सायली सोमण viva@expressindia.com

असं खूप वेळेला होतं की कुठल्या तरी ठरावीक कार्यासाठी/समारंभासाठी किंवा सहजच आपल्याला नवीन कपडे विकत किंवा बनवून घ्यायचे झाले तर आपण त्यापूर्वी त्या कपडय़ाचा रंग, त्याचा पॅटर्न, स्टाईल/फॅशन या गोष्टींचा एक तत्सम विचार केलेला असतो. खूप वेळा असंही होतं की काही वर्षांपूर्वी गाजलेली एखादी फॅशन किंवा एखाद्या मोठय़ा सेलेब्रिटीने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी गाजवलेला एक विशिष्ट ड्रेस-अ‍ॅक्सेसरीप्रमाणेच आपल्याला आपले नवीन कपडे हवे असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतात मोदी सरकार आल्यापासून किंवा त्याच्या थोडं आधीच पुन्हा एकदा पुरुषांचा पारंपरिक कपडय़ांचा कल खादी कुर्ते आणि बंडी जाकीट यांच्याकडे वाढला. तेव्हापासूनच या कपडय़ांना आपण नव्याने मोदी कुर्ता अथवा मोदी जाकीट असं म्हणतो. थोडक्यात आजचा आपला विषय मागील शतकातील अशाच काही व्यक्ती आणि घटनांवर आधारित आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांच्या रोजच्या राहणीमानात; कपडय़ांमधल्या आवडीनिवडीत बदल घडवून आणला आणि प्रत्यक्षात अशा अनेक फॅशन चळवळी जन्माला आल्या..

नीओ क्लासिकल

नीओ क्लासिकल ही पहिली फॅशन चळवळ किंवा पहिलं फॅशनचं युग आहे. हे नाव एक ग्रीक शब्द ‘नीओ’ आणि एक लॅटिन शब्द ‘क्लासिकस’ यावरून घेतलेला आहे. ज्याला आर्ट्स आणि फॅशनच्या भाषेत बोलायला गेलो तर एक उच्च दर्जा असलेली कलाकृती अथवा फॅशन किंवा स्टाईल जी एव्हरग्रीन आहे किंवा सतत ट्रेंडमध्ये असणारी असा याचा अर्थ होतो. याचा उगम अठराव्या शतकाच्या मध्यात रोममध्ये एज्युकेशनल ग्रँड टूरसाठी आलेल्या युरोपमधील फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांकडून झाला. आणि ही फॅशन१८१५ मध्ये नेपोलियनच्या राज्यापर्यंत टिकून राहिली. साधेपणा, सममिती आणि कालातीत फॅशन ही यापहिल्या फॅशन युगातील मूळ तत्त्वं आहेत. म्हणूनच एकदम हलक्या वजनाचे ट्रान्स्ल्यूसेन्ट मस्लिन कॉटनपासून बनवलेले स्लीवलेस एम्पायर लाईनवाले, ए लाईन अम्ब्रेला घेराचे, मोठय़ा उंचीचे, छानशी रिबन किंवा लेस लावलेले गाऊन्स आणि ड्रेसेस, ग्रीक मोटिफ असलेल्या कश्मिरी लोकरीच्या शाली, कमी किंवा फ्लॅट हिलवाले बॅले पद्धतीचे पायताण, छोटय़ा उंचीचे कुरळे केस या सर्व त्या काळातील गोष्टी आजही आपण तितक्याच आवडीने परिधान करतो. पुरुषांच्या फॅशनबाबतीत बोलायचं झालं तर प्लेन मस्लिन फॅ ब्रिकच्या शर्टची जागा आता या काळात लिनन आणि कॉटनच्या कपडय़ांनी घेतली आहे, पण बहुतांशी पुरुष प्लेन फॅब्रिकच वापरतात. त्या काळात युरोप आणि ग्रीक भागातील पुरुष प्लेन फॅब्रिक आणि त्यावर लष्करातील काही मौल्यवान बॅजेस अशा स्टाईलच्या कपडय़ांमध्ये राहाणं जास्त पसंत करत होते.

आर्ट नुव्हो

‘आर्ट नुव्हो’ हा एक फ्रेंच शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘नवीन कलाकृती’ असा होतो. १८९० ते १९१० या काळात ही चळवळ प्रत्यक्षात आली आणि लवकरच प्रसिद्ध झाली. फाईन आर्ट्सच्या भाषेत आपण याला कमर्शिअल किंवा अप्लाईड आर्ट असं म्हणू शकतो. कारण इथे नैसर्गिक गोष्टी किंवा आपल्या रोजच्या राहणीमानातील वस्तू वापरून त्याला एक कलात्मक वळण कसं देता येईल याचा विचार केलेला दिसतो. मुख्यत: वेल, पानं, फळं, फुलं, प्राणी, पक्षी, त्यातल्या विविध प्रकारच्या आकार-रेषा यावरून प्रेरणा घेऊन एक स्वत:चं डिजाईन, पेंटिंग, म्युरल इत्यादी तयार करणे हे या प्रकारात मोडतं. टेक्स्टाईल डिझाईनमधील विविध डिझाईन मोटीफ तसेच फ्लोरल प्रिंट्स, बटीक प्रिंट्स आणि पेंटिंग्ज; त्याच बरोबर विविध देशप्रदेशातील एम्ब्रॉडयरी आणि फॅब्रिक विव्हिंगमधील डिझाईन मोटीफ त्यांची कॉम्बिनेशन्स वापरून तयार केलेले कपडे अशा पद्धतीच्या टेक्सटाईल्सची ओळख आपल्याला आर्ट नुव्होमुळे झाली, असे समजायला काही हरकत नाही.

बेले पोक

ही साधारण आर्ट नुव्होच्या समांतर काळात आलेली फॅशन चळवळ समजली जाते. हाही एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे सुंदर युग. हा काळ पाश्चिमात्य देशातील एक अत्यंत महत्त्वाच्या फॅशन युगाचा मानला जातो. व्हिक्टोरियन काळानंतर पहिल्या महायुद्धाला सुरुवात होण्याआधीचा सहाव्या किंग एडवर्डच्या शासनकाळातील होता. या काळात लोकांचे जगणे शाही थाटाचेच होते जे त्यांच्या राहणीमान आणि कपडय़ांवरून नीट झळकत असे. त्या काळात स्त्रिया मोठय़ा घेराचे गाऊन्स, कोर्सेट परिधान करत असत. त्यांच्या डोक्यातील हॅटवर असणारी विविधरंगी पिसे, हातातील ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी दिसायला खूप सुंदर होत्या, पण ही फॅशन तितकीच महागडी देखील होती.

क्युबिझम आणि फ्लॅपर

विसाव्या शतकातील एकदम सुरुवातीच्या काळात क्युबिस्ट आर्टमुळे प्रसिद्ध झालेले चित्रकार पिकासो आणि ब्राक यांनी नैसर्गिक सौंदर्याला भौमितिक आकार आणि रेषांमधून सादर करत एक वेगळ्याच पद्धतीची चित्राकृती आणली. या चित्रांचा लोकांच्या कपडय़ांच्या स्टाईल्स निवडण्यावर इतका परिणाम झाला की, ज्या स्त्रिया आतापर्यंत गाऊन्स, कोर्सेट आदी कपडे किं वा स्वत:चा कमनीय देह एस सिल्हाऊट असलेल्या कपडय़ांमधून मिरवणं पसंत करत होत्या. अचानक त्या कमी घेरवाले किंबहुना  सध्या जे आपण स्ट्रेट फिटिंग कपडे वापरतो त्याकडे त्यांचा कल वाढला. बदललेल्या प्रिंटनुसार स्ट्रेट फिटिंगचे कपडे, त्याचबरोबर केसांचा बॉबकट आणि मोठा घेर नसलेली क्लोश हॅट या दोन्ही गोष्टीही तितक्याच लोकप्रिय झाल्या.

फ्लॅपर म्हणायचं झालं तर क्युबिझमचाच विस्तारित प्रकार. स्ट्रेट सिल्हाऊट्सच्या बरोबरीनेच आपली शरीरयष्टी अगदीच डौलदार दिसण्यापेक्षा किंवा मुरडत मुरडत चालण्यापेक्षा ती जास्तीत जास्त पुरुषी किंवा टॉम बाईश कशी दिसेल, यावर स्त्रियांचा भर वाढला होता. उदाहरणार्थ ढगळ, सैलसर कपडे, बॉक्स प्लीट्सचे स्क र्ट्स आणि फ्रॉक्स, छोटे जॅकेट, फ्रिंज्ड किंवा अनईव्हन हेमलाईनचे ड्रेसेस जाणीवपूर्वक वापरले जात होते. सुप्रसिद्ध आंतराष्ट्रीय डिझायनर कोको शानेलने १९२६ मध्ये डिझाईन केलेला आणि अतिशय लोकप्रिय असा लिटिल ब्लॅक ड्रेस हे याचे उत्तम उदाहरण. एलबीडी म्हणून ओळखला जाणारा हा ड्रेस एव्हरग्रीन फॅशनमध्ये मोडतो.

एव्हाना या काळानंतर स्त्रिया पूर्ण उंचीऐवजी गुडघ्याच्या उंचीचे कपडे घालू लागल्या होत्या. पहिल्या महायुद्धानंतर किंवा त्या दरम्यान स्त्रियांवर झालेले शारीरिक अत्याचार आणि पाश्चिमात्य देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था पण याला कारणीभूत असावी. हळूहळू ती कोलमडलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्त्रियाही पुरुषांबरोबर काम करू लागल्या होत्या. त्यामुळे नंतरच्या काळात सुटसुटीत आणि अ‍ॅंटी फेमिनाईन कपडे घालणे ही स्त्रियांची गरज बनली होती. काळानुसार आणि त्या त्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीनुसार फॅशनवर जे महत्त्वाचे परिणाम झाले आणि त्यातून जे ट्रेंड्स जन्माला आले त्यातले वर उल्लेखलेले टप्पे हे मैलाचे दगड मानले जातात. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ज्या फॅशन चळवळी आणि ट्रेंड जन्माला आले त्या वेगळ्या होत्या. त्यांचे कर्तेधर्तेही वेगळे होते. त्या ट्रेंडसेटर व्यक्ती आणि त्या अनुंषगाने वाढलेल्या फॅशनच्या चळवळीकथा आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ या.