प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय याची सुतराम कल्पना नसताना केवळ सतत वेगवेगळं शिकत राहण्याच्या ध्येयाने निधी चौधरी या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपर्यंत पोहोचल्या. लग्नानंतर नोकरी आणि घर सांभाळून त्यांनी परीक्षा दिली, प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) म्हणून काम पाहत आहेत. सतत शिकत राहण्याच्या ध्यासातूनच त्यांना आजचं यश साध्य झालं आहे, असे सांगत परिश्रमपूर्वक शिक्षण आणि प्रामाणिक काम करत राहिले पाहिजे, हा यशाचा व्यवहारी मंत्र निधी चौधरी यांनी ‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात दिला. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी रसिका मुळ्ये आणि रेश्मा राईकवार यांनी त्यांना बोलतं केलं..

शब्दांकन : तेजस्वी गायकवाड

प्रादेशिक भाषेचा न्यूनगंड असण्याची गरज नाही

कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी भाषा हे केवळ माध्यम आहे. मी हिंदी भाषेतून शिक्षण घेतलं होतं. मी जेव्हा आरबीआयसाठी मुलाखतीला गेले तेव्हा दिल्लीतील ती मोठी इमारत, तिथलं वातावरण यामुळे मलाही दडपण आलं होतं. प्रादेशिक भाषेतून शिक्षण झालं आहे, गावातून आलो आहोत म्हटल्यावर आपण इंग्रजीत तयारी केलेली नाही, आपण त्यांच्यासारखे हुशार दिसत नाही हा न्यूनगंड आपल्याला साहजिकपणे येतो. मी आरबीआयच्या बोर्डासमोर मुलाखत दिली तेव्हा हिंदीतून प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही तर आरबीआयमध्ये नोकरीसाठी आला आहात आणि तुमचं पोस्टिंग चेन्नईमध्ये होणार आहे. तिथे तर तुम्ही हिंदी बोलून भाजीही खरेदी करू शकणार नाही; पण मी त्यांना सांगितलं की, तुम्ही मला आरबीआयसाठी जगात कुठेही पाठवलं तरी मी काम करणार, मला भाषेची अडचण येणार नाही आणि खरंच माझी पोस्टिंग चेन्नईमध्ये झाली. त्यानंतर आयएएसची परीक्षा मी इंग्रजीतून दिली; पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात नोकरीला जाल तिथे तीन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. एक तुमचं त्या विषयातलं ज्ञान, दुसरं तुमचं विश्लेषण करण्याची क्षमता म्हणजे तुम्ही आरबीआयसाठी गेलात तर आर्थिक घटनांचं विश्लेषण यायला हवं, प्रशासकीय सेवा असेल तर राजकीय, आर्थिक, सामाजिक सगळ्या घटनांचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व. या तीन गोष्टींची काळजी घेतली तर भाषा कुठलीही असेल त्याने फरक पडत नाही. त्याचं दडपण घ्यायची गरज नाही.

आपण बदल घडवू शकतो

ज्यांना असं वाटतं की, व्यवस्थेत आपण काही बदल घडवू शकत नाही त्यांनी तर व्यवस्थेत काम करायला यायलाच हवं. अगदी शंभर टक्के नाही, पण आपण बदल घडवू शकतो. अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी असतात ज्यात आपण रस दाखवला तर त्याचा फायदा होतो. लोकांना न्याय मिळतो. अनेक सरकारी अधिकारी जीव तोडून काम करतात. अगदी रस्त्यावर सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेही मनापासून सफाई केली तर त्याला समाधान मिळतं आणि लोकांना आनंद मिळतो.

कॉलेजची कलेक्टर साहिबाँ..

मी राजस्थानच्या छोटय़ा गावातून आले आहे. तेव्हा आमच्या तालुक्यात जास्त कॉलेजेस नव्हती आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्याही अगदीच नगण्य होती. तरीही मी माझ्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना मी वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण करत होते, अनेक स्पर्धामध्ये भाग घेत होते. तेव्हाच्या काळी मुलीने इतक्या हिमतीने स्टेजवर येणं, आपली मतं मांडणं ही खूप मोठी गोष्ट होती. मी या सगळ्या गोष्टी करत होते, शिवाय एनएसएसची लीडरही होते. त्यामुळे आम्हाला शिकवणारे एक प्राध्यापक कायम मला ‘कलेक्टरबाई, तुमची सही द्या..’ असं प्रेमाने चिडवायचे. हळूहळू मग ‘कलेक्टर साहिबाँ’ असं नावच पडलं..

अभ्यासाला कंटाळू नका

स्पर्धा परीक्षेसाठी जास्त महिने सातत्याने अभ्यास करावा लागतो. एक ते अठरा महिने तयारी करावी लागते. अशा वेळी अभ्यासाचा कंटाळा येतो; पण तसं होऊ  नये म्हणून स्मार्ट स्टडीजचा अवलंब करा. एकदा एका विषयाचा कंटाळा आला की दुसऱ्या विषयाचा अभ्यास करा. त्या वेळी अभ्यासच एवढा असतो की तुम्हाला बाकीचं काही वाचायला मिळत नाही. त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या विषयातच विविधता शोधा. त्यासाठी तुम्हाला वर्तमानपत्रे, विविध सरकारी संकेतस्थळं, माहितीपूर्ण मासिकं यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे माहितीही मिळते, अभ्यास होतो आणि कंटाळाही येत नाही. मुळात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात विविधता असतेच.

डिग्रीसाठी शिक्षण घेऊ  नका..

अनेकदा मुलं फक्त डिग्री हवी म्हणून शिक्षण घेतात; पण तसं करू नका. तुम्हाला जे आवडतं आहे तो अभ्यासक्रम निवडून त्याचा मनापासून अभ्यास करा. माझ्याआधी माझी बहीण आयपीएस झाली होती. मी जेव्हा दहावी-बारावी शिकत होते तेव्हा माझे आजीआजोबाही असंच सांगायचे, की तिचं शिक्षण पुरे झालं. शिकून फार तर शिक्षक होईल किंवा नोकरी करील. ती थोडीच कलेक्टर होणार आहे, असं ते विचारायचे; पण त्याहीवेळी माझ्या आईवडिलांनी माझी बहीण आणि मी हुशार आहेत, त्यांना शिकू दिलं पाहिजे, ही भूमिका कायम ठेवली. मला लहानपणापासून शिकण्याची आवड होती, वादविवाद करण्याची आवड होती, नवीन शिकत राहण्याची आवड होती. आत्ताही प्रशासकीय अधिकारी झालो म्हणजे आपल्याला ज्ञानाची गरजच उरली नाही असं होत नाही. अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत जे सेवेत असूनही शिक्षण घेत राहतात. आमचे एक सचिव आहेत, ते तर आता बीएडही झाले आहेत. शिकत राहणं महत्त्वाचं असतं. तुमचं जे ज्ञान आहे ते सतत वाढवत राहणं, अपडेट राहणं हे महत्त्वाचं असतं, नुसतं डिग्री घेणं नव्हे..

स्त्री अधिकारी म्हणून आव्हान

मी धाडसी नाही, पण मी माझ्या कामात अपयशी होण्याचा विचार मनातून काढून टाकला आहे. आलेल्या आव्हानाला सामोरे जा. मला कधीही कुठूनही एक स्त्री अधिकारी म्हणून दडपण आणणारा किंवा वाईट वागणूक देणारा फोन आला नाही. मी फक्त माझं काम करते आहे, त्यामुळे मी कधीही कोणाला घाबरत नाही. मी प्रामाणिकपणे काम करते आणि तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे, शिस्तीने तुमचे काम करत असता तेव्हा तुमच्या हाताखालच्या, आजूबाजूच्या लोकांवरही त्याची जरब असते, त्यांना आदरही वाटतो. कधीकधी आपणच ठरवलेल्या योजनेत, निर्णयात अपयश येतं तेव्हा शांत राहून आपलं काय चुकलं याचा विचार करायला हवा. आपलं मन मोकळं होईल अशा गोष्टी त्या वेळी कराव्यात. पुस्तक वाचन, गाणी ऐकणं, फिरायला जाणं.. माझ्या बाबतीत मी जेव्हा माझ्या मुलाला पाहते तेव्हा मी माझा सगळा ताण विसरून जाते. अशा गोष्टी करीत राहिल्या पाहिजेत. अपयशाचं मळभ दूर झालं की पुन्हा त्याच जोमाने कामाला लागायचं!

हिंदी बोललो तरी इंग्रजी वाटायची!

माझे वडील बारावी शिकले होते. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा केला आणि ते इंजिनीअर म्हणून पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मी बारावी गणित, विज्ञान घेऊन शिकत होते. त्या वेळी मला वडिलांनी विचारलं की, तुम्हाला इंजिनीअर व्हायचंय? त्या वेळी मला तसं काही करायचं नव्हतं, असं सांगितलं. मला भाषा शिकायची होती. संस्कृत घ्यायचा विचार माझ्या डोक्यात होता. त्या वेळी मला वडिलांनी सल्ला दिला, की हिंदी आणि आपल्या इतर भाषा तुम्हाला येतातच; पण तुम्ही इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला तर जागतिक स्तरावरचा अभ्यास करणं सोपं होईल. त्या वेळी आम्ही हिंदी जरी बोललो तरी आजूबाजूचे म्हणायचे की काय इंग्रजी झाडताय? आमच्या मारवाडी समाजात मारवाडी भाषेच्या पलीकडे कोणी पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे इंग्रजी तर आमच्या कल्पनेपलीकडे होती. वडिलांनी त्या वेळी दिलेला सल्ला खूप मोलाचा ठरला. मी इंग्रजी साहित्य हा विषय घेतला, अभ्यास केला आणि त्यातही पदवी शिक्षण पूर्ण केलं.

सरकारी सोयीसुविधांसाठी प्रशासकीय सेवेत येऊ नका

मी जेव्हा प्रशासकीय अधिकारी झाले तेव्हा माझ्या ज्ञानाने मी इतरांसाठी काही तरी करेन, हा एकच हेतू मनात होता. लाल दिव्यांची गाडी किंवा सरकारी सोयीसुविधांचा विचारही मी कधी केला नाही. आता तर महाराष्ट्रातून लाल दिवे गेले आहेत. ती नोटीस जेव्हा आली तेव्हा मी पालघरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि मी पहिला माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला होता. त्यामुळे लाल दिव्यासाठी सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू नका. दिवे तर लोकांच्या मनात आपल्या कामाने उजळले गेले पाहिजेत.

प्रशासकीय सेवेत बरेवाईट अनुभव नित्याचेच!

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काम करताना राजकीय दडपण, स्थानिक लोकांच्या अडचणी, व्यवस्थेमधील प्रश्न यांच्याशी रोजच सामना करावा लागतो; परंतु लोकांच्या हिताचा निर्णय असेल तर पाठिंबा नक्कीच मिळतो. त्यामुळे प्रशासकीय सेवेमध्ये काम करून बदल नक्कीच घडवता येतो. फक्त बदल घडवण्याची इच्छा असावी लागते. राजकीय दडपणाचे प्रसंग फारसे वाटय़ाला आले नाहीत. तुमचा हेतू चांगला असेल तर तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळतेच. पेण, पालघर यानंतर मुंबईतील प्रशासकीय सेवेमध्ये अनेक बरेवाईट अनुभव आले, परंतु यातून शिकत पुढे जात राहिले आणि जात राहणार.

मोपेड दिली म्हणून भांडण!

त्या वेळी शाळा-कॉलेजमध्ये मुलींना त्यांचे वडील सोडवायला यायचे; पण मी कॉलेजला प्रवेश घेतल्यावर मला वडिलांनी मोपेड घेऊन दिली. पूर्ण तालुक्यात कोणी मुलगी मोपेड चालवत नव्हती. जिथे मुली शिक्षणच घ्यायला पुढे येत नाहीत तिथे वडिलांनी मला कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोपेड घेऊन दिली, त्यामुळे सगळे मला पाहायला गोळा व्हायचे. मला खूप राग आला त्या गोष्टीचा.. मलाही इतर मुलींसारखं तुम्ही कॉलेजमध्ये येऊन सोडा, असं सांगत मी त्यांच्याशी भांडले होते. तेव्हा वडिलांनी मला विचारलं की काय झालं? मुलांनी फार त्रास दिला का? तू लक्ष नको देऊस. काय झालं मुलींनी गाडी चालवली तर.. असं उलट त्यांनी मला सांगितलं. खरं तर मला तेव्हा आनंद व्हायला होता. आज वाटतं की, मी त्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा होता; पण त्या वेळी तसं झालं नाही. मी उलट वडिलांना विचारलं होतं, की तुम्हाला मला धाडसी का बनवायचं आहे? आज मला ते कौतुक वाटतं; पण त्या वेळी तो प्रत्येक दिवस परीक्षेचा वाटायचा. खरं तर माझ्या वडिलांनीच मला धाडसी बनवलं. आजची निधी आणि तेव्हाची निधी यात खूप फरक आहे.

माझे वडील माझे आदर्श

माझ्या वडिलांनी नेहमीच माझी साथ दिली. प्रत्येक गोष्टीत ते पाठीशी होते आणि तेच माझे आदर्श आहेत. मी लहानपणी वेगवेगळ्या मासिकांतून लिखाण करत होते. माझे वडील पोस्टाचे स्टॅम्प्स-पाकिटं घेऊनच यायचे आणि त्या वेळी वर्तमानपत्रात जे संपादकीय येतं त्यावर तुम्ही काही तरी लिहा, त्यांना पाठवा, असं ते सतत सांगत राहायचे. आठव्या वर्षीपासून मी सतत लिहीत होते. माझं आर्थिक, राजकीय विषयावर माझं काय मत आहे हे लोकांना कळलं पाहिजे, त्यासाठी आपण लिहीत राहिलं पाहिजे हे तेव्हापासून बिंबलं होतं. माझ्या वडिलांनी हरएक प्रयत्न केले. त्यांनी कधीही मुलगा-मुलगी अशी वेगळी वागणूक दिली नाही. मला वाटतं, त्यांच्यासारखे वडील जर सगळ्या मुलींना मिळाले तर कोणतीच मुलगी मागे राहणार नाही.

जोखीम पत्करण्याची तयारी हवी

प्रशासकीय अधिकारी हा लोकांसाठी काम करत असतो. लोकांनी जे प्रतिनिधी निवडून दिले आहेत त्यांच्यात आणि लोकांमधला दुवा म्हणून प्रशासकीय अधिकारी काम करत असतो. त्यामुळे लोकांच्या हितासाठी काम करत असताना अनेकदा धाडसी निर्णय घ्यावेच लागतात. जोखीम पत्करून निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे धाडस सध्याचे प्रशासकीय अधिकारी करीत नाहीत. त्यामुळे त्यांना अपयश येत नाही, पण यशही मिळत नाही. जोखीम पत्करण्याची तयारी ठेवूनच प्रशासकीय सेवेत यावे. काही तरी करून दाखवण्याची जिद्द प्रशासनात येण्यासाठी आणि आल्यावरही हवी.

यशस्वी होण्याचा मंत्र

मी इयत्ता आठवीत शिकते. परीक्षा या केवळ परीक्षा नसून किंवा केवळ एखाद्या गोष्टीत निवड होण्याचे प्रमाणपत्र नसून खूप काही शिकवून जातात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कठीण असला तरी जर त्यात तुम्हाला खरंच इच्छा असेल तर तुम्ही नक्की करावा. मात्र अपयशानंतर खचून जाऊ  नका हे शिकायला मिळाले. कारण अभ्यासाच्या या प्रक्रियेतूनसुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात. ज्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मंत्र देऊन जातात. ’ प्रांजल धनावडे

मार्गदर्शक ठरणारा उपक्रम

व्हिवाचा उपक्रम चांगला आहे आणि या माध्यमातून भेटणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्ती या नक्कीच मार्गदर्शक ठरतात. निधी यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली. आणि इतक्या मोठय़ा पदावर कार्यरत असताना समोर कशा प्रकारे अडचणी निर्माण होतात, त्यांना सामोरे जायची जिद्द ही मुळात आपल्यात असायला हवी. हे त्यांचे म्हणणे भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल. ’ पारस नाईक

सकारात्मकता सोबत घेऊन जातोय

मी बँकेत नोकरी करतो. प्रशासकीय अधिकार आणि प्रशासन याबद्दल आपण साधारणत: नेहमीच नकारात्मक बोलत असतो. मात्र आज एक अधिकाऱ्यामागचा माणूस समजूून घेता आला आणि त्यांना देशाबद्दल वाटणारी तळमळ पाहता प्रशासकीय सेवेतली प्रामाणिकता दिसून आली. पुरुषप्रधान संस्कृतीला न जुमानता एका स्त्रीने जिद्दीने आणि समाजाला सोबत घेऊन काम करणे खरेच वाखाणण्याजोगे आहे.
’ संकेत सुभेदार

उभारी देणारे विचार

पुस्तकी ज्ञान, अभ्यास सुरू असताना विशेषत: त्याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून त्यांचे अनुभव, त्यांचे विचार खूप उभारी आणतात. निधी यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन उपयोगात आणण्यासारख्या आहेत. ’ तन्वी डोंबे

कष्ट घेण्याची जिद्द हवी

आवड असेल तर कष्ट घेण्याची जिद्द असायला हवी. हे निधी यांच्या बोलण्यातून प्रकर्षांने जाणवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणासाठी वय किंवा लग्न या गोष्टी आडव्या येत नाहीत. याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. ’ गिरीश जाधव

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला

विद्यार्थ्यांने आपल्या आयुष्याकडे कसे बघायला हवे, इच्छित ध्येयाकडे त्याने कशी वाटचाल करायला हवी. हे खूप सहज आणि छान समजले. व्हिवाच्या या उपक्रमातून अशा व्यक्ती सामान्यांसमोर येणे, समाजासाठी खूप गरजेचे आहे. ’ विजय पाटील

विचार भावले

निधी चौधरी यांचे विचार खरंच खूप भावले. एवढी मोठी पदवी मिळवूनही त्यांच्या बोलण्यातला प्रांजळपणा खूप भावला. नेहमीप्रमाणेच ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’चा कार्यक्रम खूप आवडीचा व प्रेरणादायी ठरला, यात काहीच शंका नाही. त्यासाठी लोकसत्ताचे खूप आभार.
’ श्वेता शेडगे

शिक्षण महत्त्वाचे

लाल दिवा काढून टाकला आहे हे त्यांनी ज्या शांतपणे सांगितले ते खूप आवडले. त्यांच्या शिक्षणाबद्दल खूप कौतुक वाटते. त्या अजूनही शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे एक वेगळे महत्त्व समजले. कोणत्याही वयात आपण जिद्दीने शिक्षण पूर्ण करू शकतो हा निधी चौधरींच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आम्हाला खूप काही शिकवून गेला. ’ युवराज राठोड

दिशा मिळाली

मला ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’चा हा कार्यक्रम खूपच आवडला. हा कार्यक्रम फार वेगळा ठरला. मला माझ्या आयपीएस अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली. पुढे कसे मार्ग अवलंबले पाहिजेत, याची दिशा मिळाली. त्यासाठी निधी चौधरी यांचे व्यक्तिमत्त्व फार वेगळे ठरले. श्रेयस धारपवार

पुढे जातच राहिले पाहिजे

निधी चौधरी यांचा मनमोकळा स्वभाव खूप भावला. कितीही अडचणी असल्या तरी आपण आयुष्यात पुढे जातच राहिले पाहिजे. त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगातून पुढे येऊन पदवी संपादन केली, पदव्युत्तर विविध विषयात शिक्षण घेतले. त्यामुळे आयुष्यात प्रगती करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्याकडून समजले. अथर्व सातपुते

संकलन : प्रियंका वाघुले, तेजल चांदगुडे

गायत्री हसबनीस