20 January 2019

News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : कोको टय़ून, शकीरा आणि श्रवणपचन

आपल्या भारतीयांइतके श्रवणक्षम कान जगात कुठेही नसतील. म्हणजे भारतात पहिले गाणे रेकॉर्ड झाले १९०२ साली.

तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये बॉलीवूडी गाण्यांची जत्रा असतेच. या लिस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारी गाणीही असतातच. यातली खरोखर ऐकायलाच हवीत अशा पॉप्युलिस्ट गाण्यांची तुमची यादी अपडेट करणारं हे सदर..

आपल्या भारतीयांइतके श्रवणक्षम कान जगात कुठेही नसतील. म्हणजे भारतात पहिले गाणे रेकॉर्ड झाले १९०२ साली. शास्त्रीय गायिका गौहर जान यांच्या गायकीचा मुद्रित झालेला तबकडीवरील पहिलावहिला आवाज ते आज कानासोबत डोक्यावरही परिणाम करणाऱ्या ‘प्यार से करेंगे सबका स्वागत’ या हिट पंक्तींच्या वहिवाटीत सहिष्णूतेचा कळस गाठावे इतके गाण्यांचे प्रवाह बदलत गेले. प्रत्येक उत्सव वा समारंभ साजरा करताना भारतातल्या कानाकोपऱ्यात दुसऱ्यांच्या कानाची तमा न बाळगता संगीत वाजतेच. त्यातही आबालवृद्धांच्या संगीतचवीत कमालीचा फरक आहे. दरेक तरुण पिढी आपल्या जाणीव किंवा जडणघडणीच्या काळातील संगीत सवरेत्कृष्ट मानते. त्यानुसार प्रत्येक नवी पिढी आधीच्या पिढीचे संगीत बाद ठरवत आणि आधीची पिढी नव्या संगीताच्या नावाने बोटे मोडत आली आहे. भारतात हिंदी सिनेसंगीत कायमच विविधतेतील एकता टिकवून होते. त्यानंतर प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक गीतांना महत्त्व होते. एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये एमटीव्ही आणि व्ही चॅनलच्या रूपाने सगळ्याच संगीतप्रेमींच्या संकल्पना आणि गानप्रेम उद्ध्वस्त करणारे वादळ आले. नंतर त्यात म्युझिक चॅनल्सची न थांबणारी भर पडत गेली. याचदरम्यान तंत्रज्ञान इतके चक्रवादळी बनले की रेकॉर्ड प्लेअरवरून टेपरेकॉर्डरवर जाताना लागला नाही, त्याहून अधिक वेगात लोक कॅसेट सोडून सीडीकडे वळले आणि सीडी सोडून एमपीथ्री-पेनड्राइव्हमधून संगीतसाठा करू लागले. घर भरेल इतकी जागा घेणाऱ्या कॅसेट-रेकॉर्ड्समध्ये मावणारी गाणी एका छोटय़ाशा हार्ड-ड्राइव्हवर मावू लागली. एमटीव्ही आल्यानंतर आपल्याकडे पहिल्या काही वर्षांत पॉप अल्बम्सची लाट आली. मग भारतीय सिनेसंगीतावरही पॉपस्टार्सचा प्रभाव पडला. पॉपमध्ये रिमिक्स आले, डीजेंचा सुळसुळाट वाढला आणि पाकिस्तानी गायकांना आयते व्यासपीठ मिळाल्यानंतर सुफी गायकी सिनेसंगीतात डोकावून गेली. २००४ नंतर खऱ्या अर्थाने आपले भारतीय सिनेसंगीत ग्लोबल झाले. म्हणजे पूर्वीच्या काळीही राजरोस चोरी करून किंवा प्रभाव घेऊन गाण्यांच्या चाली बांधल्या जात होत्या. यूटय़ूब आल्यानंतर कित्येक हिंदूी-मराठी गाण्यांचे मूळ स्रोत उपलब्ध झाले. आपल्या गाण्यात जागतिक प्रवाहासोबत हिपहॉप म्युझिक आले, लोकसंगीताचा प्रभाव आंतरराष्ट्रीय बिट्सवर पडताळून पाहणाऱ्या ए.आर. रेहमान, अमित त्रिवेदीच्या प्रयोगांत ते खुलले-विस्तारले  गेले आहे. आज वॉकमनवर संगीत ऐकणारी पिढी अस्तंगत  झाली असली, तरी आयपॉडयुगानंतर आता मोबाइल हा आबालवृद्धांचा संगीतसखा बनला आहे. गेल्या दहा वर्षांत माहितीच्या विस्फोटाइतकाच संगीत आणि गाण्यांच्या डाटाचाही विस्फोट झाला आहे. भारतामधील गाण्यांइतकेच किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय संगीत ऐकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. समाजमाध्यमांतून एमपीथ्री पाठविता येत असल्यामुळे कानांना सुखावणाऱ्या समांतर लोकप्रिय गाण्यांचा प्रचार आणि प्रसार सोपा झाला आहे. या सदरातून त्या आंतरराष्ट्रीय संगीताची दखल घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जानेवारी १९३६ साली अमेरिकेत पहिल्यांदा बिलबोर्ड मॅगझिनद्वारे आठवडय़ात सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांची यादी प्रकाशित होऊ लागली. हाच पुढे जगभरात रूढ झालेल्या ‘टॉप टेन हिट्स’चा आरंभ होता. या मासिकाच्या ताज्या अवतारात सध्या पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराच्या नामांकनावर चर्चा आहे. कृष्णवर्णीय कलाकारांच्या हिप-हॉप आणि आर अ‍ॅण्ड बी (ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लू) या संगीताचे यंदा ग्रॅमीच्या नामांकनात वर्चस्व असले, तरी गेल्या काही वर्षांमध्ये जुन्या गाण्यांना वाद्यांचा नवा मुलामा चढवून किंवा टीव्ही मालिकेमध्ये, सिनेमामध्ये वापरून एखाद्या विशिष्ट काळातील बॅण्ड्सना, गायकांच्या गीतांना पुनरुज्जीवन देण्याचे काम होत आहे. ‘थर्टीन रिझन व्हाय’ नावाच्या प्रचंड लोकप्रिय आणि वादग्रस्त मालिकेमधून अशा किती तरी जुन्या गाण्यांना पुन्हा लोकप्रिय केले गेले. सध्याच्या चित्रपटांच्या ओरिजनल साउण्डट्रॅक्स आणि मालिकांमधली गाणी नीट लक्ष देऊन ऐकली, तरीदेखील सुंदर गीतांच्या अजस्र जंगलाचा न संपणारा फेरफटका सुरू होईल. याद्या आणि हिटलिस्ट यांची पडताळणी या आठवडय़ात करीत नाही. पण गेल्या वर्षांच्या अखेरीपर्यंत कानांत गुंजणाऱ्या संगीतात ‘कोको’ या ताज्या अ‍ॅनिमेटेड सिनेमातील थीमसाँग सर्वात वरच्या स्थानी आहे. चित्रपटाचे थीमसाँग हे त्याची जातकुळी स्पष्ट करणारे असते. व्हायोलिनच्या तुकडय़ापासून सुरू होणाऱ्या या धूनद्वारे हा चित्रपट किती पकडून ठेवू शकेल, याची कल्पना करून देणारा आहे. यंदा ऑस्करसाठीच्या संगीत विभागात या धूनवर मात करू शकेल, इतकी चांगली धून २०१७च्या संपूर्ण वर्षांत ऐकायला मिळालेली नाही. गेल्याच वर्षी आलेल्या शकीराच्या ताज्या अल्बममधले ‘व्हॉट वी सेड’ हे गाणेदेखील ऐकावेच असे आहे. या संपूर्ण अल्बममध्ये शकीराची शैली थोडी बदललेली आहे. तरी तिच्या फुटबॉल स्पर्धाच्या थीमसाँगइतकेच नृत्यखेचक असलेले हे गाणे आहे. गेल्या दशकभरात सुमधुर गाण्यांची अविरत निर्मिती करत सर्वाधिक श्रीमंत गायिका बनलेल्या टेलर स्विफ्टला तिच्या ताज्या अल्बमसाठी निव्वळ दोन नामांकने मिळाली आहेत. अविस्मरणीय गाणी देणाऱ्या या गायिकेने यंदा अतिवाईट गाण्यांचा भडिमार केला आहे. तिचा विस्मृतीच्या वाटेवर असलेला अल्बम ऐकला तरी हरकत नाही. याशिवाय ‘गुची गँग’ हे विचित्र गाणे आवर्जून पाहावे आणि ऐकावे असे आहे. खास करून त्याच्या विडंबनासह. आपले श्रवणपचन वर्षभर खरोखरीच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी करायचे असेल, तर पुढील आठवडय़ापासून यादी हजर होईलच.

viva@expressindia.com

First Published on January 5, 2018 1:06 am

Web Title: bollywood songs pop songs bollywood pop songs hollywood