ठरवून चांदीचेच दागिने घडवणं आणि त्याद्वारे करिअरला चंदेरी झळाळी आणणं ही गोष्ट प्रयत्नसाध्य करत त्यातली कलादृष्टी जपणारी ‘कल्ला’कार आहे ज्वेलरी डिझायनर आणि ‘क्वर्कस्मिथ’ची संस्थापक दिव्या बत्रा.

त्याच त्या पारंपरिक दागिन्यांपेक्षा वेगळं काही तरी म्हणून नेहमीच एखाद्या स्टेटमेंट पीसकडे पाहिलं जातं. पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांपेक्षा चांदीला अधिक प्राधान्य दिलं जातं. अनेकदा ‘दागिने’ म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्याकडे ‘अ‍ॅक्सेसरीज’ म्हणूनच पाहिलं जातं. अलीकडे चांदीचे दागिने घडवणाऱ्यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होते आहे. त्यापैकीच फॉर्मलपासून ते पार्टीवेअपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर सहज शोभून दिसणाऱ्या चांदीच्या अ‍ॅक्सेसरीज बनवणारा एक ‘ब्रॅण्ड’ आहे ‘क्वर्कस्मिथ.’ प्रज्ञा आणि दिव्या बत्रा या बहिणींच्या जोडगोळीने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या ब्रॅण्डला स्वरा भास्कर, सोना मोहापात्रा, तापसी पन्नू यांच्यासारख्या ‘सेलेब्रिटीं’नी आणि शेरी श्रॉफ या प्रसिद्ध ब्लॉगरने नावाजलं आहे. हा ब्रॅण्ड दोघा बहिणींचा असला तरी त्याअंतर्गत आपल्या सर्जनशीलतेने, कल्पकतेने हे चांदीचे अफलातून दागिने घडवणारी किमयागार आहे ती दिव्या..

लहानपणापासूनच दिव्या आणि प्रज्ञा या दोघींनाही मनाप्रमाणे करिअर घडवण्याची मुभा घरातूनच मिळाली होती. दिव्याला दहावीत चांगले गुण मिळाल्यावर प्रथेप्रमाणे इंजिनीयरिंगचा आग्रह न धरता तिला हव्या त्या ठिकाणी, म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश घ्यायला घरच्यांकडून प्रोत्साहनच मिळालं. तिने त्या वेळी ज्वेलरी डिझायनिंग हा मुख्य विषय घेतला होता. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी तिने स्वत:ला अष्टपैलू म्हणून सिद्ध करत सुवर्णपदक पटकावलं. दिव्याला या क्षेत्रातच स्वत:चं प्रोफेशन आणि करिअर घडवायचं होतं. मात्र त्याची सुरुवात शिक्षण संपल्यानंतर आधी अनुभव घेण्यातून झाली. दिव्याने २००४ ते २००८ या कालावधीत ‘आम्रपाली’ ब्रॅण्डसोबत काम केले. हे काम करत असताना तिला चांदीचे दागिने घडवण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी जवळून पाहायला मिळाली आणि तिथूनच तिच्या ‘रजतप्रेमा’ला सुरुवात झाली. त्यानंतर तिने तिथेच सोनं आणि हिऱ्यांमध्येही दागिने घडवण्याचा अनुभव घेतला, मात्र तिचं चांदीच्या दागिन्यांवर जडलेलं प्रेम काही कमी झालं नाही. त्यामुळे आपली सर्जनशीलता चांदीच्या दागिन्यांसाठीच पणाला लावायची आणि त्यातच करियर घडवायचं असं दिव्याने ठरवलं. दिव्या सांगते की, ‘जुन्या होत चाललेल्या चांदीच्या दागिन्यांना येणारा ऑक्सिडाइज्ड रंग हा त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. माझ्या आईचे जुन्या पद्धतीचे चांदीचे दागिने माझ्याकडे अजूनही आहेत आणि ते मी वापरते. चांदी हा सहज मिळणारा धातू आहे, यापेक्षाही त्याच्या अ‍ॅक्सेसरीज कोणत्याही रंगावर खुलून दिसतात हा मला आवडणारा चांदीच्या बाबतीतला सर्वात महत्त्वाचा भाग. या सगळ्या कारणांपलीकडे मला स्वत:ला चांदीच्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल असलेलं प्रचंड कौतुक आणि चांदीचे दागिने घडवण्याबद्दलचा अनुभव या दोन गोष्टींमुळं मी माझ्या पॅशनसाठी ‘चांदी’चीच निवड केली’.

दागिने घडवणारे आजघडीला अनेक जण आहेत. दिव्याचे दागिने, तिचा ब्रॅण्ड लोकप्रिय होण्यामागचं नेमकं कारण काय?, हे शोधायचं असेल तर तिने घडवलेल्या दागिन्यांवरून नजर टाकायलाच हवी. दागिन्यांची रचना, घडण आणि आपल्या ब्रॅण्डचं मार्केटिंग या दोन्हींतली ‘कल्पकता’ हे एकमेव कारण त्यांच्या यशामागे आहे हे लक्षात येईल. नोजपिन, अंगठी आणि कानातले हे दागिन्यांचे मूळ माहीत असलेले प्रकार. पण नोजपिन्स करतानाही त्यात जे वैविध्य दिव्याने उपलब्ध करून दिले आहे त्याला (पान ३ वर) (पान १ वरून) तोड नाही. शिवाय या प्रकारांबरोबर साडीवरचे ब्रोच असतात तसे पण वेगवेगळी टॅगलाइन चितारलेले ब्रोच, कानातले हे आजच्या पिढीसाठी स्टाइल स्टेटमेंट ठरले आहेत. ‘नखरेवाली’, ‘मुसाफिर हूं यारो’ हे शब्द कोरलेले ब्रोच जीन्सला लावून किंवा ते लिहिलेली अंगठी बोटात घालून टेचात मिरवण्याचा मोह कोणाला आवरला नाही तरच नवल!

दागिने त्यांच्या धातूइतकेच चोखले जातात त्यांची घडण आणि डिझाइन्ससाठी. त्यासाठी लागतो एक ध्यास, अभ्यास आणि बारकाईने निरीक्षण करण्याची वृत्ती. त्याबद्दल दिव्या सांगते की, ‘काही गोष्टी आपण लहानपणापासून बघत आलेल्या असतो. त्या काळातील क्षणांची नोंद नकळतपणे कुठे तरी होत असते. आणि ती डिझाइन्स रेखाटताना प्रत्यक्षात येते कधी कधी.. कोणत्याही कलेच्या प्रेरणेसाठी निसर्गाहून सुंदर गोष्ट नाही. निसर्गातल्या वेली, पानं, फुलं अशा सगळ्या गोष्टी वापरूनच माझी डिझाइन्स तयार होतात. तसंच लहानपणापासून मी हिंदी कविता, साहित्य यांच्या सहवासात वाढले आहे, वडिलांकडून सुफी साहित्य ऐकत मोठी झाले आहे. गुलजारांच्या कविता मला नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. याच सगळ्यावरून प्रेरणा घेऊन आमचं ‘अक्षर’ हे कलेक्शन अवतरलं आहे. यात ‘जोगन’, ‘मुसाफिर’, ‘कमली’ अशा अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे.’ दिव्याने डिझाइन केल्यानंतर प्रत्यक्ष दागिने घडवण्याची कारागिरी जयपूरमध्ये केली जाते. ही प्रक्रिया कशी सुरू झाली याची माहिती देताना दिव्याने सुरुवातीच्या काळात दागिने घडवण्यासाठी एका कारागिरासोबत सात ते आठ वर्ष काम केल्याचं सांगितलं. त्यांची मदत ही ‘क्वर्कस्मिथ’च्या उभारणीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यांच्यामार्फतच इतर कारागिरांपर्यंत पोहोचता आलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘क्वर्कस्मिथ’ची आजची कारागिरांची ‘टीम’ तयार झाली, असं ती म्हणते.

दागिने नुसते तयार केले म्हणून होत नाही. ते प्रत्यक्ष मार्के टमध्ये पोहोचवणं हा कुठल्याही ब्रॅण्डसाठी फार महत्त्वाचा भाग असतो. इथे दिव्याच्या या ‘कलाकारी’ स्वप्नाला साथ मिळाली ती सख्खी बहीण अर्थात प्रज्ञाची! प्रज्ञाने आयआयटी दिल्लीतून बायोकेमिकल इंजिनीयरिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर सिंगापूर येथून एम.बी.ए.ची पदवी घेतली आहे. प्रज्ञाने या व्यवसायाची जाहिरात, व्यवहार, ग्राहकसंबंध, आर्थिक बाबी आदी सगळ्याच बाजूंची जबाबदारी उचलली आणि ‘क्वर्कस्मिथ’ने आकार घ्यायला सुरुवात केली, असं दिव्या सांगते. या दोघींमधली केमिस्ट्रीही ब्रॅण्ड पुढे नेण्यासाठी फोयदेशीर ठरली. दिव्याच्या या कलाकारीचं कौतुक करताना आणि ब्रॅण्ड पुढे नेतानाचा अनुभव सांगताना प्रज्ञा म्हणते की ब्रॅण्ड एकच असला तरी आमच्या दोघींची क्षेत्रं वेगवेगळी होती. त्यामुळे कमीत कमी वाद आणि अधिकाधिक काम हे आपोआप साध्य झालं. बहिणी असल्याने एकमेकींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ  शकतो आणि एकमेकींचा आपापल्या क्षेत्रातला अधिकार मान्य करू शकतो. कारागिरांपासून ते डिझाइन्सपर्यंत सगळ्या क्षेत्रांत दिव्याचा शब्द हा काळ्या दगडावरची रेघ असते आणि आर्थिक बाबींसह व्यवस्थापनच्या बाबतीत मी निर्णय घेते. त्यामुळे एकमेकींसोबत काम करण्याचा आनंद अधिक मिळतो,’ असं प्रज्ञाने सांगितलं.

‘क्वर्कस्मिथ’ हा खऱ्या अर्थाने या काळाची कास धरून पुढे आलेला ब्रॅण्ड आहे हे केवळ त्यांच्या दागिन्यांवरूनच नाही तर त्यांच्या मार्केटिंगच्या फंडय़ांवरूनही सहज लक्षात येतं. त्यांचा व्यवसाय हा केवळ सोशल मीडिया आणि त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटवरून होतो, म्हणजेच पूर्णपणे ‘ऑनलाइन’ व्यवसाय चालवला जातो. ‘आमची कुठेही शाखा नाही’ ही पाटी या दोघी अभिमानाने मिरवतात. ‘क्वर्कस्मिथ’ची कोणत्याही प्रकारची दुकाने नाहीत आणि कोणत्याही दुकानांमधून त्यांच्या अ‍ॅक्सेसरीजची विक्री होत नाही. अधूनमधून दिव्या आणि प्रज्ञा बत्रा आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने देशभरात ‘पब्लिक पॉप-अप्स’ करतात. अद्याप त्याचा बहुतांशी व्यवसाय भारतातच असून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय करण्याचं दिव्याचं स्वप्नं आहे. ‘क्वर्कस्मिथ’ हे एक स्टाइल स्टेटमेंट बनावं, अशी या जोडगोळीची इच्छा असून तेच त्यांचं ध्येय आहे. ‘क्वर्कस्मिथ’च्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा हा एक नावीन्यपूर्ण आणि महत्त्वाचा भाग म्हणून लवकरच त्यांचा एक विशेष प्रोमो प्रकाशित करण्यात येणार आहे. दिव्याच्या म्हणजेच पर्यायाने ‘क्वर्क स्मिथ’च्या या कलात्मक चंदेरी वाटचालीसाठी ‘टीम व्हिवा’तर्फे शुभेच्छा!

 

सिल्व्हर इज लाइक अ फाइन वाइन. वाइन जशी जितकी जुनी होते तितकी चवदार लागते. तसंच काळ पुढे जात राहतो तसतशी चांदी अधिकाधिक सुंदर दिसायला लागते.’

 -दिव्या बत्रा, संस्थापक, क्वर्कस्मिथ