उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या खाबू मोशायच्या दिलाला आणि पोटालाही सुकून हवा होता.
त्यासाठी खाबू मोशाय उन्हाच्या झळा सोसत मुंबईच्या गल्ल्या धुंडाळत होता. याच शोधात असताना
गिरगावातल्या एका छोटय़ाशा गल्लीत खाबूला ‘धूप छास’ नावाचा भन्नाट प्रकार गवसला..
‘मुंबईतील तापमान ३७ अंशांच्या पल्याड’.. सकाळी सकाळी ही बातमी वाचून खाबू मोशायने हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि निमूटपणे कपाळावर जमलेला घाम पुसून काढला. खाबू मोशायला वास्तविक गर्मीचा फार त्रास होत नाही. कारण खाबू प्रत्येक ऋतूचा आनंद लुटण्यावर भर देतो. वर्षां ऋतूत पाऊस अंगावर घेतल्याशिवाय त्याला राहावत नाही, शरदाचं चांदणं डोळ्यांनी प्यायल्याशिवाय त्याच्या मनाची तहान भागत नाही आणि तसंच ग्रीष्मातल्या कडकडीत उन्हात एखाद्या काळ्या कातळाप्रमाणे तापायलाही खाबूची ना नसते.. निसर्गाशी दोस्ती करायची, तर या सगळ्या ऋतूंची कडकडून गळाभेट घ्यायलाच हवी की!

18

अफसोस एवढाच होता की, गुसलखान्यातून अगदी थंड पाण्यात अंग घुसळून बाहेर पडल्यानंतरही पाच मिनिटांत खाबू मोशाय घामाघूम होत होता. घरातून निघून रेल्वे स्टेशनला जाईपर्यंत घामाची आंघोळ होत असल्याने खाबू मोशायला या उकाडय़ाने हैराण केलं होतं. त्यामुळे खाबूला शरीराला आणि मनालाही थंड करणारं काहीतरी हवं होतं. उन्हाळ्यात मिळणारं पन्हं शरीरासाठी प्रचंड गरम वगरे असल्याचं खाबूच्या कानावर आल्याने खाबू त्याच्या वाटेला जात नव्हता. पण तेव्हा खाबूला ताक पिण्याची हुक्की आली.

आता ताक पिण्यासाठी मुंबईच्या गल्ल्या धुंडाळायचं काय कारण, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. घरच्या घरी दह्य़ात पाणी टाकून ते घुसळल्यावर होतंच की ताक तयार! पण केवळ तेवढय़ा प्रकरणावर खूश होईल, तर तो खाबू कसला! लहानपणापासून खाबूची आणि ताकाची गट्टी. लहानपणी दुपारचं जेवण झाल्यानंतर आजी न चुकता खाबूच्या ताटात मिठाची गुळणी टाकलेली ताकाची वाटी ठेवायची. ती वाटी ओठांना लावल्यावर एक शांत प्रवाह पोटापर्यंत पोहोचत असल्याचं खाबूला जाणवायचं. गोडाचं जेवण आणि त्यावर ताक हे खाबूच्या मते निद्रानाशावर उत्तम औषध आहे. त्यातही गोडाच्या जेवणात जिलबी असेल, तर पुढचा कारभार आटोपलाच म्हणून समजा. एखाद्या मोहक रमणीच्या लालस अधरांवर ओठ टेकवल्यानंतर वाटावं, तसंच हे ताकाच्या वाटीला किंवा ग्लासाला ओठ लावल्यानंतर वाटतं.. (हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असून तो ओठानुरूप बदलू शकतो. पण बोलणार कोण, आपलेच दात आणि आपलेच ओठ)

इथे एक गोष्ट खाबूला स्पष्ट करायला हवी. खाबूला ताक आवडत असलं, तरी कोिथबीर, मिरची, कढीपत्ता वगरे पालापाचोळा टाकून केलेला मठ्ठा नावाचा प्रकार नावाप्रमाणेच अत्यंत मठ्ठं असतो, असं त्याचं मत आहे. त्यामुळे पंक्तीत मठ्ठा वगरे नावाने देणाऱ्या द्रव पदार्थापासून खाबू लांबच असतो. मठ्ठा किंवा ताकाच्या नावाखाली आंबूस पाणी पाजणाऱ्यांचा धिक्कार असो! त्यापेक्षा मस्त लोण्याचे थोडेसे कण असलेलं ताक, तेदेखील मसाला न टाकता समोर आलं तर खाबूच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. त्या ताकाचा ‘मठ्ठा’पणा न वाढवता काही वेगळं करता यायला हवं.
तर, या ताकातलं वेगळेपण शोधण्यासाठी चांदण्या उन्हात खाबू मुंबईतल्या गल्ल्या धुंडाळत होता. त्याच वेळी बाबूने त्याला खबर दिली की, गिरगावमधल्या एका गल्लीत धूप छास नावाचा काहीतरी प्रकार मिळतो. चौकशीअंती ही गल्ली म्हणजे एकेकाळी नाटय़रसिकांची मक्का असलेल्या साहित्य संघ मंदिराची गल्ली असल्याचं कळलं. खाबूचा आणि या गल्लीचा संबंध खूप जुना असल्याने खाबू तडक या गल्लीकडे रवाना झाला.

19साहित्य संघ मंदिरावरून पुढे चर्नीरोड स्थानकात जाण्यासाठी निघालात की, ही गल्ली संपते. तिथेच तुम्हाला ताक स्टेशन नावाचा बोर्ड दिसेल. इथेच हरी ओम छास सेंटर नावाचं ताक मिळण्याचं ठिकाण आहे. गिरगावातला प्रसाद वेदपाठक नावाचा तरुण गेली चार-पाच र्वष हे ताक स्टेशन चालवतोय. त्याच्या मेन्युकार्डवर स्पेशल ताक, उपवास ताक, मसाला ताक, जलजीरा ताक, जंबो ताक आणि हे धूप ताक मिळतं. खाबूने ‘त वरून ताकाची परीक्षा’घेण्यासाठी आधी साधं ताक पिऊन बघितलं. अंतरीची खूण पटल्यानंतर खाबूने मग धूप ताक मागवण्याचं धाडस केलं. गाडीवरच्या तरुणाने यज्ञासाठी किंवा सत्यनारायणाच्या प्रसादासाठी करतो, तशी तयारी करायला सुरुवात केली. त्याने कोळसे ठेवायची एक तिपाई काढली. त्यात काही कोळसे टाकले. बर्नरने ते कोळसे पेटवले. चांगले निखारे फुलल्यावर त्याने त्यावर जिरं आणि ओवा टाकला. तो थोडासा तडतडतो नाही, तोच त्याने त्यावर तूप टाकलं. आसमंत धुराने गजबजून जाण्याआधीच त्याने त्या धुरावर एक मोठा ग्लास उपडा ठेवून तो धूर त्या ग्लासात कोंडला. दुसऱ्या ग्लासात मसाला टाकून त्यात ताक टाकलं. धूर बराच वेळ कोंडला गेल्यावर तो ग्लास उचलून दुसऱ्या ग्लासातलं ताक त्याने धुराच्या ग्लासात ओतलं आणि ते पुन्हा ताकाच्या ग्लासात घेऊन तो ग्लास खाबूसमोर पुढे केला. खाबूच्या चेहऱ्यावर ‘एवढंच’ या अर्थाचं प्रश्नचिन्ह बघून या तरुणाने ‘पिऊन तर बघा’ या अर्थाची खूण केली. खाबूने पहिला घोट घेतला आणि ग्लासात कोंडलेल्या त्या धुराचा मस्त फ्लेवर ताकावाटे खाबूच्या पार पोटापर्यंत गेला. हा प्रकार भन्नाट आहे. केवळ भन्नाटच नाही, तर एकदम हटके आहे. प्रसाद वेदपाठक हा तरुण गेली सात-आठ र्वष ताक, दही आदींचा व्यवसाय करतो. उन्हाळ्याच्या दिवसात त्याला १०० ते १५० लिटर दूध लागतं, यावरूनच त्याच्या व्यवसायाच्या व्याप्ती कळावी. बहुतांश सगळ्या हॉटेलांना त्याच्याकडूनच ताक पुरवलं जातं. पण हे धूप ताक पिण्यासाठी मात्र या ताक स्टेशनपर्यंत यावं लागतं. बरं, हे ताक आहे फक्त २० रुपयांत. त्यामुळे खिशातूनही धूर निघत नाही. त्याशिवाय या ताक स्टेशनवर फक्त ४५ रुपयांत तुम्ही कितीही ग्लास साधं ताक पिऊ शकता. हे कळल्यावर तर खाबूला अनावर आनंद झाला. पण धूप ताकचा मोठा ग्लास संपवतानाच खाबू थंड झाला होता. त्यामुळे हे ४५ रुपयांचं आव्हान खाबूने तूर्तास नाकारलं.
शरीर आणि मन दोन्ही त्या धूप ताकामुळे शांत झालं होतं. उन्हाळ्याच्या दिवसांत गाडीमध्ये जसं कूलण्ट आवश्यक असतं, तसंच ताकाचं कूलण्ट शरीराला देऊन खाबूने मोटर स्टार्ट केली. पण त्यानंतर दिवसभर खाबूला येणाऱ्या ढेकरांमध्ये तो स्मोकी फ्लेव्हर येत होता. पण ते म्हणतात ना, वायू मुक्त करून वाया घालवण्यापेक्षा ढेकर देऊन चव तरी घ्या.. खाबू या धूप ताकाची चव दिवसभर घेत होता.
ल्ल

कसं जाल : या ताक स्टेशनला जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम मार्ग आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्थानकात उतरल्यावर पूर्वेकडे येणारा पादचारी पूल घ्या. या पुलावरून सफी हॉस्पिटलच्या बाजूने साहित्य संघाकडे जाणाऱ्या पादचारी पुलावर वळा आणि संघाच्या गल्लीत उतरल्यावर तुम्हाला लगेचच ताक स्टेशन दिसेलच. मध्य रेल्वेवरून येणार असाल, तर सीएसटीला उतरून आझाद मदान व महापालिका येथून क्रमांक ६६, ६९ आदी गिरगावात येणाऱ्या बस पकडून गायवाडी स्टॉपला उतरा. बाजूलाच असलेल्या डॉ. भालेराव मार्ग या छोटय़ा गल्लीतून सरळ चालत गल्लीच्या टोकापर्यंत या. तिथे तुम्हाला ताक स्टेशन दिसेल. विशेष म्हणजे ही गाडी दिवसभर सुरू असते.

– खाबू मोशाय