सृष्टी साळवी

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

रुपी कौर यांच्या ‘मिल्क अ‍ॅण्ड हनी’ या पुस्तकात म्हटलंय की कशा प्रकारे माणसं एकटेपणाच्या गर्तेत हरवलेले असताना नेहमी आधार, प्रेम आणि सोय शोधण्यासाठी धडपडत असतात. या ओळीतून मला तीव्रतेने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपल्याला कधीच लोकांच्या सल्लय़ाची गरज नसावी. कारण तुम्ही जसे नाहीत तसे बनण्याची खोटी सूचना त्या सल्लय़ात असते. आपण जन्माला एकटय़ानेच येतो, आपण आपला मार्ग एकटय़ानेच शोधायचा असतो. जो माणूस असा स्वयंसेवी, निश्चयी मनाचा, भयमुक्त, बिनधास्त असतो त्यांच्या या धाडसाला, त्यांनी एकटय़ाने मिळवलेल्या कर्तृत्वाला सगळं जग सलाम करतं. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर जेव्हा पुढे येता तेव्हा तुम्हालाच तुमच्या निर्भिड स्वभावाची प्रशंसा करावीशी वाटते. अगदी त्याउलट, तुम्हीच जेव्हा स्वत:च्या बाबतीत साशंक असता, स्वत:च्या परिस्थितीवर थोडे नाराज असता, मी काहीच करू शकत नाही या भावनेत अडकलेले असता तेव्हा सगळाच गोंधळ होतो. तुमच्या या भिडस्त स्वभावातून तुम्हाला एकटय़ानेच बाहेर पडायला हवं, त्या निडरपणे जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करून त्यातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही आधीपासूनच शूर होतात, स्वावलंबी-सुंदर होतात, आहात हे तुमच्या लक्षात येते. पूर्वी बाळगलेला न्यूनगंड हा एक भ्रम होता हेही कळून चुकते. म्हणून एकच काळजी घ्यायची आपण कोण आहोत, कसे आहोत हे जगाने सांगता कामा नये. मी कोण आहे, हे मला ठाम माहिती असले पाहिजे. विशेषत: आजची तरुण पिढी आपल्या एकटेपणाबद्दल फारच तक्रार करताना दिसते. जे स्वत:ला ‘मी एकटाच आहे!’ वगैरे समजतात त्यांच्यासाठी ही ओळ वाचताना त्यांनी जगण्याचा खरा अर्थ शोधण्याऐवजी ‘एकटेपणा’ म्हणजे काय हे शोधले पाहिजे. या एकटेपणाचा एकाकी हा अर्थ बदलून स्वबळावर पुढे येण्याचा निर्धार केला तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. तुम्हाला इतर कोणाची नव्हे तर तुमच्या स्वत:चीच जास्त गरत असते, हे या ओळीतून यथार्थपणे सूचित के ले आहे.