तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

रमी या खेळात आपल्या प्रतिस्पध्र्याकडे किती पानं आहेत आपण याचा विचार जास्त करतो कारण त्यावर आपलं कडक ‘लक्ष’ असतं. त्याच रीतीने आयुष्यातसुद्धा कित्येकदा आपण आपला वेळ समोरच्याकडे काय काय आहे? किंवा समोरचा आपल्यापेक्षा किती जास्त आनंदी आहे?, यावर लक्ष ठेवण्यात घालवतो. आपल्या खऱ्या आयुष्यातील प्रतिस्पध्र्याकडे नकळत आपलं जास्तच लक्ष असतं. परंतु त्यावेळी आपल्याकडच्या क्षमतांचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. मी माझ्या वयात चाललेली ही स्पर्धा अगदी रिलेट करू शकतो. ज्या पद्धतीने माझ्या वयाचा मुलगा कॉलेजमध्ये इतर मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी धडपडताना, नव्या नोकऱ्यांच्या मागे लागताना, सतत प्लेसमेंटसाठी मुलाखती देताना, इंटर्नशिप करताना पाहतो तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न नक्कीच डोकावून जातो. ‘अरे, हा तर नक्कीच ‘माझ्यापेक्षा’ हुशार असेल! माझ्यापेक्षा हाच ‘त्या’जागी उजवा आहे!, अशी नकळत स्वत:च्या हुशारीविषयीच शंका घेणारी विधानं मनात घर करायला लागतात. मग अशा वेळी आठवते ही ओळ! विन्सटन ग्रुम यांच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या पुस्तकातील ही ओळ आणि या पुस्तकातला नायक फॉरेस्ट गम्प. शारीरिकरीत्या कमजोर असूनही आणि बुद्धिमत्ता (आय.क्यू) कमी असूनही फक्त निरुपयोगी विचार न करता कष्ट करण्याच्या सवयीमुळे फॉरेस्ट आयुष्यात सफल होतो. त्याची आई तो लहाणपणी पायाने अधू असूनही कायम सांगायची की देवाने तुला जे बहाल केलंय ते कसंही असो त्याच जोरावर आयुष्यात पुढे जायचं आहे. छोटय़ा फॉरेस्टच्या कमजोर विचारशक्तीवर त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यानंतर तो सैनिक बनतो, सेवानिवृत्त झाल्यावर उत्तम टेबल टेनिसपटू बनतो. या गोष्टीतून आजच्या पिढीला खूप शिकण्यासारखं आहे. सध्या जगात खूप स्पर्धा आहे. विशेषत: अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना मला ती सर्वात जास्त जाणवते. या क्षेत्रात हजारो विद्यार्थी, अगदी हजारो विद्यार्थी दरवर्षी बेरोजगार राहतात. इथे प्रकर्षांने दुसऱ्यांपेक्षा आपण किती चांगलं परफॉर्म करतो त्याहून अधिक आपण आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला का?, याचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. नाहीतर आयुष्यात इतरांची तुलना करण्याच्या सवयीने कित्येक उच्च बौद्धिक क्षमता असणारे लोक अयशस्वी होतात त्याच वेळी फॉरेस्टसारखे कमी बुद्धिमत्ता असूनही दुसऱ्यांशी तुलना न करता प्रयत्नपूर्वक पुढे जात राहतात. आपल्या तरुण पिढीला हेच तर शिकायचं आहे! स्पर्धा जीवघेणी आहे हे मान्य आहे, पण स्वत:च्या क्षमतांचा पूर्ण वापर करणं याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. बाकी आपल्यापेक्षा हुशार माणसं तर आपल्या आजूबाजूला असणारच आहेत, आता त्यांच्याशी तुलना करत राहायचं की फॉरेस्टप्रमाणे स्वत:च्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याकडे ‘लक्ष’ ठेवून पुढे जायचं हेच आपल्या तरुणांच्या हातात आहे.