News Flash

‘सुशी’याना..

या फेस्टिव्हलमध्ये मिसो सूप, डोरायाकी, क्रीम पफ, याकीतोरी आणि सुशी आदी प्रसिद्ध जपानी पदार्थ ठेवण्यात आले होते.

यंदा कुल जपान फेस्टिव्हलचे सहावे वर्ष होते. लोअर परेलच्या स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये दिमाखात पार पडलेल्या फेस्टिव्हलमध्ये केवळ तिथले खाद्यपदार्थच नव्हे तर अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. या कुल जपान फेस्टिव्हलमध्ये जपानी संस्कृती, त्यांच्या निरनिराळ्या वस्तू, बोन्साय या सगळ्याचे प्रदर्शन होते. पण, सगळ्याचं खरं आकर्षण होतं ते म्हणजे जपानी खाद्यपदार्थ.

कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशात असलेल्या नानाविध संस्कृतींवरून लक्षात येते. संस्कृती अनेक प्रकारच्या असतात, त्यातलीच एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे ‘खाद्यसंस्कृती’. अन्न हे केवळ उदरभरण नसून ते एक यज्ञकर्म आहे म्हटलं जातं आणि कुठल्याही देशाची खाद्यसंस्कृती याला अपवाद नाही. त्यामुळे त्या त्या देशांचे खाद्यपदार्थ चवीचे असतील तर ते जगभरात सर्वदूर पोहोचतात. आपला देश जसा नानाविध खाद्यसंस्कृतीसाठी जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे जपान देशातील खाद्यसंस्कृतीदेखील तितकीच प्रसिद्ध, चविष्ट आणि खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारी आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे त्यामुळे सातासमुद्रापार मिळणारे पदार्थ इथे ‘लोकल’ कधी, कसे होतात हे कळतही नाही. चायनीज पदार्थ अगदी मोमोजही इथे हातगाडय़ांवर मिळायला लागलेत. सध्या तसेच काही जपानी पदार्थ आपल्याकडे लोकप्रिय होतायेत. त्यात ‘सुशी’चा वाटा फार मोठा आहे. सध्या तरी मोठमोठाल्या रेस्तराँमध्ये ठाण मांडून बसलेली ही सुशी आणि इतर जपानी पदार्थ नेमके काय आहेत हे समजून घेण्याची संधी ‘कुल जपान फेस्टिव्हल’मधून मिळाली.

यंदा ‘कुल जपान फेस्टिव्हल’चे सहावे वर्ष होते. लोअर परेलच्या स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये दिमाखात पार पडलेल्या फेस्टिव्हलमध्ये केवळ तिथले खाद्यपदार्थच नव्हे तर अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. या ‘कुल जपान फेस्टिव्हल’मध्ये जपानी संस्कृती, त्यांच्या निरनिराळ्या वस्तू, बोन्साय या सगळ्याचे प्रदर्शन होते. पण, सगळ्याचं खरं आकर्षण होतं ते म्हणजे जपानी खाद्यपदार्थ. यात तेथे नाश्त्यापासून जेवणानंतरच्या डेझर्टपर्यंत खाल्ले जाणारे मोजकेच पदार्थ ठेवण्यात आले होते. याबद्दल सांगताना जपानी पदार्थविभागाचे प्रमुख हॅरी चेंग म्हणतात, ‘खरंतर जपानी पदार्थ हे जगातील सगळ्यात पौष्टिक पदार्थापैकी एक आहेत. जपानी लोकांचा जगण्याचा कालखंड हा इतर देशांतील लोकांपेक्षा अधिक आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जपान देशातील आहार, इथले अन्नपदार्थ बनवण्याची पद्धत. त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे जपानी लोक अन्न जास्त शिजवत नाहीत त्यामुळे त्यातील अत्यावश्यक गुण तसेच राहतात आणि आहारातूनच ते शरीराला मिळतात. या फेस्टिव्हलमध्ये मिसो सूप, डोरायाकी, क्रीम पफ, याकीतोरी आणि सुशी आदी प्रसिद्ध जपानी पदार्थ ठेवण्यात आले होते. यानिमित्ताने, या जपानी पदार्थाची ही तोंडओळख..

जपानी पदार्थासाठी फक्त फेस्टिव्हलवरच अवलंबून राहण्याची गरज नाही. हे पदार्थ सध्या आपल्याकडे वेगवेगळ्या हॉटेल-रेस्तराँमधून मिळतात. त्याविषयी माहिती देताना या फेस्टिव्हलच्या ‘फूड डिपार्टमेंट’चे अनुज जोधानी यांनी जपानी पदार्थ हे महाग आहेत असा अनेकांचा गैरसमज असल्याने लोक चटकन त्याकडे वळत नाहीत, असं सांगितलं. फेस्टिव्हलमध्येही हे पदार्थ नाममात्र किमतीत होते, मात्र बाहेरही जपानी पदार्थ अगदी ५० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त अशा विविध किमतीत उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या फेस्टिव्हलमुळे जपानमधील नेहमीच्या पदार्थाची पूर्ण नाही तरी तोंडओळख आपल्याला झाली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सुशी किंवा याकीतोरी असे पदार्थ मिळत असतील तर खवय्यांना थोडासा ‘सुशी’याना.. व्हायला काहीच हरकत नाही!

मिसो सूप

हे सूप जपानमधील प्राचीन पदार्थ आहे, जो जपानमध्ये रोजचा नाश्ता आणि जेवणात असतोच असतो. हे मिसो सूप ‘दाशी’ (सुकवलेले छोटे मासे ज्यांना निबोशी म्हणतात) आणि मिसो पेस्ट यापासून बनवले जाते.

याकीतोरी

याकीतोरी म्हणजे ग्रिल्ड चिकन. ‘ग्रिल्ड चिकन’ करताना चिकनच्या आत पेरीयाकी सॉस घालून नंतर ते शिजवलं जातं. हे याकीतोरी भात, म्हणजेच जपानी राईसबरोबर सव्‍‌र्ह केलं जातं.

डोरायाकी

हा पदार्थ जपानी पॅनकेक म्हणून ओळखला जातो. यामध्ये जपानी ब्रेडमध्ये आंको नावाचा पदार्थ घालून ते शिजवलं जातं. हे आंको म्हणजे जपानी लाल बियांची पेस्ट असते आणि शिजवल्यानंतर हे डोरायाकी पॅनकेकसारखे दिसतात.

क्रीम पफ

क्रीम पफ हे खरंतर डेझर्टची भूमिका पार पाडतं. हे पफ प्रसिद्ध जपानी ब्रॅड बिअर्ड पापा यांच्याकडून बनवून घेतलं जातं. यात पफमध्ये स्पेशल चीज क्रीम घातलं जातं आणि मग नंतर ते सव्‍‌र्ह करतात.

सुशी

सुशी हा जगप्रसिद्ध जपानी पदार्थ आहे. खरंतर सुशी म्हणजे सुकवलेले मासे असा गैरसमज आहे. परंतु सुशी हे मासे नसून तो जपानी भाताचा एक प्रकार आहे. जपानी भात हा खरंतर चिकट आणि घट्ट अशा प्रकारचा असतो व शिजवल्यामुळे भाताची ती छोटी छोटी शितं एकमेकांना अजूनच चिकटतात. या भातामध्ये सुशी व्हिनेगर टाकलं जातं व तो भात मग सुशी भात (सुशी राईस) होतो.

हे सुशी राईस आणि ‘नोरी’ म्हणजेच जपानमधील सी वीड (सुकवलेली समुद्री वनस्पती) एकत्र केले जातात. त्यानंतर त्यात आपल्याला हवा तो पदार्थ, म्हणजे व्हेज किंवा नॉनव्हेज यातील काहीही घालून ते नंतर शिजवलं जातं आणि मग त्याचा रोल करून ते आठ तुकडय़ांमध्ये विभागून सव्‍‌र्ह केलं जातं. सगळ्यात प्रसिद्ध सुशी म्हणजे ‘प्रॉन टेमपुरा’.

असा हा सुशी पदार्थ नंतर तीन पदार्थाबरोबर सव्‍‌र्ह केला जातो. त्यातील पहिला म्हणजे ‘गारी’. हे गारी आपल्याला प्रत्येक सुशीनंतर माऊथ रिफ्रेशिंगची भूमिका बजावतं. त्यामुळे प्रत्येक सुशीची चव आपण अगदी नव्याने उपभोगू शकतो. दुसरा पदार्थ म्हणजे ‘वासाबी’. हा पदार्थ चटणीप्रमाणेच असतो. वासाबी खरंतर एक जपानी मुळी आहे जी अत्यंत जहाल आणि उष्ण असल्याने सुशीबरोबर ती फक्त चवीपुरतीच वापरली जाते. आणि सुशीबरोबर सोया सॉसदेखील सव्‍‌र्ह केला जातो ज्यामुळे सुशी अधिकच चविष्ट लागते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:33 am

Web Title: cool japan festival in lower parel street phoenix mall japanese food japanese cuisine
Next Stories
1 कपडेही ‘ओएलएक्स’ होतात तेव्हा..
2 ‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..
3 कल्लाकार : ‘चल’नी नाणं..
Just Now!
X