अनिरुद्ध कुळकर्णी

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

जुन्या साहित्याबद्दल मी जिज्ञासा बाळगून आहे, पण या शतकात पुरोगामी विचार करत असताना मला जाणीवपूर्वक थोडं मागचं वाचायला आवडतं. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’ पुस्तकातील ही ओळ मी वाचली तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत असं माझ्या लक्षात आलं. आजच्या बऱ्याच घटनांशी हे वाक्य एका वेगळ्या अर्थाने जुळले आणि त्यामुळे काही घटनांचे अर्थ नव्याने कळले. त्यामुळे ही ओळ मला जास्त आवडते. यात धर्म म्हणजे काय? या साध्या-सोप्प्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत हा शब्दही आपसूकच जोडला जातो, कारण भगवंतांनी धर्माचा गहन अर्थ सांगितला. मानवाच्या आतंरिक आणि बाह्य विकासासाठी धर्माची आवश्यकता आहे असं पुस्तकात वाचलं पण एक तरुण व्यक्ती म्हणून माझ्यात ऊर्जा नसती तर मी एकटाच राहिलो असतो, ही संभाव्य स्थिती जाणवताना हे एक कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या वयाची मंडळी नेहमी ‘एनर्जेटिक’ तरुणांसोबत राहणं पसंत करतात. कोणीच, मी कोणत्या धर्माचा आहे? कोणता देव पाळतो? नास्तिक आहे का?, हे पाहात नाही. मी जर हुशार, बुद्धिमान, त्यांच्या तोलामोलाचा उत्साही तरुण असेन तर माझी ओळख व जागा त्यांच्यात नक्कीच चांगली असेल. आपल्यातला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा, करून पाहण्याचा उत्साह आणि चेहऱ्यावरची प्रसन्न शांतता लोकांना आकर्षित करते. खरं तर धर्म म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्तव्य. त्यामुळे मला हे पुस्तक वाचताना गीतेतला हा संदर्भ महत्त्वाचा वाटतो.

आजच्या युगात धर्म म्हणजे कर्मकांड मानतात. खरं म्हणजे सर्वानी मतभेद, हेवेदावे विसरून एकत्र नांदणे यातच धर्माचा अर्थ लपलेला आहे. म्हणूनच कोणावरही अन्याय होऊ  नये, कोणाला कोणाकडून त्रास होऊ  नये, कोणामुळे मनस्ताप होऊ  नये याची काळजी घेतली पाहिजे. आज सगळीकडे सगळ्यांनाच त्रास, मनस्ताप, मारहाण, फसवाफसवी, चोरी, दरोडे यांना सामोरं जावं लागतंय. मात्र आपण त्या वाटेकडे न वळणं आणि त्या वाटेवर जाणाऱ्यांना रोखणं हेच आपलं कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे. हे लक्षात घेऊन आजच्या तरुण पिढीने सुदृढ समाजघडणीला महत्त्व देत त्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत.