19 September 2020

News Flash

कॉफी प्रेम!

१ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

मूळची इथियोपियात जन्म झालेली, काळसर तपकिरी रंगाची, थोडीशी कडवट चवीची, ती समोर आली की, मनाला खरोखर संजीवनी मिळते. कोण बरं ती? तर गोड-कडवट चवीने जिव्हातृप्ती देणारी नेहमीच हवीहवीशी वाटणारी ‘कॉफी’. तरुणाईत जसं चहाप्रेम उतू जातं तसंच कॉफीप्रेम देखील असतं. चहापंथीयांमध्ये जसा सकाळी कडक चहा, मित्रांमध्ये चर्चा करायला फक्कड चहा, दुपारची झोप उडवायला लज्जतदार चहा हवा. तसंच कॉफीपंथीयांमध्येदेखील सकाळी हॉट कॉफी, मीटिंगला कोल्ड कॉफी, अध्येमध्ये फिल्टरकॉफी ही हवीच. मित्रामित्रांमध्ये चहाला जायचं का?, असा प्रश्न सहज विचारला जातो. परंतु कॉफीला जायचं का?, असा प्रश्न जरा अदबीने व क्वचितच मित्रमुखातून बाहेर पडतो. कॉफी हा विषय तरुणाईत जरा अदबीचा आहे. १ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आम्ही ‘व्हिवा’च्या तरुण वाचकांसाठी आणि चिरतरुण कॉफीप्रेमींसाठी कॉफीच्या खास रेसिपी घेऊन आलो आहोत. शेफ विष्णू मनोहर यांनी कॉफीची कडवट चव न घालवता ती अधिक स्वादिष्ट कशी होईल, यावर भर देऊन कॉफीच्या रेसिपी दिल्या आहेत. तर शेफ यशोधन देशमुख याने कॉफी लावा केकची पाककृती दिली आहे.

कॉफी सँडविच केक

साहित्य : मदा २ वाटय़ा, दूध पावडर १ वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, सोडा अर्धा चमचा, लोणी अर्धी वाटी, कॉफी ३ चमचे, साखर ३ चमचे, ब्रेड स्लाइस २ नग.

कृती : सर्व प्रथम २ वाटी मदा, १ वाटी दूध पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा व अर्धी वाटी लोणी एकत्र फेटून घ्या. गरज पडल्यास थोडे दूध घाला. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. नंतर ३ चमचे कॉफी, ३ चमचे साखर, १ चमचा पाणी एकत्र करून खूप फेटून घ्या. इतके फेटायचे की ते श्रीखंड सारखे घट्ट झाले पाहिजे. नंतर ब्रेडच्या २ मोठय़ा स्लाईस घेऊन त्यावर दोन्ही बाजूंनी लोणी लावून घ्या. व तयार कॉफीचे घट्ट मिश्रण लावून दुसरी स्लाइस लावा. तयार स्लाइस केकच्या मिश्रणात बुडवून नॉनस्टिक पॅनवर ठेवा. वर झाकण मंद आचेवर ३ मिनिटे शेकून झाकण उघडा. नंतर दुसरी बाजू २ मिनिटे शेकून गरम असतानाच मधून कापून सव्‍‌र्ह करा.

कॉफी लावा केक

साहित्य : २ चमचे एक्स्प्रेसो कॉफी, २ चमचे साखर, ५० ग्रॅम डार्क चॉकलेट, ३० ग्रॅम मदा, २ अंडी, ५० ग्रॅम बटर, अर्धा चमचा बेकिंग पावडर

कृती : प्रथम एका भांडय़ात कॉफी आणि साखर आणि अर्धा चमचा पाणी घेऊन व्हिस्कच्या साहाय्याने फेटून घ्यावे. मग चॉकलेट मेल्ट करून त्यात बटर मिसळावे. आता त्यात अंडी मिक्स करून फेटून घ्यावे. त्यात कॉफी मिक्स करून मदा आणि बेकिंग पावडर हलक्या हाताने मिक्स करावे. तयार मिश्रण छोटय़ा छोटय़ा मोल्डमध्ये टाकावे आणि १८०’ सेल्सियसला प्रीहीटेड ओव्हनमध्ये १२ मिनिटे ठेवावे. व्हॅनिला आइसक्रीम आणि कॉफी पावडर टाकून सव्‍‌र्ह करावे.

कॉफी कुकीज

साहित्य : मदा सव्वा कप, कॉर्नस्टार्च अर्धा कप, लोणी २०० ग्रॅम, पावडर शुगर पाऊण कप, कोको पावडर पाव कप, व्हॅनिला इसेन्स १ चमचा, इन्स्टंट कॉफी २ चमचे.

फिलिंगकरिता – व्हाइट बटर १ कप, मिल्क पावडर २ चमचे, रिफाइन्ड शुगर ३ कप, व्हॅनिला इसेन्स १ चमचा, लेमन इसेन्स १ चमचा, ऑरेंज मार्मालेड अर्धी वाटी, स्ट्रॉबेरी जॅम अर्धी वाटी.

कृती : ओव्हन १८० डिग्रीवर प्रीहीट करा. पाव कप पाणी घेऊन त्यात कॉफी पावडर घालून बाजूला ठेवा. नंतर एका बाऊलमध्ये लोणी, पावडर शुगर, व्हॅनीला इसेन्स घालून सॉफ्ट फेटून घ्या. त्यात मदा, कॉर्नस्टार्च, कोको पावडर घाला. यानंतर तयार केलेले कॉफी मिक्स घालून स्मूथ करा. हे मिश्रण पाइपिंग बॅगमध्ये भरून गुलाबाचे आकार काढा. याला १८० डिग्रीवर १२ ते १५ मिनिटे बेक करा.

फिलिंगकरिता – व्हाइट बटर, मिल्क पावडर, साखर, लेमन इसेन्स एकत्र करून छान फेटून घ्या. अशाच प्रकारे स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज क्रीमसुद्धा तयार करा. दोन कुकीजच्या मध्ये भरून पाच मिनिटे फ्रिजमध्ये थंड करून सव्‍‌र्ह करा.

फोम कॉफी (घरी तयार होणारी)

साहित्य : दूध २ कप, इन्स्टंट कॉफी ३ चमचे, साखर ३ चमचे, गरम पाणी २ चमचे.

कृती : सर्वप्रथम दूध गरम करत ठेवा. त्यामध्ये १ चमचा साखर घाला. एका कपात कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये दोन चमचे साखर घाला व ती साखर भिजेल एवढेच १ किंवा २ चमचे गरम पाणी घाला. नंतर एका चमच्याने खूप फिरवा. हळूहळू त्याचे घट्ट श्रीखंडासारखे फोम तयार होते. सव्‍‌र्ह करतेवेळी एक चमचा उरलेली कॉफी दुधात घालून त्यावर तयार फोम मिसळून सव्‍‌र्ह करा.

संकलन मितेश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:02 am

Web Title: coffee lava cakes recipe by chef yashodhan deshmukh
Next Stories
1 व्हिवा दिवा : पोर्णिमा बुद्धिवंत
2 नवविचारांचा श्रीगणेशा..
3 पाळीव प्राण्यांसाठीही सुरु झाली डबा सेवा
Just Now!
X