17 December 2017

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : हो की नाही?

नीरजला त्याचं मन खात होतं. पुढच्या आठवडय़ापासून फायनल्स होत्या.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: October 13, 2017 12:32 AM

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

‘मला खरं तर नाही म्हणायचं होतं’, निराशेनं मान हलवत निशा म्हणाली. अमन आणि ती त्या दिवशी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. परत येताना रात्र झाली. अमन तिला सोडायला आला होता. तो कॉफी प्यायला रूममध्ये आला. आणि तिथेच राहिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी निशा मला भेटायला आली होती. ‘मग का म्हणाली नाहीस तसं?’, ‘अगं त्याला काय वाटलं असतं?, आणि गोष्टी अशा एका पाठोपाठ घडत गेल्या की मला काही सुचलंच नाही’, निशाचं उत्तर होतं.

नीरजला त्याचं मन खात होतं. पुढच्या आठवडय़ापासून फायनल्स होत्या. त्याला परीक्षेचं प्रचंड टेन्शन यायचं. काल अभ्यास करत असताना त्याचा चेहरा बघून आदित्यनं त्याला कसली तरी गोळी दिली. तुझं टेन्शन एकदम पळून जाईल म्हणाला. ‘नको रे’, ‘घे रे’ अशा छोटय़ाशा वादावादीनंतर नीरजनं ती घेतली. नीरजला जाम झोप आली. आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटायचं सोडून तो पूर्ण मरगळला. त्याचं डोकं दुखायला लागलं. ‘आपण काल घ्यायला नको होती ती गोळी’, त्याने शंभर वेळा स्वत:ला दोष दिला.

आई-बाबांच्या रोजच्या भांडणाला गार्गी कंटाळली होती. ‘तुला ते इतके आवडत नसतील तर तू लग्न तरी का केलंस बाबांशी?’, तिने आईला विचारलं. सुस्कारा सोडून आई म्हणाली, ‘काय करणार? नाही म्हणायची टाप नव्हती आमची आई-वडिलांसमोर. खरं तर मला पुढे खूप शिकायचं होतं. पण चांगलं स्थळ आलं म्हणून लावून दिलं त्यांनी लग्न!’

आपण सगळ्यांना आवडावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यात काही चुकीचं नाही. इनफॅक्ट बऱ्याचदा त्यामुळेच नकार देववत नाही आपल्याला. पण या लोकप्रियतेसाठी आपण कोणते मार्ग पत्करणार? कोणत्या थराला जाणार? घाई, धावपळ, चिडचिड हे सगळं ओझं घेणार का? घेतलेल्या निर्णयाबद्दल सतत पश्चत्ताप करत राहणार का? धोके पत्करणार का? कारण या ‘नाही’ म्हणता न येण्याचे फार मोठे परिणाम भोगायला लागतात कधी कधी. तुम्हाला या वयात आई-वडिलांना, मित्रांना, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला, ड्रग्जना, अनोळखी लोकांना अशा अनेकांना ‘नाही’ म्हणायची वेळ येते. तुमचे आणि तुमच्या आई-वडिलांचे लग्न, करिअर, नोकरी, बाहेरगावी जाणे अशा अनेक बाबतीत मतभेद असू शकतात. त्या त्या वेळी आपली मतं योग्य प्रकारे, ठामपणे पटवून देता आली नाहीत तर गार्गीच्या आईसारखी रुखरुख लागून राहते. आयुष्यभर नकोसं काम करत बसायला लागतं. कायम आई-वडिलांचा रागराग करत बसतो आपण. पण अनेकदा तुम्हाला स्वत:लाच स्पष्ट कल्पना नसते आपल्याला काय हवंय याची. त्यामुळे तुम्ही आपली बाजू त्यांना पटवून देऊ  शकत नाही.

सेक्शुअल रिलेशनशिपच्या बाबतीतही अनेकदा हा गोंधळ उडतो. निशा म्हणाली तसं मन नाही म्हणत असतं. शरीर मात्र आतुर असतं. कुणाचं ऐकावं ते समजत नाही. आणि नंतर जेव्हा त्याचे परिणाम भोगायची वेळ येते तेव्हा ब्रह्मांड आठवतं. आपण नाही का म्हणालो नाही वेळेवर? त्याचं कारण आपण आपल्या भावनांचा, आपल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचारच केलेला नसतो. विचार फक्त लोक काय म्हणतील याचा केलेला असतो.

म्हणजे आधी आपल्याला नाही म्हणायचं की हो म्हणायचं याचा ठाम निर्णय घ्यायला लागेल. त्याच्या बऱ्यावाईट परिणामांचा नीट विचार करायला लागेल. त्यानंतर ते कसं, कोणत्या शब्दांत सांगायचं ते ठरवायला लागेल. आणि मग ते प्रत्यक्षात करायला लागेल. आणि त्याहीनंतर त्या निर्णयावर उगीच विचार करत न बसता पुढच्या कामाला लागावं लागेल. म्हणजे असं नको व्हायला की आपण नकार तर देऊन बसतो पण मग वाटणार, ‘अरे, जायला हवं होतं आपण. आता सगळे तिकडे मजा करत असतील. उद्या आपल्याला जळवतील’. त्यापेक्षा एकदा आपण नाही असा निर्णय घेतला की मग त्यातल्या पॉझिटीव्ह बाजूवर लक्ष केंद्रित करायचं. त्या निर्णयामुळे आपला काय काय फायदा झाला आणि गेलो असतो तर काय तोटा झाला असता हे विचार मनात आणायचे. त्या मिळालेल्या रिकाम्या वेळात आपल्याला हवी असलेली दुसरी एखादी गोष्ट किंवा एखादं महत्त्वाचं काम करता येतं. तो वेळ सत्कारणी लावता येतो. नकोशा सवयींपासून स्वत:ला वाचवता येतं. भविष्यकाळावर परिणाम करणारे महत्त्वाचे निर्णय ठामपणे घेता येतात.

नाही म्हणायलासुद्धा प्रॅक्टिस लागते. त्यासाठी ती सवय ठेवणं, आपल्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असणं, लोकांच्या भावनांचा विचार करण्याबरोबर स्वत:च्या भावनांचाही विचार करणं हे सगळंच फार महत्त्वाचं आहे.

viva@expressindia.com

First Published on October 13, 2017 12:32 am

Web Title: decision making issue sexual relationship stress management