वैष्णवी नवलकर

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

मला स्वत:ला मानवी भावभावनांचं विश्व रंगवणाऱ्या कथा व तसे लेखक फार आवडतात. तरुणांच्या दृष्टिकोनातून आलेल्या अशा कथा जास्त भावुक करतात आणि कायम लक्षात राहतात. याबाबतीत माझा आवडता लेखक आहे दूर्जाय दत्ता. त्याच्या ‘द बॉय हू लव्हड’ या सिक्वेन्स पुस्तकातील ही ओळ जास्त आवडते. आपण आयुष्यात अर्धाअधिक वेळ आपला होणारा जोडीदार दिसायला कसा असेल? कोण असेल? किंवा त्याहीपेक्षा तो असाच हवा वगैरे विचार करण्यात घालवतो. पण जेव्हा तो भेटतो तेव्हा आपण फक्त त्याचं रूपच कल्पनेत रंगवलेलं असतं, एक व्यक्ती म्हणून त्याचा विचार कधीच केलेला नसतो, असा काहीसा अर्थ सांगणारं हे वाक्य आजच्या पिढीला रिलेट करणारं आहे असं मला वाटतं. आपण प्रेमात फार लवकर पडतो आणि तितक्याच वेगाने त्यातून बाहेरही पडतो. म्हणजेच आपण आपला जोडीदार केवळ बाह्य़रूप पाहूनच शोधत असतो. जेव्हा त्याच्या आतला माणूस कळतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काही चूक केली का म्हणून धास्तावतो. इथे भावनेच्या भरात घेतलेला जोडीदाराचा आपला निर्णय चुकला आहे की काय असं वाटतानाच पुन्हा प्रेमात पडलो तर तीच चूक पुन्हा होईल की काय अशी भीती आपल्या मनात घर करते, ही भावना लेखकाने अचूक पकडली आहे. प्रेमकथा म्हणजे नुसत्या दोन व्यक्ती प्रेमात पडणं नव्हे तर मानवी भावना व प्रेमात प्रत्येक माणूस करतो त्या चुका, गैरसमज व प्रेमात पडताना होणारी घाई या सगळ्या सहज भावना लेखकाने वास्तव पद्धतीने मांडल्या आहेत.