वेदवती चिपळूणकर

बिंज या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे कोणतीही गोष्ट ‘अति’ करणे. जेव्हा सामान्यत: काही ठरावीक गोष्टींचं प्रमाण अति असतं तेव्हा त्याला बिंज हे विशेषण लावलं जातं. कोणतीही गोष्ट खाणं किंवा पिणं जेव्हा अति प्रमाणात होतं तेव्हा त्याला बिंज म्हणतात. काही वेळेला मर्यादेपेक्षा जास्त झालेल्या गोष्टीला बिंज म्हटलं जातं. आजकालची पिढी, म्हणजे आमची पिढी, म्हणजे आपली पिढी खूप गोष्टी ‘अति’ या प्रमाणात करते. अनेकदा प्रत्येक भावना ही या पिढीसाठी अतिच असते. दु:ख अति, आनंद अति, एन्जॉयमेंट अति, डिप्रेशन अति! हे अति करण्याला मराठीत ‘अतिरेक’ असा शब्द आहे, पण त्याला काहीशी निगेटिव्ह छटा आहे. मात्र बिंज हे विशेषण केवळ निगेटिव्ह ‘अति’ म्हणून नाही, तर साधारणत: जास्त प्रमाणात केलेल्या कोणत्याही गोष्टीला बिंज हे विशेषण लावलं जातं.

सध्याची ‘बिंज वॉच’ ही संज्ञा वेब सीरिज आणि ऑनलाइन बघितले जाणारे चित्रपट, जुन्या मालिका यांच्याशी निगडित आहे. आताची तरुणाई ही बहुतेक करून रात्रीच स्वत:साठी वेळ देऊ  शकते. वीकएंडला जेव्हा ही तरुणाई स्वत:साठी वेळ देते तेव्हा मात्र तो संपूर्ण वेळ त्यांचा असतो आणि त्यात त्यांची आवडती गोष्ट ते करतात. सोफ्यावर रीलॅक्स बसून, मूडनुसार हातात कोल्डड्रिंक किंवा कॉफी घेऊन आवडत्या वेब सीरिज किंवा मालिकेचे एकापाठोपाठ एक सलग एपिसोड्सवर एपिसोड्स, सीझन्सवर सीझन्स बघण्याची मजा काही औरच ! या सलग बघण्याच्या पद्धतीला बिंज वॉच म्हणतात. अनेकदा मुव्हीजही बिंज वॉच केल्या जातात आणि ‘मुव्ही नाइट’ म्हणून त्याचे आधीपासून प्लॅन्सही केले जातात.

एखाद्या वेब सीरिजचे खूप सारे सीझन्स सलग बघायलाही स्किल लागतं, असं हे बिंज वॉचर्स म्हणतात. मात्र पुन:पुन्हा एकाच सीरिजचे सगळे सीझन्स पाहणं यासाठी मात्र खरंच काही वेगळी साधना करावी लागत असावी. पण हा प्रकार बहुतेकदा फक्त मनोरंजनाच्या बाबतीतच ऐकायला मिळतो. सलग सीरिज किंवा मुव्ही बघण्याला जसं बिंज वॉच म्हणतात तसं सलग अभ्यास करण्याला बिंज स्टडी म्हणतात की नाही कोण जाणे !

viva@expressindia.com