अवंती देशपांडे, डॅलस, यूएसए

डॅलसच्या खाद्यसंस्कृतीवर मेक्सिकोचा प्रभाव जाणवतो. टेक्स-मेक्सअसे अमेरिकन आणि मेक्सिकन क्युझिनचे मिश्रण इथेच नव्हे तर पूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध आहे. डॅलसमध्ये भारतीय आणि आशियाई लोकांची संख्या वर्षांगणिक वाढत चालली आहे. त्यामुळे इथे जागोजागी भारतीय रेस्तराँ पाहायला मिळतात. अगदी पाणीपुरीचे स्टॉलही इथे आहेत.

ह्य़ुस्टन, ऑस्टिन, सॅन अँटनियो आणि डॅलस ही चार मोठी शहरं टेक्सास राज्यातील महत्त्वाची शहरं आहेत. डॅलस हे इतर मोठय़ा शहरांच्या मानाने नवीन शहर असल्याने इथले बांधकाम आणि नियोजन आधुनिक पद्धतीचं आहे. प्रशस्त चार-पाच पदरी रस्ते, मोठाले महामार्ग, उड्डाणपूल आणि मॉडर्न आर्किटेक्चर असलेल्या इमारती असं चित्र इथे दिसतं. इथला एअरपोर्ट अमेरिकेतील सगळ्यात मोठय़ा आणि बिझी एअरपोर्टपैकी एक आहे. डॅलसचा डाऊ नटाऊ न खूपच प्रेक्षणीय आहे. डाऊ नटाऊ नची स्कायलाइन म्हटल्यावर डोळ्यांसमोर ‘मार्गारेट हंट ब्रिज’ येतो. हा ब्रिज आणि ‘रियुनियन रिव्हॉल्व्हिंग टॉवर’ हे डॅलसचे लॅण्डमार्क्‍स आहेत. ‘रियुनियन टॉवर’चा वरचा मजला ३६० अंशात फिरतो. तिथे ‘वुल्फगँग पक, ५६०’ हे आगळंवेगळं डायनिंग रेस्तराँ आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या डॅलसमध्ये ज्या ठिकाणी झाली, तिथे त्यांचं स्मारक म्हणून सहामजली संग्रहालय बांधण्यात आलं आहे.

आधुनिक डॅलसमध्ये कधीकधी निसर्गरम्य ठिकाणांची कमतरता नक्की भासते. आम्ही मुंबईचे असल्याने समुद्रकिनाऱ्याची इथे हटकून आठवण येते. ही उणीव कधीकधी इथल्या कृत्रिम तलाव, बॉटनिकल गार्डन्समुळे पूर्ण होते. वसंत ऋतूमध्ये रस्त्याच्या कडेकडेला टेक्सास राज्याचे फूल म्हणून मान असणाऱ्या ‘ब्लूबॉनेट’चे निळेशार गालिचे पाहायला मिळतात. एकंदरीत टेक्सासचं हवामान साधारण गरम आहे.

डॅलस शेजारच्या फोर्टओर्थला डॅलसच्या मानानं थोडी ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभली आहे. या शहराने आपली काऊ बॉय संस्कृती अजूनही जपली आहे. टेक्सासचा इतिहास तसा खूप प्रसिद्ध आहे. टेक्सास पूर्वी मेक्सिकोचा भाग होता. अमेरिकेने तो मेक्सिकोकडून विकत घेतला. त्यामुळे टेक्सियन आणि मॅक्सिकन अशा दोन्ही संस्कृतींचा अनोखा मेळ इथे अनुभवायला मिळतो.  डॅलसच्या खाद्यसंस्कृतीवर मेक्सिकोचा प्रभाव जाणवतो. ‘टेक्स-मेक्स’ असे अमेरिकन आणि मेक्सिकन क्युझिनचे मिश्रण इथेच नव्हे तर पूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध आहे. डॅलसमध्ये भारतीय आणि आशियाई लोकांची संख्या वर्षांगणिक वाढत चालली आहे. त्यामुळे इथे जागोजागी भारतीय रेस्तराँ पाहायला मिळतात. अगदी पाणीपुरीचे स्टॉलही इथे आहेत. ‘टेक्स-मेक्स’ क्युझीनमधले बरेच पदार्थ आवडते आहेत. विशेषत: अ‍ॅव्होकॅडोपासून बनवलेला ‘ग्वाकमोली’ हा पदार्थ खूप जास्त आवडतो. इथली खासियत म्हणते ‘चिप अँण्ड डिप’. वेगवेगळ्या चिप्सबरोबर नाना प्रकारचे डिप्स बनवता येतात. त्यात ‘ग्वाकमोली’ सगळ्यात आवडता. चिप्सबरोबर किंवा नुसताही खायला आवडतो. ‘फहीताझ’ हाही इथला एक आवडता खाद्य प्रकार आहे. कांदा, ब्रोकोली, झुकीनी, मश्रूम अशा भाज्या परतवलेल्या असतात, त्यासोबत मेक्सिकन राइस, ब्लॅक बीन्स, क्रीम, चीज आणि ग्वाकमोली असं एकत्र सव्‍‌र्ह केलं जातं. असा एक फहीताझ हे एक वेळचं जेवणच असतं. इथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ‘टेक्सास स्टेट फेअर’ होते. त्यात मिळणारे टेक्सन फ्राइड फूड तरुणाईला आवडतं. त्यात फ्राइड आइस्क्रीम, फ्राइड ओकरा (भेंडी), फ्राइड डिल (बडीशेप) पिकल हे खूप प्रसिद्ध आहेत. फेनेल केक हाही खूप आवडता खाद्य प्रकार आहे. बहुसंख्य लोक मांसाहारी असून चीजबर्गर कां स्टेक किंवा बेकन नॉचो चिप्स खूप लोकप्रिय आहेत.

डॅलसमधली ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’ आणि अर्लिग्टनमधली ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’ या दोन प्रमुख युनिव्हर्सिटी आहेत. त्यात भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप आहे. आम्हीही इथे शिकलो आणि स्थायिक झालो. भरपूर जागा आणि सोयीसुविधा उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांत मोठय़ा इंडस्ट्रीज आपल्या मुख्य कार्यालयाचं स्थलांतर इथे करत आहेत. त्यामुळे सध्या इथे मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. सार्वजनिक वाहतूक नसणं ही डॅलसमधली एक वाईट बाजू आहे. सार्वजनिक वाहतुकीमुळे घातपात आणि चोऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं, या भीतीने सार्वजनिक वाहतुकीचा प्रस्ताव हा सतत अमान्य केला जातो. इथल्या तरुणाईचा शिक्षणाकडे अधिक कल आहे. युनिव्हर्सिटीमध्ये असताना मी अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची टय़ुटर होते. त्यांचा अभ्यासातला रस बघून शिकवायला आणखीन उत्साह वाटायचा. अभ्यासाखेरीज मुलांना स्पोर्ट्स आणि म्युझिकची आवड दिसते. मेडिकल आणि इंजिनीअरिंगखेरीज इतरही कोर्सेस ते करतात. त्यापैकी नर्सिगचा कोर्स लोकप्रिय आहे. इथे नर्सिगचं चित्र आपल्यापेक्षा किती तरी पटीनं वेगळं आहे. नर्सिग हे एक प्रतिष्ठित काम मानलं जातं. सध्या इथे ऑरगॅनिक फार्मिगचा ट्रेण्ड आहे. दर शनिवारच्या लोकल फार्मर्स मार्केटमध्ये कित्येक तरुण स्वत: पिकवलेल्या भाज्या विकतात. डॅलसमध्ये आम्ही दोन वर्षे राहत आहोत. सुरुवातीला विद्यार्थी असताना बऱ्याच गोष्टी नवीन आणि गमतीदार वाटल्या. लोकांच्या भाषेचा वेगळ्या पद्धतीचा हेल आहे. माणसं खूप फ्रेंडली आहेत. माझे पती ओमकार गायक-संगीतकार आहेत आणि मला फोटोग्राफी आवडते. आम्हा दोघांनाही इथे आपापले छंद जोपासायला वाव मिळाला. इथलं मराठी मंडळ हे खूप अ‍ॅक्टिव्ह मंडळ आहे आणि मराठीपण जपून आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे (इटट) दर दोन वर्षांनी होणारं अधिवेशन २०१९ मध्ये डॅलसला होणार आहे आणि त्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहात आहोत.

मी शिकत असताना युनिव्हर्सिटीचे काही कोर्सेस डॅलस डाऊनटाऊनमध्ये असायचे. तिथे जायला साधारणपणे दोन तास लागायचे. मी नुकतीच आले होते आणि मला ड्रायव्हिंग येत नव्हतं. त्यामुळे आधी कॅ बने स्टेशनला जायचं, मग ट्रेनने डॅलस डाऊनटाऊनला. तिथे उतरून दोन ट्रेन्स बदलून २० मिनिटे चालून आमच्या बिल्डिंगमध्ये पोहोचायचे. हे क्लासेस संध्याकाळचे होते आणि ते संपल्यावर पुन्हा तसाच प्रवास करत युनिव्हर्सिटीत परतायचे. एकदा मला स्टेशनला जायला उशीर झाला. माझ्याकडे तिकीट काढण्याइतपत वेळ नव्हता. त्यामुळं द्विधा मन:स्थितीत ट्रेनमध्ये चढले. त्या दिवशी परीक्षा होती आणि क्लास चुकवणं शक्यच नव्हतं. ट्रेन सुरू झाली. नेमकं त्याच दिवशी तिकिटांचं मॅन्युअल चेकिंग सुरू होतं. आता आपल्याला ट्रेनमधून पुढच्या स्टेशनला उतरवणार, तिकीट काढायला सांगणार, दंड भरायला लागणार, परीक्षेला उशीर होणार.. अशा विचारांचा गोंधळ उडाला होता. माझ्या बाजूच्या एका वयस्कर व्यक्तीने विचारलंही की, ‘यू लूक वरीड. इज ऑल ओके ?’ डॅलसमधली माणसं फ्रेंडली आहेत आणि लगेच संवाद साधतात. एरवी मी ‘ऑल गुड’ असं उत्तर दिलं असतं; पण त्यांनी असं एकदम विचारल्यावर मी माझी अडचण सांगितली. त्या माणसाने काही न बोलता त्याचा पास मला दिला. म्हणाला, ‘‘माझं स्टेशन आलंय आणि माझा आजचा प्रवास संपलाय. मला हा पास नाही लागणार.. तू तो घे.’’ मला काय बोलावं ते कळलंच नाही. फक्त मनापासून त्याचे आभार मानले. जणू देवच धावून आला. पुढे आमची मैत्री झाली. त्याआधी ट्रेनमधली फ्रेंडशिप फक्त मुंबईतमध्येच होतात, असं मला वाटायचं.

फिटनेसविषयी फक्त डॅलसमध्येच नाही तर संपूर्ण यूएसमध्ये जागरूकता आहे. तरीही इथे लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे. जंकफूड आणि अयोग्य जीवनशैली त्यासाठी कारणीभूत आहे. फ्राइड फूड खाण्याकडे जास्त कल असल्याने प्रत्येक जेवणात चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स असतेच.  इथे भरपूर जिम्स, फिटनेस क्लब्ज, स्टुडिओज आहेत. फुटबॉल हा अमेरिकनांचा प्रमुख खेळ आहे. त्यात ‘डॅलस काऊ बॉईज’ ही टीम प्रसिद्ध आहे. बेसबॉल खेळणारी ‘टेक्सास रेंजर्स’ ही नॅशनल टीम आहे. या खेळांसाठी दोन मोठी स्टेडिअम्स डलास-फोर्थओर्थमध्ये आहेत. मॅच बघणं हा इथल्या लोकांचा आवडता विरंगुळा आहे. हे शहर आधुनिक असलं तरीही माणसं तशी बऱ्याच प्रमाणात परंपरावादी आहेत. डॅलस देशाच्या बायबल बेल्टमध्ये येतं. इथे फॅमिली व्हॅल्यूजना आणि चर्चमध्ये जाण्याला तितकंच महत्त्व आहे. पर्यावरणस्नेह हा केवळ एक ट्रेंड नसून इथल्या लोकांच्या आयुष्याचा एक भाग आहे. रिसायकलिंगचा कचरा वेगळा करून प्रोसेस करणं, उन्हाळ्यात ‘पाणी वाचवा’ योजनासारख्या बऱ्याच योजना राबवण्यात येतात. घर किंवा ऑफिसजवळ स्टोअर्स, रेस्तराँ असतील तरी ते अजिबात जवळ नाहीत. प्रत्येक कामासाठी ड्राइव्ह करावं लागतं. त्यामुळे कारपूलला महत्त्व आहे. त्यासाठी इथल्या फ्रीवेवर कारपूल लेन्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये न अडकता जाता येतं. इथल्या राहणीमानाचा खर्च इतर ठिकाणांपेक्षा कमी आहे. युनिव्हर्सिटीची फीही कमी असल्याने इतर राज्यांतून विशेषत: कॅलिफोर्नियाहून स्थलांतर केलेले लोक इथे अधिकांश दिसतात. डॅलस शहरानं मला बरंच काही दिलं, बरंच काही शिकवलंय. डॅलस म्हटलं की घर असं समीकरण आहे. मी कॅ लिफोर्नियाला असताना हे जाणवायचं. माझं मास्टर्सचं शिक्षण, लग्न होऊ न सेटल होणं, या सगळ्या गोष्टींमुळे डॅलसबद्दल फार आपुलकी वाटते.

viva@expressindia.com