शेफ वरुण इनामदार

सूर्याचा दाह चांगलाच वाढू लागला आहे पण, काळजी करण्याचं कारण नाहीये. ‘बॉटम्स अप’चा नवा अध्याय नक्कीच हा त्रास थोडा कमी करेल. कारण या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत बीअरविषयी काही खास गोष्टी. मला माहितीये, गेल्या काही दिवसांपासून आपण वाइनवर जास्त भर दिला होता. मुळात तो विषयच तसा होता, ज्याकडे जातीने आणि थोडं जास्त लक्ष देणं अपेक्षित होतं. वाइनच्या देशात मनमुराद फेरफटका मारल्यानंतर आता आपण वळणार आहोत बीअरकडे. वाइनच्या अध्यायाला थोडी विश्रांती दिली असून त्याकडे आपण नंतर पुन्हा येणार आहोतच.. तोवर बोलू या बीअरविषयी. चेहरा कसा फुललाय पाहा नुसता बिअरचा उल्लेख करताच! बीअर ही तशी अनेकांच्याच ओळखीची. किंबहूना त्याबद्दल सोशल मीडियावरूनही बऱ्याच गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत. त्यात आणखी काही भर टाकत सुरुवात करुया ‘बॉटम्स अप’च्या नव्या प्रवासाला.

चहा आणि पाणी या दोन पेयांमागोमाग सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणारं एकमेव पेय म्हणजे बीअर. हे आता नव्हे तर पूर्वापारपासून चालत आलं आहे. धान्यापासून बीअर तयार करण्यात येते. ज्यामध्ये बार्ली म्हणजेच जवाचा जास्त वापर केला जातो. पण, गेल्या काही वर्षांपासून बीअर तयार करण्यासाठी गहू, मका आणि तांदळाचाही वापर केला जातो आहे. धान्यामध्ये असणाऱ्या पिष्टमय पदार्थ आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या इथेनॉल आणि काबरेनेशनमुळे बीअर तयार होते. बीअर तयार करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे, हॉप्स. ऌ४े४’४२ ’४स्र्४’४२ या झाडाची ही फुलं, फुलं म्हणण्यापेक्षा  छोटय़ा आकाराचा झाडाचा अंश ज्याचा वापर बीअरला चव देण्यासाठी केला जातो. ज्यापासून कडवट, तुरट आणि हलकीशी आंबट चव बीअरला मिळते. त्याव्यतिरिक्त हर्ब्स आणि काही फळांचाही हॉप्सऐवजी वापर केला जातो. घरी हॉप्स वगैरे टाकून नीट तयार होते बीअर, पण कमर्शिअली जास्त प्रमाणात करताना त्यात काही पदार्थ मिसळावे लागतात. कमी प्रमाणात बीअर तयार करते वेळी त्यात वापरात येणारं नैसर्गिक काबरेनेशन मोठय़ा  प्रमाणात बीअर बनवते वेळी कृत्रिम पद्धतीने केलं जाऊ  लागलं.

बीअरविषयी आणखी सांगावं तर आपले धर्मग्रंथ आहेत, त्याचप्रमाणे पुरातन मेसेपोटोमियामध्ये ‘द कोड ऑफ हम्मुराबी’ ही अतिशय महत्त्वाची पुस्तिका होती. ज्यामध्ये बीअरचा उल्लेख आढळला होता. सुरुवातीच्या काही लेखी उल्लेखांमध्ये हे पुस्तक आढळलं म्हणजे पुस्तक ही संकल्पना ज्या वेळी मानवाला नीट उमगलीही नव्हती अगदी तेव्हाच्या काही पहिल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे हे ‘द कोड ऑफ हम्मुराबी’. बीअरविषयीच्या काही नियमांविषयी सांगावं तर, याविषयी प्रत्येक देशाचे स्वत:चे नियम आणि अटी आहेत. अगदी त्या बीअरच्या लेबलपासून ते करप्रणालीपर्यंत. त्यामुळे याविषयी जास्त विचार न करता हे सरकारवर सोडून द्यावं, कारण याविषयीचे निर्णय थेट तेथूनच घेण्यात येतात. त्यामुळे सध्यातरी आपण आपल्या प्याल्यावरच लक्ष देऊ या. मुळात या गोष्टींमध्ये कोणाचा तोटा नाही. पण, बिअर उत्पादकांनी त्यावरच्या करप्रणालीविषयी थोडा विचार करावा, कारण पिनेवाले तो पिते जाएंगे.. हे कितीही खरं असलं तरीही सरकारच्या निर्णयापुढे कोणालाच जाता आलेलं नाही हेच कटू सत्य आहे.

‘द हीम टू निनकसी’विषयी फार कमी लोकांनी ऐकलं असावं. मेसोपोटेमिअन बीअरच्या देवीसाठी लिहिलेली ही प्रार्थना आहे असं म्हटलं जातं. पण, मुळात ती सुशिक्षित लोकांनी लिहिलेली बीअर तयार करण्याची कृती आहे. इसवी सनपूर्व ३५०० ते ३१०० दरम्यानचे पश्चिम इराणमधील झ्ॉग्रोस डोंगररांगामध्ये आढळणाऱ्या गोडीन तेपे इथे जवापासून तयार करण्यात आलेल्या बीअरचे अवशेष सापडले होते. धान्याचा सर्वप्रथम शोध लागला तेव्हा म्हणजेच इसवी सनपूर्व १०,००० मध्येही बीअरचा वापर असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येतेय खरी पण, त्याबद्दल कोणताही पुरावा नाही हे खरं. बीअरचा उल्लेख पुरातन इराक आणि इजिप्तच्या इतिहासात आढळतो. ज्या वेळी आधुनिकीकरणाच्या काळात तिचा वापर केला जायचा, असं काही पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. साधारण ५००० वर्षांपूर्वी उरुक (सध्याचं इराक) शहरामध्ये मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून बीअर देण्यात यायची. आम्ही काही वर्षांपूर्वी इजिप्तला भेट दिली होती, तेव्हा तिथल्या टूर गाइडने मला दिलेली माहिती चांगली आठवतेय. इजिप्तच्या गिझामध्ये भव्य असे पिरॅमिड साकारण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक मजुराला दररोज जवळपास पाच लीटर बीअर दिली जायची. ज्यामुळे मजुरांच्या शरीराला आवश्यक अशी काही पोषक तत्त्वं तर मिळायचीच. त्यासोबतच बांधकामाच्या वेळी त्यांच्यात बराच उत्साहसुद्धा असायचा. आम्हाला त्या गाइडच्या बोलण्यावर त्या वेळी हसू आलं होतं, पण या साऱ्याची लेखी नोंद असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं.

सातव्या शतकाच्या आधीपासून म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या फार आधीपासूनच बीअर तयार करण्यात येते आहे. किंबहुना युरोपातील काही मॉनेस्ट्रीकडूनही बीअरची विक्री करण्यात येत होती. सुरुवातीच्या काळात युरोपिन मॉनेस्ट्रींकडूनन विकली जाणारी बीअर कालांतराने व्यावसायिक पातळीवर विकली जाऊ  लागली आणि त्यानंतर घरगुती पातळीवरही तिला स्थान मिळालं. आता तर काही हौशी लोकही बीअरचे काही प्रयोग करत विविध फ्लेव्हर्सची बीअर तयार करू लागले आहेत असा हा बीअरचा रंजक प्रवास. १९ व्या शतकाच्या सुमारास बीअर तयार करतेवेळी उत्पादकांनी हायड्रोमीटर आणि थर्मामीटरचा वापर सुरू केला, मुळात त्याच सुमारास या गोष्टींचा नव्याने शोध लागला होता. त्यामुळे बीअरच्या उत्पादन प्रक्रियेत काही अमूलाग्र बदल झाले. ती तयार करण्याच्या कृतीत बदल झाला परिणामी जी बीअर हाती आली, त्यातही बरेच बदल झाल्याचं लक्षात आलं. मुळात यामध्ये किमया होती ती म्हणजे नवनवीन संशोधनांची. इथे बीअर तयार करण्यासाठी काही गोष्टींच्या बाबतीत फॉम्र्युला वापरले जाऊ  लागले, ज्यामुळे तिच्या चवीमध्ये सातत्य राखता येणं शक्य झालं. उदाहरणार्थ किंगफिशर बीअरची चव दहा वर्षांपूर्वीही तशीच होती, जशी ती आज आहे.

भारतात युरोपियन संस्कृतीचा शिरकाव होण्यापूर्वीपासूनच बीअरचा वापर पाहायला मिळाला होता. वेदांमध्येही सुरा या नावाने बीअरचा उल्लेख आढळून येतो. देवराज इंद्राचं हे आवडीचं पेय असं म्हटलं जातं. पण, अखेर बीअर हे युरोपियन पेय आहे, यावरच अनेकजण ठाम आहेत. युरोपियन पद्धतीची बीअर भारतात आणली ती म्हणजे ब्रिटिशांनी. १७१६ मध्ये पेल एल ही हलक्या प्रतीची बीअर इंग्लंडहून मागवली होती. मोठय़ा प्रवासामध्ये बीअर खराब होऊ नये यासाठी त्यात मोठय़ा प्रमाणावर अल्कोहोल आणि हॉप्स मिसळण्यात आले होते. त्यानंतर १७८७ मध्ये भारतीय पेल एल ही बाओ ब्रुअरीमध्ये बनवली जाऊ लागली. १८३० मध्ये एडवर्ड अब्राहम डायर, म्हणजेच फादर ऑफ कर्नल रेजिनॉड एडवर्ड हॅरी डायर अर्थात जालियनवाला बाग हत्याकांडकर्त्यां कर्नलच्या वडिलांनी कसौलीमध्ये पहिली भारतीय ब्रुअरी सुरू केली. ‘लायन’ या नावाने सर्वाच्या भेटील आलेली ही बीअर आजही विकली जाते. पण, आता ती उत्पादन करणारा कारखाना मात्र शिमल्यातील सोलन येथे स्थलांतरित झाला आहे. वर्ष जसजशी सरत गेली तसतशी लायन बीअरच्या नावातही बदल झाले. सुरुवातीला ती डायर मिकन या नावाने ओळखली जायची, तर आज मोहन मिकन या नावाने तिला नवी ओळख मिळाली आहे. मोहन या नावाने तुम्हाला कशाची आठवण झालीये का? अगदी बरोबर, ‘रम’च्या लेखात आपण ज्या मोहन यांच्याविषयी वाचलं ही तीच कंपनी आहे, जी आपल्याला ‘ओल्ड मंक’ पुरवते.

१९६९ मध्ये मध्य प्रदेशच्या खजुराहो येथे सुरू झालेली लिलासन ब्रुअरिज ही त्यांच्या स्ट्राँग बीअरसाठी ओळखली जाते. भारतातील पहिलावहिला सुपर बीअर ब्रॅण्ड म्हणून त्याची ओळख आहे. त्याशिवाय सध्याच्या घडीला भारतात सर्वाधिक खप होणारी बीअर म्हणजे किंगफिशर. ज्याशिवाय ताज महाल इंडियन लेगर, कल्याणी, टायगर, लायन, कोब्रा, हेवर्डस, नॉक आऊट आणि झिंगारो हे बीअरचे ब्रॅण्डचे बरेच लोकप्रिय आहेत. भारतात ब्रुअरी मार्केटमध्ये सर्वाधिक वाटा आहे तो म्हणजे बंगळूरुच्या युनायटेड ब्रुअरीजचा. त्याशिवाय कार्ल्सबर्ग, सबमिलर इंडिया आणि अँनुसर- बुश इनबेव्ह या ब्रुअरीजही बऱ्याच प्रचलित आहेत. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की सबमिलर ही तिच कंपनी आहे जी हेवर्ड्स आणि फॉस्टर्सची उत्पादनं विकते आणि अँनुसर- बुश इनबेव्ह कंपनी बडवायझर हे उत्पादन विकते. आपण फॉस्टर्स, बडवायझर ही नावं ऐकली आहेत खरी पण, त्यांच्या मूळ कंपन्यांविषयी जाणून घेण्याचा फारसा प्रयत्न केला नसावा, म्हणून ही काही माहिती दिली.

एरवी आपण बीअर कॅनमध्ये किंवा एखाद्या सुरेख अशा बाटलीमध्ये पाहत आलो आहोत. पण, गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रोब्रुअरीज ही संकल्पनाही नव्याने सुरू झाली आहे. रेस्टॉरंटच्याच काही मोकळ्या भागात या मायक्रोब्रुअरीज थाटलेल्या असतात, जेथून अगदी ताजी अशी फळांची आणि विविध चवींची ताजी बीअर तयार केली जाते. त्यात अल्कोहोलचं प्रमाणही विविध प्रकारे, चवीनुसार संतुलित राखलं जातं. नवी संकल्पना, बीअरचे विविध प्रकार हे सर्व मान्य. पण, इथे मुळ मुद्दा असा आहे की, या बीअर कॅफेचा व्यवसाय फारसा चांगला चालत नाही. कारण अद्यापही त्याला प्रसिद्धी मिळाली असली तरी फारशी स्वीकृती मिळालेली नाही असंच म्हणावं लागेल. उदाहरणार्थ फोटोकॉपीसाठी आपण झेरॉक्स याच शब्दाचा सर्रास वापर करतो. जणू तो फोटोकॉपीचा समानार्थी शब्दच आहे. पण, मुळात तसं नाहीये. ‘झेरॉक्स’ ही अमेरिकन डिजिटल डॉक्युमेंटेशन कंपनी आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या इथे बीअर म्हटलं की, ‘किंगफिशर’ हेच नाव प्रचलित आहे. त्यामुळे इतर शब्दच काय विचारही अनेकांच्या मनात येत नसावेत. तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण हा खरं तर  गहन चर्चेचा विषय आहे. ज्यावर आपण नक्कीच वेळ काढून विचार करणार आहोत.. तोवर ‘बिअर है तो मामला सेट है बॉस’!

अमेरिकेचा इतिहास आणि ते घडवणारे दिग्गज यांच्या सन्मानार्थ ‘रेड लागर’ लवकरच ‘फ्रीडम रिझर्व रेड लागर’ नावाची नवीन बीअर बाजारात आणणार आहेत. १७५७ मध्ये भारत आणि फ्रेंच युद्धादरम्यान जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या लष्करी जर्नलमध्ये हाताने लिहिलेली एक बीअरची रेसिपी सापडली, ज्यावरून प्रेरणा घेऊन या नव्या रेड लागरची निर्मिती करण्यात आली आहे.

viva@expressindia.com