एकामागोमाग एक बंद झालेली इराणी हॉटेल्स नंतर कधीच सुरू झाली नाहीत. परंतु तीन वर्षांपूर्वी मुंबईत एक ऐतिहासिक घटना घडली. तब्बल पाच दशकांनंतर मुंबईत पुन्हा एकदा डॉ. मन्सूर अली शौगी यझदी यांनी माहिमच्या कनोसा हायस्कूलच्या समोर ऑक्टोबर २०१५ मध्ये नवं कोरं इराणी हॉटेल सुरू केलं. त्याचं नाव कॅफे इराणी चाय’. पण यावेळी त्यांच्या वाटय़ाला वाघमुख न येता गायमुख आलं.

‘कॅ फे इराणी चाय’ या नावातील ‘चाय’ या इंग्रजी शब्दात त्यांनी ‘आय’ या इंग्रजी अक्षराचा दोनदा उल्लेख केला आहे. ते दोन आय म्हणजे दोन डोळे आहेत, असं डॉ. मन्सूर सांगतात.

मुंबईच्या नाक्यावरची ही मोठय़ा जबडय़ाची दुकानं म्हणजे वाघमुखं होती. हिंदूंनी ती धार्मिक तर कधी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फायद्याची नसल्याचे कारण देत खरेदी केली नाहीत. स्वाभाविकच त्यांचे दरही कमी होते. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा इराणी भारतात आले त्यावेळी मुंबई, पुणे, हैदराबाद या तीन प्रमुख शहरांत त्यांनी तळ ठोकला आणि वाघमुखं असलेली ही दुकानं अगदी नगण्य किमतीत विकत घेतली. त्यांच्या लेखी या शकुन-अपशकुनाला काडीचीही किंमत नव्हती. इराणी नाक्यावरच का आढळतो त्याचं हे कारण आहे. कालांतराने भारतात दाखल झालेला इराणी वैभवसंपन्न झाला. मैलोन्मैल चालत आलेले हे इराणी फार शिकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी भारतात आल्यावर त्यांच्या पुढच्या पिढीला शिकवलं. पुढची पिढीसुद्धा मन लावून शिकली आणि विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यापैकी पहिल्या दोन-तीन पिढय़ांनी इराणी हॉटेलचा हा व्यवसाय इमाने-इतबारे सुरू ठेवला, पण नंतरच्या पिढीने गल्लय़ावर बसण्यास नकार दिला. शिवाय तोपर्यंत काळही बदलला होता. केवळ हिंदूंनाच नव्हे तर व्यापारी मानसिकता असलेल्या प्रत्येकालाच नाक्यावरच्या मोक्याच्या जागेची किंमत लक्षात आलेली होती. बहुराष्ट्रीय कंपन्याही भारतात दाखल होत होत्या. त्यामुळे त्यांनी या मोक्याच्या जागा विकत घेण्याचा सपाटा लावला. अर्थातच नाक्यावरचा इराणी हळूहळू नाहीसा झाला. एकामागोमाग एक बंद झालेली इराणी हॉटेल्स नंतर कधीच सुरू झाली नाहीत. परंतु तीन वर्षांपूर्वी मुंबईत एक ऐतिहासिक घटना घडली. तब्बल पाच दशकांनंतर मुंबईत पुन्हा एकदा डॉ. मन्सूर अली शौगी यझदी यांनी माहिमच्या कनोसा हायस्कूलच्या समोर ऑक्टोबर २०१५ मध्ये नवं कोरं इराणी हॉटेल सुरू केलं. त्याचं नाव ‘कॅफे इराणी चाय’. पण यावेळी त्यांच्या वाटय़ाला वाघमुख न येता गायमुख आलं. ‘कॅफे इराणी चाय’ या नावातील ‘चाय’ या इंग्रजी शब्दात त्यांनी ‘आय’ या इंग्रजी अक्षराचा दोनदा उल्लेख केला आहे. ते दोन आय म्हणजे दोन डोळे आहेत, असं डॉ. मन्सूर सांगतात. तसंच इंडियन-इराणी भाई भाई या टॅगलाईनच्या वर भारताच्या झेंडय़ाचा भगवा, हिरवा आणि इराणच्या झेंडय़ाचा लाल आणि हिरवा हे रंग वापरण्यात आलेत.

शतकभरापूर्वी इराणमध्ये यझद आणि केरमान या प्रांतात मोठा दुष्काळ पडला. त्यानंतर तेथील मंडळी मजल-दरमजल करत आठ-नऊ  महिने पायी प्रवास करत भारतात पोहोचली. डॉ. मन्सूर यांचे आजोबा हाजी मोहम्मद शौगी यझदी हे त्यापैकी एक. १८९० साली भारतात दाखल झाल्यानंतर हाजी मोहम्मद हे अपोलो बंदरला किटलीत चहा विकत असत. डॉ मन्सूर सांगतात, आम्ही भारताचा उल्लेख हिंदुस्तान असाच करतो. कारण फारसी भाषेत ‘दुस्तान’ म्हणजे फ्रेंडशिप. हिदुस्तानी लोकं ‘अतिथी देवो भव’ असं मानतात आणि आम्हा इराण्यांचीसुद्धा तीच भावना आहे.

डॉ. मन्सूर यांचे वडील हबिब शौगी यझदी दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये कॅन्टीन चालवत असत. चित्रपट सुरू होण्याआधी आणि मध्यंतराच्या काळात असं मोजकंच काम तिथे असल्याने डॉ. मन्सूरही तिथे अधूनमधून जात असत. त्यावेळी व्ही. शांताराम यांनी त्यांना खूप प्रेम दिलं. डॉ. मन्सूर त्यांच्यापासून प्रभावित झाले आणि त्यांनाही चित्रपटाची गोडी लागली. त्यातूनच त्यांनी २०१३ साली ‘कॅफे इराणी चाय’ हा अठ्ठावीस मिनिटांचा माहितीपट तयार केला. इराण्यांचं भारतात झालेलं स्थलांतर आणि मुंबई, पुणे, हैदराबाद येथील इराणी हॉटेल्स, इराणी पदार्थ आणि त्यांच्या मालकांची कथा सांगणाऱ्या या माहितीपटाला आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पंधराहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

‘कॅफे इराणी चाय’ सुरू करताना डॉ. मन्सूर यांनी इराणी हॉटेलचा पूर्वीचाच थाट कायम ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावरच ठेवलेली आरामखुर्ची तुमचं लक्ष वेधून घेते. हॉटेलच्या इंटिरीअरमध्ये लाकडाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आलाय. आत शिरताच डाव्या बाजूला गल्ला आहे. त्यावर एका कोपऱ्याला अंडय़ाचे क्रेट आणि चॉकलेट-गोळ्यांच्या मोठाल्या काचेच्या बरण्या मांडलेल्या आहेत. या काचेच्या बरण्यांमधील चॉकलेटचीसुद्धा गंमत आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या लहान मुलांना या बरणीतलं चॉकलेट भेट म्हणून दिलं जात असे. त्यामुळे ते लहान मूल पुढच्या वेळी हॉटेलमध्ये जाताना चॉकलेटवाल्या काकांच्याच हॉटेलमध्ये जायचंय असा हट्ट धरत असे. आपसूकच इराणी आणि ग्राहकांमधील बंध अशा लहानसहान कृतींमधून घट्ट होत गेले. खालच्या काचेच्या कपाटात येथे मिळणारी विविध इराणी उत्पादनंही दिसतात. नवीन गायमुखी गाळ्यात जागेचा अभाव असल्याने मोजकेच चौकोनी लाकडी टेबल आणि शंभर वर्षे जुन्या लाकडी खुच्र्याची पध्दतशीरपणे मांडणी केलेली आढळते. टेबलावर सिल्कचं नक्षीदार कापड अंथरलेलं आहे. त्यावर मेन्यू आणि वर संपूर्ण टेबल व्यापून टाकणारी मोठाली काच. समोरच लाकडाच्या आणि काचेच्या कपाटात ताजे पाव दिसतात. हॉटेलमध्ये दोन्ही बाजूला मोठाले आरसे लावलेले आहेत. हे आरसे म्हणजे पूर्वीचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, असं डॉ. मन्सूर सांगतात. त्या आरशांमधून गल्लय़ावर बसलेल्या मालकाला रस्त्यावरील हालचालींपासून ते किचनमधल्या प्रत्येक गोष्टी दिसत असतात. तिथेच बसून तो प्रत्येक टेबलावर लक्ष देत असतो आणि कामगारांना प्रत्येक गोष्टीची ऑर्डर देत असतो. फक्त मालकच कशाला आलेल्या गिऱ्हाईकालाही बसल्या जागेवरून संपूर्ण हॉटेलमध्ये काय सुरू आहे याची मान न वळवता माहिती मिळत असते. खाली चौकटीचे डिझाइन असलेल्या दोन रंगातील चेकर्ड टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत. पूर्वी त्याचा वापर बुद्धिबळ खेळण्यासाठी केला जात असे, असं ते सांगतात.

इथल्या मेन्यूकार्डावर सकाळच्या न्याहरीपासून, दुपारचं आणि रात्रीच्या जेवणासाठीचे सर्व पदार्थ आहेत. इराणी चहा, बन मस्का, ऑमलेट, भुर्जी, खिमा, बिर्याणीसोबतच दरदिवशी इराणी स्पेशल पदार्थही असतो. इराणी आब घोष (सोमवार), मसूर घोस्ट राईस (मंगळवार), बेरी झेरेश पुलाव (बुधवार), अदस पुलाव (गुरूवार), इराणी मटण हलीम (शुक्रवार), पर्शियन मटण शोर्बा (शनिवार), मटण व्हाईट बिर्याणी (रविवार) अशी दररोज वेगळी ट्रीट येथे मिळेल. शिवाय पालनजीचे प्रसिद्धआईस्क्रीम सोडा, रासबेरी, जीरा मसाला, जिंजर, लेमनेड ही थंड पेयदेखिल आहेतच. प्रत्येक पदार्थ अतिशय प्रयत्नपूर्वक बनत असल्याचं त्याच्या चवीवरून लक्षात येतं. त्याची मांडणी आणि सव्‍‌र्ह करण्याची पध्दतही तितकीच आकर्षक. डॉ. मन्सूर यांचा मुलगा मोहम्मद हुसैन शौगी यझदी हा शेफ असून या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत असतो. खास इराणी चव जपण्याचाही त्याने कसोशीने प्रयत्न केला आहे. ‘कॅफे इराणी चाय’चं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे पाणी विकलं जात नाही. निसर्गाने एकच गोष्ट आपल्याला मोफत दिलेली आहे. ती विकणं आमच्या तत्त्वात बसत नसल्याचं डॉ. मन्सूर सांगतात. हा कॅफे म्हणजे सवलतींचा अड्डा आहे. तुम्ही सायकलने येथे गेलात तर बिलामध्ये दहा टक्के सूट मिळेल. २६ जानेवारीला २६ टक्के, १५ ऑगस्टला १५ टक्के, इराणच्या राष्ट्रीय दिनाला २२ टक्के, नवरोझला १० टक्के सवलत बिलावर दिली जाते. एवढंच नव्हे तर अपंगांना वर्षभर १५ टक्के आणि युनिफॉर्ममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही बिलामध्ये सवलत देण्यात येते. डॉ. मन्सूर हे स्वत: मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘कॅफे इराणी चाय फाऊं डेशन’ची स्थापना केली असून आपल्या परीने कॅन्सरग्रस्तांपासून अनेकांना ते मदत करत असतात.

भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सर्व इराणी लोकांनी आपल्या हॉटेल्सना रोषणाई केली होती. आणि तीन दिवस सलग चहा आणि सरबत मोफत वाटलं होतं. सरकारतर्फे ही त्यांना कौतुकाचं प्रमाणपत्रही देण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, जेव्हा मी एखाद्या इराणीला भेटतो तेव्हा मला माझा हरवलेला भाऊ  सापडल्याचा आनंद होतो. डॉ. मन्सूर यांच्यासारख्या इराण्यांना भेटल्यावर खरंच त्याचा प्रत्यय येतो.

आम्ही येथे रिकाम्या हाताने आलो होतो. पण भारतीयांनी आम्हाला प्रेम, मानसन्मान, पैसा, प्रसिद्धी सर्वच काही दिलं. आम्हाला ते परत करायचंय, असं डॉ. मन्सूर यांचे मामू मिर्झा अब्बाझ शौनाझियान सांगतात. पन्नास वर्षांनंतर उघडलेल्या इराणी कॅफेवर केलेल्या भरभरून प्रेमानंतर डॉ. मन्सूर यांना देशाच्या प्रत्येक शहरात इराणी कॅफे सुरू करण्याची इच्छा आहे. त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात येवो हीच सदिच्छा!

viva@expressindia.com