गेलो होतो. त्यामुळे प्रचंड दडपण होतं, पण दोन महिन्यांत मी इथं रुळून गेलो. याला कारण म्हणजे शहरातील आणि विद्यापीठातील काळजी घेणारी माणसं! एक घटना सांगतो. मी नवीनच शहरात आलो होतो. काही आवश्यक वस्तू घेण्यासाठी वॉलमार्टमध्ये गेलो. कॉलेजपासून चांगल्याच लांब अंतरावर जायचं आणि ओझं घेऊन यायचं म्हणजे कठीण होतं. जाताना बसने गेलो. इथे बससव्‍‌र्हिसला मेट्रो म्हणतात. वॉलमार्टमधून खरेदी करताना उशीर झाला आणि सामानाचं चांगलंच ओझं झालं. मी लोकल टॅक्सी ठरवली. टॅक्सीचालक आफ्रिकन वंशाचा होता. माझा एकंदर अवतार बघून त्याने मी नवखा विद्यार्थी असल्याचं ओळखलं. आस्थेनं चौकशी केली. कॉलेजच्या गेटवर आल्यावर मला लक्षात आलं की आतपर्यंत सामान घेऊन जाणं अशक्य होतं. कारण गेट ते माझी खोली यात अंतर दीड किलोमीटर! त्याने हळूच गाडी वळवली आणि माझ्या होस्टेलच्या सर्वात जवळच्या गेटमधून सरळ बिल्डिंगच्या दारापर्यंत गाडी नेऊन उभी केली. एवढेच नव्हे तर सगळं सामान खोलीपर्यंत न्यायला मदत केली. त्याला वरच्या कामाचे पैसे विचारले तर त्याने घेतले नाहीच, शिवाय जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून फोननंबर देऊन गेला आणि कधीही गरज पडली तर बोलव, असं सांगितलं. विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी येतात. वेगवेगळ्या धर्माची, देशाची आणि भाषांची माणसं इथे गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांना सांभाळतात. वैयक्तिक स्पेस देतात. स्वावलंबनाचे धडे देतात. जेवण्या-खाण्याची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. गरज पडल्यास स्वत:चं अन्न बिनधास्त शेअर करतात आणि कम्युनिटी लिविंग सार्थ जगतात.

‘युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का अ‍ॅट ओमाहा’ हे अमेरिकेतील टॉप २० मानांकन असलेलं विद्यापीठ आहे. मी इथे जीवशास्त्र आणि मानसशास्त्रासह समाजशाष्टद्धr(२२९ या विषयांत पदवी शिक्षण घेतो आहे. येथील प्राध्यापक मोठय़ामोठय़ा पदांवरील नेमस्त लोक किंवा डॉक्टरेट मिळवलेले उत्तम शिक्षक आहेत. विद्यापीठाच्या विविध खेळांसाठी स्वत:च्या टीम्स आहेत. शिक्षणासोबत शारीरिक स्वास्थ्याला इथे महत्त्व दिलं जातं आणि त्यानुसार जागतिक दर्जाचं हेल्थसेंटर विद्यापीठातच आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेले उत्तम प्रतीचं खाद्य येथील मेसमध्ये मिळतं. जगभरातील विद्यार्थी असल्याने संपूर्ण जगातील विविध रेसिपीज इथे उपलब्ध असतात आणि त्या जागतिक दर्जा राखून केलेल्या असतात. त्यापुढे तारांकित हॉटेल्स फिकी पडतील इतकं चांगलं अन्न इथे मिळतं. विद्यापीठाचा परिसर इतका मोठा आहे की, अंतर्गत वाहतुकीसाठी बस-शटलसेवा विनाशुल्क उपलब्ध आहे.

ओमाहा हे शहर जुन्या आणि नव्या गोष्टी सामावून घेणारं आहे. शहराचे उत्तर, दक्षिण, ओल्ड मार्केट आणि डाउनटाऊन – नवे ओमाहा असे चार विभाग आहेत. ओल्ड मार्केट परिसरात जुन्या देखण्या इमारती असून त्या खूप चांगल्या पद्धतीने सांभाळल्या जातात. विशेष म्हणजे त्यात लोक राहतात. येथील काही दुकानं शंभर वर्षं जुनी आहेत. याच बाजारात वीकेंडला स्थानिक शेतकऱ्यांचा बाजार भरतो. हा आपल्याकडच्या आठवडी बाजारासारखा असला तरी व्यवस्था आणि स्वच्छता डोळ्यात भरते. ओमाहामध्ये दुकानं असली तरी लोकांचा कल वॉलमार्टमध्ये खरेदीकरण्याकडेच आहे. शहरापासून काही अंतरावर प्रचंड मोठय़ा आवारात हे वॉलमार्ट आहे. शब्दश: टाचणी ते उपग्रहापर्यंतच्या सर्व वस्तू इथे मिळतात. लोकांना वीकेंडला मजा करायला यायला आवडेल, असं हे ठिकाण आहे. ओमाहामधल्या प्रसिद्ध जीन लेही मॉलमध्ये जगभरातील सर्व ब्रँड्सची उत्पादनं मिळतात. इथला एपली विमानतळ देखणा आहे. शहराच्या प्रसिद्ध कार्टर लेक तलावाला लागूनच त्याची बांधणी केली आहे. या शहराचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे शहरातील अनेक उद्याने! अतिशय सुंदर पद्धतीनं तयार केलेली ही उद्याने इथल्या हॅपी-गो-लकी लोकांचे प्रतिबिंब म्हणावी लागतील! लोक त्याचा वापर छोटय़ाशा पिकनिकसाठी ते चर्चासत्रं घडवण्यासाठीही करतात. येथील बोटॅनिकल गार्डन आणि झू हे उत्तमोत्तम संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ओमाहा अमेरिकेतील महत्वाचं असं संरक्षण केंद्रही आहे. येथील ऑफट एअरफोर्स बेस अमेरिकेचा महत्वाचा असा बेस असून त्यात साडेसात हजारांहून अधिक लोक काम करतात. नेब्रास्का मेडिसिन आणि यूएनएम सेंटर ही अमेरिकेतील अत्यंत महत्वाची हॉस्पिटल्स ओमाहामध्येच आहेत. इथे विविध संशोधनंही जोरात चालतात.

ओमाहामधील लोक अतिशय शांत आहेत. बहुभाषिक संस्कृती आहे. न्यूयॉर्क आदी शहारांप्रमाणे घाईगडबड इथे अजिबात नाही. तरीही अमेरिकेतील अत्यंत महत्वाची बिझनेस हाऊसेस आहेत यावरून लोकांची उत्पादकता सहज लक्षात येईल. शुक्रवार दुपार ते रविवार उत्तररात्र हे लोक आयुष्य जगतात. स्थानिक ऑपेरा, नाटक, उत्तम वाचनालयं, उद्यानं आणि शॉपिंग सेंटर्समध्ये कुटुंबासह आवर्जून जातात. सर्वप्रकारची उपहारगृहे असल्याने जगभरातील रेसिपीज चाखता येतात. येथे आयरिश, हिस्पॅनिक, आफ्रिकन, नेटिव्ह अमेरिकन यांच्यासह जगभरातील लोक आहेत, पण सामाजिक वातावरण छान आहे. मुलं पंधराव्या वर्षांपासून स्वतंत्र होतात. शिक्षणासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेतात. तरुण प्रचंड मेहनत करतात. काम तिथे कामच आणि मजा तेव्हा मजा अशी त्यांची प्रवृत्ती असते. इथलं शिक्षण महाग असल्याने त्यासाठीची रक्कम शाळेच्या पॉकेटमनीपासूनच सेव्ह करण्याची त्यांची सवय असते. स्वत: कमावतात आणि त्यात भर घालत राहतात. अमेरिकेतील मुलं आणि तरुण कसे असतात, हे भारतात असताना जे ऐकलं होतं, त्याच्या अगदी विरुद्ध ती आहेत. कमालीची जबाबदार आणि वेळेला किंमत देणारी आणि तरीही उत्तम आयुष्य जगणारी पिढी मी सध्या पाहतोय.

मी सुरुवातीला शिकागोला उतरून काही काळ आयोवा स्टेटमध्ये राहून ओमाहामध्ये थेट कॉलेज सुरू होण्याच्या आदल्या दिवशी येणार होतो. मधला काळ पंधरा दिवसांचा होता. काही कारणांमुळे आयोवामधील मुक्काम रद्द करून निघालो. मी एक काऊचसर्फर आहे. आयत्या वेळेला तेथील एका अमेरिकन व्यक्तीला विनंती केली आणि दोन-तीन दिवस राहता येईल का?, असं विचारलं. त्याने होकार दिला. तो एक अतिशय मोठय़ा हुद्दय़ावरील नेव्ही अधिकारी आहे. माझी अडचण त्याने समजून घेऊन अगदी कॉलेज सुरू होईपर्यंत घरात ठेवून घेतलं. वेळच्यावेळी जेवणखाण ठेवून डय़ुटी केली. मला हवं-नको ते पाहिलं. आता या कुटुंबाचा सदस्य होण्याइतका जिव्हाळा निर्माण झाला आहे. दोन-चार दिवस संपर्क नसला तर हॉस्टेलपर्यंत येऊन चौकशी करतात. सुट्टीच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. अगदी जणू दुसरं कुटुंबच आहे हे माझं! ओमाहामध्ये भारतीय खूप आहेत. येथील बँकिंग आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांत चांगल्या हुद्दय़ांवर ते काम करतात. भारतीय किराणा दुकानं इथे आहेत. एका खूप सुंदर मंदिरात वेगवेगळे उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होतात. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मीही स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं. अमेरिकेतील लोकांबाबत साधारणपणे ज्या नकारात्मक गोष्टी आपल्याकडे बोलल्या जातात, तसं वातावरण मला ओमाहामध्ये अजिबात दिसलेलं नाही. अमेरिकेत गेलेला माणूस तिकडचाच का होतो?, हा अनेकदा मला पडलेला प्रश्न होता. इथे आल्यावर आणि इथे राहिल्यावर त्याचं उत्तर मला मिळालं.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com