News Flash

डेनिमचा ‘कूल’ अवतार

उन्हाळा आणि डेनिम हे समीकरण अगदी आत्ताआत्तापर्यंत न जुळणाऱ्या गोष्टींपैकी एक होतं.

एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाळा. अशा कडक गरमीमध्ये नक्की काय घालावं हा प्रश्न नेहमीच पडतो. रोज रोज कॉटनचे ड्रेस घालणंही शक्य नसतं. आणि तेवढे कॉटनचे कपडेही कपाटात नसतात. अशावेळी वर्षभर साथ देणारी डेनिम कितीही त्रास झाला तरी हवीहवीशी वाटते. आणि नेमकं हेच हेरून यंदा अनेक लोकल आणि मोठय़ा ब्रॅन्डच्या समर कलेक्शनमध्ये ‘डेमिन फॅशन’चे ‘कूल’ अवतार पाहायला मिळतायेत. केवळ शॉप्समध्येच नव्हे तर अलिया भट्ट, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पदुकोण या बॉलीवुड ब्युटीजनीही हे कूल डेनिम अवतार आपलेसे केले आहेत. एरवी उबदारपणाचा आव आणणारी, जाड डेनिम अचानक उन्हाळ्यात कुठल्याही रूपात वापरावी एवढी कूल कशी झाली, हाच प्रश्न सध्या फॅ शनप्रेमींना सतावतो आहे.

उन्हाळा आणि डेनिम हे समीकरण अगदी आत्ताआत्तापर्यंत न जुळणाऱ्या गोष्टींपैकी एक होतं. मात्र सेलिब्रिटींच्या इन्स्टा अकाऊंटपासून ते मोठमोठय़ा ब्रँड्सच्या शॉप्सपर्यंत सगळीकडे डेनिम एके डेनिम दिसू लागले आहेत. डेनिमचा जाड कपडा आणि उन्हाळा या दोन विरोधी गोष्टींचं कोडं सोडवत फॅशन डिझाइनर्सनी हे समीकरण लोकप्रिय कसं बनवलं?, हा सहज पडणारा प्रश्न आहे. सध्या जे डेनिम ड्रेस खास उन्हाळ्यासाठी उपलब्ध झाले आहेत त्यामध्ये डेनिमचा कपडा वापरला गेलेला नाही, परंतु त्याचा लूक मात्र हुबेहूब डेनिमसारखाच दिसतो, असं फॅशन एक्स्पर्ट सांगतात. तुम्ही अनेकदा बाजारात जीन्स , एखादा डेनिमचा शर्ट किंवा कोणत्याही प्रकारचा डेनिमचे कपडे घेताना त्या गारमेंटचा कपडा पातळ आणि हलका लागतो. याच कारण म्हणजे ते खरेखुरे डेनिमचे कापड नसते. डेनिम सारखा लूक असणारा ‘कॅ म्ब्रिक’ किंवा ‘कॅम्बरे’  हे कापड त्यासाठी वापरलं जातं. तुम्ही या कपडय़ापासून बनवलेलं कोणतंही गारमेंट जर नीट जवळून निरखून बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये निळ्या दोऱ्यासोबत पांढरे दोरेही दिसतील. हे कापड साध्या विवमध्ये विणलेल असतं आणि त्यामुळेच हे अतिशय हलकं असत. डेनिमसारखं दिसणारं हे कापड उन्हाळ्यातील नवीन डेनिम आहे किंवा डेनिमला बेस्ट ऑप्शन आहे असं नक्कीच म्हणता येईल. या नव्या डेनिम अवताराचे कूल ऑप्शन्स मार्के टमध्ये आले आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या..

डेड डेनिम / रिप्ड (Ripped) लाईट डेनिम जीन्स

रोजच्या वापरातील पायाला घट्ट चिकटून बसणारी  जीन्स उन्हाळ्यात नकोच असते. पण आपण बाराही महिने ही जीन्स वापरतोच. त्यामुळे उन्हाळ्यातही कितीही त्रास झाला तरी बरीच लोक जीन्स घालतात. हेच हेरून ‘डेड डेनिम’ किंवा  रिप्ड – लाईट डेनिम जीन्स बाजारात आल्या आहेत. लेग फ्रेंडली अशा या जीन्स तुम्हाला कडक उन्हळ्यातही वापरता येतील. या जीन्स लूझ फिट असणाऱ्या, वॉशिंगसाठी सोप्या असणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे सहज घालता आणि काढता येणाऱ्या अशा आहेत. अशा जीन्सवरती तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट, लूझ फिटिंग शर्ट, पेस्टल रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट , टॉप्स घालू शकता.

ट्विस्टेड डेनिम्स शर्ट : डेनिम म्हटलं की जीन्ससारखं शर्ट हा आलाच.  मुलं आणि मुली अशा दोघांच्या फॅशनमध्ये हा डेनिम शर्ट मस्ट असतो. नव्वदच्या दशकातील रेट्रो फॅशनची आठवण करून देणारा हा ट्विस्टेड डेनिम्स शर्ट टेपर्ड ब्लॅक जेगिन्स आणि क्लासिक कॅज्युअल ट्रेनर्ससोबत घालू शकता. या शर्टची हेमलाईनही सेम नाही त्यामुळे नेहमीच्या शर्टपेक्षा नक्कीच हटके लूक तुम्हाला मिळतो. या शर्टचा वापर तुम्ही एखाद्या प्लेन रंगाच्या टी-शर्ट वरती जॅकेट म्हणूनही नक्कीच करू शकता.

डेनिम डंग्री :  फॅशन विश्वातील चक्रात पुन्हा फिरून डेनिम डंग्री नेहमी फॅशनमध्ये येतेच. या डंग्रीचा वापर तुम्ही सुट्टीमध्ये फिरायला जाताना नक्कीच करू शकता. तुम्ही तुमच्या कम्फर्टप्रमाणे  कोणत्याही फिटेड टॉप किंवा आता जास्त ट्रेडिंग असणारा क्रॅप टॉप डेनिम डंग्री सोबत घालू शकता. तुमच्या  डेनिम डंग्रीचा आणि तुमच्या टॉपच्या रंगसंगतीचा एकदा मेळ बसला की तुम्हाला मस्त समर लूक मिळेल.

लाइट डेनिम स्कर्ट/ क्लासिक डेनिम स्कर्ट :

टिपिकल कॉटनचे किंवा पॉलिएस्टरचे स्कर्ट घालण्यापेक्षा आता ट्रेंडमध्ये आलेले डेनिमचे स्कर्ट नक्की घालून बघा. वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगामध्ये आलेले हे स्कर्ट म्हणजे एक क्लासिक ऑप्शन आहे. हे स्कर्ट डेनिमच्या वेगवेगळ्या शेडमधेही उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही यावर कोणत्याही रंगाचा टॉप ट्राय करू शकता. साधा टी-शर्ट आणि डेनिम स्कर्ट आणि त्याखाली फुटवेअरमध्ये ट्रेडिंग असणारे पांढरे शूज घालून बघा.

वनपीस : गेल्या एक दोन वर्षांत मुली उन्हळ्यात सर्रास वन पीस घालतात. आणि हीच बदलती ग्राहकांची मागणी बघून आणि डेनिम विषयीचं प्रेम जाणून अनेक ब्रॅंडने डेनिम वनपीस बाजारात आणले आहेत. पार्टीपासून ते फिरायला जायला अगदी रोजच्या वापरातही आपण हे वनपीस सहज वापरू शकतो. वेगवेगळे वॉश दिलेले हे वनपीस खूप सुंदर दिसतात. वेगवेगळे वॉश, सिल्हाऊट्स, रंगांच्या शेड, थोडी एम्ब्रॉएड्री, नवनवीन नेकलाईन अशा सगळ्या गोष्टींनी सजलेले वनपीस तुमच्या समर कलेक्शनमध्ये असायलाच हवेत.

याशिवाय, ट्रेंडी फॅशनबरोबरच मसाबा गुप्तसारख्या फॅशन डिझाइनरने एथनिक फॅ शनमध्येही डेनिमचा अप्रतिम वापर करून घेतला आहे. एथनिक डेनिम ड्रेस परिधान करून सजलेल्या अलिया भट्टचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे डेनिम म्हणजे जीन्स हा समजच आता मुळातून खोडायला हवा. हे सगळे ट्रेडिंग फॅशन कलेक्शन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, लाइमरोड, मंत्रा  अशा मोठय़ा ऑनलाईन  शॉपिंग फॅशन साईट पासून ते छोटय़ा लोकल बाजारातील दुकानात, स्ट्रीट शॉपवरही सहज उपलब्ध झाले आहेत, यावरूनच या बदललेल्या ‘कूल’ डेनिमचा फॅशन महिमा तुमच्या ध्यानात आला असेलच!

डेनिम जॅकेट्स

आपण कितीही कोणत्याही प्रकारचे जॅकेट्स वापरले तरी डेनिम जॅकेट्सला तोड नाही. साध्या टी-शर्ट आणि बॉट्टम्सवरती हे डेनिम जॅकेट्स घातले की झालं आपलं काम. कारण साध्याशा त्या जॅकेट्समुळे तुम्हाला हटके आणि स्टायलिश लूक मिळतो. कदाचित याच डेनिम जॅकेट्सची प्रसिद्धी बघता मासाबा गुप्ता या नामंकित फॅशन डिझाइनरने स्पेशल डेनिम  जॅकेट्स बाजारात आणले आहेत. हे इझी टू वेअर आणि सॉफ्ट, हलके जॅकेट्स तुम्ही प्लेन टॉप आणि जीन्ससोबत पेअरअप करू शकता. हा लूक तुम्ही कॉलेजपासून ते बाहेर ऑऊ टिंगला जातानाही वापरू शकता.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:10 am

Web Title: cool denim look fashion trend
Next Stories
1 ‘तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जास्त आहे..’
2 ‘बुक’ वॉल
3 ‘जग’ते रहो : अमाप निसर्गसौंदर्य आणि इतिहासाच्या पाऊलखुणा
Just Now!
X