23 November 2017

News Flash

आऊट ऑफ फॅशन : गडद रंगांची गंमत!

डिझायनर्सवर गेल्या काही सीझन्सपासून या गडद रंगांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे.

मृणाल भगत | Updated: September 8, 2017 2:05 AM

अचानकपणे गेल्या काही सीझनपासून डिझायनर्स डार्क, अर्थी टोन्सच्या प्रेमात पडू लागले आहेत. एखाद वेळेस विंटर कलेक्शन्सचं निमित्त समजून घेता येऊ शकतं, पण समर कलेक्शन्समध्येही तेच. हे फक्त एका ट्रेंडचं निमित्त आहे की अजून काही ते शोधायचा एक प्रयत्न..

नुकताच प्रदर्शित झालेला ‘बरेली की बर्फी’ हा सिनेमा आणि त्यातील नायिकेची भूमिका आठवतेय? बरेलीसारख्या छोटय़ा गावातील विचारांनी मोकळी, बिनधास्त, नाचायची आवड असणारी, सिगरेट, दारू पिणाऱ्या एका तरुणीची व्यक्तिरेखा कीर्ती सनॉनने सिनेमात केली आहे. तिला आपले स्वतंत्र विचार आहेत, आपला जोडीदार कसा असावा याबद्दल तिची मतं आहेत. या सिनेमामध्ये तिच्या कपडय़ांबाबत, लुकबाबत केलेला एक महत्त्वाचा प्रयोग सिनेमामध्ये दिसून येतो. नायिका आणि त्यातही बबली व्यक्तिरेखा असली की ब्राइट, फ्लोरल आणि घेरेदार कपडे नायिकेला देण्याच्या परंपरेला इथे फाटा दिलेला आहे. ती कुर्ते आणि जीन्स वापरते. स्ट्रेट फिटचे, ऑफिसला जायला सोयीचे. रंग काहीसे गडद, अर्थी एथनिक प्रिंट्सचे. हे झालं एक उदाहरण. पण नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमध्ये गडद रंग प्रामुख्याने वापरले गेल्याचं दिसून येईल. एकूणच डिझायनर्सवर गेल्या काही सीझन्सपासून या गडद रंगांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे. रोजच्या वापरातील कपडेच नाही तर पार्टी लुकपासून ब्राइडल कलेक्शन्सपर्यंत सगळीकडे हा प्रभाव दिसून येतो. अचानकपणे मुलींनी ब्राइट रंगाचे कपडे घालणं कमी केलं असं तर काही नाही, ना बाजारात ब्राइट रंगाचे कपडे उपलब्ध नाहीत, त्याला मागणी नाही असंही नाही. तरीही या गडद रंगाच्या आकर्षणामागे काही वेगळीच कारणं नक्कीच आहेत.

मरून, नेव्ही, मेहंदी ग्रीन, बिस्कीट कलर, डार्क नारंगी, मस्टर्ड यल्लो, गडद पिंक, राखाडी, डार्क लाल हे रंग रस्टिक, अर्थी टोन्सच्या गटातील. त्यांच्या उबदार लुकमुळे एरवी वापरायला सोयीचे. हे रंग ब्राइट रंगाच्या तुलनेत तितकेसे नजरेत भरत नाहीत. त्यामुळे अशा कपडय़ांची इस्त्री खराब झाली किंवा थोडे जुनाट झाले तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे एरवी वापरायला हे रंग सोयीचे असतात. विशेषत: फॉर्मलमध्ये हे रंग आवर्जून वापरले जातात, याचं कारण म्हणजे तिथे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास उठून दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे ब्राइट रंगांचा भडकपणा नजरेत भरणं टाळलं जातं. या रस्टिक रंगांमध्ये व्यक्ती उंच, रुबाबदार दिसते. शक्यतो कोणत्याही स्किनटोन, देहयष्टीचं यांना बंधन नसतं. साहजिकच हे रंग फॉर्मल्समध्ये पसंत केले जातात.  मध्यंतरीच्या काळात डिझायनर्सवर भारतीय पारंपरिक कलेचा प्रचंड प्रभाव पडला होता. बाटीक, बांधणी, लेहरिया, कलमकारी, ब्लॉक प्रिंट या पद्धतीचा डिझायनर्सनी आपल्या कलेक्शन्समध्ये आवर्जून वापर केला होता. या प्रिंट्सचं वैशिष्टय़ म्हणजे कॉटन, सिल्क, खादी, मलमल अशा पारंपरिक कापडांवर ही रेखाटली जातात. तसंच त्यांच्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर होतो. साहजिकच त्यांना रस्टिक लुक मिळतो. गेल्या काही सीझन्समध्ये या पारंपरिक कला वेगवेगळ्या पद्धतीने सादर झाल्या आणि त्यामुळे रस्टिक रंगांचा वापरही तितकाच वाढला. यांच्यासोबतच जॉर्जेट, शिफॉनसारख्या कृत्रिम कापडांना फाटा देत खादी, कॉटन, मलमल या सुटसुटीत आणि आरामदायी कापडांचा वापर करण्याकडेही डिझायनर्सचा कल होता. या कापडांना डाय केल्यावर त्यावर शक्यतो काहीसे गडद रंगच मिळतात. त्यामुळेही या गडद रंगांचा वापर साहजिक होता.

ही आपसूक आलेली निमित्ते या गडद रंगांमध्ये होतीच. पण त्यासोबतच या रंगांचा संबंध बदलत्या मानसिकतेशीही जोडला गेला. गेल्या काही वर्षांपासून फेमिनिझम, स्त्री-पुरुष समान हक्क, काम करण्याचा समान अधिकार, व्यक्ती म्हणून समान ओळख असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचाही प्रभाव या रंगांच्या निवडीवर पडला आहे. रस्टिक रंग हे शक्यतो पुरुषी पेहरावात वापरले जात असत. स्त्रियांच्या पेहरावात ब्राइट, फेमिनाइन रंग. मधल्या काही वर्षांत पुरुषांच्या कपडय़ांमध्ये शिरू पाहणारे उजळ रंग आणि त्यांची मानसिकता याबद्दल आपण आधी बोललो आहोतच. तसाच काहीसा बदल स्त्रियांच्या पोशाखात झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आठवून पाहा, एकतर घरातला पुरुष सीमेवर युद्धात गुंतल्यामुळे आपसूक स्त्रियांवर बाहेर पडून काम करायची पाळी आली होती. त्यात त्यांच्याकडे नव्या पोशाखाला पैसे नाहीत म्हणून हातात पहिले आले ते पुरुषांचे पोशाख आणि त्यातील गडद रंग. पुढे तो काळच गडद रंगाच्या कपडय़ांनी गाजवला. असंच काहीसं आताही होतंय. फॉर्मल्समधील नियम, रस्टिक लुकमधील रुबाबदारपणा तरुणींना आकर्षित करतोय. या रंगांमधील सुटसुटीतपणा, सहजता त्यांच्या पसंतीस उतरते आहे. त्यामुळेही या रंगांच्या मागणीत भर पडते आहे. वेगवेगळ्या रंगांसोबत आपसूकपणे एकत्र येण्याच्या या रंगांच्या गुणधर्मामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्टायलिंग करता येतं. त्यामुळे पेहरावाचे पर्यायसुद्धा वाढतात. अर्थात एखादा ट्रेंड येण्यामागची कित्येक कारणं असू शकतात आणि तीच याची गंमत असते. रस्टिक ट्रेंडमागची ही गंमत कुतूहल वाढवणारी आहेच पण यामुळे कपडय़ांमध्ये नवे प्रयोग करायची चालनाही मिळतेच. कलमकारी ड्रेसला सिल्व्हर ऑक्सिडाइज दागिन्यांसोबत घालून मिळणारा ट्रायबल लुक. प्लॅन कॉटन कुर्ता आणि पलाझोचा एथनिक लुक. घेरेदार रस्टिक अनारकलीसोबत गोल्डन हात संपूर्ण किंवा इअरकफसारख्या हटके ज्वेलरीने पारंपरिक लुकला ट्विस्ट देता येतो. कॉटन शर्ट ड्रेसवर स्निकर्स घालून कॅज्युअल लुकला फन एलिमेंट देता येतो. असे कित्येक प्रयोग करायची संधी हे रंग देतात. लेअरिंगचे तर कितीतरी पर्याय खुले होतात. मग तुम्हीही या रंगांसोबत स्वत:चा एक प्रयोग करून बघा आणि आम्हाला सांगायला विसरू नका.

First Published on September 8, 2017 2:05 am

Web Title: dark colour tone fashion kriti sanon fashion bareilly ki barfi