हल्लीच्या तरुणाईचं वेळेचं गणित गजबच आहे. सतत बदल हवाय आम्हाला.. वेगाने बदलायचंय.. खरं तर इन्टन्टली! ‘पेस ऑफ लाइफ’च तसा आहे आजचा. वेग म्हणजेच एनर्जी, एनर्जी म्हणजेच तरुणाई- असं हे समीकरण बनत चाललंय. कशाकशात दिसतो हा पेस ऑफ लाइफ? बोलणं, वागणं, खाणं-पिणं, रिलेशनशिप्स, छंद.. या वेगाच्या वेडात काही निसटून जातंय का? की यातूनच सृजनात्मक शक्ती मिळतेय? नव्या तरुणाईचा हा वेग पकडण्याचा प्रयत्न नवीन वर्षांत बदललेल्या ‘व्हिवा’मधून.

वेग म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिलं काय येतं? ऱ्हूमऽऽ ऱ्हूमऽऽऽ बाइक. येस! रस्त्यावरून दिमाखात धावणाऱ्या, वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज असलेल्या, वेगवान युथफूल बाइक्स. तरुणाईमध्ये म्हणूनच या बाइक्सची क्रेझ असते. ज्याच्याकडे सगळ्यात यो बाइक असते, त्याची ग्रुपमध्ये वेगळीच वट असते. मग गर्लफ्रेंडला पहिल्यांदा डेटवर न्यायचं असेल किंवा पावसात एकटंच लाँग ड्राइव्हला जायचं असेल.. ऑफिसची गडबड असेल किंवा कॉलेजची लगबग.. यंगिस्तानसाठी बाइक्स नेहमीच आवडीची, कामाची आणि पसंतीची आहे. आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी असावी, युनिक असावी यासाठीदेखील आज तरुणाई प्रयत्न करते आणि त्यातूनच येतो- बाइक मॉडिफिकेशनचा ट्रेण्ड.
बाइक मॉडिफिकेशन म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाइकमध्ये चेंजेस करून घेणं किंवा बाइक विकत घेतानाच त्यामध्ये हवे ते कस्टमायझेशन करणं. म्हणजे बाइकचं इंजिन वगळता संपूर्ण बॉडी ला हव्या त्या पद्धतीनुसार बदलणं म्हणजेच बाइक मॉडिफिकेशन. यामध्ये बाइकला विविध अ‍ॅक्सेसरीज बसवून घेण्यापासून ते बाइकचा संपूर्ण लुक चेंज करण्यापर्यंत सगळंच आलं. या क्षेत्रात मागच्या काही वर्षांत हार्ले डेव्हिडसनसारख्या मातब्बर ब्रॅण्डखेरीज, वर्देची, राजपूताना कस्टम्स, बुलेटीज कस्टम्स असे अनेक ब्रँड्स फेमस आहेत. खरं पाहिलं तर बाइक मॉडिफिकेशन हा एक शौक आहे. बाइक्सची पॅशन ज्याच्याकडे आहे त्याला आपली बाइक ही इतरांपेक्षा वेगळी असली पाहिजे असं वाटणारच. बाइक मॉडिफिकेशन म्हटल्यावर त्यात केवळ सीट्स बदलणं, आरसे बदलणं, थीमनुसार कलर चेंज करणं, डेविल लुक देणं इतकंच येतं असं नाही. पण यापेक्षादेखील बाइक मॉडिफिकेशन खूप काही जास्त असते. यामध्ये संपूर्ण बाइकचा लुक (सीट्स, हँडल, इंजिनीअरिंगमधले बदल, कलर, अ‍ॅस्थेटिक्स, टायर्स) हे सर्वच आलं. याबद्दल अक्षय वर्दे यांच्याकडून बरंच काही जाणून घेता आलं.
याबाबत वर्देची ब्रँडचा सर्वेसर्वा अक्षय वर्दे यंगस्टर्सच्या बाइक मॉडिफिकेशन पॅशनबद्दल भरभरून बोलतो. ‘यूथफुलनेस हे एक स्टेट ऑफ माइंड आहे. जोपर्यंत व्यक्ती सकारात्मक असते तोपर्यंत ती यंग असते असं माझं मत आहे. बाइक ही एक अशीच युथफूल पॅशन आहे. इट मेक्स यू फील अलाइव्ह.’ ‘वर्देची’ची या ब्रॅण्डची सुरुवात कशी झाली याबद्दल अक्षयने सांगितलं, ‘मी साधारण २००५ मध्ये याची सुरुवात केली. त्या वेळी बाइक मॉडिफिकेशन्सचे एवढे ब्रँड्स नव्हते. त्या वेळी एक्सक्लुझिव्ह मोटर बाइक्स बनविण्याची गरज वाटली आणि त्यामुळे मोटर बाइक्स डिझाइन करण्याच्या माझ्या हॉबीवर मी काम करायला सुरुवात केली आणि याच छंदाचं नंतर फूलफ्लेज्ड बिझनेसमध्ये रूपांतर झालं.’
बाइक मॉडिफिकेशन्समधले सध्याचे ट्रेण्ड सांगताना अक्षय म्हणाला, ‘बाइकचा लुक, फील, स्टाइल आणि अस्थेटिक्स याकडे सध्याच्या तरुणाईचं प्रामुख्याने लक्ष असतं. त्याशिवाय बाइक्सच्या विविध कार्यात, यंत्रांमध्ये बदल करून घेणं आणि लुकसोबतच बाइक्सच्या इंजिनीअरिंगमध्ये पण हवे तसे बदल करून घेणं आजच्या तरुणांना आवडतं. या बदलांची सुरुवात २००० रुपयांपासून होऊ शकते बाइक मॉडिफिकेशन कॉस्ट अगदी १२ लाखांतही जाते.’
बाइकच्या या नखऱ्यांवर लाखो रुपये खर्च करणारी तरुणाई तिच्यावरच्या प्रेमापोटीच ते करते. बाइकचं ऱ्हूम ऱ्हूम असं फरफरणं वेगाचं प्रतीक आहे. त्याच्याच तर प्रेमात आहे आजची पिढी. म्हणूनच मग आपल्या मनाजोगती, युनिक बाइक बनवून घेण्यासाठी एवढा अट्टहास करतात. बाइक ही केवळ गरज राहिलेली नसून स्टाइल स्टेटमेंट झालं आहे. या ‘रफ्तार- ए- जिंदगी’साठी मॉडिफाइड रफ्तार असेल तर क्या बात है! काय म्हणता?
– निहारिका पोळ