18 October 2018

News Flash

प्रयत्नांच्या पंखांना..

 अवघ्या २७ वर्षांत भारत कुमारने पॅरा स्वीमिंगमध्ये पन्नास पदकांची कमाई केली आहे

विकलांगतेला शरण न जाता आयुष्यात खूप काही करून दाखवणाऱ्यांसाठी जागतिक विकलांग दिवससाजरा केला जातो. अशा लोकांचा सन्मान मान्यवर संस्थेकडून दरवर्षी करण्यात येतो. यावर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पाच वीरांमध्ये एक नाव होतं ते भारत कुमार या तरुणाचं..

संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा ‘इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी’ म्हणून घोषित केला आहे. विकलांगतेला शरण न जाता आयुष्यात खूप काही करून दाखवणाऱ्यांसाठी हा जागतिक ‘विकलांग दिवस’ साजरा केला जातो. अशाच लोकांचा सन्मान मान्यवर संस्थेकडून दरवर्षी करण्यात येतो.  यावर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पाच वीरांमध्ये एक नाव होतं ते भारत कुमार या तरुणाचं. यंदाही हा पुरस्कार सोहळा अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. पॅरास्वीमिंगमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या या जिद्दी तरुणाची कथाही तितकीच नवलाईची आहे.

अवघ्या २७ वर्षांत भारत कुमारने पॅरा स्वीमिंगमध्ये पन्नास पदकांची कमाई केली आहे. या तरुणाला जन्मत:च फक्त उजवा हात होता. परंतु केवळ जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्याने पॅरा स्वीमिंगमध्ये नावलौकिक कमावला आहे. एक हात असलेला जलतरणपटू याची आपण कल्पनाही करू शकत नाही, पण ती कल्पना भारतने प्रत्यक्षात साकर करून दाखवली आहे. मूळचा हरियाणातील छोटय़ाशा गावचा असलेल्या भारतची वयाच्या आठव्या वर्षी गाझियाबादला त्याच्या नातेवाईकाकडे रवानगी झाली. गरिबी त्याच्या पाचवीलाच पूजलेली होती. ज्या नातेवाईकाकडे तो राहत होता त्यांच्याकडे गायी होत्या. त्यांना नदीमध्ये अंघोळ घालायला घेऊन जायचा भारतचा दिनक्रम होता. आणि तेव्हापासूनच पाण्यासोबत खेळता खेळता त्याला पोहोण्यात रस निर्माण झाला.

जलतरणपटू बनण्याआधी भारत अ‍ॅथलीट होता. त्याने २००५ आणि २००६ साली ‘ज्युनिअर नॅशनल लेव्हल अ‍ॅथलेटिक्स’मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. त्यानंतर  २००९ मध्ये ‘ज्युनिअर वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स’मध्ये सिल्वर मेडल  मिळवलं. २०१० मध्ये त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्यामुळे त्याला पुढे अ‍ॅथलेटिक्स करता आले नाही. पण त्याने आपली जिद्द सोडली नाही. अ‍ॅथलेटिक्स करता येणार नाही म्हटल्यावर त्याने आपला मोर्चा स्विमिंगकडे वळवला आणि खूप मेहनत घेऊन वर्षभरातच म्हणजे २०११ मध्ये तो नॅशनल लेव्हलचा पॅरा स्विमर बनला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एकामागून एक स्पर्धा जिंकत त्याने स्वत:चं, त्याच्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव मोठं करायला सुरुवात केली आणि आजही करतो आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आणण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी तो आता जोमाने तयारीही करतो आहे.  एखाद्या खेळाडूला त्याच्या खेळाचा सराव करतानाच त्याच्यासाठी योग्य आहाराचीही गरज असते. आपलं प्रशिक्षण आणि आहार या दोन्ही गोष्टी साधायच्या तर भारतला महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. आपल्याकडे अजूनही खेळाडूंसाठी सोयीसुविधा नसल्याने भारत स्वत:च या गोष्टींसाठी झगडतो आहे. इतक्या पदकांची कमाई करूनही भारतला आपला खर्च काढण्यासाठी स्वीमिंगचे क्लासेस घेण्याबरोबरच लोकांच्या गाडय़ा धुण्यासारखी कामंही करावी लागतायेत. पण त्याला आता मागे हटायचे नाही. कुठल्याही कारणासाठी त्याला त्याचे स्वप्न मागे पडू द्यायचे नाही. म्हणून तो जिद्दीने मेहनत करतो आहे. अर्थात, खेळात पुढे जायचे म्हणून कधी मला माझ्या पोटासाठी ही पदकं विकायची पाळी येऊ नये, अशी प्रार्थना तो करतो आहे.

viva@expressindia.com

First Published on December 1, 2017 12:36 am

Web Title: bharat kumar get international day of persons with disability world champion para swimmer world disabled day