आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या आर्थिक क्षेत्रात स्त्रियाही आपला ठसा उमटवू लागल्या आहेत आणि जबाबदारीचे पद समर्थपणे पेलू लागल्या आहेत. कॅस्ट्रॉल इंडियासारख्या भलाथोरला अर्थपसारा असलेल्या बलाढय़ कंपनीच्या प्रमुख वित्तीय अधिकारी असलेल्या रश्मि जोशी या कंपनीच्या संचालक मंडळावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. नुकताच त्यांना एक्स्प्रेस इंडियाचा उत्कृष्ट वित्तीय अधिकारीहा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा करिअरप्रवास ऐकण्यासाठी व्हिवा लाऊं जच्या मंचावर त्यांच्याशी संवाद साधला लोकसत्ताचे प्रतिनिधी वीरेंद्र तळेगावकर आणि स्वाती केतकर-पंडित यांनी..

मराठी माध्यमात शिक्षण

मराठी माध्यमात शिकल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लहानपणी कधी अभ्यासाचं ‘ओझं’ वाटलं नाही. खेळायला, बागडायला, दहा गोष्टी करायला भरपूर वेळ मिळायचा. पूर्ण मराठी माध्यमातून शिकल्यानंतर अकरावीला इंग्रजी आल्यावर थोडा त्रास होतो, पण तो फक्त तेवढं एकच वर्ष टिकतो. नंतर त्या भाषेची सवय होते, सगळं कळायला लागतं. शाळेत असताना ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’च्या इंग्रजीच्या परीक्षा असतात. त्यांच्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला खूप मदत होते. त्या परीक्षा दिल्या असतील तर पुढेही इंग्रजीचा फार काही त्रास होत नाही.

नोकरी शोधताना..

पहिली नोकरी शोधताना लोक माझ्याकडे ‘सीए’ म्हणून नाही तर केवळ एक मुलगी म्हणून पाहायचे. अनेकदा मला नोकरी देणारा किंवा न देणारा स्वत:च माझ्यासाठी निर्णय घेऊन मोकळा व्हायचा. फायनान्समध्ये काम म्हणजे उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागतं आणि तू तर मुलगी आहेस म्हणून स्वत:च ठरवून टाकून मला नोकरी नाकारणारेही भेटले. उद्या लग्न होऊन तू इथून जाशील, तर नोकरीही सोडशील, मग आम्ही उगीच तुझ्या ट्रेनिंगवर खर्च का करू?, अशा कारणानेही मला नोकरी नाकारली गेली. अनेक वेळा नोकरी देणारा स्वत:च सगळं ठरवून मोकळा झालेला असायचा.

जबाबदारीचं पद

‘बाकीचे जेव्हा कॉन्फरन्समध्ये मग्न असतात तेव्हा जमाखर्चाचा ताळेबंद जो नीट ठेवतो तो सीएफओ ! नवीन बिझनेस मिळण्याच्या ईष्र्येने लोक जगावेगळी प्रपोजल आणतात त्याला योग्य त्या साच्यात बसवतो तो सीएफओ! कुणी काही चूक केली की स्वत:च्या लोकप्रियतेची पर्वा न करता त्याला चूक दाखवून देतो तो सीएफओ! एथिक्स आणि कंप्लायन्स सांभाळण्यासाठी वेळ पडली तर नोकरीवर उदार होतो तो सीएफओ! बाहेरच्या संकटांना वेळीच ओळखून त्यापासून कंपनीला कसं वाचवायचं हे समोर आणतो तो सीएफओ! कंपनी मोठी व्हावी, कारभार वाढावा म्हणून पुढचा विचार करून रणनीती बनवायला मदत करतो तो सीएफओ! हिशेब सांभाळणं, ऑडिट करून घेणं, टीमला शिकवणं, पुढे आणणं, चूक कोणाचीही असली तरी ऑडिट मीटिंगमध्ये ऐकून घेणं हे सगळं करतो तो सीएफओ! सर्वाना शिस्तीत ठेवून तरीही यशस्वी व्हायला मदत करतो तो सीएफओ! सर्वतोपरी प्रयत्न करून शेअर होल्डर्सची संपत्ती वाढवतो तो सीएफओ!’ सीएफओ अर्थात मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची जबाबदारी काय हे सोप्या शब्दांत समजावून सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे. कंपनी अ‍ॅक्टमधील नवीन सुधारणेनुसार ‘सीएफओ’ हे सॅच्युटरी डेसिग्नेशन आहे आणि की मॅनेजमेंट पर्सोनेल आहे. यामुळे या पदावरच्या व्यक्तीची जबाबदारी वाढली आहे.

तुमचं काम बोलतं

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मला मॅनेजरची पोस्ट मिळाली होती. माझे पुरुष सहकारी वयाने मोठे आणि अधिक र्वष काम केलेले होते. त्यामुळे त्यांचा थोडासा असहकारच होता, मात्र हळूहळू माझ्या कामातून त्या पोस्टसाठीची माझी योग्यता त्यांना पटू लागली आणि मला त्यांचं सहकार्य मिळू लागलं. नंतर मी ‘गोदरेज’मध्ये काम केलं. तिथे मला कोणत्याही प्रकारे स्त्री-पुरुष भेद वगैरे जाणवला नाही. जेव्हा तुम्ही फायनान्समध्ये काम करत असता तेव्हा तुम्ही फार काही कोणाला प्रिय नसता, कारण बऱ्याच गोष्टींना नाही म्हणायची वेळ तुमच्यावर येते. पण तुमच्या कामाने कंपनीला होणारा फायदा सगळं बोलत असतो.

बाबांचं प्रोत्साहन

मी नेहमीच म्हणते की बाबांनी सांगितलं नसतं, आग्रह केला नसता, प्रोत्साहन दिलं नसतं, तर मी या क्षेत्रात कधीच आले नसते. मला शिक्षक व्हायचं होतं आणि त्या वेळी मला सांगितलं गेलं की शिक्षण क्षेत्रात उत्पन्न कमी आहे म्हणून मी तो विचार बाजूला ठेवला. माझे बाबा ‘टाटा’ कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी असल्याने बोर्ड मीटिंग वगैरेला उपस्थित राहणं त्यांच्या सवयीचं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या मनात मला सीए आणि सीएस करण्यासाठी उद्युक्त करण्याचा विचार सुरू होता. १२वीत असताना मी ज्या क्लासला जायचे त्या क्लासच्या गरुड सरांनीही बाबांना मी सीए करावं असं सुचवलं आणि बाबांचा विचार पक्का झाला. त्यांनी मलाही हाच सल्ला दिला. ‘बी.कॉम.’ आणि ‘सीए’ दोन्ही एकत्र करताना, प्रवासात शक्ती खर्च होत असताना, एकाच वेळी सगळे पेपर देऊ न ‘सीए’ होणं कठीण होतं. त्यातही आर्टिकलशिप करता-करता अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मी एक- एक ग्रुप क्लीअर करत ‘सीए’ झाले. लग्न झाल्यानंतर बाबांच्या आग्रहाखातर ‘सीएस’ही केलं; मात्र ‘सीए’ करताना काहीसे विषय सारखे असल्याने, परीक्षेच्या मध्ये आर्टिकलशिप वगैरे काही नसल्याने आणि ‘खूप’ अभ्यास कसा पूर्ण करायचा हे समजलेलं असल्याने ‘सीएस’ फार अवघड गेलं नाही. मात्र या सगळ्या गोष्टी बाबांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्या.

सुपरवुमन सिण्ड्रोम

तुम्ही कामावर जाता तेव्हा स्त्री म्हणून घराकडे लक्ष देत नाही आहात वगैरे अशा प्रकारचे विचारच तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून मागे ओढतात. कॉर्पोरेटमध्ये स्पर्धा असतेच आणि त्यात आपल्याला टिकून राहावंच लागतं. जेव्हा तुम्ही पुरुषांसोबत स्पर्धा करत असता तेव्हा तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स इफेक्टिव्ह द्यावाच लागतो. मात्र लहानपणापासून आपली घडण अशी झालेली असते की तुम्हाला पुढे जाऊ न हीच घरची कामं करायची आहेत तर आत्तापासून ती शिका. मात्र घरातली काही कामं ही ‘आऊ टसोर्स’ करायला हरकत नसावी. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे हा अट्टहास असण्याची गरज नाही. कुटुंबातील इतर माणसांसोबत मुलं मोठी होतात. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपणच स्वत: केली पाहिजे असा काही नियम नाही. मुलांसोबत क्वॉलिटी टाइम घालवणं महत्त्वाचं! सर्वच कामं मीच करणार किंवा केली पाहिजेत किंवा करू शकते, असं दाखवण्याची गरज वाटणं म्हणजेच सुपरवुमन सिण्ड्रोम! तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा असणं आणि घरातल्या सगळ्या मंडळींनी समजून घेऊ न मदतीचा हात पुढे करणं या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचा तुमच्यावर विश्वास असला तर तुमच्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला त्यांची साथ आपोआप मिळते. पण या सगळ्या गोष्टी स्त्रीनेच स्वत:च्या मनाला समजावल्या पाहिजेत आणि अंमलात आणल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची ओढाताण कमी होईल.

कॅस्ट्रॉलमध्ये सुरुवात

गुरगावची नोकरी दीड-दोन वर्षांनी मी सोडली आणि ‘कॅस्ट्रॉल’मध्ये पाऊल ठेवलं. ‘कॅस्ट्रॉल’मध्ये नोकरीला लागल्याला मला नुकतीच तेरा वर्षे पूर्ण झाली. तिथे मी आधी ‘जनरल मॅनेजर फायनान्स आणि अकाऊंट्स’ म्हणून काम पाहत होते. नंतर ‘रिजनल प्लॅनिंग आणि परफॉर्मन्स मॅनेजर’ म्हणून बढती मिळाली. पण ही जबाबदारी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांत त्यांचं सगळं स्ट्रक्चर बदललं. बहुराष्ट्रीय कंपनीत असे बदल कधीही होऊ  शकतात आणि त्यांना सामोरं जाण्याची तयारी तुम्हाला ठेवावीच लागते. बदललेल्या स्ट्रक्चरमध्ये मला परफॉर्मन्स मॅनेजर म्हणून सिंगापूरला जावं लागलं त्या वेळी मी सतरा देशांचे परफॉर्मिग मॅनेजमेंटचे काम पाहायचे आणि पाच देशांच्या फायनान्स टीम मला रिपोर्ट करायच्या.

देशोदेशीचे अनुभव

प्रत्येक देशाची कार्यसंस्कृती वेगळी असते याचा अनुभव मला ठिकठिकाणी आला. बाहेरच्या देशात अनेकदा अधिकाराला आव्हान दिलं जात नाही आणि काही देशांमध्ये प्रश्न विचारणं, शंका उपस्थित करणं, अडचणी सांगणं या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्यांचा वास्तवात फायदा होतो. आपण घेतलेल्या निर्णयात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या वेळीच लक्षात येतात. प्रश्न विचारल्यामुळे ब्रेन स्टॉर्मिग होतं आणि अडचणी आधीच लक्षात आल्याने त्या वेळीच दूर करता येतात. सिंगापूरमध्ये बऱ्याच महिला बाहेर काम करतात आणि त्यांच्या संस्कृतीत रोज स्वयंपाक करणं बसत नाही हे माझ्या लक्षात आलं. प्रत्येक मोठय़ा मल्टिनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये जेंडर डायव्हर्सिटी टार्गेट असतं. चीन आणि आशियाई देशांमध्ये हे प्रमाण उलट आहे. फायनान्समध्ये तिथे सगळ्या महिलाच होत्या. आणि पुरुष फार कमी प्रमाणात ऑफिस जॉबला होते. आपल्याकडे स्त्रीला डय़ुअल करिअर करावं लागतं. घर आणि प्रोफेशन असं दोन्ही सांभाळणं हे एक प्रकारे एका वेळी दोन करिअर करण्यासारखंच आहे.

नवीन बदल आणि परिणाम

गेली २५ र्वष मी काम करते आहे, त्यादरम्यान पाहिल्यास अनेक बदल झाले आहेत. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाने मोठा बदल घडवून आणला आहे. मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आम्ही अक्षरश: वहीत हाताने हिशेब लिहून मग त्याच्या बेरजा-वजाबाक्या करायचो. संगणक नवे होते तेव्हा ते समजून घेण्यात कित्ती तरी वेळ घालवला आहे. आजकालच्या मुलांना हे सारं करावं लागत नाही. हा त्यांचा दोष अर्थातच नाही. कारण तंत्रज्ञानाची मदत असणं काही वाईट नव्हे. पण कधी कधी संगणक करेल, या नादात आपण ती सारी प्रक्रियाच विसरून जातो. यावरून मला एक किस्सा आठवतो. आमची जीएसटीसंदर्भात चर्चा सुरू होती. त्यातील एका रकमेच्या आकडय़ाविषयी मी सीए झालेल्याच एका मुलाला विचारलं, काय रे हा आकडा कसा आला? तो म्हणाला, तो सिस्टीममधून आला. पण मला हे उत्तर हवं होतं की त्या आकडय़ावर कोणत्या आणि कशा प्रकारच्या गणिती क्रिया झाल्या तेव्हा तो आकडा आला. हा त्याचा दोषही नसेल कदाचित. पण त्याला हे शिकायला मिळालंच नसेल. आता आपल्याला पाढे येत नाहीत. अगदी सोपी सोपी गणितं, बेरजाही आपण कॅलक्युलेटर नाही तर संगणक नाही तर मोबाइलशिवाय करत नाही, करू शकत नाही. तंत्रज्ञानावर इतकं विसंबून राहणं बरं नाही.

करिअरच्या संधी

जिथे सीएची गरज असते तिथे सीएच लागतो. जिथे एमबीएची गरज असते तिथे एमबीए केलेलाच लागतो. आपल्याकडे माणसांच्या डोक्यात असतं की, काही कामं मला सीएकडूनच करायची आहेत. तसा सीएला तीन वर्षांँचा अनुभव मिळालेला असतो. त्याचा उपयोग त्यांना पुढे कामामध्ये खूप होतो. आपल्या शिकण्याच्या क्षमतेवर आपण काम करू शकतो. एमबीएच्या मुलांना बँकेत, फायनान्समध्येही जॉब मिळू शकतो. बऱ्याच संधी आहेत पण तुमच्याकडे अ‍ॅप्टिटय़ूड पाहिजे.

नवीन आव्हानं

नोटा बंदी आणि जी.एस.टी.चा परिमाण हा मागच्या वर्षी अनेक कंपन्यांवरती झाला. तसा तो ‘कॅस्ट्रोल इंडिया’वरही झाला जी.एस.टी. लागू करणं हे मोठं आव्हान होतं. नियम सगळे अनिश्चित होते, अनेक प्रश्नांना उत्तरं नव्हती आणि अजूनही थोडी संदिग्धता आहे. पण तुमच्यासोबत स्ट्रॉग टीम आणि स्ट्रक्चर्ड दृष्टिकोन असेल तर अशी आव्हानं घेणं सोपं होतं. हे नवीन आव्हान म्हणजे खूप मोठा बदल होता. हे सगळं समजून घेण्यासाठी मी खूप वेळ दिला. ही नक्की काय प्रणाली आहे, त्याचं काम नक्की कसं करायचं? त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आमची टीम तयार झाली. याचा परिमाण खूप चांगला झाला. जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा आम्ही ग्राहकांना थोडय़ा काळासाठी जास्त क्रेडिट दिलं होतं. इतर वेळेला आमचे वर्किंग कॅपिटल आम्ही लगेच तयार ठेवतो. तुमचा ब्रॅण्ड आणि वितरण व्यवस्था उत्तम असेल तरच हे शक्य आहे

मोठा निर्णय

‘गोदरेज’नंतर एका डच कंपनीत मी काम करत होते. कंपनी तशी लहान होती आणि नवीन होती. त्यामुळे तेव्हा मी आयटी, सीएस आणि फायनान्स सगळंच एकत्र पाहायचे. कंपनी लहान असल्याने वेगवेगळी माणसं नसायची आणि त्यांचा स्टाफही कमी होता. पण त्यांची कार्यसंस्कृती मला आवडली. त्यांच्या कार्यपद्धतीत मोकळेपणा होता. आपल्याला वाटतं ते परखडपणे बोलण्याची मुभा तिकडे होती. जिथे आपल्याला आपली मतं व्यक्त करता येतात तिथे काम करणं नेहमी सोपं असतं. मात्र ९/११ च्या घटनेनंतर ती कंपनी त्यांनी विकून टाकली आणि मलाही नवीन नोकरी शोधायची होती. त्या वेळी माझ्याकडे दोन पर्याय होते. एक कंपनी थोडी लहान होती पण मुंबईत होती आणि दुसरी कंपनी मोठी होती पण गुरगावला होती. माझ्या करिअरच्या दृष्टीने मला आता मोठी संधी गरजेची होती. घरातल्या सर्वाशी चर्चा करून मी गुरगावला जायचं ठरवलं आणि त्या निर्णयात घरच्या सगळ्यांनी मला साथ दिली. मुलगी तर लहान असल्याने माझ्याचसोबत होती, पण गुरगावला मी कधीच एकटी नव्हते. आमच्या कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी नेहमी माझ्यासोबत असायचं.

काम हीच तुमची ओळख

ओळख नसली तरी तुम्ही तुमच्या टॅलेन्टवरती मोठे होऊ  शकता, यशवी होऊ  शकता. मला जॉब मिळाला तो कोणत्याही ओळखीशिवाय मिळाला. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की, ओळखीची गरज आहेच. तुम्ही काम करायला लागलात की तीच तुमची ओळख होते. तुम्ही कोणताही कोर्स केल्यावर त्यातून उत्तम यश मिळवणं महत्त्वाचं. चांगल्या विद्यार्थ्यांना कं पन्या स्वत:हून बोलावतात.

कॉर्पोरेट विश्वातील स्पर्धा

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते, तशी कॉर्पोरेट विश्वातही आहे. वेगवेगळी आव्हाने नसतील तर या क्षेत्रात काही मजा नाही. स्पर्धा जरी असली तरी त्याचं राजकारण होऊ  द्यायचं की नाही हे तुम्ही स्वत: ठरवायचं असत. आणि जर कोणी राजकारण करत असेल तर त्यांच्यापासून दोन हात लांब राहणं हे  महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जसं वागता तसं लोक तुमच्याकडे बघतात. कदाचित तुम्हाला वरचं पद काही वर्षांँनंतर मिळेल, पण तेव्हा मिळेल तेव्हा ते तुमच्या मेहनतीवर मिळालेलं असेल. माणूस आला की राजकारण आलंच. चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस असतात ज्यामुळे तुम्हाला राजकारणापासून थोडं संरक्षण मिळू शकतं. कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही एकच माणूस निर्णय घेत नाही तर चार-पाच माणसं मिळून घेतात. थोडा वेळ जातो पण नि:पक्षपाती निर्णय नक्की मिळतो.

अपारंपरिक मार्गावर चालण्याची तयारी

मला विज्ञान शाखेत शिकून पुढे काही तरी करायचं होतं. पण मग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये माझा कल कॉमर्स (वाणिज्य) शाखेकडे दाखवण्यात आला जे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं. पण या शाखेबद्दल आणि त्यातील करिअर संधीबद्दल तितकंसं माहीत नसल्याने आज माझ्या आजीच्या सांगण्यावरून मी इथे आले आणि या जगाचा एक वेगळा पैलू ऐकायला मिळाला. माझी आई स्वत: कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते मात्र तिला आम्हाला कधी वेळ देता आला नाही. आज इथे येऊन या कॉर्पोरेट सेक्टर मधली स्पर्धा आणि ताणाबद्दल ऐकलं असता आई अनुभवत असलेल्या कॉर्पोरेट आयुष्याची खोली समजून घेता आली.

अनुया कानडे

रिलेट करता आले

मला कार्यक्रम खूपच आवडला. सुपर वुमन सिन्ड्रोमचा मुद्दा विशेष भावला कारण घरीही आईला तितक्याच तत्परतेने घर व ऑफिस सांभाळताना तिला किती रस्सीखेच करावी लागते, हे जाणवतं. मी तो मुद्दा माझ्याशीही रिलेट करू शकते. सी.ए व सी.एस्.मधील स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्याचे महत्त्व कळले.

शर्वरी ताठरे

भविष्याचे मार्गदर्शन मिळाले

मी पण सध्या सी.ए.ची इंटर्नशिप करतोय म्हणून मलाही त्यांनी सी.ए.बद्दल सांगितलेला मुद्दा पटला. सी.ए.मध्ये भरपूर स्पर्धा आहे त्यामुळे सी.ए. करताना माझा कल भविष्यात कुठे असेल याचे मार्गदर्शन या कार्यक्रमातून मिळाले. त्यातून कॉर्पोरेट लाइफ कसं हॅन्डल करायचे हेही कळले.

सोहम वैद्य

करिअरच महत्त्वाचे

मला एम.बी.ए. फायनान्स करायची इच्छा असल्याने मला त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळाले नाही. परंतु माझ्या करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन देणारा हा कार्यक्रम खूप भावला. आपले करिअर कसे स्थिर असावे हे कळले.

शुभांगी वीरकर

सी.ए.बद्दलची माहिती मिळाली

माझा ‘व्हिवा लाऊंज’चा पहिलाच कार्यक्रम असल्याने फार शिकायला मिळाले. आपण संधी न गमावता त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे, हे समजले. मराठी माध्यमातून शिक्षणाबद्दलचा त्यांचा अनुभव ते सुपर वुमन सिन्ड्रोम याची नवी माहिती कळली. सी.ए. या क्षेत्राबद्दलची माहिती मिळाली आणि तंत्रज्ञान जगात किती महत्त्वाचं आहे हेही उमगले.

आद्र्रा देसाई

समाज आणि मित्रांपलीकडे जात काहीतरी करणं महत्त्वाचं

कॉर्पोरेट जगात मराठी माणसांचं प्रमाण कमी आहे आणि अशा परीस्थितीत रश्मि जोशी एका कंपनीचा अर्थिक भार यशस्वीरीत्या सांभाळत आहेत हे खूप प्रेरणा देणारं आहे. समाजाच्या नियमांना झुगारून, मित्र जे करतात तेच मी करणार या विचाराच्या पलीकडे जाऊन काही तरी वेगळं करू न दाखवण्याची शिकवण मला आज इथे मिळाली. तसंच भारतात काम करून काय करायचं?, असं म्हणणारी पिढी सध्या जोर धरते आहे मात्र भारतात नोकरी-व्यवसायाच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध असूनही आपण त्याचा फारसा विचार करत नाही. आज इथे येऊन मला हा विचार समजून घेता आला की प्रगती करायची असेल तर इथे राहूनही करता येणं शक्य आहे.

–  वेदांत नेने

(संकलन : गायत्री हसबनीस, तेजल चांदगुडे)

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर, तेजश्री गायकवाड