सेलिब्रिटी फॅशन फॉलो करतात की ते जे परिधान करतात ती फॅ शन ठरते? कोंबडी आधी की अंडे? असा हा कधीही निश्चित उत्तर न मिळणारा प्रश्न. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कलाकार ज्या पद्धतीने वावरतात त्याबद्दलची उत्सुकता जनसामान्यांमध्ये असणं साहजिक आहे. मात्र सध्या त्यांच्या या दिनचर्येतील प्रत्येक लुक फॅशनम्हणून अगदी फॅशन डिझायनर्सवरही आरूढ होऊ लागला आहे. मॉर्निग वॉक लुक, जिम लुक, ड्राइव्ह लुक, डिनर लुक, एअरपोर्ट लुक.. न जाणे अशा लुक्सया लेबलखाली फॅशनचे किती नानावतार लोकप्रिय होणार आहेत..

फॅशनप्रेमींची संख्या आपल्याकडे पूर्वीपासूनच खूप जास्त आहे. त्या वेळी फॅ शन हा शब्द फक्त रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या नट-नटय़ांच्या स्टाइलपुरतीच मर्यादित होता. काही वर्षांनी रॅम्पवर येणाऱ्या मॉडेल्स, मिस इंडिया-मिस युनिव्हर्ससारख्या स्पर्धानी फॅशन जगताचे चित्र बदलून टाकले. पूर्वी साधना कट किंवा राजेश खन्नाचा गुरू शर्ट, अमिताभ बच्चनच्या लांबलचक पँट्स.. चित्रपटांमधून बाजारात येणारी हीच फॅशन सर्वसामान्यांना परिचित होती. पार्टी आणि पेज थ्री कल्चर आल्यापासून फॅशनचा थोडा वेगळा विचार व्हायला लागला. तरीही रॅम्पवर दिसणारी किंवा फॅशन डिझायनर्सच्या विंटर-समर कलेक्शन्सच्या पोतडीमधून येणारे कपडे हीच फॅ शन होती. पण फॅशनच्या बाबतीत हिंदी चित्रपट कलाकारांचा जनमानसावर असलेला पगडा आजही तसाच कायम आहे. त्याला साथ मिळाली आहे ती सोशल मीडियाच्या वेगाची.. प्रत्येक कलाकार आपण दिवसभरात काय करतो त्याची छायाचित्रे इन्स्टाग्राम-फेसबुक, ट्विटरवर टाकतो. त्यामुळे तो कुठल्या वेळी कुठल्या अवतारात असतो, ब्रॅण्डेड कपडे घालतो – मेकअप काय असतो, अ‍ॅक्सेसरीज काय असतात हे सगळं नीट टिपणाऱ्या चाहत्यांसाठी तेच स्टाइल स्टेटमेंट ठरतं.

टीव्हीवर दिसणाऱ्या किंवा रॅम्पवर झळकणाऱ्या फॅशनच्या पलीकडे जात नेहमीच्या सामान्य आयुष्यात, छोटय़ा-छोटय़ा प्रसंगांतून कलाकारांचा जो लुक दिसतो तोच कित्येकदा सगळ्यांना भावतो. चाहते मग आपल्या कलाकाराचा असाच लुक फॅशन म्हणून फॉलो करतात. आणि मग लोक फॉलो करतात म्हणून एअरपोर्टपासून ते घरात स्वत:च्या पेटबरोबर खेळतानाही कलाकारांना त्यांचा म्हणून काहीएक लुक कॅरी करावाच लागतो. फॅशनचा हा प्रवाह एका वर्तुळासारखा गोल-गोल फिरतोय आणि त्यात त्यांनी फॅशन डिझायनर्सनाही ओढून घेतलं आहे. याविषयी डिझायनर श्रुती संचेती म्हणते, ‘‘हल्ली माध्यमांबद्दलची जागरूकता खूपच वाढलेली आहे. डिजिटल माध्यमे दिवसागणिक बदलतायेत, त्यात नवनवीन फीचर्सची भर पडते आहे. या फीचर्सचा वापर करण्याच्या उत्साहापोटी कलाकारांचं नेहमीचं आयुष्य हे खासगी न राहता सगळ्यांसमोर उघड होतंय. घराबाहेर पडल्यापासून प्रत्येक पावलागणिक त्यांना मीडियाचे लोक, फोटोग्राफर, ब्लॉगर, क्रिटिक आणि त्यांचे चाहते भेटत असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या लुकबद्दल सविस्तर चर्चा रंगतात. याचा परिणाम म्हणून जिम, एअरपोर्ट, पार्टी कुठेही जाताना त्यांना सतत स्वत:कडे लक्ष देणं भाग पडतं आहे. ते सतत एका प्रेशरखाली असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांना अपटूडेट राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही.’’ कलाकारांच्या किंवा सेलिब्रिटींच्या या लुक्सचा प्रभाव फॅशन डिझायनर्सच्या कामावर पडलाय का? यावरही त्यांना त्यांचा प्रत्येक लुक सीरियसली घ्यावा लागत असल्याने त्यांच्या स्टायलिस्ट आणि डिझायनर्स टीमचं काम दुपटीने वाढलं असल्याचं श्रुतीने सांगितलं. साध्या साध्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी त्यांना स्वत:च्या स्टायलिस्ट आणि डिझायनर्स टीमचा सल्ला घ्यावा लागतो आहे, असे सांगत आपण अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धी कार्यक्रमांपासून एअरपोर्टवर जाण्यासाठीचे वेगवेगळे कपडे डिझाइन करून दिले असल्याचे तिने स्पष्ट केले. पार्टी वगळता अन्य लुक्ससाठी ‘लेस इज मोअर’ या तत्त्वाने काम करत एलिगंट आणि वावरायला अतिशय सहजसोपे असतील अशा डिझाइन्स बनवत असल्याची माहितीही तिने दिली.

सध्या अलिया भट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, कतरिना कैफ, जॅकलिन यांचे एअरपोर्ट लुक.. शाहीद कपूर, जॉन अब्राहम, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह सारख्या कलाकारांचे जिम लुक खूपच फेमस आहेत. ते मोठय़ा प्रमाणावर फॉलो केले जातात. याशिवाय, करिना कपूर खान आणि तिची मैत्रीण अभिनेत्री अमृता अरोरा यांचे जिम लुकही चर्चेचा विषय ठरले आहेत. फॅशनच्या बाबतीत तर करिनाचे एयरपोर्ट लुक, प्रेग्नन्सी लुक, आफ्टर प्रेग्नन्सी लुक, जिम लुक सगळ्याच गोष्टी इतक्या लोकप्रिय ठरल्या आहेत की, फॅशन जगतात करिना हे क्रांतिकारी नाव ठरले आहे. सध्या लहानग्या तैमुरचे लुक्ससुद्धा प्रसिद्ध होत आहेत. करिना गर्भवती होती तेव्हापासून तिच्या संपूर्ण लाइफस्टाइलबद्दल खूप चर्चा झाली. अनेक गर्भवतींनी तिची लाइफस्टाइल फॉलो केली होती. सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा या दोघींनी तर आपल्या सुट्टय़ांची छायाचित्रेही इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने त्यांचे हॉलिडे लुक हाही नवा ट्रेंड ठरला आहे.

कलाकार केवळ सोशल मीडियावर आपली छायाचित्रे मोठय़ा प्रमाणावर अपलोड करत असल्याने त्यांचे हे लुक्स प्रसिद्ध होतायेत का? एअरपोर्टवर जातानाचे त्यांचे लुक्स इतके प्रसिद्ध होण्यामागचे कारणच काय? यावर आपलं मत व्यक्त करताना कलाकारांच्या सतत प्रेझेंटेबल राहण्यामुळे ही फॅशन वाढतेय. तसंच सतत लोकांसमोर राहावं लागत असल्याने सकाळी वॉकसाठी बाहेर पडायचं असू दे नाहीतर एखाद्या इव्हेंटला जायचं असू दे कलाकार चोवीस तास आपल्या प्रेझेंटेबल राहण्यावर भर देतायेत, असं स्टायलिस्ट अमित दिवेकर यांनी सांगितलं. एअरपोर्टवरून येता-जाताना अनेकदा कलाकारांना खूप चालायचं असतं. या काळात कित्येकदा ते लोकांच्या गराडय़ात असतात. त्यामुळे साहजिकच त्यांनी काय कपडे घातले आहेत? ते चालतात कसे, बोलतात कसे याची चर्चा जास्त होते. त्यांचे एअरपोर्ट लुक्स प्रसिद्ध  होण्यामागचंही हे मुख्य कारण असल्याचं दिवेकर यांनी स्पष्ट केलं. विमानाने प्रवास करायचा असेल तर एक तर त्यांना खूप वेळ विमानात बसायचं असतं किंवा झोपायचं असतं. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा वेळ लक्षात घेऊन त्यांचे कपडे स्टायलिस्ट आणि तितकेच आरामदायी असणं आवश्यक ठरतं. अनेकदा कलाकार गॉगल लावून वावरताना दिसतात, त्यावेळी कदाचित त्यांनी फारसा मेकअप केलेला नसतो. कंगना राणावत ही तिच्या एअरपोर्ट लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. तिला स्वत:ला या लुक्समध्ये वावरणं आनंददायी वाटतं. त्यामुळे तोच आनंद कित्येकदा पाहणाऱ्यांनाही त्या स्टाइलक डे आकर्षित करतो, असं त्यांनी सांगितलं.

सोशल मीडिया साइट्सवर कलाकारांचे हे लुक मोठय़ा प्रमाणात झळकतात. त्यामुळे त्यांचे हे लुक्स एक फॅशन ट्रेंड्स बनून गेले आहेत. कलाकारही आपल्या अनेक इव्हेंट्सचे सेल्फीज, आपले मॉर्निग रुटीन व्हिडीओ, पार्टी, अ‍ॅवॉर्ड सोहळ्याची छायाचित्रे एवढंच नाहीतर स्किन केअर, हेअर केअर रुटीनचे व्हिडीओही मीडिया साइट्सवर पोस्ट करतात. प्रियांका चोप्राचा स्किन केअर रुटीनचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या सगळ्या प्रकारांमुळे एकूणच कलाकारांच्या लाइफस्टाइलवर लोकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून हल्ली कलाकार आपली पूर्ण स्टाइल, कपडेपटच डिझाइन करून घेण्यावर भर देत असल्याचे दिवेकर यांनी सांगितले. ‘‘सुरुवातीला मी अभिनेता स्वप्निल जोशी याचे स्टाइलिंग करत होतो. सध्या त्याचे पूर्ण वॉर्डरोब स्टाइल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिमा चांगली राहावी यासाठी कलाकार सतत व्यवस्थित राहण्याच्या प्रयत्नात असतात. कित्येकदा ते स्वत: किंवा माध्यमांकडून त्यांचे हे लुक्स कॅमेऱ्यात कैद होतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात. मग त्यांचे हे लुक्स त्यांचे चाहते फॉलो करतात, तीच त्यांच्यासाठी फॅशन ठरते. आणि मग चाहत्यांना सतत नवं काही देण्याच्या नादात कलाकारही फॅशनचे आपले प्रयोग सुरूच ठेवतात. सोशल मीडियामुळे कलाकार- चाहते- फॅ शन डिझायनर्स ते पुन्हा कलाकार असं हे एक अव्याहत चक्र सुरू झालं आहे. त्यामुळे सेलिब्रिटी-कलाकारांच्या फॅशनचे नानावतार सहज निर्माण होतात आणि ‘फॅशन’ विश्वात दखलपात्रही ठरतात. त्यामुळे इथे फॅशन कुठून आली याचं उत्तर शोधण्यापेक्षा तुम्हाला आवडली ना, मग चालतंय की..!

हल्ली माध्यमांबद्दलची जागरूकता खूपच वाढलेली आहे. डिजिटल माध्यमे दिवसागणिक बदलतायेत, त्यात नवनवीन फीचर्सची भर पडते आहे. या फीचर्सचा वापर करण्याच्या उत्साहापोटी कलाकारांचं नेहमीचं आयुष्य हे खासगी न राहता सगळ्यांसमोर उघड होतंय.

श्रुती संचेती, डिझायनर

viva@expressindia.com