सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; सेलेब्रिटींची फॅशन सगळ्यांनाच फॉलो करावीशी वाटते; पण चंदेरी पडद्यावरचं किंवा फॅशन रॅम्पवरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

डिसेंबर महिना असतोच पार्टी आणि सेलिब्रेशनचा! ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तयारी सुरू झाली असेलच. गणपती, नवरात्री, दिवाळीच्या पारंपरिक, एथनिक वातावरणातून बाहेर पडत आपल्या वॉर्डरोबलासुद्धा पार्टीवेअर कलेक्शनचा तडका देण्याची ही वेळ. मग हा मुहूर्त चुकवून कसा चालेल! सध्या आपल्या न्यू लुक आणि मेकओव्हरमुळे चर्चेत असलेल्या परिणीती चोप्राचा हा लुक यंदाच्या पार्टी सीझनसाठी उत्तम आहे. नुकत्याच झालेल्या ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरमध्ये परिणीती या वेगळ्या प्रकारच्या एलबीडीमध्ये रॅम्पवर अवतरली. जॅकेटसारखा फील देणारा पण मोकळा केप हे तिच्या या ड्रेसचं वैशिष्टय़. सिक्वीन्स वर्क, शिअर ड्रेसिंग आणि केप हे यंदाच्या पार्टी सीझनचे तीन मुख्य ट्रेण्ड आहेत. त्यात काळा रंग कधीच ‘आऊट ऑफ फॅशन’ जाण्याचा प्रश्नच नाही. परिणीतीने लुक पूर्ण करण्यासाठी स्ट्रेट हेअर आणि न्यूड मेकअपची मदत घेत तिचा ग्रे नेलकलर हायलाइट केला आहे.

कसा कॅरी कराल?
पार्टी सीझनमध्ये एलबीडी (लिट्ल ब्लॅक ड्रेस) वॉर्डरोबमध्ये हवाच. लिट्ल ब्लॅक ड्रेस कधीच आऊटडेटेड वाटत नाही. पार्टीमध्ये बोल्ड वाटतो आणि काळ्या रंगामुळे तुमचं पोश्चर उठून दिसतं. तुम्ही बारीक दिसता. अर्थात नेहमीप्रमाणे प्लेन काळा ड्रेस निवडण्यापेक्षा या फोटोत परिणीतीने निवडलाय त्या प्रकारचा सिक्वीन्स वर्कचा (म्हणजे चमचमणाऱ्या टिकल्यांचा) ड्रेस तुमच्या लुकमध्ये थोडा ड्रामा आणू शकतो. पार्टीत तो नक्कीच आपली छाप पाडेल. यंदाच्या सीझनमध्ये शिअर ड्रेसिंग ट्रेण्डमध्ये आहे, पण त्यासाठी योग्य रंग निवडणं गरजेचं आहे. नाही तर अशा ड्रेसेसमध्ये अवघडलेपण येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही पहिल्यांदा असा ड्रेस घालणार असाल तर काळा किंवा गडद रंग कधीही उत्तम. केप या सीझनमध्ये हिट आहे. पार्टी ड्रेसल्ली यामुळे रॉयल लुकही मिळतो. थंडीच्या दिवसांत केपची फॅशन करायला काहीच हरकत नाही. परिणीतीने सिंपल मेकअप केला असला तरी तुम्ही मात्र पार्टी मूडचा विचार करता आयमेकअप डार्क करू शकता. सोबत छान कीटन हिल्स किंवा प्लम्स असल्या की पार्टी गर्ल रेडी टू रॉक द डान्स फ्लोर!
viva.loksatta@gmail.com