05 March 2021

News Flash

व्हायरलची साथ : सीमोल्लंघन असंही आणि तसंही..

आम्ही अगदीच अहिंसावादी. दंतवैैद्यक अर्थात डेंटिस्टकडे असणाऱ्या ड्रिल मशीनलाही आम्ही घाबरतो.

देवीपेक्षाही मार्केटिंगचे गिमिक असलेल्या नऊ रंगांचा सण अशी ओळख झालेल्या नवरात्रीचा अंतिम टप्पा म्हणजे दसरा. सीमोल्लंघनचा दिवस. बऱ्याच कालावधीनंतर सीमोल्लंघनाच्या कालावधीत आपण प्रत्यक्ष सीमेविषयी जागरूक झालो आहोत; पण आपल्या विचारांची सीमा खुंटलेय का?

आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण? असा प्रश्न चारचौघात विचारला तर शंभरापैकी ९५ माणसं पाकिस्तान म्हणतील. तीन माणसं चीन म्हणतील. एक बांगलादेश म्हणेल आणि उरलेल्या एकाला आपले यच्चयावत शत्रू समान घातक वाटतील. आम्हाला मात्र वेगळ्याच शत्रुविचाराने पछाडलंय. ब्रॅण्डिंगच्या नियमांनुसार कोणालाही निनावी ठेवू नये. गोंडस नाव किंवा संज्ञा देणं आवश्यक. छान सुवासाच्या फुलांची शास्त्रीय नावं कशी कठीण असतात. तसं या विचाराचं नामकरण केलंय- स्वयंघोषित स्वकीय शत्रुआघाडी. हा विचार समजून घेण्यासाठी आम्हाला विचारांची दोन कालखंडांत विभागणी करणे भाग पडले. इसवीसन आणि इसवीसनपूर्व असतं अगदी तस्संच. सर्जिकल अटॅकपूर्व आणि सर्जिकल अटॅकपश्चात.

आम्ही अगदीच अहिंसावादी. दंतवैैद्यक अर्थात डेंटिस्टकडे असणाऱ्या ड्रिल मशीनलाही आम्ही घाबरतो. ‘मिशन रुटकॅनल’ अंतर्गत दातावर आक्रमण करणारं ते मशीन, सू सू असा त्याचा ध्वनी कानात साकळला आहे. शत्रुआघाडीची कार्यपद्धती मोठी रंजक. स्वत:च्या मतदारसंघात नदीचा नाला, नाल्यात बिल्डिंग, वाळू-रेती उपशासाठी खारफुटींची कत्तल, दगडखाणींसाठी डोंगर उजाड, अगणित बेकायदा बांधकामं अशा गाळीव इतिहास-भूगोलाची पाश्र्वभूमी असणारे बाह्य़ा सरसावून सर्जिकल अटॅकवर बोलतात. बांगलादेशापलीकडची आपली सात राज्यं आणि त्यांच्या राजधान्या सांगता न येणारे पाकव्याप्त काश्मीरच्या टोपोग्राफीविषयी सांगतात. सातवी ‘ड’मध्ये नकाशात सुदान प्रदेशाला विषुववृत्तीय प्रदेश दाखवणारे आपल्या अक्षांश-रेखांशाविषयी अधिकारवाणीने वदतात. हे पाहिल्यावर आमचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होतो. ढेभळी पिंपळगावची वेस गेल्या दशकभरात ज्यांनी ओलांडली नाही ते आपण पाकिस्तानशी युद्ध करायला हवेच, अशी भूमिका मांडतात. त्या वेळी समष्टीचा विचार कसा करतात हे आमच्या ध्यानी येते. वाघा बॉर्डरवरची परेड सोहळा वगळता आपला सीमेशी काही संबंध नाही. दिवाणखान्यातली डास मारायची चायनीज रॅकेट एवढीच आपली शस्त्रओळख. नैसर्गिक वायुविजनची सोय नसल्याने काचेची आवरणं असलेल्या बिल्डिंग आणि पर्यावरणद्रोही एसीमध्ये सुशेगात मशीनच्या कॉफीचे घोट रिचवत संवेदनशील सीमाभागावर चर्चा रंगते.

लष्कर म्हणजे फक्त युद्ध नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, लॉजिस्टिक आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक कंगोरे असतात. या सगळ्याच्या शास्त्रोक्त अभ्यासाला सामरिकशास्त्र म्हणतात. सर्जिकल अटॅकवर अहमहमिकेने चर्चा करणाऱ्यांना या शास्त्राचा पत्ता नाही. हा पाकशास्त्राचा भाग आहे असाही अनेकांचा समज आहे. सर्जिकल अटॅक म्हणजे काय हे आतापर्यंत तुम्हाला वाचून, पाहून आणि ऐकून समजलं असेल. तो आता झाला की नाही, त्याचे पुरावे, यूपीए सरकारच्या काळात झाला की नाही यावर बोलण्यास आपण सामरिकतज्ज्ञ नाही; पण यानिमित्ताने अनेकांचे अज्ञान उघडे झाले आहे. असं म्हणतात मूर्खपणा सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते, काही जण त्यातही घाई करतात. अनेक घाईवीर तुम्ही गेल्या दोन आठवडय़ांत अनुभवले असाल; पण यानिमित्ताने आपणच आपली माहिती खुली करतोय. अटॅकसाठी कशी तयारी होते, पॅरासैनिकांचे विशेष प्रशिक्षण कसे असते, आपली मोक्याची ठाणी कुठली आहेत, शस्त्रास्त्रं, डावपेच याविषयी अतिउत्साहात ग्राफिक्सद्वारे माहिती दिली जातेय. कसं आहे- सीमेपलीकडच्या शत्रूला आपली गोपनीय माहिती हवीच आहे. आपल्या माध्यमातून ही माहिती आयती त्यांच्या हातात पडतेय, कारण गुगल त्यांचाही मित्र आहे. सोशल मीडिया तेही वापरतात. आपल्याद्वारे व्हायरल होणाऱ्या गोष्टींतून देशाचं नुकसान होईल असा डेटा जनरेट होतोय का याचं भान बाळगायलाच हवं. शोधपत्रकारिता म्हणून ‘ऑपरेशन जिंजर’चा तपशील उकरण्यात आलाय. भारतीय लष्कराची ही गुप्त योजना होती. गौरवास्पद असली तरी त्याचा तपशील सामान्य माणसापर्यंत पोहोचायला हवा अशी आवश्यकता नाही. काही गोष्टी गोपनीय राहणं देशहिताचं असतं.

देशासाठी ज्यांनी जीव गमावला त्यांच्या घरच्यांचं नुकसान भरून न येणारं आहे. ज्यांनी सर्जिकल अटॅक केला त्यांनीही जीव पणाला लावला. दोन आठवडय़ांनंतरही पोकळ वाग्युद्ध, चटपटीत न्यूजफीड, हटके हॅशटॅगद्वारे सर्जिकल अटॅक धुमसतोय. हा आठवडा सीमोल्लंघनाचा. लष्कराने सीमेवरच्या शत्रूला चीतपट करून कृतिशीलता सिद्ध केली आहे. युद्ध आपला प्रांत नाही; पण संकुचित, पूर्वग्रहदूषित आणि प्रसिद्धीसाठी सवंग मार्ग अवलंबणाऱ्या विचारांचा नायनाट करून निकोप दृष्टिकोन अंगीकारणं हे सीमोल्लंघन स्वागतार्ह. पक्ष, गट, तट, विचारधारा, इझम, आयडियालॉजी, बायस, नोशन्स यापेक्षाही देश महत्त्वाचा. सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे आपणही सजग राहायलाच हवं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 5:44 am

Web Title: cross border issues and disputes
Next Stories
1 शिडशिडीत की फिट?
2 खाबूगिरी : इति मत्स्यपुराणे..
3 खाऊच्या शोधकथा : लॉलीपॉप
Just Now!
X