25 May 2020

News Flash

डाएट रिझोल्युशन

खाण्यापिण्याविषयीच्या साध्या सवयींविषयीचे सोपे संकल्प केलेत तरी तुमचं नवं वर्ष आरोग्याच्या दृष्टीने हॅपी असेल

‘आपलं आरोग्य ही पहिली संपत्ती’ हे राल्फ वाल्डो इमर्सनने योग्यच म्हटलं आहे. नवीन वर्षी आरोग्य हीच तुमची प्राथमिकता ठरवायला हवी. नवीन वर्षांच्या संकल्पांची यादी तुमच्याकडे तयार असेल एव्हाना. आता या यादीमध्ये सगळ्यात वरच्या स्थानी डाएट हवं. डाएट म्हणजे फार अवघड, अशक्य गोष्ट नाही, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. खाण्यापिण्याविषयीच्या साध्या सवयींविषयीचे सोपे संकल्प केलेत तरी तुमचं नवं वर्ष आरोग्याच्या दृष्टीने हॅपी असेल.

संकल्प १ : दिवसातून ६ वेळा खा
तुमच्या दोन जेवणांमध्ये तुम्ही जितके अंतर ठेवाल तितकी तुम्हाला जास्त भूक लागेल. साहजिकच, पानावर बसल्यावर तितके जास्त तुम्ही जेवाल. दिवसातून तीन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा सहा वेळा थोडे-थोडे जेवण घ्यावे. त्यामुळे तुमच्या चयापचयाच्या प्रक्रियेला चालना मिळते. ऊर्जेची पातळीही योग्य राहते.

संकल्प २ : निसर्गाच्या जवळ जा
आधीच पॅक केलेल्या, प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये भरपूर साखर, मीठ, कृत्रिम फ्लेवर असतात. फॅक्टरीमध्ये तयार केलेले फॅट्स, रंग आणि रसायने आणि प्रीझर्वेटिव्हज् असतात. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये तुमच्या हृदयाचे संरक्षण करणाऱ्या सॉल्युबल फायबरसारख्या नैसर्गिक पोषकद्रव्यांची कमतरता असते. त्यामुळेच अशा औद्योगिक प्रक्रियायुक्त पदार्थापासून दूर राहून ताजे, नैसर्गिक आणि पारंपरिक पदार्थ स्वीकारा. आपल्या आजीच्या काळातील डाएटमध्ये असे अनेक पौष्टिक आणि चवदार पदार्थ सापडतील.

संकल्प ३ : जेवणाचे पान रंगीत करा
जर तुमचे जेवणाचे ताट एकसुरी, बेरंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या त्या आहारातून तुम्हाला पुरेशी पोषकद्रव्ये मिळणार नाहीत. तुम्ही योग्य खाद्यपदार्थ खाताय याची खात्री करण्यासाठी विविधरंगी खाद्यपदार्थाचा आहारात समावेश करा. गाजर, बीट, पालक यांसारख्या रंगीत भाज्या, फळे, मुळे भाज्या पोषक असतात आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. टोमॅटो, कलिंगड, लाल भोपळी मिरची यात फायटोकेमिकल असतात, जे रोगांपासून आपला बचाव करतात. लाल-जांभळ्या भाज्या-फळे उदाहरणार्थ, जांभळा कोबी, लाल माठ, वांगे, प्लम्स, ब्लॅकबेरी यांच्यात अँथोसायनिन्स, फ्लॅव्होनाईड आणि पॉलिफिनॉल्स असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवते.

संकल्प ४ : साखर वगळा, आयुष्यातला गोडवा वाढवा
रिफाइन्ड साखरेऐवजी नैसर्गिक साखरेचा वापर करा. त्यासाठी प्रक्रिया न केलेला गूळ चांगला पर्याय आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये असलेली साखर आरोग्यासाठी धोकादायक असते. कँडीबारच्या ऐवजी केळं, खजूर यांचा समावेश आहारात करा. अनेक फळांपासून डेझर्ट बनवता येऊ शकते. केळे आणि शिजवलेले सफरचंद, मध, खजूर यापासून आईस्क्रीम आणि स्मूदी बनवून नैसर्गिक गोडवा देणारी डेझर्ट बनवता येतील.

संकल्प ५ : मोसमातील फळे, भाज्यांची लज्जत चाखा
हिवाळ्यात आपल्या शरीराला अशा खाद्यपदार्थाची गरज असते, जे पोषणाबरोबरच उष्मा देते. शरीराला उष्णता देणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये गाजर, बटाटा, कांदा, मुळा, याम, बीट, सलगम यासारखी कंदमुळे तसेच मेथी, पालक, पुदिना, सरसों साग या पालेभाज्यांचा समावेश होतो. या पालेभाज्यांमध्ये आयसोथिओसायनेट आणि फोटोकेमिकल्स असून ते रोगाला प्रतिबंध करतात. त्यांच्यातील फ्लेवर पदार्थाला चवही देतात. पपई, अननस आणि आवळा यांच्यात सी व्हिटॅमिन भरपूर असून त्या माध्यमातूनही उष्णता मिळते. उन्हाळ्याचे स्वागत आपण व्हिटॅमिन ए आणि सीने समृद्ध असलेल्या फळांचा राजा आंब्याने करतो. द्राक्षांमध्ये फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश आहे. रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यू बेरी आणि ब्लॅक बेरीज यांच्यात फायबर आणि व्हिटॅमिन सीचा समावेश होतो. ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, कलिंगड, मका यांच्यात अँटीऑक्सिंड्टस, लायकोपीन आणि कॅरोटीनॉईड्स यांचा समावेश असतो. काही फळे जी पोषणाने भरपूर असून केवळ पावसाळ्यातच उपलब्ध होतात त्यात चेरी, पीच, प्लम आणि लीची यांचा समावेश होतो. ही फळे रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याबरोबरच संसर्गापासून लढण्यासाठी शरीराला बळ देतात. भेंडी, दुधी, सुरण, पडवळ आणि कारल्यासारख्या भाज्यांचा समावेशही आहारात करा.

संकल्प ६ : हॉटेलमध्ये खाणे टाळा
घरात जेवण बनवून खाण्याने तुमचे पैसे तर वाचतातच त्याचबरोबर तुम्ही काय खाताय यावरही नियंत्रण राहते. स्वच्छता, चव आणि प्रमाण यावरही नियंत्रण राहते.

संकल्प ७ : आरोग्यासाठी चालत राहा
रोजच्या दैनंदिनीची ३० मिनिटे शारीरिक व्यायामासाठी राखून ठेवा. व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे ताण कमी होतो, ग्लायसेमिक नियंत्रण वाढते, रक्तदाब कमी होतो आणि त्याही उपर तुमच्या शरीराला फिट आणि चांगल्या अवस्थेत ठेवते. नवीन वर्ष जवळ येत असताना, चांगले आरोग्य मिळवण्यासाठी असे छोटे बदल करण्याची चांगली संधी आहे. कारण छोटे-छोटे बदल मोठे बदल घडवितात. नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!!

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:13 am

Web Title: dieting tips and food
Next Stories
1 फंकी कॉलेज लुक
2 व्हिवा दिवा: कल्याणी पाटील
3 नावात काय आहे?
Just Now!
X