27 September 2020

News Flash

खाबूगिरी : ‘मनी’च्या मनींच्या गुजगोष्टी

इंग्रजीत एक म्हण आहे, क्युरिऑसिटी किल्स द कॅट! म्हणजे कुतूहल मांजरींचा गळा घोटतं.

काही ठिकाणं ही तिथे मिळणाऱ्या पदार्थापेक्षाही त्या ठिकाणांच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असतात. काही दिवसांपूर्वी खाबू अशाच एका ठिकाणी गेला. तिथे जाऊन खाबूने काय खाल्लं, हा मुद्दा अलाहिदा, पण खाबूला तिथे जाऊन खूप बरं वाटलं आणि शांतीही मिळाली. ठिकाण आहे कॅट कॅफे स्टुडियो’.. हा कॅफे खाण्यासाठी प्रसिद्ध नसला, तरी तिथे काही पदार्थ चांगले मिळतात.

इंग्रजीत एक म्हण आहे, क्युरिऑसिटी किल्स द कॅट! म्हणजे कुतूहल मांजरींचा गळा घोटतं. आता म्हणजे काय, असा विचार येणं स्वाभाविक आहे. खरं तर खाबू म्हणींचा अर्थ वगैरे सांगण्याच्या फंदात पडत नाहीत. ज्याला जो अर्थ लावायचा तो त्याने लावावा. काही वर्षांपूर्वी ती ससा-कासवाची शर्यतीची गोष्ट ऐकून खाबूला खूप वाईट वाटलं होतं. स्लो बट स्टेडी विन्स द रेस वगैरे तत्त्वज्ञान सांगण्यासाठीच त्या कासवाला जिंकवलं असावं, यात खाबूला काही शंकाच नाही. पण खाबूला त्या गोष्टीतला ससा जाम आवडत आलाय. मस्त मेहनत करायची, एखादं चांगलं झाड दिसलं की त्याखाली थांबायचं, एखादी झोप काढायची, वाटेत पुन्हा काही बरं दिसलं की थांबायचं.. असा क्षणन् क्षण मोजत प्रवास करायचा. पण खाबूची ही मतं लहानपणीही कोणालाच पटली नव्हती. त्यामुळे क्युरिऑसिटी किल्स द कॅट या म्हणीचा अर्थ ज्याने त्याच्या त्याच्या वकुबानुसार लावावा.

खाबूने लावलेला अर्थ म्हणजे फुकट कुतूहल दाखवलं, तर ते महागात पडतं. पण खाबूच्या सगळ्या खाद्यजीवनाचा पायाच मुळात कुतूहलावर आधारलेला आहे. खाद्यजीवनातील अनेक गमती-जमती या कुतूहलापोटीच खाबूच्या पोटात गेल्या आहेत. त्या अर्थाने खाबू मांजर जमातीतला आहे. ज्यात त्यात नाक खुपसायला आवडणाऱ्यांची ही जमात!

आता तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल की, खाबू चांगलं कोंबडय़ा, बोकड, मासे वगैरेंच्या गप्पा मारायचं सोडून मांजरांच्या मागे का लागलाय! त्याचं कारण असं की, खाबूला मांजरींबद्दल विशेष आकर्षण आहे. खाबूला आकर्षण असल्याचं कारण खरं तर चाणाक्ष लोकांच्या सहज लक्षात येईल. पण ही चाणाक्ष लोक नावाची जमात आजकाल दुर्मीळ होत चालली असल्याने खाबूच तुम्हाला त्याचं कारण सांगणार आहे. खाबूला मांजरी आवडतात कारण खादाड बुचकीला त्या खूप आवडतात. विषय संपला!

तर अशा या मार्जारप्रेमी खादाड बुचकीच्या आग्रहास्तव खाबू पश्चिम उपनगरांमधील वर्सोवा नावाच्या ठिकाणी सुटीचा दिवस असतानाही कडमडला. तो कडमडला नसता, तर खाबू आयुष्यातल्या एका मोठय़ा आनंदाला मुकला असता. पश्चिम उपनगरात राहणारे लोक मध्य रेल्वेवर राहणाऱ्या लोकांच्या भाषेत ‘साले हायक्लास’ असतात. पूर्व उपनगरांमधील लोकांच्या तुलनेत अधिक सुखवस्तू असलेल्या लोकांचा हा भाग. त्यातच मुंबईतील नवश्रीमंत नावाचा वर्ग याच उपनगरांमध्ये जास्त उदयाला आला. तर या नवश्रीमंत वर्गाच्या अनेक लाडिक हट्टांपैकी एक म्हणजे पेट  फ्रेंडली कॅफेज! खरं सांगायचं तर खादाड बुचकीने माहिती देईपर्यंत खाबूलाही पेट फ्रेंडली कॅफे वगैरे भानगड माहीत नव्हती. पेट फ्रेंडली कॅफे म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या घरचे पाळीव प्राणी घेऊन जाऊ  शकता असे कॅफे.

खादाड बुचकीने असाच एक कॅफे वर्सोव्यात शोधून काढला होता. या कॅफेची खासियत म्हणजे इथे पाळीव प्राणी घेऊन जावे लागत नाहीत, तर त्या कॅफेमध्येच ते असतात. कॅफेचं नाव आहे ‘कॅट कॅफे स्टुडियो’! आता तुम्ही म्हणाल की, चांगलं खाद्यपदार्थावर लिहिणाऱ्या खाबूला अचानक या कॅट कॅफे वगैरेंवर लिहायची अवदसा का आठवली? खाबूला तुमची तक्रार मान्य आहे. पण खाबूच्या दृष्टीने खाणं इज नॉट ऑल्वेज ऑल अबाऊट फूड, इट्स अल्सो अबाऊट कंपनी! म्हणजे काय, तर खाण्याची मैफील रंगणं त्या मैफिलीत शरीक होणाऱ्यांवरही बहुतांश वेळा अवलंबून असतं.

वर्सोवा मेट्रो स्टेशनवर उतरलात की, वर्सोव्याच्या दिशेने चालत जायचं. एके ठिकाणी रस्ता उजवीकडे आणि डावीकडे असा दुभागला जातो. डाव्या बाजूने गेलात, तर वर्सोव्यातील मुख्य इमारतींकडे तो रस्ता जातो. त्याऐवजी उजवी बाजू पकडायची. हा रस्ता काहीसा अरुंद आहे. या रस्त्याला लागल्यावर उजव्या हाताला लगेचच कॅट कॅफे स्टुडियो आहे. कॅट कॅफे स्टुडियोमधली खासियत म्हणजे इकडच्या मांजरी. या मांजरी काही कोणी पाळलेल्या नाहीत. रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेल्या, कोणाला कुठे सापडलेल्या, एखाद्या अपघातात पाय गमावलेल्या किंवा काहींनी सोडून दिलेल्या अशा २५-३० मांजरी या कॅफेमध्ये आहेत. कॅफे चालवणारी सगळी मंडळी तरुण आणि मांजरींवर प्रेम करणारी आहेत. बसायला लाकडाच्या खुच्र्या आणि टेबले, या मांजरींना बसण्यासाठी बनवलेल्या जागा, परडय़ा, त्यांमध्ये गुबगुबीत गाद्या आणि त्या गाद्यांवर त्यांच्याइतक्याच गुबगुबीत मांजरी!

मांजरी आवडणाऱ्यांसाठी हा नक्कीच स्वर्ग आहे. पण मांजरी न आवडणाऱ्यांनी तर इथे यायलाच हवं. इथे आलेला माणूस शंभर टक्के मांजरींच्या प्रेमात पडलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मांजरींचं ठीक आहे, उदरभरणाचं काय? प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण आधी पोटोबा मग बोकोबा. त्याचीही चिंता नसावी. हा कॅट स्टुडियो असला, तरी त्या दोन शब्दांच्या मध्ये कॅफेही आहे. या कॅट कॅफे स्टुडियोमध्ये तुम्हाला साधं सॅण्डविच, चीज टोस्ट, चीज मेयॉनिज, व्हेजिटेबल सॅण्डविच अशा अनेक प्रकारची सॅण्डविचेस मिळतील. त्याचप्रमाणे इथे मिळणारी कॉफीही उत्तम आहे. इथे कॉफीशिवाय मसाला चाय, कॅपेचिनो, एक्स्प्रेसो आदी व्हरायटीही मिळते. तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसही मिळतात. पण इथे येणारे अनेक जण फक्त कॉफीचा मग घेऊन या मांजरींच्या अनेक लीला न्याहाळत बसतात. या मांजरींना खेळवण्यासाठी इथे काही खेळणीही ठेवली आहेत. त्या खेळण्यांसह खेळता खेळता एखादे मांजर तुमच्या मांडीतही येऊन बसते.

खाबूची इथली खाण्यापिण्याची वैयक्तिक आवड विचाराल, तर खाबूला इथलं व्हेज चीज टोस्ट सॅण्डविच आवडलं. हे सॅण्डविच १०० रुपयांच्या आतबाहेरच असल्याने खाबूच्या खिशालाही भरुदड बसला नाही. खाबू आणि खादाड बुचकी या दोघांच्याही खाण्यापिण्याचा खर्च चारशे रुपयांच्या आतच झाला. आता एक गोष्ट कबूल करायलाच हवी. खादाड बुचकीने खाण्यापेक्षा मांजरींना कुरवाळण्यातच जास्त वेळ घालवला. त्यामुळे तिच्यासाठी मागवलेलं सॅण्डविचही खाबूलाच रिचवावं लागलं. तेवढा खाबूला त्या मांजरींचा हेवा वाटला, तो भाग अलाहिदा. पण खादाड बुचकीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच खाबूचं पोट भरलं आणि खाबूने भरल्या पोटाने आणखी एक हॉट कॉफी ऑर्डर केली.

कुठे – कॅट कॅफे स्टुडियो

कसे जाल : अंधेरी किंवा घाटकोपर स्टेशनवरून मेट्रो करून वर्सोवा स्थानकात उतरा. त्यानंतर अंधेरीकडे पाठ करून स्थानकाखाली असलेल्या रस्त्याने चालत निघालात की, एके ठिकाणी रस्ता संपून डावी आणि उजवीकडे वळतो. इथे उजव्या बाजूला वळल्यावर उजव्या हाताच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बंगल्यातच हा कॅट कॅफे स्टुडियो आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 12:32 am

Web Title: cat cafe studio
Next Stories
1 कॅलरी मीटर : घर का खाना आणि डाएट फूड
2 ठोकताळे झुगारणारी फॅशन
3 चिरंतन भारतीय फॅशन
Just Now!
X