शाळेत असताना तिने बालश्रीमिळवला आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याआधी आहे, अत्यंत पारंगत नृत्यांगना. नृत्य हाच तिचा श्वास आहे. अशी ही कल्लाकार आहे, तन्वी पालव.

तन्वी पालवच्या म्हणजे पालवांच्या घरातली सकाळ व्हायची, आकाशवाणीवरचं शास्त्रीय संगीत ऐकून. तन्वीचे पालक काही कारणास्तव संगीतविषयक शिक्षण घेऊ शकले नाहीत, पण हीच आवड त्यांनी मुलांमध्ये रुजवली.

लहानगी तन्वी चालली नाही तर चक्क नाचलीच, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

दादरमध्ये बालपण गेलेली तन्वी आपल्या बरोबरीच्या मुलांसोबत खेळाबागडायची नव्हे तर चक्क नाचायची. वयाच्या तिसऱ्याच वर्षी लहानग्या तन्वीला घेऊन तिचे बाबा नृत्यालयात गेले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, ‘‘तुमची लेक अजून बरीच लहान आहे. तिचं हाडं अजून पक्की झालेली नाहीत. अशा वेळी जर तिने नृत्याचा सराव केला तर तिच्या पायांना इजा होईल. त्याऐवजी तुम्ही असं करा की, ती पाच वर्षांची झाल्यावर तिला घेऊन या.’’ पण तन्वीच्या वडिलांना ते ऐकलं नाही. ते आणखी चार नृत्यालयांत जाऊन आले. पण तिथेही त्यांना हेच उत्तर मिळालं. शेवटी हताश होऊन बापलेक घरी आले. पण तन्वीच्या मनातलं नृत्य हरवलं नव्हतं. एक दिवस  खेळता खेळता तिला गच्चीवर अचानक घुंगरांचा आवाज आला. धावत जाऊन पाहते तर काय, गच्चीच्या एका कोपऱ्यात एक बाई कथ्थकची शिकवणी घेत होत्या. ते पाहून तन्वी रोज त्यांच्या शिकवणीच्या वेळी खेळण्याच्या बहाण्याने गच्चीत जाऊन बसू लागली. बाईंच्याही ते लक्षात आलं. त्यांनी तन्वीला जवळ बोलावून विचारलं, तेव्हा त्यांना कळलं की तन्वीला नृत्याची किती आवड आहे. त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन तन्वीच्या आईला विचारलं, तुमच्या मुलीला मी शिकवू का? तन्वीला व तिच्या आईला आकाश ठेंगणं झालं. अशा रीतीने तन्वीच्या पहिल्या गुरू लता बाकाळकर तिच्या आयुष्यात आल्या. त्या स्वत: नृत्यालंकार आहेत. गच्चीवरच्या शिकवणीने तन्वी खुूा होऊन गेली. तिच्या गुरूंनी अगदी लहानसहान गोष्टींपासून सुरुवात केली.

त्याची आठवण सांगताना तन्वी म्हणाली की, ‘‘उजव्या बाजूची गिरकी सोपी असते पण डाव्या बाजूची तितकीच डौलदार गिरकी घेणं, कठीण असतं. एकदा बाईंनी अशी गिरकी घेणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं. ते मी मिळवलं. आयुष्यातलं हे पहिलं पण अविस्मरणीय बक्षीस.’’ तिच्या वयाचा अडथळा न बाळगता तिच्या गुरूंनी तन्वीला प्रवेशिका प्रथमच्या परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इंग्रजी माध्यमात तिसरीत शिकणारी तन्वी मराठीमधील अ आ इ शिकत होती. त्याच वयात तिने प्रवेशिकेची परीक्षा दिली आणि नृत्याच्या मराठी भाषेतल्या मोठय़ा मोठय़ा व्याख्या लिहिल्या. पण केवळ घोकंपट्टी करून नव्हे तर आईने आणि गुरूने तिच्याकडून त्या नीट अभ्यासून घेतल्या होत्या. याचं फलित म्हणून ती उत्तम गुणांनी प्रवेशिका प्रथमची परीक्षा उत्तीर्ण झाली. काही दिवसांनी तन्वी विविध स्पर्धामध्येही उतरू लागली. मधल्या काळात तिची शिकवणी महालक्ष्मीला गेली.

स्पर्धेसाठी तिची विशेष शिकवणी रात्री १२ तर कधी एकपर्यंत चालायची. पण तन्वी न थकता जोमात तालीम करत असे. तिचे बाबा क्लास सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दाराशी बसून असायचे. कधी कधी क्लासचा दरवाजा ओलांडल्यावर तन्वीच्या लक्षात यायचं की आपण इतके थकलोय की आता पुढे एक पाऊलही टाकवणार नाही. मग तिचे बाबा तिला अलगद उचलून घ्यायचे. घरी आई अक्षरश: जेवण भरवायची. तर बाबा मांडीवर घेऊन बसायचे. त्यांच्या याच पाठिंब्यामुळे मी आज, करिअरचा इतका मोठा टप्पा गाठू शकले, असं तन्वी आवर्जून सांगते.

इयत्ता सहावीत असताना तन्वीच्या शाळेतील धुरी मॅडमनी, दुसऱ्या दिवशी असणाऱ्या ‘बालश्री’ या स्पर्धेची माहिती तन्वीला दिली. घरी जाऊन आई-बाबांना सांगायची ताकीद दिली. पण दंगामस्तीच्या नादात तन्वी ते विसरली. रात्री अचानक घरी धुरी मॅडमचा फोन आल्यावर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. याबद्दल तन्वी म्हणते, ‘‘मला स्पर्धेचे नियम व अटी काहीच ठाऊक नव्हते. ‘बालश्री’च्या आधी मी अनेक स्पर्धामध्ये सहभागी झाले होते व प्रथम क्रमांकही पटकावला होता. शिवाय अल्लड वय, त्यामुळे मला खरं तर ‘बालश्री’चं गांभीर्य समजलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी स्पर्धेच्या ठिकाणी गेले. माझी मी एकटीने स्पर्धेची तयारी केली. स्पर्धेचे नियम तर तिकडे गेल्यावर अचानक कळले. पण स्पर्धेच्या मोठेपणाची कल्पनाच नसल्याने दडपण नव्हतंच. मी नृत्य सादर केलं. तिथल्या परीक्षकांनी मला जवळ बोलावलं, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, बाळा तुला बालश्री मिळाला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. काही महिन्यांतच ‘बालश्री पुरस्कारा’साठी माझं नाव घोषित करण्यात आलं. मी, माझे गुरू व आईवडील आम्ही सगळे दिल्लीला पुरस्कार स्वीकारण्यासाठी रवाना झालो. तेव्हाचे राष्ट्रपती के आर नारायणन व अनेक मान्यवर लोकांसमोर नृत्य सादर करून मी हा पुरस्कार स्वीकारला.’’

बालश्री मिळवल्यानंतर सुरू झालेली तन्वीची घोडदौड थांबलीच नाही. २००० साली तिला मिनिस्ट्री ऑफ कल्चरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॅलरशिप मिळाली. त्याचप्रमाणे २००५ साली नवी दिल्लीतील रढकउ-टअउअ, तर २०१२ साली मिनिस्ट्री ऑफ कल्चरल गव्हर्नमेंटकडून तरुण कथ्थक कलाकारांना दिली जाणारी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली.

इंडोनेशियन सरकारकडून मिळणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंडोनेशियन गव्हर्नमेंट आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर स्कॉलरशिप २०१६ही तिने मिळवली.

नृत्यात निपुण असलेली तन्वी अभिनेत्री कशी झाली, याची उत्सुकता होती. त्याबद्दल ती म्हणाली, अभिनयाचं पाठबळ मला आविष्कारने दिलं. त्यांच्याबरोबर मी ‘दुर्गा झाली गौरी’ व ‘पंचतंत्र’ या दोन नृत्यनाटिका केल्या. अभिनयाशी गट्टी तिथेच जमली. रुईया कॉलेजला गेल्यावर नाटय़वलय होतंच. मग तिथेही अनेक एकांकिका आणि प्रायोगिक नाटकं केली, बक्षिसं मिळवली. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ला इंडोनेशिया सरकारकडून मिळालेल्या स्कॉलरशिपवर तन्वीला तीन महिने बालीला जायचा योग आला. जगभरातल्या तरुणांमध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करत होती. तिथे ‘बहासा’ नावाची इंडोनेशियन भाषा, ‘गमलान’ नावाचे वाद्य आणि इंडोनेशियन नृत्य तन्वी तीन महिन्यांत शिकली. तिथल्या लोकांना तिने भारतीय नृत्याची आवर्जून ओळख दिली. शास्त्रीय संगीत ऐकवलं. बालीबरोबरच रशिया, नेदरलँड, ढाका व सिंगापूर या ठिकाणीही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर देशांतर्गत हैदराबाद, केरळ, भुवनेश्वर, कोणार्क, दादरा नगर हवेली, दिल्ली, कोलकाता या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय. नुकतंच तिने स्वत:चं नृत्यालय सुरू केलं आहे. त्याच्या दोन शाखा आहेत. तन्वीच्या या नृत्यमयी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा!

viva@expressindia.com