बर्लिनच्या या जगात क्रिएटिव्हिटीला वाव आणि भाव आहे. अनेक तरुण आर्ट, म्युझिक, नृत्यसारख्या विषयांत काम करण्यासाठी किंवा या क्षेत्रात स्वतचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी इथे येतात. समकालीन  तसेच आधुनिक कलेमध्ये इथल्या तरुणाईला रस आहे. इथे अनेक प्रस्थापित म्युझियम्सबरोबर ठिकठिकाणी असंख्य आर्ट गॅलरी पाहायला मिळतात. इथला फिल्म फेस्टिवल जगप्रसिद्ध आहे.

बर्लिन.. जर्मनीची राजधानी म्हणून लोकांना परिचित शहर. हिटलर, दुसरे महायुद्ध, बर्लिनची भिंत असे अनेक हॅशटॅग बर्लिनला लावले जातात.  पण सध्याचे बर्लिन एक अत्यंत डायनॅमिक शहर आहे आणि त्याचे श्रेय जाते इथल्या तरुणाईला. बर्लिनची तरुणमंडळी म्हणजे फक्त जर्मन नाही तर अनेक देश, प्रांतातून शिकायला आलेली, नोकरीच्यानिमित्ताने शहरात स्थायिक झालेली. बर्लिनच्या गतकाळाशी त्यांचा संबंध फारसा नाही. बर्लिनची मॉडर्न प्रतिमा त्यांच्यादृष्टीने महत्वाची. अर्थात बर्लिनची अशी प्रतिमा बनण्यासाठीही तरुणाईही बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहे. १८-१९व्या शतकात प्रशियन साम्राज्याची राजधानी असणारे बर्लिन पहिल्या आणि विशेषत दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाले; दुसऱ्या महायुद्धानंतर जवळपास ४५ वष्रे विभागलेले राहिले. एके काळी औद्योगिक आणि त्याचबरोबर एक मॉडर्न शहर म्हणून दिमाखात मिरवलेले हे शहर!  पण दुसऱ्या महायुद्धानंतर शहरातील लोक स्वतला आणि कुटुंबाला सावरण्याच्या विवंचनेत बुडून गेले. शहराच्या मधोमध असलेली भिंत आणि त्यामुळे स्वतच्याच माणसांमध्ये निर्माण झालेला दुरावा बर्लिनने अनुभवला, पण त्याचबरोबर भीतीचे एक सावटही टिकून राहिले.

१९८९मध्ये जेव्हा भिंत पडली तेव्हा शहराने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली. नवीन लोक शहरात येऊ लागले. नवनव्या वस्ती झाल्या.  या नव्या बर्लिनमध्ये महत्व आहे स्वातंत्र्य आणि एन्जॉयमेंटला. मग ते विविध रेस्टॉरंट्स, बार, क्लब्जमधले सेलिब्रेशन असो किंवा थिएटर,  सिनेमागृहे असो, तरुणमंडळींचा ओढा याकडे दिसतो. यामुळेच असेल पण बर्लिनचे नाईटलाईफ प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे पिंगपॉंग बार (टेबल टेनिसचा एक वेगळा प्रकार, जो या बारमध्ये खेळला जातो), अंडरग्राऊंड  बार( इमारतींच्या तळघरातील बार), खास आर्टस्ट्सिसाठी असणारे बार आणि कॅफे इथे बघायला मिळतात. परफॉìमग आर्टसमध्ये नाटके, सिनेमे याबरोबरच बर्लिन फिलहार्मोनीचा ऑर्केस्ट्रा तसेच ’कोमिश ऑपेर’ चा ऑपेरासुद्धा लोकप्रिय आहे.  सालसा असो किंवा बॅले, टेक्नो वा हिपहॉप, जॅझ किंवा ८०च्या दशकातली गाणी, सर्व नृत्य, गाण्यांचे अनेक प्रकार इथे दिसतात.

इथले अजून एक विशेष म्हणजे  ‘अल्टरनेटीव्ह’ चळवळ. ही काहीशी बंडखोर प्रवृत्ती इथे आढळून येते. ग्राफिटी हे व्यक्त होण्याचे एक माध्यम असले तरी त्याचबरोबर वेगवेगळ्या फेस्टिवल्स, किंवा हेरिटेज वॉकसारख्या गोष्टींमध्येही ही अल्टरनेटीव्ह चळवळ दिसून येते. मेडेसेलेब्रेशन हा असाच एक प्रसंग, ज्यात परेड, पार्टी, लाईव्ह म्युझिक या माध्यमातून तरुणाईची िझग पाहायला मिळते. सांस्कृतिक बहुलतेचा पुरस्कार करणारा ‘काíनवल ऑफ कल्चर्स’ फेस्टिवल, समिलगी विचारांशी व हक्कांशी संबंधित गे परेड सारख्या परेड्स इथे आयोजित केल्या जातात. एकूणच इथली तरुण मंडळी खुल्या विचारांची आहेत असे जाणवते.

साधारण बर्लिनर तरुण मंडळी पालकांपासून स्वतंत्र राहणारी. शालेय शिक्षणानंतर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश करताना ते घराबाहेर पडतात. आपल्या गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेंड सोबत राहण्यात काही वावगं नाही, हे समाजमान्यच आहे. त्यामुळे लग्न करायचं का हा निर्णय स्र्वस्व त्या जोडप्यांचाच. शिवाय समाजात त्यांनी व्यक्त कसे व्हावे यातही बंधने नाहीत. धार्मिक पाश्र्वभूमीबद्दलही म्हणायचे तर बर्लिनर फारसे धार्मिक नाहीत. पण अनेकांना आपल्या आप्तेष्टांबरोबर सण साजरे करायला आवडतात. या बर्लिनचे प्रतीक आहे ‘बर्लिन  बेअर’. वेगवेगळ्या  रूपात ते आपल्याला बर्लिनच्या रस्त्यांवर आढळते.  बर्लिनची  अजून एक ओळख म्हणजे अ‍ॅम्पलमॅन – ट्रॅफिक सिग्नलवर दिसणारा माणूस – आता बर्लिनचा ब्रँड झाला आहे. बर्लिनमध्ये ठराविकच फॅशनचा अट्टाहास नाही. साधारण अघळपघळ कपडे घालूनही इथल्या लोकांमध्ये आपण फिट बसू शकतो. फिटनेसकडे इथल्या लोकांचा ओढा आहे,  पण खाण्याची आवडदेखील आहे. मांसाहारी पदार्थाबरोबरच कॉफी , केक, पेस्ट्री,  ब्रेडचे विविध प्रकार इत्यादी गोष्टी लोकांच्या आवडीच्या! मुंबईच्या वडापावसारखीच बर्लिनर करीवूर्स्टही इथे टपरीवर सहज मिळणारी लोकप्रिय डिश. करीसॉसमध्ये घोळवलेले सॉसेज ब्रेडमध्ये टाकून आवडीने खाल्ले जातात. डोनर कबाब या तुíकश/ अरेबिक प्रकाराला इथे मागणी आहे.  पण  त्याचबरोबर मेक्सिकन, अमेरिकन, फ्रेंच, इटालियन, व्हिएतनामी, थाई, चायनीज, जपानी,  कोरियन तसेच भारतीय जेवणाला तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो. संध्याकाळचे जेवण इथे तसे लवकरच,  साधारण ६ ते ७ च्यादरम्यान, पार्टी मात्र रात्र- रात्र चालतात. मद्यपान हा जेवणाचा भाग असल्याने जेवणात तर दारूचा समावेश असतोच,  पण खास दारू पिण्याच्या निमित्ताने भेटणेही सहज आढळते. जर्मनीतील  इतर शहरांप्रमाणेच बिअर हे इथलेदेखील आवडते मद्य!

युरोपातील इतर शहरांप्रमाणेच बर्लिनची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था उत्तम आहे आणि इतर शहरांच्या तुलनेत अजूनही स्वस्त आहे. बर्लिनमध्ये सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणारयांची संख्या मोठी आहे. तरुणांकडे गाड्या असतात त्या सहसा वीकएंड ट्रिप्ससाठी वापरल्या जातात. सायकल इथे पॉप्युलर आहे. थंडीतसुद्धा हौशीने सायकल चालवणारे बरेच लोक आढळतात. ऑक्टोबर ते मार्च थंडीचा सीझन. ऐन थंडीत कधीकधी तापमान – २० डिग्रीपर्यंत खाली जाऊ शकते. अंधारही ४ वाजताच पडतो.  याबद्दल सहसा तक्रार ऐकायला मिळाली तरी बर्लिनच्या चौका- चौकात असंख्य इव्हेंट्स सतत सुरू असतात. अर्थातच उन्हाळ्यात तापमान २० डिग्रीच्यावर गेले की अनेक बर्लिनर आपल्याला नदीकाठावर अथवा पार्क्‍स, गार्डन्समध्ये भेटतात.  काही बिअर पीत,  काही नुसतेच आपल्या मित्रांबरोबर सूर्यप्रकाशाची मजा घेत पहुडलेले,  काही धावणारे, व्यायाम करणारे दिसतात.  बर्लिनमध्ये असणारे अनेक तरण- तलाव या काळात भरून जातात. बर्लिनच्या  सभोवताली असलेल्या जंगलांत फिरायला जाणे,  तलावांमध्ये  बोटींग करणे, ट्रेकिंग, हायकिंग,  पार्क्‍समध्ये  बाब्रेक्यू अशा अनेक गोष्टी या काळात लोक करताना दिसतात.

आपल्याकडे जसे क्रिकेटचे वेड तशी युरोपात जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे फुटबॉल! बर्लिनही त्याला अपवाद नाही. पण अर्थातच जर जर्मनीमधील इतर शहरांशी तुलना केली तर या खेळासाठी इथे प्रेम तसे कमीच वाटते. फक्त फुटबॉलच नाही तर आईसहॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा इतर खेळांना इथे सारखेच प्राधान्य आहे. हे त्याचे कारण असावे. विशेष म्हणजे बर्लिनची क्रिकेट टीमही आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे बर्लिनर बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आहेत. याचं कारण पूर्वीपासूनच बर्लिनमध्ये वेगवेगळ्या देशातून लोकांचे प्रवाह येत राहिले. जर्मनीबरोबरच तुर्की, रशियन, पोलिश, फ्रेंच, इटालियन, सर्बियन, व्हिएतनामी असे अनेकविध प्रांतातील लोक इथे मोठय़ा प्रमाणात आढळतात. टेक्निकल युनिव्हर्सिटी, फ्री युनिव्हर्सिटी, हुम्बोल्ड युनिव्हर्सिटी या तीन मोठय़ा युनिव्हर्सिटी बर्लिनमध्ये आहेत आणि उच्चशिक्षण मोफत असल्याने बर्लिनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपण खूप आहे. पण त्याचबरोबर बर्लिन शहर आवडते म्हणून इथे स्थायिक होणारे अनेक तरुण पाहायला मिळतील.

साधारण जर्मन भाषेचे प्राबल्य असले तरी भाषेचे एक स्थानिक वेगळेपण इथे दिसते. अर्थात जर्मन भाषा न येणाऱ्यांचे इथे फारसे अडतही नाही. जर्मनीच्या या भागात वंशवाद आहे. अशी सर्वसाधारण समजूत असली तरी बर्लिनमध्ये मला तो फारसा कधी जाणवला नाही. शहराचा बहुसांस्कृतिक आयाम कदाचित त्याला कारणीभूत असावा.वरचे  हे वर्णन काही प्रमाणात युरोपातल्या पॅरिस, लंडनसारख्या  शहरांनाही लागू होईल. पण बर्लिनचे वेगळेपण म्हणजे युरोपातल्या इतर शहरांपेक्षा बर्लिन एक तर स्वस्त आहे, अजूनसुद्धा  बर्लिनचा विस्तार होतो आहे, त्यामुळे नवीन संधी सतत निर्माण होत आहेत. बर्लिन  अधिक फ्रेंडली आहे आणि शहराचे बहुढंगी व्यक्तिमत्व तरुणाईला अधिक आकर्षति करते. बर्लिनच्या एकूण लोकसंख्येच्या वयोमानाचा विचार केला तर पन्नास टक्क्य़ांहून अधिक लोक ४५ वर्षांच्या आतील आहेत त्यामुळेच बर्लिन हे एक तरुण शहर आहे.

गेले वर्षभर बर्लिनमध्ये राहात असताना मला असे जाणवले की बर्लिन शहर कोणालाही आपलेसे करून घेते. बर्लिनर होण्यासाठी वयाची, भाषेची अथवा प्रांतीय अट नाही. एकदा का तुम्ही बर्लिनर झालात की आपोआपच इथल्या वातावरणाचा भाग होऊन जाता. ही एक धुंदी आहे आणि ती अनुभवण्यासाठी बर्लिनमध्ये राहून बघायला हवे।

viva@expressindia.com