विराज हर्डीकर, सिअ‍ॅटल, यू. एस. ए.

अमेरिकेतील माझ्या वास्तव्याला सहा वर्ष२ झाली आहेत. एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरीनिमित्ताने जवळपास वर्षभर मी सिअ‍ॅटलला राहतो आहे. इथे आल्यावर काही वेळा कळत-नकळत आधी राहायचो त्या कॅलिफोर्नियाशी याची तुलना व्हायची आणि अजूनही होते कधीकधी. मी राहायचो सॅन होजेमध्ये आणि नोकरीसाठी जायचो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. कॅलिफोर्नियात जागा मुबलक प्रमाणात असल्याने सगळं सुटसुटीत असतं. कुठे जायचं झाल्यास स्वत:चं वाहान असलेलं उत्तम. मोठय़ा शहरांत तुलनेनं सार्वजनिक वाहतुकीची सोय अधिक चांगली असते. सिअ‍ॅटलमध्ये राहणीमानावरचा खर्च तुलनेने खूप कमी आहे. कॅलिफोर्नियातलं हवामान अमेरिकेतील चांगलं हवामान म्हणून गणलं जातं. तर सिअ‍ॅटलमध्ये हिवाळ्यात कायम मळभ आलेलं असतं. आठवडा उलटला तरी सूर्यच दिसत नाही काही वेळा. त्याउलट कॅलिफोर्नियात कितीही थंडी असली तरी सूर्य दिसायचा. सॅन फ्रान्सिस्को आणि सिअ‍ॅटल या दोन्ही ठिकाणी तरुणाईची संख्या अधिक्यानं जाणवते. कारण या शहरांना स्वत:चा एक ताल, लय आणि वेग आहे. अशा काही गोष्टींमुळे कधी वाटतं की, मी तिकडेच आहे आणि काही गोष्टींतला विरोधाभास जाणवतो.

वेस्ट आणि ईस्ट कोस्टच्या राज्यांच्या विचार करता ती डेमोक्रॅट पक्षाकडे कल असणारी आहेत. त्यांना ब्ल्यू स्टेटस् असं म्हणतात. इथल्या लोकांची विचार करण्याची वृत्ती, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन, संपत्तीच्या वर्गीकरणाबद्दलची मतं या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सारख्या असतात. इथली तरुणाई उदारमतवादी, मोकळ्या विचारसरणीची आहे. आपल्याकडे भारतात आणि इथे राहणाऱ्या भारतीयांमध्येही जीवनातल्या शिक्षण या पैलूला खूपच महत्त्व असतं. ‘शिक्षणाने खूप गोष्टी साध्य होऊ  शकतात,’ असा जणू कानमंत्र आपल्याला दिला जातो. इथे पिढय़ा न् पिढय़ा घरांत सुबत्ता आणि ऐषारामाचं जीवनमान आहे. त्यामुळे ज्यांना खरोखरच शिक्षणाची आवड असते, तेच शिकतात. पुढे नोकरीबाबतीत तेच होतं. आवश्यक तेवढंच काम केलं जातं. इथल्या राहणीमानावर होणारा खर्च लक्षात घेता हॉटेलिंग, पर्यटन, मनोरंजन अशा गोष्टींवर खर्च करणं अनेकांना शक्य होतं. इथं महाग आहे तो वैद्यकीय आणि शिक्षणक्षेत्राचा खर्च. मात्र कोणत्याही कामाला कमी न लेखता, कोणतंही काम हे कामच असतं, एवढंच लक्षात घेतलं जातं. शिक्षण घेणारी मुलं उपजीविकेचा एक स्रोत म्हणून छोटा-मोठा जॉब करतात.

मी पाच वर्षांपूर्वी एका नामांकित कंपनीत इंटर्नशिप करत होतो. आम्हा इंटर्न्‍सशी होणाऱ्या गप्पांमध्ये आमच्याविषयी जाणून घेतलं जायचं आणि त्या त्या सहकाऱ्यांविषयीही त्या ओघात कळायचं. एका ज्येष्ठ सहकाऱ्याशी गप्पा सुरू होत्या. तेव्हा त्या कंपनीचा इतिहास, त्यांच्या स्वत:च्या करिअरची सुरुवात असे निरनिराळे यशाचे टप्पे त्यांनी सांगितले, ते माझ्या अजूनही लक्षात राहिलं आहे. इथे सर्वसाधारण एक चित्र असं दिसतं की, नोकरीसाठी जागा जास्त आणि त्यासाठी अर्ज करणारे उमेदवार कमी आहेत. आपल्याकडे साधारण उलटं चित्र दिसतं. शिवाय शिक्षणाचा मुद्दाही येतोच. त्याच कंपनीतील एका ज्येष्ठ महिला सहकाऱ्यांशी बोलताना कळलं, त्या मुळात आशियायी देशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये संगीत शिकवत होत्या. लग्नानंतर इथे आल्यावर त्या सॉफ्टवेअर क्षेत्रात काम शिकून घेऊन ते करू लागल्या. आता त्या सिनीअर इंजिनीअर आहेत. मला त्यांचं फारच कौतुक वाटलं. ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनांचं नातं अधोरेखित करणारा हा देश आहे.

अमेरिकन माणसं भेटल्यावर हाय-हॅलो असं ग्रीट करतात, पण त्यापलीकडे जाऊन आपली आपुलकीने चौकशी वगैरे करण्याचा त्यांचा हेतू नसतो. तो केवळ त्यांच्या एटीकेट्सचा एक भाग असतो. इथल्या सगळ्या मोठय़ा शहरांत जगभरातले लोक असल्यामुळे त्यांच्याशी बोलताना शक्यतो राजकारण, धर्म, जातिभेद आदी गोष्टींवर चर्चा करायची नाही, असा जणू अलिखित नियम असतो. त्यामुळे स्पोर्ट्स, छंद, फिरस्ती याच गोष्टींवर गप्पा जास्ती रंगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत तरुणाईला राजकारणात रस नव्हता. तरुणाईने केलेलं मतदान हे फक्त ३० ते ३५ टक्के२ होतं. फारच उदासीनता होती. मात्र पर्यावरणाशी संबंधित काही नियमांमध्ये होणारे अनाकलनीय बदल, काही सामाजिक चळवळींचं पसरतं लोण आणि एकूणच भोवतालच्या घडामोडी यामुळे तरुणाईत थोडीशी का होईना, पण सजगता वाढली आहे.

इथे सतत मळभ असल्यामुळे बऱ्याचदा मनावर नैराश्याचं सावट येऊ  शकतं. ते येऊ  नये, म्हणून सिअ‍ॅटलमधले लोक स्वत:ला सतत व्यग्र ठेवायचा प्रयत्न करतात. आपल्याला आनंद देतील, अशा गोष्टी करतात. जवळपास सगळ्यांकडेच कुत्रे किंवा मांजरं, त्यातही कुत्रेच मुख्यत: असतात. अगदी ऑफिसमध्येही कुत्रे आणायला काही नियम व अटी पाळल्यास परवानगी असते. त्यांच्यासाठी सगळ्या सोयी असतात. मला स्वत:ला कुत्रे आवडतात. आम्हीही कुत्रा पाळायचा विचार करतो आहोत. याचा एक किस्सा आठवला, तो सांगतो. एकदा ऑफिसमध्ये काम करताना सायबेरियन हस्की जातीचा पांढऱ्या रंगाचा कुत्रा माझ्या शेजारी येऊन बसला. सहज माझं लक्ष गेल्यावर बघितलं तर हे पांढरं धूड काय दिसतंय, असं वाटून थोडासा दचकलोच होतो. त्याला अर्थातच माझ्या दचकण्याचा सुगावा लागला नाही. काही क्षणांनी तो स्वत:च्याच धुनकीत निघून गेला. इथली फिटनेस संस्कृती अगदी दखल घेण्याजोगी आहे. खूप थंडी असल्याने लोक इनडोअर राहातात. त्यामुळे आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने कटाक्षानं काळजी घ्यावीच लागते. ठिकठिकाणी स्टारबक्ससारखी कॉफीशॉप आणि जिम अशी जोडगोळी दिसतेच. मीही इथे आल्यापासून जिम जॉईन केलं आहे. भारतीयांची संख्या अधिक असल्याने भारतीय पदार्थ आणि वस्तू इथे सहजी उपलब्ध होतात. महाराष्ट्र मंडळात वीकएण्डचा मोका साधून सगळे सणवार साजरे होतात. कॅलिफोर्नियात असताना स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटीतील होळीच्या सेलिब्रेशनला जायची संधी मिळाली होती. तेव्हा खूप धम्माल केली होती. माझा कॅलिफोर्नियातला बराचसा भाग फिरून झाला आहे. शिकागोलाही गेलो होतो. न्यू यॉर्कला गेलो होतो, तेव्हा मित्राने काळजीपूर्वक वावरण्याचा सल्ला दिला होता. कारण आपण शिस्तीचं पालन केलं तरी काही वेळा लोक धक्का मारून पुढं जातात. कुणाला वेळच नसतो. तिथल्या सबवेमध्ये बेधडक धक्क्याचा अनुभव गाठीशी जमा झालाच.. तेव्हा मुंबईची आठवण आल्याखेरीज राहिली नाही. टाइम्स स्क्वेअर हा पर्यटकांचा मोठाच आकर्षणबिंदू आहे. ऐन मध्यरात्रीही तिथे पर्यटकांची यथास्थित गर्दी होती. ९-११च्या अतिरेकी हल्ल्यानंतर बांधण्यात आलेलं स्मारकही पाहिलं. त्यानंतर सगळीकडची सुरक्षाव्यवस्था अतिशय चोख ठेवण्यात आली आहे.

मी आणि माझी बायको गायत्री बफेलो शहरातील नायगारा फॉल्सला गेलो होतो ती ट्रिप अगदी लक्षात राहण्यासारखी झाली. निसर्गातील या अफाट आश्चर्यापुढे आपण नि:शब्द होतो. अनेकांनी हा नायगारा फॉल्स टीव्ही किंवा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलेला असतो. तसा मीही तो पाहिला होता. पण याचि देही, याचि डोळा नायगारा फॉल्स पाहतानाचा क्षण अगदी अविस्मरणीय होता. या धबधब्याचा हॉर्स शू फॉल्स हा भाग कॅनडाच्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा भाग म्हणजे अमेरिकन फॉल्स. ‘मेड ऑफ द मिस्ट टूर’ नावाची ही बोट नायगाराची सफर घडवते. तिकीट काढायचं आणि रेनकोट अंगावर चढवायचा आणि या बोटीत डेकवर जाऊ न उभं राहायचं. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचं. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजून जातो. ‘केव्ह ऑफ द विंड्स’ या ठिकाणाहूनही रेनकोट अंगावर चढवून नायगारा धबधबा अगदी जवळून न्याहाळता येतो. थोडंसं पाणी पडलं तरी पाठीवर पाण्याचा जोरात सपकारा बसल्यासारखं वाटतं. तिथे आम्हाला इंद्रधनुष्यही दिसलं होतं. आता आमच्या घरचे आल्यावर त्यांनाही नायगाराला घेऊन जायचंच, असं पक्कं ठरवलं आहे. या सफारीतला धोका लक्षात घेऊन पर्यटकांची व्यवस्थित काळजीही घेतली जाते. आमच्या घरातून ऐटदार भासणारा माऊंट रेनीअर हा पर्वत दिसतो. कॅ स्केड माऊंटन रेंजमधला सगळ्यात उंच पर्वत म्हणजे माऊंट रेनीअर हा वॉशिंग्टन स्टेटमध्ये असून तो सिअ‍ॅटलच्या स्कायलाइनचा जणू एखादा दागिनाच आहे. त्याच्याकडे पाहून आपण माणसं त्या अर्थाने निसर्गापुढं किती खुजी आहेत, हे नेहमीच अधोरेखित होतं.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com