News Flash

‘डेट’भेट अर्थात प्रेमाची अॅप्लिकेशन्स

टिंग टिंग टिडिंग.. स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन आलेलं असतं..

सोशल नेटवर्किंग साइट्सवरून भेट झाली. मग प्रत्यक्षात भेट, मग प्रेम आणि लग्न.. हे आता जुन्या जमान्यातलं वाटावं इतके बदल व्हच्र्युअल जगात झालेत. आपला स्मार्ट झालेला फोन प्रेमाचा सिलसिला आता राजरोसपणे करायला शिकवू लागलाय. ‘अॅप स्टोअर’वरची डेटिंग अॅप्सची वाढती संख्या हेच सांगते.
टिंग टिंग टिडिंग.. स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन आलेलं असतं.. ‘यू हॅव गॉट अ न्यू मॅच’ किंवा मग ‘राईट स्वाइप’चा सिग्नल.. हे कोणत्याही मेसेज अॅपच नोटिफिकेशन नाही तर हे आहे डेटिंग अॅप्सच नोटिफिकेशन! हे पाहिल्यावर अनेकांची कळी खुलल्याशिवाय राहात नाही. प्रेमाचा सिलसिला आता अगदी थेटपणे स्मार्टफोनवर रुजू झालाय. हा आपला स्मार्ट झालेला फोन या अॅप्सच्या साहाय्याने परफेक्ट मॅच शोधू लागलाय.

मुलीच्या फोनवर नोटिफिकेशन येतं. ती ‘राईट स्वाइप’ करते आणि तिची कळी खुलते. ती बाहेर जायची तयारी करते. हे सगळं पाहणारी आई आपली तरुण लेक आरशासमोर उभी राहून स्वत:ला न्याहाळताना बघते आणि कुठलाही प्रश्न न विचारता तिला चक्क कुठला स्कार्फ चांगला दिसेल याचा सल्ला देते. अनोळखी लोकांशी बोलायला कारण लागणाऱ्या आपल्या देशात आपल्या तरुण मुलीला ती डेटवर जात असताना सल्ले देणारी ‘टिंडर अॅप’च्या या जाहिरातीतली आई आपल्याला ‘कमाल’ वाटते. एका भारतीय आईचं असं वागणं ‘अनरिअलिस्टिक’ असल्याचं अनेक जणांना वाटेल. कारण तसं पाहता प्रेमप्रकरण हा आईवडिलांपासून लपून करण्याचा सिलसिला. त्यामुळे या जाहिरातीतली आई बोल्ड वाटल्याशिवाय राहात नाही हे खरं! पण या जाहिरातीमुळे सध्या चलतीत असणाऱ्या डेटिंग अॅप्सची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार सुरू झालेय आणि त्यात तरुणाई उत्साहाने सामील होतेय.

टिंडर, हॅपन, वू, ट्रलीमॅडली, लिंक्ड, झुस्क या डेटिंग अॅप्सनी आता तरुणांच्या स्मार्टफोनमध्ये जागा घेत आहेत. अशाच काही नवीन अॅप्सची संख्या गुगल स्टोरमध्ये वाढताना दिसतेय. अनेक परदेशी डेटिंग अॅप्स आता आपल्याकडे येऊ लागली आहेत. प्रेम, रिलेशनशिप म्हणा किंवा लफडं, भानगड.. पण भेटणं तर त्यात आलंच. या भेटण्यालाच आता ‘डेटिंग’ हे गोंडस नाव मिळालंय. आम्ही डेटिंग करतो हे सांगणंही हल्ली ‘कूल’ वाटतं.

या अॅप्सच्या माध्यमातून आजूबाजूला असणाऱ्या आणि अॅप वापरणाऱ्या सिंगल्सची ओळख होते. एकमेकांना ‘पाहिलं’ जातं, चॅट इन्व्हिटेशन पाठवलं जातं. यामुळे सिंगल मुलामुलींना ‘सांग कधी कळणार तुला..’ असं म्हणायला लागत नाही. एका ‘राइट स्वाइप’वर काम होऊन जातं. डेटवर येण्यासंबंधी विचारणा केली जाते. पटलं तर ठीक, नाही तर दुसरीकडे नशीब आजमावलं जातं. भावनेला वाट मोकळी करून देत लगेच प्रत्यक्ष भेटीत त्याचं रूपांतर होताना दिसतं. त्यात फेसबुकसारखं विचारण्यासाठी येणारं दडपण नाही. ‘मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही’ असं सांगून ‘जस्ट फ्रेंड’ म्हणून होणाऱ्या गणतीचा चान्सच इथे नसतो. अगदी थेटपणे विचारण्याची मुभा इथे असते. कारण डेटिंग अॅप्सवर रजिस्टर किंवा लॉगइन असल्यामुळे ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रश्नच येत नाही. या अॅप्सवर खूप सारे ‘ऑप्शन्स’ असल्यामुळे थोडं सावधानतेने पावलं उचलली जातात. कारण कोण जाणे आपण कमिट केलं आणि उद्या एखादा नवा, चांगला ‘ऑप्शन’ उपलब्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ कॅज्युअल स्टॉकिंगवर समाधान मानणारे देखील असतात. (व्हच्र्युअल जगात कॅज्युअल स्टॉकिंग म्हणजे निव्वळ दुसऱ्यांच्या प्रोफाइल्सवरून नजर टाकणे.. दुसऱ्यांना ते कळणार नाही, अशा बेताने ते केलं जातं.)

या डेटिंग अॅप्सवर बरेच आरोपही होतात. सीरियस रिलेशनशिप किंवा कमिटमेंट इथे अभावाने आढळते. केवळ शारीरिक आकर्षणातून या अॅप्सचा वापर केला जातो असा आरोपदेखील केला जातो. मात्र हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. डेटिंग अॅप वापरणारे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून नातं बघणारे असू शकतात. थोडी खबरदारी घेणं तितकंच गरजेचं असतं. काही अॅप्समध्ये पहिल्या २४ तासांत केवळ मुलींनाच प्रथम मेसेज करण्याची संधी देण्यात आली आहे. मुलींसाठी हा सेफ ऑप्शन असू शकतो.
पहिल्या नजरेतच प्रेमात पडणारी माणसं आहेत, तर इतरांना मात्र अशा अॅप्सचा आधार घ्यावा लागतो. पण अर्थात ही काही मॅट्रिमोनियल अॅप्स नाहीत की सगळं काही जमून जाईल. डेटिंग अॅप्स हा फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असं आपण याला म्हणू शकतो. कारण काही जण खरंच प्रेमात पडतात तर काही आपलं नशीब आजमावत राहतात. पण या अॅप्समुळे प्रेमाची परिभाषा बदलतेय एवढं नक्की.

– कोमल आचरेकर

 

 

‘व्हिवा रिपोर्टिग टीम’मध्ये सहभागी व्हायचंय?
फॅशन, लाइफस्टाइल, कॉलेज लाइफ, सोशल मीडिया या विषयीचे सगळे अपडेट्स तुम्हाला असतात का? याविषयी लिहावं अशी इच्छा असेल, तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून व्यक्त व्हावसं वाटत असेल, आपल्या कॉलेजविश्वातल्या, तरुणाईच्या जगातल्या गोष्टी शेअर करायला तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा टीमच्या रिपोर्टर होऊ शकता. ‘टीम व्हिवा’मध्ये सामील व्हायचं असेल तर तुमची वैयक्तिक माहिती – फोन नंबर, कॉलेजचं नाव आणि पत्त्यासह आमच्याकडे पाठवा. व्हिवामध्ये तुम्हाला कशाबद्दल लिहायला आवडेल आणि का हे २०० शब्दात (देवनागरीमध्ये) लिहून पाठवा. आमचा ईमेल आयडी – viva@expressindia.com सब्जेक्टलाइनमध्ये व्हिवा रिपोर्टिंग टीम असं जरूर लिहा. टपाल पाठवायचं असल्यास आमचा पत्ता – लोकसत्ता व्हिवा पुरवणी विभाग,
ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:17 am

Web Title: dating apps on playstore
Next Stories
1 माझं पहिलं डेटिंग.
2 ‘यूटय़ूबवर’चा टिंडर मसाला
3 .. कधी रे येशील तू?
Just Now!
X