तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

‘द पिलग्रिमेज’ या पावलो कोएलो यांच्या पुस्तकातील हे वाक्य वाचल्यावर मला आलेला एक अनुभव व त्याचा तरुणांच्या परिस्थितीशी जवळ जाणारा विचार लक्षात येतो. मी बंदरावर जहाजे येताना पाहायचो, पण सर्व जहाजं बंदरावरच ठाण मांडून बसत नव्हती हेही मी पाहिलं, कारण ती जहाजं असतात त्या चालवणाऱ्यांच्या ताब्यात. इथे जहाज चालवणाऱ्या नाविकाची मन:स्थिती वेगळी असते. काहींना जहाजं थांबवायला आवडत नसावीत, त्यामुळे ते बंदरावर कधीच थांबत नाहीत. सतत भ्रमंती करत असावेत. जेव्हा जहाजं पाण्याचा वेध घेतात तेव्हा तो नाविक यशस्वी होतो जगभ्रमंती करायला. समुद्रातून भ्रमंती करणं किती धाडसाचं काम आहे याची मला नुसती कल्पना आली आणि त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की काहींच्या मनात एक वेगळीच जिद्द असते. बेभान असणारे हेच लोक आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवतात. नाविकांसाठी बंदरं ही फक्त त्यांच्या जहाजांसाठीची सुरक्षित जागा आहे. मात्र या बंदरांपलीकडे काहीतरी आहे, याचा प्रत्यय या ओळीतून जाणवतो. परंतु आज मला ही ओळ वाचताना एक वेगळीच चिंता जाणवली. आपल्याकडे बऱ्याच तरुणांना त्याच त्याच गोष्टी करत राहण्यात दिलासा वाटतो. ते फक्त नेहमी करत असलेल्या गोष्टीच करतात. का? त्यांना इतर कोणत्या गोष्टीमध्ये रस वाटत नाही का, असा प्रश्न पडतो. आपल्या इतर कौशल्यांकडे आपलंच दुर्लक्ष होतंय, ज्यांचा वापर खरं तर वेगळं काही करून पाहण्यासाठी केला जाऊ  शकतो, हेच मुळी ते विसरले आहेत का? आपण एखाद्या चांगल्या गोष्टीत धोका पत्करला तर अपयशच येईल असाच तरुणांचा समज असतो. परंतु वरील ओळीतून मिळणारा भावार्थ युवकांना मोलाचा संदेश देतो. जहाज चालवणाऱ्या नाविकाचे काम म्हणजे त्याला सांगण्यात आलेल्या अंतरापर्यंत जाणे. पण तो थोडा धाडसी असतो त्याला जिज्ञासा असते की बंदर सोडल्यावर पुढे समुद्र कसा दिसतो? त्यापलीकडेच जग कसे आहे? अज्ञात गोष्टींना घाबरण्याचे कारण नाही हे त्याच्या या निर्णयावरून समजते. खरं तर त्याला काय गरज असावी पुढे जायची, कारण त्याचे काम त्याला सांगण्यात आलेल्या सीमेपर्यंतच आहे. तरीही तो सीमा पार करतोच. कारण त्याला काही मिळवायचं नसलं तरी पुढे गेल्यावर काहीतरी पाहायचंय ही त्याची जिज्ञासा आहे. अज्ञाताचा शोध घेण्याची किंबहुना नव्या नव्या गोष्टी शिकून त्यातून बोध घेण्याची ही जाणीव, जिज्ञासा आजच्या काहीच न करू पाहणाऱ्या तरुणांनी अवलंबली पाहिजे.