07 March 2021

News Flash

बॉटम्स अप : प्रवास कॉकटेलपासून मॉकटेलपर्यंत

कॉकटेल्सविषयी सांगायचं तर बऱ्याचदा ते घरी बनवण्यावरच प्राधान्य दिलं जातं.

शेफ वरुण इनामदार

‘जब मिल बैठेंगे सब यार..’ असं म्हणत काही मित्रमंडळींच्या टोळ्या पार्टीच्या नावावर बसतात आणि गप्पांच्या ओघात त्यांना जोड मिळते ती म्हणजे मद्याच्या एखाद्या प्याल्याची. एका प्याल्यापासून म्हणजेच पेगपासून सुरू झालेल्या या सत्रात ग्लास आणि मग अख्खीच्या अख्खी बाटली कधी रिकामी होते याचा अंदाजच येत नाही. आपल्या मित्रमंडळींच्या यादीत असं एक तरी नाव असतं ज्याच्या सवयीप्रमाणेच पिण्याचे बेत वगैरे आखले जातात. मुळात असे मित्र आयुष्यात कोणत्याही प्रसंगी पाठिंबा देण्यासाठी हजर असतात. यावर तुम्ही सहमत आहात ना माझ्याशी, हा झाला गप्पांची सुरुवात करण्याचा विषय. पण, माझ्या मित्रांविषयी सांगावं तर नेहमीच्या पिणाऱ्यांप्रमाणे, हे तळीराम सोडा-वॉटरची जोड देत त्यांच्या प्याल्याचा आनंद घेतात असं नाही. तर आपल्या घरी मित्रांना आमंत्रित करून काहीतरी भन्नाट पेयांच्या फ्युजनच्या साथीने अनोख्या गोष्टी आपल्यासमोर सादर करणाऱ्यांच्या यादीतही या मित्रांच्या नावांचा समावेश होतो. आणि मग पुढय़ात येत विविध प्रकारची पेय असणारी कॉकटेल आणि मॉकटेल्सची यादी.

कॉकटेल्सविषयी सांगायचं तर बऱ्याचदा ते घरी बनवण्यावरच प्राधान्य दिलं जातं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाहेर जाऊ न मॉकटेल-कॉकटेल पिण्यात पैसे वाया घालवण्यापेक्षा घरीच त्याचा आनंद घेणं कधीही उत्तम. त्याशिवाय आपले ड्रिंक्स घरी बनवण्याहून दुसरं सुख काय हो.. या सगळ्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या अशा व्यक्तीसाठी तुमच्या स्वत:च्या ठेवणीतील दारू काढून त्यांच्यासाठी काही तरी भन्नाट ड्रिंक तयार करणं. आपल्यातील अनेकांमध्ये दडलेल्या या बारटेंडरकडे स्वत:ची अशी एक कॉकटेल्सची वेगळी यादी तयारच असते. अर्थात या गोष्टी प्रत्येक वेळी एकसारख्या असतीलच असं नाही. पण, एखादी लहानशी गोष्ट किंवा मद्याचं प्रमाण इकडचं तिकडे झालं की काहीतरी अफलातून आपल्या हाती येतं. आणि मुळात पेय तयार करताना इथे आपल्या कल्पनेप्रमाणे हवं तसं बनवता येणं ही बाबच जास्त महत्त्वाची ठरते. तर मग कॉकटेल म्हणजे नेमकं काय आणि कॉकटेल-मॉकटेल यांच्यात नेमका फरक काय? ज्यूस स्टॉलवर जाऊ न आपल्यापैकी अनेकांनी फ्रुट कॉकटेलची ऑर्डर दिली असेल, पण इथे वापरला जाणारा शब्द मुळात चुकीचा आहे. काय म्हणता.. का? लेख जसजसा पुढे जाईल तसतसं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेलच की.

इतिहासाचे काही संदर्भ चाळून पाहिले तर लक्षात येईल की कॉकटेल हा शब्द आणि त्याची उत्पत्ती कुठे तरी हरवलेली आहे. पण, सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार १८०३ मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला होता. या गोष्टीवर तुम्ही कितपत विश्वास ठेवाल हे ठाऊक नाही. पण, कॉकटेल हा शब्द सर्वप्रथम एका बारटेंडरने नव्हे तर एका पत्रकाराने वापरला होता. साखर, पाणी, लिक्वर्स आणि बिटर्स अशा पदार्थापासून बनवण्यात आलेलं एक पेय म्हणजे कॉकटेल.

१९व्या शतकामध्ये कॉकटेलचं रूप काहीसं बदलत गेल्याचं पाहायला मिळालं. २१व्या शतकात तर विविध प्रकारची दारू, वाईन आणि गार्निश करण्याच्या पद्धतीमध्ये खाण्यायोग्य असणारी काही रसायनं आणि धुराचा वापर केला जाऊ  लागला. पण, काहींनी मात्र कॉकटेल साधंच घेणं पसंत केलं. किंबहुना ही पद्धत त्यांच्या आजोबांच्या वगैरे काळापासून चालत आली असावी जिथे ते दारू पिताना ती पाण्यात मिसळून प्यायचे. त्यामुळे अशा पद्धतीने दारू प्यायची असेल किंवा कॉकटेल हवे असेल तर बारटेंडरला ‘ओल्ड फॅशन ड्रिंक’ द्या असं सांगण्यात येतं. अल्कोहोल, साखर आणि पाणी या सगळ्याचं एकत्र मिश्रण करून आणि त्यात ‘बिटर’ बिटर्स अ‍ॅड करून एक प्रकारचं सिरप तयार होतं, ज्याला कॉकटेल असंही म्हणतात. मुळात याला ‘ओल्ड फॅशन्ड’ असंही म्हणतात. ज्यामध्ये प्रत्येक वेळी अल्कोहोलचं प्रमाण कमी जास्त असल्याचं पाहायला मिळतं. ‘ओल्ड फॅशन’ हे अगदी पहिलंवहिलं कॉकटेल आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या अनेक बारटेंडर्सनी त्यांची कॉकटेलची यादी बदलण्याचं आणि त्यात नवनवीन पेयांची भर टाकण्याचंही महत्त्वाचं काम सुरूच ठेवलं.

शतकानुशतकं विविध प्रकारची ड्रिंक्स घेण्याची प्रथा म्हणा किंवा आणखी काही. पण, हे सर्व बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. आपण कॉकटेल वगैरे बऱ्याच वर्षांपासून बनवतोय, पण १७ व्या शतकापासून त्याची खऱ्या अर्थाने नोंद करण्यात आली. ज्यामध्ये स्लिंग, ताडी (Toddy), ज्युलेप आणि फिज या विभागांमध्ये कॉकटेल्सची नोंद करण्यात आली.

कॉकटेल्सचा उल्लेख असणाऱ्या काही छापिल पुराव्यांविषयी बोलायचं तर ‘न्यू हॅम्पशायर’च्या २८ एप्रिल १८०३ च्या ‘द फार्मर्स कॅबिनेट’ नावाच्या मासिकात त्याचा सर्वप्रथम उल्लेख करण्यात आला होता. त्यात मस्करीत असं लिहिण्यात आलं होतं  की, ‘सकाळी अकराच्या सुमारास एक माणूस येतो, त्याचा हँगओव्हर उतरवण्यासाठी त्याला एक पेय देण्यात आलं होतं. ते पेय म्हणजेच कॉकटेल’. ‘आइम्बाइब’ या पुस्तकात डेव्हिड वॉन्ड्रीचने सर्वप्रथम कॉकटेलची रेसिपी लिहिली होती ज्यामध्ये १९ व्या शतकातील बार संस्कृती आणि कॉकटेल्सविषयी बरीच माहिती देण्यात आली होती.

कोणत्याही प्रकारची नोंद नसल्यामुळे अनेकांनी कॉकटेलशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा आपणच शोध लावला असा कांगावा केला, पण त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता हीसुद्धा एक महत्त्वाची बाब. आता ही एक हास्यास्पद गोष्ट असली तरीही हेच सत्य आहे. पण, कितीही असलं तरीही कॉकटेलशी संबंधित काही कथा या तितक्याच रंजक आहेत. त्यातील काही खास आणि माझ्या विशेष आवडीच्या कथा पुढे तुम्हाला सांगतो आहे.

त्या कथा खालीलप्रमाणे..

‘कॉकटेल’ या शब्दामागे असणारी ही कथा ‘रूस्टर टेल’ म्हणजेच कोंबडय़ाच्या शेपटीच्या पिसाशी निगडित आहे. (कॉक-कोंबडा, टेल-शेपटी-कॉक टेल)शी संबंधित आहे. ज्याचा वापर एखादे ड्रिंक मिक्स करण्यासाठी वापरले जायचे. मुळात अशा या कथा लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत, पण म्हणून त्यांची रंजकता कमी होते, असं नाही. कॉकटेलशी निगडित आणि माझ्या माहितीतील आणखी एक कथा म्हणजे १८२१ मधली जेम्स ‘द स्पाय’ नावाच्या पुस्तकाची. ज्यात बेटी फ्लँगन नावाच्या महिलेचा उल्लेख करण्यात आला होता. १७७९ मधील काळाचा संदर्भ घेत रचलेली ही कथा. ती महिला एका हॉटेलची मालकीण होती जी फ्रेंच सैनिकांना ड्रिंक्स सव्‍‌र्ह करायची. तसे करत असताना ती शेजाऱ्यांचे कोंबडे चोरायची. कोंबडय़ा चोरून त्यांच्या शेपटीची पिसं काढून ती त्या पिसांचा वापर ड्रिंक्स ढवळण्यासाठी करायची. आहे की नाही ही रंजक कहाणी?

‘रूस्टर थेअरी’ किंवा कोंबडय़ाच्या पिसाच्या या कथा विविध रंगांवरही आधारलेल्या होत्या, पण त्या काळात दारू ही विविध रंगांमध्ये उपलब्ध नव्हती. मात्र कोंबडा आणि त्याच्या शेपटीची पिसं यामुळे ही कथा आणखीनच रंजक ठरली. इथे संदर्भ घेतला गेला तो कोंबडय़ाच्या पिसाच्या रंगांचा.

कॉकटेलच्या नावाचा वापर नेमका कधी आणि कुठे केला जाऊ  लागला याविषयीची माझ्या माहितीतील आणखी एक कथा म्हणजे, ब्रिटनची. ‘बार टेंडर’ नावाचं एक पुस्तक होतं. जे इंग्लिश नौदलाला समर्पित करण्यात आलं होतं. इंग्लिश नौदलात काम करणाऱ्या त्या सैनिकांना मेक्सिकोमध्ये एक ड्रिंक दिलं जायचं. ते सैनिक कोंबडय़ाच्या पिसाने ते ड्रिंक ढवळायचे.

तसं पहायला गेलं तर कॉकटेल या नावामागे नाही म्हणता बऱ्याच कथा दडलेल्या आहेत. आता या वरच्या कथा वाचूनही क ॉकटेल हे नाव कुठून आलं, हा प्रश्न तुमच्या मनात घर करत असेल तर त्याचं उत्तर बहुधा तुम्हाला पुढच्या आणखी एका रंजक कथेत मिळू शकतं. दारू साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कास्क, बॅरेल या सगळ्यातून टेस्टिंग करतेवेळी पडलेले ड्रिंक्स एकत्र करण्याच्या पद्धतीला कॉकटेलिंग असं म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या डिस्टीलेशन रूममध्ये गेलात तर तिथे विविध प्रकारची ड्रिंक्स दिसू शकतात. या बॅरेलमधून पडलेल्या ड्रिंक्सना एकत्र करून ते ड्रिंक विकले जातात. ज्यांना कॉकटेल असं म्हणतात. अशा प्रकारच्या ड्रिंक्सचा दर तुलनेने कमी असतो.

कॉकटेल हा जो शब्द आहे तो, अ‍ॅझेक (Aztek) या आदिवासी प्रजातीतील देवतेच्या नावावरून घेण्यात आला आहे. तिचं नाव आहे शो शीतल (Xo chitl). शो शीतल म्हणजे एक प्रकारचं फूल. मेक्सिकन पौराणिक कथांमध्ये उल्लेख केल्यानुसार ‘शो शीतल’ नावाची एक राजकुमारी होती. ती अमेरिकन सैनिकांना दारू द्यायची, ज्याचा उल्लेखही कॉकटेल म्हणून केला जायचा.

विसाव्या शतकामध्ये कॉकटेलचं प्रस्थ बऱ्यापैकी वाढलं. १९८० पासूनच तरुणाईमध्ये अशा प्रकारच्या ड्रिंक्सना प्राधान्य देण्याकडे कल वाढला होता. दारू न पिणाऱ्यांसाठी मग अशाच काही पेयांचे प्रकार पुढे आल्याचं पाहायला मिळालं. पाहताच क्षणी भावणाऱ्या आणि एका वेगळ्याच चवीच्या मुख्य म्हणजे सर्वसाधारण सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा जास्त चांगल्या चवीच्या पेयांची चलती आली ज्यांचा उल्लेख मॉकटेल्स म्हणून केला जाऊ  लागला. मॉकटेल्सच्या लोकप्रियतेला इंटरनेटचाही बराच फायदा झाला. ज्यामुळे एकाहून एक सरस मॉकटेल्सच्या रेसिपीज सर्वासमोर आल्या. मॉकटेल्स या नावातच त्याचा अर्थही दडला आहे. मॉकटेल्स,  एखाद्या गोष्टीची नक्कल म्हणजेच मॉक. मग मॉकटेल म्हणजे मद्यासारख्या दिसणाऱ्या पण मद्य नसणाऱ्या एखाद्या पेयाची निर्मिती करणं होय. गेल्या साधारण दोन दशकांमध्ये मॉकटेल्सना कॉकटेल्सच्याच बरोबरीचं स्थान मिळालं आहे. अल्कोहोल नसणाऱ्या काही पेयांचं एक सुरेख आणि तितकंच चवदार मिश्रण करून बनवण्यात आलेलं पेय म्हणजे मॉकटेल. फळांचा रस, सिरप, क्रीम, हर्ब्स आणि त्याला जोड म्हणून काही मसाल्यांचं मिश्रण यात असतं.

या सर्व कथा आणि कॉकटेल, मॉकटेलमध्ये असणारा फरक पाहता फ्रुट कॉकटेल हे एक मिसनोमेर म्हणजेच गैरसमजातून चालत आलेल्या शब्दाचं उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. कारण मुळातच ती एक वेगळी गोष्ट आहे. तेव्हा आता यावर तुम्हीच विचार करा आणि लेखाविषयीच्या आणि लेखाच्या आगदी सुरुवातीलाच मी उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा.

दहा लोकप्रिय कॉकटेल्स

  • ओल्ड फॅशण्ड
  • मार्टिनी
  • मॅनहॅटन
  • ब्लडी मेरी
  • नेगरोनी
  • व्हिस्की सावर
  • माई ताई
  • कॉस्मोपॉलिटन
  • टॉम कॉलिन्स

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:11 am

Web Title: cocktail to mocktail a to z cocktail recipe
Next Stories
1 ‘गोंदण’गिरी
2 फॅशनदार : नववधूची तयारी
3 ‘वाद’च नाही
Just Now!
X