हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या सदरातून.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही एक अभूतपूर्व घटना होती. तिचा प्रत्येक तरुण मनावर झालेला परिणाम निराळाच होता. काही प्रत्यक्ष चळवळीत सहभागी झाले, तर काहींनी कृतीतून देशाच्या स्वत्वाला साथ दिली. अशा तरुणांनी काही उद्योगांचीही स्थापना केली. त्यातील जागतिक स्तरावर विश्वासाची मोहोर उमटवणारे नाव म्हणजे गोदरेज.

Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mother's name after your name decision by Aditi Tatkare
‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Try this amazing Spicy and Tasty Chicken Kharda You Will Love Note The Recipe
नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल झणझणीत पारंपरिक ‘चिकन खर्डा’; लगेच नोट करा रेसिपी…
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
Wedding Video
नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल

गोदरेज कपाटांनी वर्षांनुवर्षे ज्या विश्वासाने आपल्या मौल्यवान चीजवस्तू सांभाळल्या, तोच विश्वास ‘गोदरेज’च्या प्रत्येक वस्तूबाबत जाणवतो. त्याच कपाटबंद विश्वासाची ही कहाणी.

ब्रिटिश आमदनीत मुंबई प्रांतात बुजरेरजी आणि दोसीबाई गुथरजी हे पारसी दाम्पत्य राहत होते. यांना सहा अपत्ये. १८७१ मध्ये बुजरेरजी यांनी आपले आडनाव बदलून गोदरेज असे केले. या कुटुंबातील सगळ्यात मोठा मुलगा अर्देशीर याने वकिलीचा अभ्यास केला. मात्र झांजीबार येथील खटल्याच्या वेळी काही अशा गोष्टी घडल्या की त्याने वकिली सोडून दिली. मुंबईत परतल्यावर एका फार्मसीत त्याने सहायक म्हणून काम केले. त्या वेळी शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्याच्या मनात आला. पारसी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मेरवानजी कामा यांच्याकडे त्याने काही पैसे कर्जाऊ  मागितले. खरे तर गोदरेज कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. तरीही अर्देशीरने मेरवानजींकडे हे पैसे मागितले, याला एक कारण होते. त्याला भीती होती की, वडील पैसे कर्जाऊ नव्हे तर बक्षिसी म्हणून देतील. अर्देशीरच्या स्वाभिमानी वृत्तीला ते नको होते. तो काळच अशा आदर्शाचा होता. पुढे वडील वारल्यावरही अर्देशीरने वडिलोपार्जित संपत्तीतला हिस्सा नाकारला. अशा प्रकारे कर्जाऊ पैसे घेऊन व्यवसाय सुरू झाला. पण अर्देशीर यांनी बनवलेली साधने कंपनीला विकायची वेळ आली तेव्हा एका अटीमुळे व्यवहार फिस्कटला. अर्देशीर यांची अट होती की, प्रत्येक उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिलेले असावे. ब्रिटिश काळातल्या त्या कंपनीने ही अट नाकारली आणि व्यवसाय बंद पडला. मात्र अर्देशीर यांच्या हातून एका व्यवसायाच्या साम्राज्याचा पाया अटळ होता. त्याला कारणीभूत ठरली एक बातमी. वर्तमानपत्रातल्या एका बातमीने अर्देशीरचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इलाख्यात वाढलेल्या घरफोडय़ा आणि त्यावर सुरक्षेचे उपाय म्हणून पोलिसांनी योग्य सुरक्षाउपाय करण्याचे आवाहन केले होते. त्या क्षणी त्यांना नव्या व्यवसायाची कल्पना सुचली. मजबूत आणि सहज न फोडता येणारी कुलुपे बनवायचा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. पुन्हा मेरवानजींकडून त्यांनी ३,००० रु. कर्जाऊ घेतले. एका छोटय़ाशा शेडमध्ये १२ कामगारांसह ही फॅक्टरी सुरू झाली. त्याआधी बनवली जाणारी कुलुपे हाती बनवलेली आणि फारशी अचूकता नसल्याने सहज फोडता येणारी होती. गोदरेज फॅक्टरीत बनणारे प्रत्येक कुलूप आणि चावी एकमेवाद्वितीय होते. या कुलपांच्या रूपाने भारतीय घरांवर एक भक्कम पहारेकरीच बसला. सुरक्षा साधनेच्या दुनियेत गोदरेज कुलुपांनी क्रांती केली. यात गरजेप्रमाणे वैविध्य होते. दोन चाव्यांची गार्डियन कुलुपे किंवा जगात प्रथमच तयार केलेली स्प्रिंगलेस कुलुपे यांनी कुलूपविश्वात आमूलाग्र बदल घडवून आणला.

यानंतर १९०२ मध्ये गोदरेजची तिजोरी अवतरली. अनेक धनिक, व्यावसायिक, सामान्य जन यांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंचा ठेवा सांभाळून ठेवणारा दणकट रक्षक सापडला. १९०५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या इंग्लंडच्या राणीचे मौल्यवान सामान सुरक्षित राहील अशा कपाटांसाठी गोदरेजच्या तिजोरीला प्राधान्य दिले. ही एक प्रकारे गोदरेजच्या दर्जाला मिळालेली पोचपावती होती. ही तिजोरी चोरांपासूनच नाही तर आगीपासूनही सुरक्षित होती. १९४४ साली मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण मुंबई गोदीतील आगीत प्रचंड वित्तहानी जीवितहानी झाली, पण गोदरेज कपाटाच्या तिजोरीतील मौल्यवान वस्तू, कागदपत्रे मात्र आगीच्या झळांपासून सहीसलामत राहिली. ही घटना विलक्षण होती. या घटनेनंतर गोदरेज कपाटांनी भारतीयांच्या मनात जे अढळ स्थान प्राप्त केले ते कायमचे. त्यामुळेच आज कपाटाला ‘गोदरेज’ हा प्रतिशब्द तयार झाला आहे. कोणताही ब्रॅण्ड असला तरी कपाटात आहे ऐवजी गोदरेजमध्ये आहे असं म्हणणारी मंडळी दिसतात ती याचमुळे. भारताच्या इतिहासातील अनेक घडामोडींचा गोदरेज ब्रॅण्ड साक्षीदार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकशाही निवडणुकांत मतदारांचे बहुमूल्य मत जपून ठेवणाऱ्या मतपेटय़ा गोदरेजच्याच होत्या. या साऱ्याचे रहस्य एकच होते, उत्तम दर्जा. अर्देशीर गोदरेज यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. पण त्यांचे स्वदेशीबद्दलचे मत लक्षात घेण्याजोगे आहे. केवळ वस्तू स्वदेशी आहे म्हणून तिला चांगले म्हणण्याची सक्ती नको. ती दर्जाच्या बाबतीतही उत्तम असली पाहिजे. एतद्देशीय वस्तू हलक्या वा कमी दर्जाच्या हे समीकरण त्यांना बदलायचे होते आणि त्यांनी ते बदललेही. भारतीय घराघरांत दाराला गोदरेज कुलूप आणि आत गोदरेज कपाट हे समीकरण अभेद्य होते.

१९१० मध्ये अर्देशीर युरोपात गेले. दरम्यान त्यांचा धाकटा भाऊ  पिरोजशा यांनी व्यवसाय सांभाळला आणि विस्तारला. तत्कालीन सरकारने गोदरेज बंधूंना या व्यवसायासाठी विक्रोळी गावातील जमीन ५० वर्षांच्या कराराने दिली. गोदरेज कंपनीच्या सहवासात विक्रोळी गाव आमूलाग्र बदलले. १९२८ साली अर्देशीर यांनी सगळा व्यवसाय भावाच्या हाती सोपवला आणि ते नाशिकला निघून गेले.

पिरोजशा यांच्या नेतृत्वाखाली गोदरेज समूह लॉकर, कुलूप या व्यवसायांपलीकडे अन्य उत्पादनांकडे वळला. त्या काळी भारतात उपलब्ध असलेल्या साबणात चरबीयुक्त साबणाचे प्रमाण अधिक होते. हिंदू धर्मीयांच्या भावना ओळखून पिरोजशा यांनी वनस्पती तेलाचा वापर केला आणि साबण बनवण्याचा निर्णय घेतला. गोदरेज कंपनी साबण व्यवसायात शिरली. ‘सिंथॉल’ आणि ‘गोदरेज नंबर वन’ या साबणांपैकी ‘सिंथॉल’ हा त्या काळी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकला जाणारा साबण होता. १९५८ साली गोदरेज कपाटासोबत गोदरेज शीतकपाट अर्थात फ्रिज घराघरांत विराजमान झाला. अनेक घरांतला पहिला फ्रिज गोदरेजचा असायचा. भारतातले सर्वात जास्त विकले जाणारा केशकलप म्हणजे गोदरेज हेअरडाय १९७४ पासून भारतीयांच्या ‘केशसेवेत’ हजर झाला. तर १९९४ साली मलेरियाच्या साथीचा विचार करीत ‘गोदरेज गुडनाइट’ आले. रिअल इस्टेट, ग्राहककेंद्री वस्तू, उपकरणे अशा विविध प्रकारे ब्रॅण्ड गोदरेज वाढत राहिला. २००८ मधील भारताच्या चांद्रयान मोहिमेत यानातील अनेक महत्त्वाची उपकरणे गोदरेज मेड होती.

‘आयडियाज दॅट मेक लाइफ ब्रायटर’ ही गोदरेजची टॅगलाइन सर्वार्थाने खरी आहे. गोदरेजचा लोगो म्हणजे पिरोजशा गोदरेज यांची सहीच आहे. गोदरेज ही अक्षरे जिथे जिथे नजरेस पडतात तिथे तिथे भारतीय माणूस दर्जाच्या खात्रीने पाहतो. जगभरात हीच प्रतिमा या ब्रॅण्डने तयार केली आहे. म्हणूनच हा केवळ ब्रॅण्ड नाही तर भारतीय ग्राहकांचा अनेक वर्षांचा विश्वास आहे.

viva@expressindia.com