परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

‘ब्लड प्रेशर? पण ते तर म्हाताऱ्या माणसांना होतं ना? म्हणजे मी म्हातारा झालोय? अहो मी फक्त बावीस वर्षांचा आहे हो. आणि मला काहीच त्रास होत नाहीये. फक्त घसा दुखतोय म्हणून आलो होतो मी. काही तरी चूक झाली असेल डॉक्टर. मला खूप टेन्शन आलं होतं ना त्यामुळे जास्त झालं असेल बी पी. पुन्हा एकदा तपासायचं का?’, बिपीनने विचारलं.

सहा महिन्यांपूर्वीच त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम सुरू केलं होतं. त्याला मनापासून आवडणारं काम. त्यामुळे दिवस-रात्रीचा विचार न करता त्यात त्यानं स्वत:ला झोकून दिलं होतं. नुकतीच एक मोठी असाइन्मेंट मिळाली होती. म्हणून तर थोडा घसा दुखायला लागल्यावर त्यानं लगेच डॉक्टरांना दाखवायचं ठरवलं. उगीच आजार वाढायला नको. आजारी पडायला वेळ नव्हता त्याला आत्ता. तर डॉक्टरांनी हे बी. पी.चं नवीनच काही तरी काढलं. कुठून या डॉक्टरांकडे आलो असं झालं बिपीनला. त्यांनी त्याला पुन्हा एकदा यायला सांगितलंय, कन्फर्म करायला. शिवाय त्याला बजावलंही आहे नियमित चेक अप करायला लागेल म्हणून.

घरी येऊ न त्याने लगेच नेटवर सर्च केलं. त्यावर तरुण वयात होणाऱ्या बी.पी.बद्दल बरीच माहिती होती. ते सगळं वाचून तो हबकलाच. ब्लड प्रेशर सगळ्यांना असतंच. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचं नॉर्मल प्रेशर असतं १२०/८० mmHg. जेव्हा आपण म्हणतो की, एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, तेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की, या नॉर्मलपेक्षा ते जास्त आहे, म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे. रक्तवाहिन्या ताठर झाल्या की बी. पी. वाढतो. शिवाय रक्तातला मेद वाढणं, क्षार वाढणं, किडनीचे आजार, हॉर्मोन्सचा असमतोल, हृदयाचे आजार अशीही अनेक कारणं असू शकतात. पण नव्वद टक्क्यांहून अधिक वेळा काहीच कारण सापडत नाही. त्याला इसेन्शिअल हायपरटेन्शन म्हणतात. बरंच वाढेपर्यंत त्याची काही फारशी लक्षणं दिसत नाहीत. रुटीन चेकअपच्या वेळी ते लक्षात येतं. काही वेळा आधी काहीही पत्ता नसताना एकदम एखादं कॉम्प्लिकेशन होतं, जे गंभीर असू शकतं. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात.

पूर्वी वय वाढल्यावर दिसणाऱ्या या आजाराने आता मात्र तरुणपणातच आपला इंगा दाखवायला सुरुवात केलीये. ही एक इतकी गंभीर साथ आहे की, मेडिकल फील्डमध्ये यावर जोरदार संशोधन सुरू आहे. आजची लाइफस्टाइल बदललीये. घरातली बरीचशी कामं यंत्रांनी केली जातात. अगदी जवळच कुठे तरी जायचं असलं तरी आपल्याला चालायचा कंटाळा येतो, आपण लगेच गाडी काढतो. काहीही सेलिब्रेट करायचं असलं की, ड्रिंक्स आणि चिप्स, केक्स, आईस्क्रीम यासारखी फास्ट फुड्स आलीच. शाळेपासूनच याची सुरुवात होते. तुमची लहानपणीची बर्थडे पार्टी आठवून बघा! अभ्यास, क्लासेस यामध्ये दिवस इतका पॅक असतो की मनसोक्त खेळायला वेळच मिळत नाही. यामुळे लठ्ठपणा अगदी कॉमन झालाय. या सगळ्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लाइफस्टाइल डिसीजेस म्हणून जे आजार नव्यानं डोकं वर काढतायत त्यात एका त्रिकुटाचा समावेश आहे, उच्च रक्तदाब, डायबेटीस आणि हृदयविकार!

बिपीन तासन्तास एका जागी बसून काम करतो. तो सतत डेडलाइन पाळायच्या टेन्शनखाली असतो. त्याच्या खाण्यापिण्यावर काहीच धरबंध राहिलेला नाहीये. वेळी-अवेळी जंक फुड खाल्लं जातं, गेल्या कित्येक महिन्यांत त्यानं ब्रेकफास्ट केलेला नाही आणि रात्रीचं जेवण बाराच्या आधी घेतलेलं त्याला आठवत नाहीये. त्याचा काही व्यायाम होत नाही, जिमची एक वर्षांची फी भरली आहे, पण पहिला एक आठवडा सोडला तर तो तिकडे फिरकलाच नाहीये. त्याची झोपही पुरेशी होत नाहीये. आठवडाभर दिवसाला फक्त चारेक तासच झोप होते. मग रविवारी तो दिवसभर झोपतो. या सगळ्याचं कॉम्बिनेशन डेडली आहे. त्याचं वजन वाढलंय आणि आत्ता जसा घसा दुखायला लागला तसे सारखे काही ना काही बारीकसारीक आजार त्याला होत असतात.

अर्थातच, आपली जगण्याची, आहाराची, व्यायामाची पद्धत बदलायला हवी! वजन कमी करणं, नियमित व्यायाम, दिवसाला १ चमच्याहून कमी मीठ, हेल्दी आहार, स्मोकिंग आणि ड्रिंक्स टाळणं हे सगळं यात आलं. स्ट्रेस आणि राग ताब्यात ठेवणंही फार महत्त्वाचं.

DASH diet (dietary approaches to stop hypertension) नावाची एक उपचार पद्धत बरीच लोकप्रिय आहे. हातसडीचे तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू यांसारखी तृणधान्यं, भाज्या, फळं, मासे, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा भरपूर प्रमाणात आहारात समावेश आणि मीठ, मांस, तेल आणि गोड पदार्थ यांचा खूप कमी वापर. त्याच बरोबर अल्कोहोल, कॉफी आणि सिगारेट स्मोकिंग टाळून नियमित व्यायाम करायचा, असं यात सांगितलं आहे.

बिपिनला काम बंद जरी करता आलं नाही तरी लाइफस्टाइलमध्ये हे बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही. नाही तर हार्टअ‍ॅटॅक किंवा पॅरेलिसिसचा झटका त्याची वाटच बघतायत.

viva@expressindia.com