19 March 2019

News Flash

‘बुक’ वॉल

माणसं हरवली तरच आपण त्यांना वेडय़ासारखं शोधतो. वस्तूंबाबत आपण जास्त विचार करत नाही.

विनीत वढावकर

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

‘द ब्रुईड जाएंट’ या कादंबरीत कझूओ इशिगुरो या जपानी नोबेल विजेत्या लेखकाच्या पुस्तकातील ही एक ओळ जास्त भावली, याचं कारण असं की, ‘एक्सल’ आणि ‘बिर्टाईस’ हे एक वयस्कर जोडपं आहे. ते त्यांचा एक नवा प्रवास सुरू करतात, ज्यात ते त्यांच्या हरवलेल्या मुलाला खूप वर्षांनी शोधायला बाहेर पडले आहेत. लेखकाने इथं त्या दोघांमधला खूप भावनिक पैलू समोर आणला आहे. त्या दोघांनाही त्यांचा मुलगा कोण आहे, तो कसा दिसतो, कुठे राहतो? काही माहिती नसतं म्हणून आपल्या आयुष्याच्या सरत्या वर्षांमध्ये तरी त्याची भेट व्हावी म्हणून त्यांची धडपड आहे. माणसं हरवली तरच आपण त्यांना वेडय़ासारखं शोधतो. वस्तूंबाबत आपण जास्त विचार करत नाही. त्या एकदा हरवल्या तर आपण नवीन विकत आणतो, त्यांच्याशी असणारं भावनिक नातं हे काही काळापुरतंच असतं. परंतु माणसांबाबतीत ते कायमस्वरूपी असतं. काही कारणांमुळे हरवलेला आपला मुलगा शोधण्याचा निर्णय घेताना त्या जोडप्याच्या मनात हाच विचार आला आहे. कादंबरीतील या काल्पनिक गोष्टीत सुरुवातीला या जोडप्याला हेही माहीत नसतं की आपल्याला एक मुलगा आहे. पण जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते आपल्या मुलाला शोधण्यासाठी निघतात. आपल्यावर कधी अशी वेळ आली तर आपणही असंच वागू का, असा प्रश्नही मनात डोकावून जातो. कारण जी व्यक्ती आपल्या स्मरणातून नाहीशी झालेली असते, त्या व्यक्तीचं आपल्याशी नातं आहे हे समजतं तेव्हा मानवी स्वभावाप्रमाणे आपणही त्या व्यक्तीला शोधण्यासाठी नक्कीच धडपड करू. त्यामुळे ही ओळ वाचताना त्यातला हा भाव लक्षात येतो. माणूस फार हळवा असतो तो आपल्या आवडत्या, जवळच्या माणसांसाठी काहीही करू शकतो. तरुणपणी माणसांची किंमत इतकी जाणवत नाही, पण म्हातारपणी ती जास्त जाणवते. हाच भावनिक फरक असतो तरुण व म्हातारं असण्यात. त्यामुळे माणसांची प्रत्येक टप्प्यावर आपण कदर केली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. या जोडप्याच्या बाबतीत अप्रत्यक्षरीत्या तेच होतं. आयुष्यभर ते त्यांच्या मुलासमवेत आनंदाने राहू शकले नाहीत तर शेवटच्या क्षणी फार कमी वेळेत त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. त्या क्षणी तरी आपल्या मुलाबरोबरच्या त्यांच्या कुठल्याच बऱ्या-वाईट आठवणी नाहीयेत, ही खंतही त्यातून जाणवते.

First Published on March 2, 2018 12:38 am

Web Title: book wall by vinit vadhavkar