मयुरी बर्वे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

एक तरुण मुलगी म्हणून सध्या मी अशा स्टेट ऑफ माईंडमध्ये आहे जिथे मला माझे आत्ताचे आयुष्य आणि यापुढचे आयुष्य कसे जगायचे आहे ते ठरवायचे आहे. एक व्यक्ती म्हणून आजकालचे तरुण वास्तवातही स्वप्नात रमतात, पण माझ्यासाठी तसे राहणे कठीण आहे. जॉन ग्रीनचे ‘टर्टल्स् ऑल द वे डाऊन’ या पुस्तकात ही ओळ वाचली. मला ती आवडली कारण या कथेतील मुख्य पात्र अझा ही मानसिकरीत्या अस्थिर आहे. तिच्या आजाराचे मूळ कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ती खूप विचार करते, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा ती अति विचार करते. ब्रश केला का? नाश्ता केला का? हा रस्ता मी क्रॉस करू का? मी याला हो त्याला नको म्हणू का?, वगैरे आपल्याच प्रत्येक बारीकसारीक कृतीचा ती विचार करत राहते. ज्याला आपण मानसशास्त्रात ‘ओव्हरिथकिंग’ म्हणतो त्यातलं हे प्रकरण. मला स्वत:ला माहिती आहे की मी कोणी मानसिक रुग्ण नाही, तरी मीसुद्धा अतिविचाराने ग्रस्त आहे. सततचे हे विचार मला दु:खी करतात, माझ्या भविष्याबद्दल मला चिंता वाटायला लागते. या पुस्तकातील जगण्याची सुंदर थिअरी खरं म्हणजे आपल्याला भानावर आणणारी आहे. मुळात आजची तरुण पिढी आजच्या जगण्यापेक्षा भविष्यकाळाच्या विचारात जास्त रमते. आपण पुढे कोण होणार? आपलं भविष्य कसं असेल? याचा विचार करून करून ते निराश होतात. आपलं एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तर आपल्या आयुष्याचं नुकसान होईल, हा विचार त्यांचं मन कुरतडत असतो. ही खरं म्हटलं तर प्रत्येक तरुणाची व्यथा आहे. अशा वेळी वरच्या ओळीतून मांडलेली थिअरी महत्त्वाची ठरते. असं म्हटलं जातं एका मोठय़ा कासवाच्या पाठीवरची आपली पृथ्वी म्हणजे एक ‘बॅलन्स्ड’ थाळी आहे. याचा अर्थच आयुष्यात कुठल्याही एका गोष्टीचा विचार नाही तर समतोलाचा विचार व्हायला हवा. मला जे आयुष्य जगायचंय ते मी माझ्या पद्धतीने जगणारच आहे, पण त्याचबरोबर सतत पुढचा विचार करण्यापेक्षा माझा ‘आज’ कसा परिपक्व होईल, मी भरभरून आज कशी जगेन यावर आपला भर असला पाहिजे. आपला आज का विनाकारण अस्थिर ठेवायचा? कारण जे आज आहे ते उद्या राहणार नाही. हे वाक्यच मुळी वर्तमानाचं भान आणून देणारं आहे. माणसावर अचानक वाईट वेळ येतेही, मात्र ती कायम तशीच राहणार नसते. तीही वेळ, परिस्थिती बदलणारी असते. मात्र त्यावेळीही उद्याचा विचार करण्यापेक्षा त्या वर्तमानाच्या परिस्थितीतून योग्य पद्धतीने बाहेर पडण्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. एखादी गोष्ट मिळवायला बराच काळ लागेल, पण ती गोष्ट नक्कीच मिळेल, याची जाण आपल्यात आज असायला हवी. वर्तमानातले जगणे समृद्ध करण्याचा विचार या ओळीतून मिळतो.