18 October 2018

News Flash

हरहुन्नरी..

जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आपल्यासोबत ‘बाबा’ आहेत अशी सुरक्षिततेची भावना होती.

पूनम महाजन (छाया : अमित चक्रवर्ती)

‘महाजन’ नावाचा मोठा राजकीय वारसा घेऊन त्या राजकारणात उतरल्या. वडिलांचा हा वारसा पुढे न्यायचा आहे हे त्यांच्या डोक्यात पक्कं असलं तरी त्याचं दडपण न घेता स्वत:च्या विचारांनी, स्वतंत्र बुद्धीने, कार्यशैलीने राजकारणात त्यांनी आपले असे स्थान निर्माण केले. अवघ्या दहा वर्षांत भाजपची कार्यकर्ती म्हणून पक्षनिष्ठा स्वीकारणाऱ्या पूनम महाजन यांनी त्याच पक्षाची मुंबईची तरुण खासदार होण्याचा मान मिळवलाच. त्याच वेळी ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ची सूत्रे हातात घेत तरुणाईला राजकीय कार्यात सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केले. आज त्या याच मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतायेत. हा प्रवास खचितच सोपा नाही, पण यशाचे हे समीकरण साधताना वडिलांच्या प्रेमळ सावलीत अनुभवलेले राजकारण ते स्वत: समाजकारण साधण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांना जाणवलेल्या, त्यांनी कमावलेल्या अनुभवांची शिदोरी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून पहिल्यांदाच सर्वासमोर उलगडली. राजकारणाशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले इतर अनेक पैलूही या वेळी रसिकांसमोर आले. ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे आणि रेश्मा राईकवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला..

महाजनम्हणून अपेक्षा मोठय़ा..

जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आपल्यासोबत ‘बाबा’ आहेत अशी सुरक्षिततेची भावना होती. लहानपणापासून घरात राजकारण होतं, पण ते बाबांच्या आजूबाजूनं होतं. बाबांचे राजकारण, त्यांची त्यामागची तळमळ, त्यांना भेटायला येणारे नेते असा सगळा त्यांच्या कामाचा घरभर दबदबा होता. मात्र ते गेल्यानंतर जाणवलं की, ते कसे कार्यकर्त्यांच्या मनात शिरलेले होते. देशभरातील लोकांना असं वाटत होतं की, त्यांच्याच घरातला एक माणूस गेला आहे. त्यांनी जोडलेली माणसं इतकी होती आणि त्यांना माझ्याकडून अनेक अपेक्षा होत्या. त्यांच्या नावाला गालबोट लागू नये याची काळजी घेत आपलं करिअर त्याच क्षेत्रात घडवायचं म्हणजे नक्कीच कठीण कामगिरी होती. ‘लीगसी इज नॉट व्हॉट यु लीव्ह इनसाइड द पीपल, बट फॉर द पीपल’.. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा या असतात आणि या अपेक्षांचं ओझं काही वेळा झेपणार नाही इतकं  वाढतं, मात्र ती खांद्यावर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बाबांना जाऊ न आज अकरा र्वष झाली आहेत, तरी आजही कुठेही गेले तरी त्यांच्याबद्दलचे किस्से ऐकायला मिळतात, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते. हळूहळू, एकेक पायरी चढत त्या अपेक्षा पेलण्यासाठी मी स्वत:ला सक्षम बनवत गेले.

फॅशनची आवड

एक स्त्री म्हटली की चांगलं दिसण्याची आवड ही आपोआपच रक्तात असते. ती का नसावी याला काही कारण नाही. काही मुली किंवा बायका राजकारणात यायचं म्हटल्यावर केस एकदम कापून टाकून, सगळे रंग बाद करून फक्त एकाच रंगाच्या सुती साडय़ा वगैरे नेसायला सुरुवात करतात ज्याची वास्तविक पाहता काहीच गरज नसते. राजकारणी महिलांनी छान दिसू नये असा कुठेही नियम नाही. मला स्वत:ला व्यवस्थित राहायला आवडतं. तुम्ही जर लोकांसाठी काम करणार तर तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे न वाटता त्यांच्यातलेच एक आहात असं वाटलं पाहिजे. त्यासाठी कोणत्याही सामान्य स्त्रीसारखी फॅ शन मलाही प्रिय आहे. माझा कल हा कॉटनकडे झुकणारा आहे. जेव्हा जेव्हा मी बाहेरच्या देशांत जाते तेव्हा तेव्हा मी भारतीय टेक्स्टाइलचेच कपडे वापरते, आपल्या कोल्हापुरी चपला वापरते. या सगळ्याने मी तर कम्फर्टेबल होतेच, मात्र आपल्या भारतीय गोष्टींची तिथे जाहिरातही होते, त्या सर्वदूर पोहोचतात.

भेट थलायवाची!

मी जेव्हा २०१४  साली युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मी संपूर्ण भारत दौऱ्यावर जायचं ठरवलं होतं आणि त्यात मला जास्त पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, चेन्नई अशा ठिकाणी फिरायचं होतं. तामिळनाडूमध्ये भाजपची सत्ता नाही. तिथे काम वाढवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन तिथे उतरले आणि तामिळनाडूमध्ये उतरल्यावर जर तुम्ही थलायवाला.. रजनीकांत यांना भेटणार नाही हे शक्य नाही; पण तिथे रजनीकांत यांच्या भेटीचा योग त्यांच्या पत्नी लता यांच्यामुळे आला. लताजी शिक्षण संस्थेसाठी खूप काम करतात. आम्ही दोघींनी मिळून ‘ग्लोबल सिटिजन इंडिया’ या उपक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रासाठी कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमातून शिक्षणासाठी फंड मिळाला.. त्या अनुषंगाने आमची भेट झाली. माझे बाबा आणि रजनीकांत चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांच्या भेटीचा योग आला. इतका मोठा सुपरस्टार असूनही ते नम्र आणि शांत स्वभावाचे आहेत. देशाबद्दल, समाजाबद्दल सगळी माहिती असणाऱ्या रजनीकांतसारख्या प्रतिभावंत लोकांनी राजकारणात ययला हवं असं मला वाटतं.

आल्या प्रसंगाला तोंड

राजकीय क्षेत्रात वादविवाद होण्याचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. प्रत्येक वेळी त्याला उत्तर देण्याची गरज असतेच असं नाही. मला मात्र कधी कोणाला उत्तर देण्याची गरज पडली नाही. तशा प्रसंगाला तोंड देण्याची कधी वेळच आली नाही. एकदाच बोलताना काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी माझ्याकडे बोट दाखवून विचारलं होतं- ‘आप सब्जी लेने जाती है क्या?’ त्या वेळी ते बजेटसंदर्भात बोलत होते. मी त्यांना ताबडतोब प्रतिक्रिया दिली नाही, पण मी ते विसरलेही नाही. राजकारणी असले तरी गृहिणीही होते. बाजारभाव माहिती नाही हे शक्यच नाही. ज्या वेळी माझी बोलायची वेळ आली तेव्हा माझ्या भाषणातून मी त्यांना त्यावर काय द्यायचं ते उत्तर बरोबर देऊन मोकळी झाले. त्याच्यामुळे माझा मूळ विषय थोडा भरकटला, पण मी त्यांना उत्तर दिलं.

तरुणांसाठी राजकारणात करिअर

तरुण पिढीसाठी राजकारण हे एक उत्तम करिअर नक्कीच होऊ  शकतं. केवळ निवडणुका लढवूनच राजकारणाशी जोडता येतं असं नाही, तर अनेक गोष्टींसाठी राजकारणात तरुणांची गरज आहे. उदाहरणार्थ, ज्या वेळी मला एखाद्या नवीन उपक्रमाची तयारी करायची असते किंवा कोणता प्रस्ताव मांडायचा असतो त्या वेळी त्याचं ‘बॅकग्राऊं ड वर्क’ करण्यासाठी माझ्याकडे एक संपूर्ण टीम असते जी या सगळ्यामागचा पूर्ण अभ्यास करून मला त्याची माहिती देत असते. माझ्या ऑफिसमध्ये अनेक इंटर्न्‍स काम करतात. अनेकदा एखाद्या पक्षाचं सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्याची जबाबदारी ही तरुण मुलांकडे असते. या क्षेत्रात येण्यासाठी, याच्याशी जोडण्यासाठी अशा शोधू तितक्या संधी मिळत राहतात.

सगळंच आवडायचं..

मी ‘बालमोहन’ची विद्यार्थिनी असल्यामुळे विद्याताई पटवर्धन यांच्याकडे अनेक नाटकांतून कामं केली. मला अभिनयाची आवडही होती. आईला वाटायचं की, आपल्या मुलीने सगळ्या गोष्टी कराव्यात. त्यामुळे नवं काही दिसलं, जाणवलं, की मला तिथे पाठवलं जायचं. त्यामुळे मी टेनिसही खेळायला शिकले, टेनिसही नियमितपणे खेळत होते. १४ र्वष मी भरतनाटय़म् शिकले. करिअरच्या दृष्टीने मी पायलट व्हायचं ठरवलं होतं आणि प्रोफेशनल पायलटचं लायसन्सही माझ्याकडे अजून आहे. त्यामुळे एकच एका गोष्टीत मी कधी अडकून पडले नाही. मला या सगळ्यामधलं सगळंच आवडत होतं. त्यामुळे यातली कोणतीही गोष्ट मी करिअर म्हणून सहज करू शकले असते. जेव्हा मी लहान होते तेव्हा बाबांकडे माणसांचा सतत राबता असायचा. अनेकदा अनेक जण जेवायला असायचे. त्या वेळी ताटात वाढायचे कठीण पदार्थ सोडून चटणी, मीठ, पाणी वगैरे वाढायचं काम माझ्याकडे असायचं. अनेकदा बाबांना हे आणून दे, ते आणून दे अशी छोटीछोटी कामं मी करायचे. तेव्हाच मी त्यांना अनेकदा विचारलं होतं की, मी तुमची पी.ए. होऊ  का?..

विद्यार्थी संघटनांना वाव मिळायला हवा!

सध्या महाविद्यालयांमधून निवडणुका बंद झाल्या असल्याने विद्यार्थी संघटनेकडे तेवढी ताकद उरलेली नाही, हे खरं आहे; पण आज राजकारणात जे जे लोकप्रिय, आघाडीचे नेते आहेत त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात ही या विद्यार्थी संघटनांमधूनच झाली होती. महाविद्यालयात नसल्या तरी पक्षांच्या युवा संघटना आहेत. माझ्या युवा मोर्चामध्ये विद्यार्थी संघटनेचीच मुलं आहेत जी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्यात वेगळाच जसबा असतो, प्रश्न विचारायची, काम करायची त्यांची एक वेगळीच स्टाईल असते. मी युवा मोर्चा मध्ये लीगल, मेडिकल अशा कमिटी बनवल्या आहेत. या कमिटींचं काम तरु ण-तरुणीच सांभाळतात. तरुणांनी राजकारणात यायलाच हवं. माझी अजूनही इच्छा आहे की, महाविद्यालयांमध्ये निवडणुका व्हायला हव्यात.

भाजप-शिवसेना कायमचे साथी

भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचे कायमचे साथी आहेत असं मला वाटतं. एखाद्या जोडप्यात जितकी प्रेमाची भांडणं होतात, रुसवेफुगवे होतात तसंच काहीसं शिवसेना-भाजपमध्येही होतं. मात्र तेवढय़ाशा कारणावरून कोणी संसार मोडत नाही. तसंच इथेही आहे. थोडा संयम सगळ्यांनाच ठेवायला लागतो, थोडी सहनशीलता दाखवावी लागते. आताच्या काळात राजकीय खेळ्यांची पद्धत बदलली आहे, रीत बदलली आहे. आता अंकांचं राजकारण होत असतं. त्यामुळे थोडं धीराने घेऊन परत सगळं जमवून गाडी रुळावर यायला वेळ नक्कीच लागेल. मात्र ही युती कधी तुटेल असं मला कणमात्रही वाटत नाही.

प्रभावी बोलण्याची गरज

आपला नेता अगदी तडफदार वगैरे असावा, त्याने भाषणं द्यावीत अशा प्रकारच्या अपेक्षा सर्व तरुण कार्यकर्त्यांना माझ्याकडूनही होत्या आणि आहेत. मला सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या समोर नीट बोलता येत नसे. लहानपणी वक्तृत्व स्पर्धा, गीतापठण स्पर्धा वगैरे स्पर्धामध्ये मी भाग घ्यायचे. त्याचा थोडासा उपयोग मला इथेही झाला. मात्र ‘प्रमोदजी असं करायचे..’ या अपेक्षा मला अनेकदा घाबरवून टाकायच्या. मी त्यांचीच मुलगी असले तरी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी मला माझ्या बोलण्याचाच वापर करावा लागणार होता. कार्य बोलत असतं, मात्र त्याआधी आपलं बोलणं समोरच्याला प्रभावी वाटलं पाहिजे.

प्रोफेशनल उडान

माझ्या भावाला लहानपणापासून विमानात प्रचंड रस होता. एकदा बोलता बोलता बाबांनी सहज मला म्हटलं, तू गाडी इतकी छान चालवतेस तर विमान का नाही चालवू शकणार! त्यावर भावाने ‘ही काय विमान चालवणार’ असं म्हणून माझी खिल्ली उडवली होती. आता भावाबहिणीच्या भांडणात भावाने चिडवलं तर बहीण पेटून उठणारच! त्यामुळे त्यानंतर मी ठरवलं की, आता तर पायलट होऊनच दाखवणार. त्यामुळे मी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सुरतमध्ये माझं ट्रेनिंग झालं आणि नंतर आठ महिने मी टेक्सासमध्ये उड्डाण करत होते, ट्रेनिंग घेत होते. इथून आईला मला एकटीला पाठवताना जराशी भीती वाटत होती. मराठी माध्यमातली मुलगी, तिथलं वातावरण वेगळं, संस्कृती वेगळी वगैरे गोष्टींची आईला काळजी होती. मात्र मी तिथलं ट्रेनिंग व्यवस्थितपणे पूर्ण करूनच परतले.

तरुणांकडूनच यंग इंडियाची स्वप्नपूर्ती

आपला देश तरुण आहे. लोकशाही देश आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या देशातील तरुण ठरवून कार्यासाठी एकजूट होत नाही तोपर्यंत आपला देश पुढे जाणार नाही. आजचा तरुण स्वत: काही ध्येयानिशी पुढे जाणार असेल तरच देश प्रगतिपथावर जाणार. माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न जर देशाशी जोडलं तरच नवीन भारताचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

ग्लोबल देसी

‘आदर्श ग्राम योजने’त प्रत्येक खासदाराने तीन गावं दत्तक घ्यायची आहेत. त्यातली वाघाडी आणि चारोटी अशी दोन गावं मी घेतलेली आहेत. त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की, छोटय़ाछोटय़ा गावांमध्ये तिथली अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे स्त्रियांवर अवलंबून आहे. सगळी अर्थव्यवस्था तिथल्या स्त्रियाच चालवतात. त्यामुळे तिथे रोजगारनिर्मिती ही स्त्रियांच्या हातूनच मोठय़ा प्रमाणावर होणं शक्य आहे. माझी सस्टेनेबल फॅ शनची आवड आणि इथली रोजगारनिर्मिती या दोन्हीची सांगड घालून मी काही तरी सुरू करायचं ठरवलं. माझी मैत्रीण फॅशन डिझायनर अनिता डोंगरे हिला मी याची कल्पना सांगितली. तिनेच ‘ग्लोबल देसी’ हा ब्रॅण्ड सुरू केला आणि त्यात गावागावांतल्या स्त्रियांना सहभागी करून घेतलं. आज मी दत्तक घेतलेल्या गावांमधल्या स्त्रिया तिच्या सर्टिफाइड टेलर आहेत आणि देशविदेशातले लोक त्यांनी शिवलेले कपडे घालत आहेत.

पूनम महाजन यांच्याशी झालेल्या गप्पांमधून एका स्त्री नेत्याला जी झुंज द्यावी लागते आणि त्यातून मार्ग काढून ते सतत आपलं काम कसं करत राहतात ते प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. त्यांचं राष्ट्रीय पातळीवरील हे काम नक्कीच वाखाणण्याजोगं आहे!

विशाल तळवलेकर

या कार्यक्रमातून खूप काही शिकायला मिळालं. महाजन यांचा वैचारिक दृष्टीकोन, बोलण्याची शैली अतिशय आवडली. ‘लोकसत्ता व्हिवा’ने असेच उत्तम उत्तम कार्यक्रम करत रहावेत जेणेकरून तरुणाई अजून प्रेरित होईल.

प्रतीक जगताप

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमातून बरंच काही शिकण्यासारखं होतं. एक स्त्री म्हणून पूनम महाजन खरोखरीच आदर्शवत आहेत. त्या एक बायको, आई, मुलगी या सगळ्या भूमिका पार पाडत असतानाच एक नेता म्हणून त्या कुठेच कमी पडलेल्या नाहीत.

एक नेता म्हणून त्यांनी त्यांची जीवनशैली, फॅशन बदललेली नाही, म्हणजेच आपण कोणीही झालो तरी आपण जसे आहोत तसे राहणं ही खूप मोठी गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.

रुतीषा पडगे

राजकारणाविषयी बोलतानाही त्यांनी त्यांची मतं मोकळेपणाने व्यक्त केली. आपल्या अनुभवातूनच आयुष्य कसं जगावं ते खूप सुंदर पद्धतीने सांगत त्यांनी मार्गदर्शन केलं.

अक्षय म्हात्रे

एखादी भारदस्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आपल्यासमोर येते, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. त्यांचे विचार आणि त्या विचारांचं आचरण त्या कशा पद्धतीने करतात हे समजून येतं. आज पूनम महाजन उंच आभाळात भरारी घेत असल्या तरीही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत हे शिकण्यासारखं आहे.

साईश मोरे

‘व्हिवा लाऊंज’ कार्यक्रम अतिशय आवडला. खूप काही शिकायला मिळालं. पुन्हा या कार्यक्रमाला यायला नक्की आवडेल.

ज्योती खरात

निरनिराळ्या क्षेत्रात स्वत:चं नाव आणि ठसा उमटवून ‘अ वूमन इन द मॅन्स वर्ल्ड’ हा वाक्प्रचार पूनम महाजन यांनी खोडून काढलेला आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात नाव मिळवू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

वैभवी म्हारनूर

आज अनेक तरुणतरुणींना राजकारणात रस नाही असं दिसून येतं. अशा परिस्थितीत पूनम महाजन विद्यार्थी आणि तरुणांसाठी जे काम करत आहेत ते वाखाणण्याजोगं आहे.  त्यांनी दिलेली ‘सपना करो तो अपना करो और कुछ ऐसा करो की देश के काम आये’, ही शिकवण विशेष आवडली.

मुकुंद पाठक

त्यांनी मांडलेले तरुण पिढी बद्दलचे विचार, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, आणि प्रगती पथावर असलेल्या भारता- विषयीचे विचार खूपच प्रेरणादायी आहेत.

केतन कारंडे

इथे येण्यापूर्वी प्रमोद महाजनांची मुलगी इतकीच त्यांची ओळख मला होती. मात्र राजकारण, घर, समाजकारण आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य यात त्यांनी समतोल कसा साधावा आणि परिस्थितीवर मात करून आपलं ध्येय कसं गाठावं याची प्रेरणा मिळाली.

पूजा चंद्रकांत जांभळे

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम नेहमी आवडतोच पण आजचा विशेष आवडला. राजकारण आणि समाजकारण याकडे बघण्याचा तरुणांचा विशेषत: मुलींचा दृष्टिकोन हा फारसा चांगला नाहीये. मात्र पूनम महाजनांसाख्या धडाडीच्या नेतृत्वाकडून त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर नक्कीेच या दृष्टिकोनात फरक पडला आहे. ‘व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.

चैतन्य गुरव

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर, तेजश्री गायकवाड

(संकलन – तेजल चांदगुडे, श्रुती जोशी, विदीशा कुलकर्णी )

First Published on December 1, 2017 12:37 am

Web Title: bjp mp poonam mahajan in loksatta viva lounge