दिवसेंदिवस प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रियांची संख्या कमी आहे, हे लक्षात घेऊन तरुण मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गुगल’ने नुकताच एक अभिनव प्रयोग केला. टेक्नोवेशन या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातल्या ६० देशातल्या पाच हजारहून जास्त मुलींनी स्वत कोडिंग करून छोटी छोटी अॅप तयार केली. या ‘कोड गर्ल’स्च्या या सगळ्या डेव्हलपमेंटचा प्रवासही कॅमेराबद्ध करण्यात आला आहे.
तंत्रज्ञान आजकाल इतकं पुढे जात आहे की, त्यामुळे अनेक गोष्टी सहज शक्य होत आहेत. मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झालाय. स्मार्टफोन आणि त्यातल्या विविध अॅप्समुळे अनेक गोष्टी सुखकर झाल्या आहेत. अगदी सगळी कामं आपल्या मुठीत आली आहेत. पण तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा कोडिंगच्या कामात स्त्रियांची संख्या कमी दिसतेय. कॉंप्युटर सायन्स आणि डेव्हलपमेंटमध्ये पुरुषांचीच मक्तेदारी दिसतेय. ‘इट्स नॉट माय कप ऑफ टी’ असं म्हणत न्यूनगंडातून महिला फारशा याकडे वळत नसल्याचं जाणवतंय आणि हे निरीक्षण जागतिक स्तरावर नोंदवलं जातंय. मोबाइल अॅप डेव्हलप करणाऱ्यांमध्ये ८० टक्के पुरुषांचा समावेश असतो, असं जागतिक स्तरावरची आकडेवारी सांगते.

दिवसेंदिवस प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रियांची संख्या कमी आहे, हे लक्षात घेऊन तरुण मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने नुकताच एक अभिनव प्रयोग केला. ‘टेक्नोवेशन’ या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातल्या ६० देशातल्या पाच हजारहून जास्त मुलींना या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा दिली.
१४ ते १९ वयोगटातल्या मुलींसाठी ‘गुगल’ने ‘टेक्नोवेशन’ ही स्पर्धा जाहीर केली होती. यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना सहभागी करून घेण्यात आले होते. कोडिंग क्षेत्रात जास्तीत जास्त मुली पुढे याव्यात आणि त्यांनी याकडे करिअर म्हणून पाहावं; परिणामी कॉप्युटर सायन्स क्षेत्रात मुलीची संख्या सुधारावी हा त्यामागचा उद्देश आहे. यामध्ये सहभागी मुलींनी स्वत कोडिंग करून छोटं अॅप्लिकेशन तयार करणं अपेक्षित होतं. विजेत्या गटाला एक लाख डॉलरचं घसघशीत बक्षीसही देण्यात आलं.
आपण राहतो त्या समाजातील, आसपासच्या परिसरातील समस्यांवर अॅपच्या माध्यमातून समाधान शोधण्याचं टास्क या मुलींना देण्यात आलं होतं. समस्येचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणाऱ्या अॅपची निर्मिती त्यांना करायची होती. यात देशोदेशीच्या मुलींनी खूप साधे तरीही महत्त्वाचे विषय निवडले. अपंगांना मदत, कचरा व्यवस्थापन, घरगुती अत्याचार, शुद्ध पाण्याचं व्यवस्थापन असे विषय हाताळून त्यावरचा उपाय म्हणून स्वत: कोडिंग करून अॅप निर्मिती केली.
या संपूर्ण ‘टेक्नोव्हेशन’च्या प्रवासाचं चित्रीकरण ‘कोड गर्ल’ या डॉक्युमेंटरीमध्ये करण्यात आलं आहे. लेसली चिल्कॉट या प्रसिद्ध दिग्दर्शिकेने ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. यात ब्राझील, नायजेरिया आणि इतर देशातल्या टेक्नोवेशनमध्ये सहभागी झालेल्या तरुणींच्या कामाचा, प्रवासाचा, उत्साहाचा, एकूणच त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा थोडक्यात आढावा घेतलाय. या स्पर्धेत त्यांना अॅप तयार करण्यासाठी करावा लागणारं सर्वेक्षण, त्यावरून अॅप बनवणं, त्याला व्यावसायिक स्वरूप देणं, त्या अॅपचं वर्णन करणं, व्हिडीयो बनवणं ते थेट सॅन फ्रान्सिस्कोला परीक्षकांसमोरचं सादरीकरण, ते पुरस्कार वितरण हा सगळा प्रवास डॉक्युमेंट्रीतून उलगडला आहे.
केवळ डोक्यात असलेली एक कल्पना, त्याचा अभ्यास करून आणि मार्गदर्शनातून सहा महिने प्रयत्न करून अॅपच्या माध्यमातून या कल्पना मुलींनी प्रत्यक्षात साकारल्या. तंत्रज्ञानाचं शिक्षण आणि त्यातून मिळणारा नवनिर्मिताचा आनंद यातून मुलींना अनुभवायला मिळाला. भविष्यात तंत्रज्ञानात नवनवीन संधी उपलब्ध होतील आणि या उपक्रमातून भविष्यातल्या तांत्रिक क्षेत्रातल्या उद्य्ोजिका जगाला मिळतील याची ग्वाही कोड गर्ल डॉक्युमेंट्री पाहून मिळते.

भारताच्या एक्स वुमेन!
गुगलने आयोजित केलेल्या ‘टेक्नोवेशन’मध्ये आपल्या देशातून ‘एक्स वुमेन’ हा संघ अंतिम सहा संघांत पात्र ठरला होता. शिवालिका कोहली, दिया मारवा, नियती दसारी, चेरील बिबिन आणि सौम्या तेजम या पाच जणींच्या चमूने ‘केपेबल’ या अ‍ॅपची निर्मिती केली होती. अपंग लोकांना कामाच्या तसेच इतर क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सेवाभावी संस्था आणि कॉपरेरेट क्षेत्राशी ओळख करून देणं, त्यातून त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी या मुलींनी या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. तुमची क्षमता तुमची ओळख आहे तुमची दुर्बलता नाही, असा संदेश या एक्स विमेननी दिलाय.

viva.loksatta@gmail.com