ब्रिटिश राजपुत्राच्या लग्नात पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेले मुंबई बेट ब्रिटिशांनी १६६८ साली सुरतच्या ईस्ट इंडिया कंपनीला दहा पौंड भाडय़ाने दिले. या कंपनीच्या सुरतहून मुंबईत आलेल्या गव्हर्नर ऑन्जियर याने मुंबईच्या विकासाला खऱ्या अर्थाने आरंभ केल्यानंतर मुंबई हे एक शहर म्हणून आकाराला येऊ  लागले. १७१६ साली मुंबई बेटाभोवती तटबंदी बांधण्याचे काम पूर्ण झाले. या सुरक्षित मुंबईत त्यानंतर देशाच्या विविध भागांतून अधिकाधिक लोक येऊ  लागले. मुंबईवर पूर्णपणे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी आपला लष्करी तळ दक्षिण मुंबईत उभारला. तो तळ त्यांनी इतका मजबूत बांधला होता की, इतक्या वर्षांनंतरही आपण त्या जागांचा वापर करत आहोत. याच परिसरात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोटापाण्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात आलेल्या इराण्यांनी मोक्याच्या जागा अगदी नगण्य किमतीत खरेदी करून हॉटेल्स सुरू केली. त्यातलेच सर्वाच्या परिचयाचे हॉटेल म्हणजे ‘कॅफे मिलिटरी रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बीअर बार’.

खोदाराम बेहराम गुलाबी हे आपल्या पत्नीसह १९२५ सालच्या आसपास इराणहून भारतात दाखल झाले. त्या काळी मुंबईत आजच्यासारखी जागेची वानवा नव्हती. जागामालक योग्य मोबदला घेऊ न जागा विकत असत. खोदाराम यांनीदेखील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंडच्या मागच्या बाजूला जागा विकत घेऊ न १९३३ साली कॅफेची सुरुवात केली. परिसरातील लष्कराचा राबता पाहता खोदाराम यांनी त्याचे नामकरण ‘कॅफे मिलिटरी’ असे केले. साहजिकच लष्कराचे अधिकारी, सैन्य आणि त्यांच्या कुटुंबीयांची कॅफेमध्ये मोठय़ा प्रमाणात ऊठबस असे. असे असले तरी सामान्यांसाठीही हा कॅफे कायम खुला असायचा. ब्रून मस्का, ऑमलेट आणि भुर्जी असे प्रत्येक इराणी हॉटेलमध्ये मिळणारे मोजकेच पदार्थ इथेही मिळत असत. त्याचसोबत ब्रिटिशांच्या आवडीचे सॉसेजेस ही कॅफे मिलिटरीची खासियत होती. खोदाराम यांचा स्वभाव आणि पदार्थाची चव यामुळे अल्पावधीतच ही जागा लोकप्रिय झाली. मुंबईच आता आपली कर्मभूमी आहे, हे लक्षात आल्यावर खोदाराम यांनी आपले गुलाबी हे आडनाव बदलून खुसरावी असे केले. ज्याचा मराठीतील अर्थ ‘आनंदी राहा’ असा होतो.

Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Gudhi padwa 2024 sade tin muhurta
Gudhi Padwa 2024: साडेतीन मुहूर्त कोणते? गुढीपाडव्याशिवाय ‘या’ अन्य अडीच दिवसांचं महत्त्व काय?
kolhapur, aditya bundgar, youth stuck in mud, mud of riverbed
पाच दिवस नदीपात्रातील चिखलात अडकलेल्या आदित्यला मिळालं जीवदान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती!
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान

साठच्या दशकात कॅफे ची धुरा खोदाराम यांचा मुलगा बेहराम यांच्या खांद्यावर आली. एव्हाना दक्षिण भारतातील लोकांनी हॉटेल व्यवसायात पाय रोवायला सुरुवात केली होती. अर्थातच त्याचा परिणाम धंद्यावर होऊ लागला. नव्याने दाखल झालेले दक्षिण भारतातील पदार्थ आणि फिल्टर कॉफी मुंबईकरांच्या पसंतीस उतरू लागली होती  बेहराम यांनी बाजाराचे वारे ओळखले आणि मेन्यूमध्ये खिमा पावसारख्या मोगलाई डिशेसचा समावेश केला. हळूहळू वेगवेगळ्या मोगलाई पदार्थाची यादी आणि लोकप्रियता वाढू लागल्यावर ब्रून मस्का, चहासारखे मूळ पदार्थ पुढे मेनूतून बेदखलच झाले; पण त्यामुळे कॅफे चा गाडा चांगलाच सावरला. त्यातूनच बेहराम यांनी डहाणू येथे जागा खरेदी केली. तिथे चिकू, नारळ आणि जांभळासारख्या फळांचे उत्पादन घेऊ न ती मुंबईत विक्रीसाठी आणली जात. त्या व्यवसायातून झालेल्या आर्थिक फायद्यातून दादर आणि अंधेरीसारख्या भागांत बेहराम यांनी जागा घेतल्या. आजघडीला बेहराम यांचा मोठा मुलगा डहाणू येथील जागा सांभाळतोय. २०१७ साली बेहराम यांचे निधन झाले. आता त्यांच्यामागे त्यांची पत्नी शिरीन (७८ वर्षे) दररोज दुपारी काही तास कॅफेमध्ये येऊ न बसतात. एखादे इंग्रजी वर्तमानपत्र वाचत आणि काचेच्या ग्लासमधून चहाचा घोट घेत जुन्या-नव्या गिऱ्हाईकांना न्याहाळणे हा त्यांचा दिनक्रम झालेला आहे. बेहराम यांच्यासोबत १९६२ साली शिरीन यांचा विवाह झाला, पण कॅफे च्या कामात त्यांनी कधीच लुडबुड केली नाही. २०१७ साली बेहराम जायच्या आधी त्यांची तब्येत ठीक नसायची तेव्हा त्यांनी बेहराम यांना सोबत म्हणून कॅफेमध्ये नियमितपणे यायला सुरुवात केली. बेहराम यांचे जिवलग मित्र परवेझ पटेल गेली काही वर्षे आपल्या मित्राच्या या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. सोबतीला अझगर झाबोली हेदेखील तुम्हाला कायम गल्ल्यावर बसलेले पाहायला मिळतील. गोरापान दिसणारा हा मनुष्य अतिशय शुद्ध मराठीत तुमच्याशी गप्पा मारतो.

अली चेंबरच्या तळमजल्यावर कॉर्नरला असलेले ‘कॅ फे मिलिटरी’ हेदेखील इतर इराणी हॉटेलप्रमाणेच वाघमुखी आहे. डाव्या बाजूला प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा आणि उजव्या बाजूला दुसरा दरवाजा असून मोठाल्या खिडक्यांमुळे सतत हवा खेळती राहतेच, पण आत बसलेल्या माणसाला रस्त्यावरच्या हालचाली आणि बाहेरील माणसाला आतला माहौल सहज दिसतो. फिकट पिवळ्या रंगाच्या भिंती असलेल्या कॅफेच्या एका भिंतीला काचा लावलेल्या आहेत. दोन मोठाले खांबदेखील कॅफेमध्ये दिसतील. त्या खांबांवर केवळ कॅफेचाच नाही तर बिल्डिंगचाही डोलारा उभा आहे. इतक्या वर्षांनंतरही कुठल्याही लोभांना बळी न पडता कॅ फेच्या इंटीरिअरमध्ये काडीमात्रही बद करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या इराणी हॉटेलचा फील आजही टिकून आहे. प्रत्येक इराणी हॉटेलमध्ये दिसणारे पृष्ठभागावर कापड आणि काच असलेले चौकोनी टेबल आणि त्याच्या बाजूला खुच्र्या इथेदेखील आहेत. काळानुरूप लाकडी खुच्र्याची जागा आता प्लास्टिकच्या खुच्र्यानी घेतली आहे. स्मिथ या इंग्लिश कंपनीचे १९४० सालातले दोन्ही बाजूंनी वेळ दाखवणारे घडय़ाळही हॉटेलच्या मध्यभागी लटकवलेले आहे. विशेष म्हणजे त्या घडय़ाळाची टिकटिक अद्याप सुरू आहे.

साधारण चाळीस वर्षांपूर्वी येथे बीअर मिळायला सुरुवात झाली. लंडन पिल्सनर, किंगफिशर, फॉस्टर, टय़ूबर्ग, काल्सबर्ग आणि कांगारू या फक्त माइल्ड बीअर येथे मिळतात. ‘कॅफे मिलिटरी’चे वैशिष्टय़ म्हणजे दररोज या परिसरातील कार्यालये सुटल्यावर अनेक कर्मचारी घरी जाण्याच्या आधी घसा ओला करण्यासाठी आवर्जून धावती भेट देऊ न जातात. त्यामध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय असते. बीअर कॅफे असला तरी कुठल्याही टेबलावर तुम्हाला मोठमोठय़ाने गप्पा मारणारे किंवा अर्वाच्य भाषेत बोलणारे लोक आढळणार नाहीत. सर्व जण शांतपणे बीअरचा घोट घेत आणि आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेत श्रमपरिहार करताना दिसतील. इतर इराणी हॉटेलप्रमाणे इथेही ओपन किचन आहे. त्यामुळे तुम्ही किचनच्या जवळ बसलेले असाल तर तुम्ही ऑर्डर केलेल्या पदार्थाचा तडका तुमची भूक अधिक चाळवतो. खिमा, ब्रेन, मटण, चिकन आणि अंडय़ाचे मोजकेच पदार्थ मेन्यूमध्ये आहेत. शिवाय सोमवार ते शनिवार दर दिवशी काही खास पदार्थही येथे मिळतात. धनसाक, जर्दाळू सल्ली चिकन, भरूची अकुरी, चिकन-एग पॅटिओ, टॅट्रीला मटण चिप्स, मसूर मटण हे पदार्थ आवर्जून चाखण्यासारखे आहेत. अर्थात त्यांचा वार पाहून तुम्हाला त्याप्रमाणे हजेरी लावावी लागेल. ‘कॅफे मिलिटरी’चा खिमा पाव संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. त्या खिमापावची गोडी स्वत: बेहराम यांनी लोकांना लावली होती. ते हयात असताना कित्येक वर्षे रोज सकाळी सहा वाजता हॉटेलमध्ये येऊ न खिमा बनवत असत. आजही तीच रेसिपी वापरत असल्याने त्याची चव जरासुद्धा बदललेली नाही. खिम्यासोबत दिला जाणारा पाव माझगावच्या रोशन बेकरीतून येतो आणि ब्रेड यझदानी बेकरीतून. मुंबईतला सर्वात बेस्ट कॅरेमल कस्टर्ड खायचा असेल तर कॅफे मिलिटरीला पर्याय नाही. इराणी हॉटेलमध्ये हमखास मिळणारे पालोनजीचे कोल्ड ड्रिंक्स येथेही मिळतात.

सुटसुटीत जागा आणि वेगळा लुक यामुळे बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग इथे झालेले आहे; पण फक्त रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशीच शूटिंगसाठी कॅफे भाडय़ाने देण्यात येतो. काळाची हाक ओळखून केलेल्या बदलांमुळे नव्याने सुरू झालेल्या कॅफेंच्या भाऊ गर्दीत ‘कॅफे मिलिटरी’ आजही स्पर्धेत टिकून आहे. आजही लोकांच्या खिशाला परवडणारे चविष्ट पदार्थ आणि वैभवशाली इतिहास यामुळे इराणी कॅफे इतक्या लवकर मरण पावणार नाहीत असा परवेझ पटेल यांना विश्वास आहे. त्यांचा हा विश्वास इराणी कॅफेवर प्रेम करणारे मुंबईकर सार्थ ठरवतील, हीच आशा.

viva@expressindia.com