संकलन – मितेश जोशी

श्रावण आला रिमझिम सरींनी निसर्गात हिरवं चैतन्य निर्माण करून गेला. गणपतीसाठी केलेले गोडधोड जेवणही सगळ्यांनी चवीने खाल्ले. श्रावणमास व गणपतीच्या निमित्ताने निष्ठेने शाकाहारी पद्धत अवलंबलेली तरुणाई आता पुन्हा एकदा खमंग मांसाहारी पदार्थाकडे वळती झाली आहे. ताटातील गोडधोड व सात्त्विक पदार्थाची जागा पुनश्च मांसाहाराने घेतली आहे. ‘बॅक टू नॉनव्हेज’ची ही खाबूगिरी अधिक रंजक व चटपटीत करण्यासाठी आम्ही खास तरुण व्हिवा वाचकांसाठी काही हटके नावाच्या आणि हटके जिन्नस असलेल्या रेसिपी घेऊन आलो आहोत. सेलेब्रिटी शेफ राखी वासवानी यांनी त्यांच्या पोतडीतल्या खमंग मांसाहारी रेसिपी शेअर केल्या आहेत.
चिकन इन ऑयस्टर सॉस

साहित्य : चिकन (बोनलेस) – २५०ग्रॅम, अंडे -१/२, कॉर्नफ्लोअर – २ टीस्पून, सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी)- प्रत्येकी १/४, तुकडे केलेल्या, हिरव्या मिरच्या – ५ , पातीचा कांदा – २ बाऊल, आलं – २ टेबलस्पूून, लसूण – २ टेबलस्पून, मीठ आणि पांढरी मिरपूड – चवीनुसार, सोया सॉस – १/२ टेबलस्पूून, चिकन सिझनिंग – १ टेबलस्पूून, कॉर्नफ्लोअर पेस्ट – १ टेबलस्पूून, तेल (तळण्यासाठी) – २ टेबलस्पूून, ऑयस्टर सॉस – २ टेबलस्पूून, चिकनचा स्टॉक – १/४ कप

कृती  : अर्ध अंडे, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ आणि पांढरी मिरपूड घालून पंधरा मिनिटांसाठी चिकन मॅरिनेट करून तळून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला पातीचा कांदा, रंगीत सिमला मिरच्या घालून मिश्रण एकजीव करा.त्यानंतर त्यात चिकन सिझनिंग, मीठ आणि मिरपूड घालून मोठय़ा आचेवर चमच्याने परता. यात चिकनचा थोडा स्टॉक आणि सोया सॉस घाला. वर बाजूला काढून ठेवलेलं तळलेले चिकन घाला. तयार मिश्रणात कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून एक मिनिटासाठी मोठय़ा गॅसवर चमच्याने ढवळा. वरून बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून सव्‍‌र्ह करा गरमागरम चिकन इन ऑयस्टर सॉस.

तेरियाकी चिकन अ‍ॅण्ड व्हेजी नूडल्स

साहित्य : बारीक केलेले बोनलेस चिकन (लेगपीस)- १०० ग्रॅम, उकडलेले नूडल्स – १ पाकीट, चिरलेल्या सिमला मिरची (लाल, पिवळी, हिरवी) – १/४  प्रत्येकी, ब्रोकोली – ३-४ तुकडे, बारीक चिरलेला पातीचा कांदा (पांढरा आणि हिरवा) – प्रत्येकी १ बाऊल, झुकिनी – ३ ते ४ काप, मोड आलेली उकडवलेली  कडधान्य – मूठभर, लसूण – २ टेबलस्पून बारीक चिरलेली, तेरियाकी सॉस – २ टेबलस्पून, ऑयस्टर सॉस – २ टेबलस्पून, सोया सॉस – २ टेबलस्पून, पांढरी मिरपूड – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, तेल – २ टेबलस्पून, अंडी – २ स्क्रँबल्ड

कृती : एका कढईत गरम तेलात चिकन घाला. वरून मीठ आणि पांढरी मिरपूड भुरभुरवा आणि बाजूला ठेवा. पुन्हा एक टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात स्क्रँबल अंडी, मीठ आणि मिरपूड घालून बाजूला ठेवा. पुन्हा तेल गरम करा त्यात लसूण, बारीक चिरलेला पातीचा कांदा, ब्रोकोली, रंगीत सिमला मिरची एकजीव करा. पुढे या मिश्रणात चिकन, अंडी, नूडल्स, तेरियाकी सॉस आणि ऑयस्टर सॉस घालून एकत्र करा. मोठय़ा आचेवर परतून घ्या. गॅस बंद करा. सवर्ि्हग बाऊ लमध्ये नूडल्स वाढून त्यात वरून मोड आलेली कडधान्यं, सोया सॉस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा तेरियाकी चिकन अँड व्हेजी नूडल्स.

हरे मसाले प्रॉन्स

साहित्य : मूठभर निवडलेली क ोथिंबीर, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या यांचे वाटण, ३ टोमॅटो (प्युरी), चवीनुसार मीठ, हळद (चिमूटभर), धणेपूड – २ टेबलस्पून, लाल मिरचीपूड – १ टेबलस्पून, तेल – २ टेबलस्पून, कढीपत्ता – १० ते १५, मोहरी – १ टेबलस्पून

कृती : एका भांडय़ात तेल गरम करा. गरम तेलात मोहरी, कढीपत्ता घाला. तडतडलेल्या मोहरीत वाटण व टोमॅटोची प्युरी एकत्र करा. कढईच्या काठांना तेल सुटेपर्यंत शिजू द्या. त्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घाला आणि मिश्रण शिजवत ठेवा. दुसऱ्या भांडय़ात मीठ आणि हळदीसह २०० ग्रॅम प्रॉन्स (कोळंबी) परतून घ्या. परतल्यावर ती शिजलेल्या मसाल्यात घाला आणि सव्‍‌र्ह करा हरे मसाले प्रॉन्स.

एग्ज बेनेडिक्ट विथ हॉलंडेइस सॉस

साहित्य : बन – ३, बेकन स्ट्रीप्स – २ किंवा ३, व्हाइट व्हिनेगर – २ टी स्पून, अंडी – ६, तूप – ५ १/२ टेबलस्पून, अंडय़ातील बलक – २, मीठ, लिंबाचा रस, मिरपूड १/४  टीस्पून, बटर, ताजी पार्सले सजावटीसाठी, बारीक चिरलेली

कृती : एका पॅनमध्ये ८० ग्रॅम लोणी वितळवा. लोणी कढवल्यावर वरचा तवंग आणि बेरी काढून टाका. गॅस बंद करा आणि तूप गार होऊ  द्या. आता तुमच्याकडे स्वच्छ वितळवलेले पातळ तूप असेल. डबल बॉयलर ठेवा आणि त्यात अंडय़ाचे फेटलेले बलक घाला. यात हळूहळू पातळ तूप घाला व चमच्याने सतत हलवत राहा. सर्वात शेवटी लिंबाचे थेंब घाला आणि घट्ट होईपर्यंत हलवत राहा. वाढण्यापूर्वी मीठ आणि मिरपूड भुरभुरवा. एका मध्यम आकाराच्या पॅनमध्ये बेकन ब्राउन होईपर्यंत परता. बन टोस्ट करा आणि त्यावर बटर लावून सव्‍‌र्ह करा.

ब्रोकोली अ‍ॅण्ड लीक प्युरे विथ पोच्ड एग्ज

प्युरेसाठी साहित्य : बारीक चिरलेला पातीचा कांदा, ६५ ग्रॅम बटर, १ मोठा सोललेला बटाटा, ३०० ग्रॅम ब्रोकोली, ६ टेबलस्पून डबल क्रीम, १ टेबलस्पून बारीक चिरलेला शेपू

कृती : एका मोठय़ा वाडग्यात बटर वितळवून घ्या आणि त्यात चिरलेली पात शिजवा. भांडे बटर पेपरने आणि झाकणाने बंद करून घ्या. भाजी अगदी मऊ  शिजवून घ्या. सोललेल्या बटाटय़ाचे चौकोनी तुकडे करा. एका भांडय़ात पाण्यात मीठ घालून बटाटा शिजवा. दुसऱ्या भांडय़ात ब्रोकोलीचे मोठे मोठे तुकडे करून मीठ घातलेल्या पाण्यात ब्रोकोलीची देठं ५ मिनिटे शिजवा. तर तिसऱ्या भांडय़ात ब्रोकोलीचे चिरलेले तुकडे पाण्यात घालून ५ मिनिटांपर्यंत शिजवा व पाणी काढून टाका.

तिन्ही जिन्नस वेगवेगळ्या भांडय़ात शिजवावे. तिन्ही जिनसांवर बर्फाचं थंड पाणी ओता. तिन्ही जिन्नस मिक्सरमध्ये अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्या. एका भांडय़ात मोठय़ा आचेवर हे मिश्रण गरम करा. तयार मिश्रणात क्रीम, शेपू, मीठ आणि काळी मिरपूड घाला. आणि मिश्रण हलके व मोकळे होईपर्यंत एकजीव करा. गरमागरम ब्रोकोली अ‍ॅण्ड लीक प्युरी तयार आहे.

पोच्ड एग्ज कृती : एकेक अंडे खोलगट डिशमध्ये फोडा. एका भांडय़ात थोडं पाणी घ्या आणि त्यात १ टेबलस्पून व्हिनेगर घाला. हलकीशी उकळी आली की या भांडय़ात फोडलेली अंडी ओता. प्रत्येक अंडे हलकेसे सेट होईपर्यंत म्हणजे साधारणपणे दोन ते तीन मिनिटे ठेवा. झाऱ्याच्या मदतीने एकेक अंडे काढून घ्या. शक्य असेल तर एकत्र वाढा, गरज भासल्यास गरम पाण्याच्या वाटीत हे अंड ठेवता येऊ  शकते.