04 August 2020

News Flash

बंडखोर ‘अ‍ॅक्सेस’रीज

या वर्षी ‘बोल्ड इज ब्युटीफुल’ या तत्त्वाप्रमाणे फॅशन विश्वात बदल घडून येतील.

हल्ली फॅशन जगतात खूप लक्षवेधी आणि सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतात. रंग, वर्ण, उंची, बांधा या सगळ्यापलीकडे जाऊन सगळ्यांना आपलंसं करणारी फॅशन आपल्या समोर आली. अनेक डिझायनर, मॉडेल यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या खुल्या फॅशनचा ट्रेंड सगळ्यांसमोर आणला. आणि त्यातूनच जन्माला आली बंडखोर फॅशन. ज्याला कोणत्याही परिभाषेची किंवा चौकटीत राहण्याची गरज नाही.

यंदाचं वर्षसुद्धा फॅशन विश्वात असेच नवनवीन बदल घडवून आणून एक बंडखोर फॅशन आपल्यासमोर आणणार यात शंका नाही. बंडखोर म्हणण्याचं कारण असं की रूढ चौकटीतील कपडे, स्टाइल यांना बाजूला सारत नवंच काही शोधून ते परिधान करणं हीच फॅशन ठरते आहे. यात अर्थात मोलाचा वाटा हा बंडखोर अ‍ॅक्सेसरीजचा असणार आहे. या वर्षी अशा कोणत्या हटके, बंडखोर म्हणता येतील अशा अ‍ॅक्सेसरीज ट्रेंड इन असतील त्याचा हा धावता आढावा..

ओव्हरसाइज ज्वेलरी

या वर्षी ‘बोल्ड इज ब्युटीफुल’ या तत्त्वाप्रमाणे फॅशन विश्वात बदल घडून येतील. ज्वेलरीच्या बाबतीतसुद्धा हे सूत्र नक्कीच पाळलं जाईल. ओव्हरसाइज इअरिंग, ओव्हरसाइज किंवा प्लस साइज नेकपीस, ओव्हरसाइज अँकलेट, ओव्हरसाइज ब्रेसलेट या सगळ्या बरोबरीने ओव्हरसाइज नोजपिन हे ज्वेलरीचे प्रकार या वर्षांत सगळ्यांच्या पसंतीस उतरतील. केवळ त्यांचा आकार मोठा आहे असं नाही. तर त्याच्या डिझाइनसाठी अगदी काही फेमस शब्द, गाणी यांचा वापर करून घेत केलेली डिझाइन्सही ते परिधान करणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरी दाखवून देतात. ‘माल’ असो किंवा ‘ठरकी’ असे शब्द लॉकेटमध्ये पेरून केलेले नेकलेस किंवा कानातले डूल पाहायला मिळत आहेत. अशा बंडखोर ज्वेलरीच्या वापराची सुरुवात गेल्या वर्षीपासूनच झाली असली तरी आता ती फॅशन म्हणून व्यक्तिगणिक रुळताना दिसेल.

कंफी बॅग्ज

कम्फर्टेबल किंवा ‘इझी टू कॅरी’ बॅग्ज मार्केटमध्ये उपलब्ध असतील. त्यात ओव्हरसाइज बॅग्जपासून ते अगदी ट्रेंडी लहान क्लचेसपर्यंत सगळ्याचा समावेश असेल. स्लिंग बॅग्ज तरुणाईत आधीच लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचे वेगवेगळे प्रकार या वर्षांत नक्कीच पाहायला मिळतील. तसेच यंदा मरुन, ऑलिव्ह ग्रीन, पर्पल, मस्टर्ड येलो, राखाडी, ब्लॅक अशा प्रकारचं हटके आणि सगळ्यांना आवडेल असं ‘कलर पॅलेट’ बॅग्जमध्येही ट्रेंड इन असेल.

फुटवेअर

गेल्या दोन वर्षांत स्नीकर्सचा खूप बोलबाला होता. या वर्षी स्नीकर्स अगदीच असणार नाहीत असं नाही, मात्र नेहमीच्या वापरासाठीही बॉक्स हिल्स असलेले फुटवेअर जास्त पाहायला मिळतील. यातही वेगवेगळे प्रकार असून बॉक्स हिल बूट्स, बॉक्स हिल सॅण्डल्स, बॉक्स हिल स्लिप ऑन्स या वर्षांत ट्रेंड इन असतील. फुटवेअर ब्रॅण्ड ‘बाटा’पासून ते अगदी ‘जारा’पर्यंत बऱ्याच ब्रॅण्डेड फुटवेअरमधील नवीन नवीन कलेक्शन्स पाहिलेत तर बॉक्स हिल फुटवेअर मोठय़ा प्रमाणावर दिसून येतील. बॉक्स हिल फुटवेअर फॅशन एलिमेंटला धक्का न देता सगळ्यांना आरामदायी अनुभव देतील असेच आहेत. असे हिल वापरताना पायाला खूप आरामदायी ठरत असल्यानेच कदाचित पण या वर्षी यालाच जास्त मागणी आहे.

घडय़ाळ

एक पट्टा आणि मध्ये डायल अशी घडय़ाळाची संकल्पना आता एवढी साधी राहिलेली नाही. त्यात कालानुरूप खूप फरक पडत गेले. कधी काळी केवळ वेळ बघायचे साधन म्हणून वापरले जाणारे घडय़ाळ आता स्टाइल स्टेटमेंट ठरते आहे. या वर्षी तर घडय़ाळाचे अगदी सटल ते फॅन्सी असे अनेक प्रकार पाहायला मिळणार आहेत. ‘टायटन’ या घडय़ाळाच्या ब्रॅण्डने त्यांच्या नवीन कलेक्शनमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत. डिझायनर मसाबा गुप्ता हिच्याकडून डिझायनर घडय़ाळांची एक सीरिजच त्यांनी विकसित करून घेतली असून अत्यंत वेगळ्या पद्धतीची अशी ही घडय़ाळे पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेतता. ‘टेक या मोमेन्ट फॉर आमची मुंबई’ ही सीरिज त्यांनी डिझाइन केली आहे. यातील घडय़ाळं २६/११ या दिवशी मुंबईकरांनी दाखवलेल्या स्पिरिटला सलाम करण्यासाठी बनवण्यात अली आहेत. प्री ऑर्डर तत्त्वावर ही घडय़ाळं विकली जाणार आहेत. ‘फास्टट्रॅक’ या ब्रॅण्डने सुद्धा आपलं नवीन कलेक्शन युथफुल पद्धतीने डिझाइन केले आहे. अत्यंत बोल्ड कलर्स घडय़ाळांमध्ये वापरले गेले आहेत. तसेच डायलमध्ये किंवा पट्टय़ावर काही ठिकाणी एखादं वाक्य, शब्द लिहिलेली घडय़ाळंही सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

या वर्षीचा ऑनलाइन बाजार असेल नाहीतर आपला स्ट्रीट बाजार सगळीकडे अशाच अ‍ॅक्सेसरीजने फुललेले दिसतील. यात तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुम्ही काय निवडता आणि ते कसं कॅरी करता याला महत्त्व आहे. तुम्ही फॅशनिस्टा असा किंवा नसा या अ‍ॅक्सेसरीज तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि वापरायला आरामदायी असल्याने फॅशनमधली ही बंडखोरी तुमच्या स्टाइलमध्ये उतरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा ठसा उमटवतील यात शंका नाही. तुमच्या आवडीपणाने तुम्ही त्या नक्की ट्राय करून बघा.. शेवटी ‘स्टे स्टाईलिश स्टे क्वर्की’ हाच या वर्षीचा फंडा आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 12:48 am

Web Title: different accessories women accessories fashion
Next Stories
1 विरत चाललेले धागे : आठवणीतली चंद्रकळा
2 ‘जग’ते रहो : बर्लिनर असण्याची धुंदी!
3 ‘कट्टा’उवाच : ‘हिरवळ’ बघणारा ठरकी छोकरो..
Just Now!
X