७ जुलै हा ‘जागतिक चॉकलेट दिवस’! लहानांपासून अगदी मोठय़ांपर्यंत सर्वानाच हवंहवंसं चॉकलेट नेमकं कोणत्या क्षणी जन्माला आलं हे सांगणं तसं कठीणच, पण म्हणून आबालवृद्धांच्या चॉकलेटप्रेमात त्याने फारसा काही फरक पडत नाही. ‘कोणे एके काळी म्हणे चॉकलेट हा तिखट पदार्थ होता. अमेरिकन लोक कोकोच्या बिया वाटून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे तिखट मसाले घालून त्यापासून झणझणीत पेय बनवायचे. मग हे चॉकलेट गोड झालं तरी कसं? तर युरोपीय बांधवांनी त्याचा तिखटपणा काढून त्यात साखर, दूध घालून त्याला गोडवा दिला. त्यानंतर चॉकलेट हा पदार्थ खाण्यायोगा व पिण्यायोगा बनवण्याचं कामदेखील त्यांनीच केलं,’ असा किस्सा शेफ विष्णू मनोहर सांगतात. जगात चॉकलेटचे असंख्य प्रकार. प्रत्येक शेफची चॉकलेट बनवण्याची एक खुमासदार शैली आहे. चॉकलेटपासून आपण नाना पदार्थ बनवू शकतो. म्हणूनच ‘व्हिवा’ वाचकांना त्यांचा चॉकलेट डे स्वत:च्या हाताने तयार केलेल्या चॉकलेट्सच्या चवीने चॉकलेटी व्हावा यासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी या चॉकलेटी रेसिपी शेअर केल्या आहेत. शिवाय, वर म्हटल्याप्रमाणे चॉकलेटचा तिखटपणा अनुभवण्यासाठी शेफ विकी रतनानी यांची ‘आमंड चिली रॉक्स’ ही खास रेसिपी शेअर केली आहे.

साहित्य – कणीक २ वाटय़ा, कोको पावडर १ वाटी, मीठ २ ग्रॅम, साखर १० ग्रॅम, यीस्ट १० ग्रॅम, चॉकलेट कॅडबरी २ नग, मिल्क पावडर अर्धी वाटी, पनीर अर्धी वाटी, ब्रिटानिया प्रोसेस चीज अर्धी वाटी, मोझेरोला चीज अर्धी वाटी, बटर २ चमचे, मध ४ चमचे.

कृती – कणीक, मीठ, कोको पावडर, मिल्क पावडर, साखर एकत्र करून त्याचा पिझ्झा बेस बनवा. पिझ्झा बेस तयार करून त्याला १० मिनिटे फरमेंट करा. त्यावर पनीरचे तुकडे, कॅडबरी चॉकलेट व चीज पसरवून बेक करा. वरून मधाचे टॉपिंग करून खायला द्या. याचा आकार छोटा असावा व आइस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करावे.

चॉकलेट करंजी

साहित्य – कणीक २ वाटय़ा, बेकिंग पावडर १ चमचा, मीठ चवीनुसार, दूध पाव वाटी, मोठी कॅडबरी १ नग, तेल १ चमचा.

कृती – सर्वप्रथम कणकीत मीठ, बेकिंग पावडर १ चमचा तेल घालून मळून घ्यावे. नंतर त्याची मोठी पोळी लाटून त्यावर साटा पसरवा व बुक फोल्ड पद्धतीने त्याची घडी करा. नंतर त्याला फ्रिजमध्ये ठेवा, कमीत कमी अर्धा तास. पुन्हा याची चौकोनी पोळी लाटून त्यावर कॅडबरी किसून घाला. त्यावर तशीच दुसरी पोळी ठेवून साच्याने कापून घ्या. प्रीहीट ओव्हनवर १३० डिग्रीवर बेक करा.

चॉकलेट पुडिंग

साहित्य – कोको पावडर १ कप, साखर पाव कप, अंडी १ नग, कॉर्नस्टार्च २ चमचे, मीठ चिमूटभर, दूध २ कप, चॉकलेट चिप्स पाव वाटी, फ्रेश क्रीम १ कप, किसलेले चॉकलेट पाव वाटी.

कृती – सर्व प्रथम पाव कप साखर, १ कप कोको पावडर, १ अंडे, २ चमचे कॉर्नस्टार्च, चिमूटभर मीठ एकत्र करून त्यात २ कप दूध घाला. नंतर डबल बॉयलिंग पद्धतीने गरम करा. गरम करतानाच त्यामध्ये पाव वाटी चॉकलेट चिप्ससुद्धा घाला. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये १ कप फ्रेश क्रीम घाला. मिश्रण एकत्र करून एका भांडय़ामध्ये सेट होण्याकरिता ठेवा. फ्रिजमध्ये तासभर ठेवून सव्‍‌र्ह करतेवेळी वरून किसलेले चॉकलेट घाला.

चॉकलेट शंकरपाळे

साहित्य – कोको पावडर अर्धी वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी, मदा १ वाटी, पिठीसाखर अर्धी वाटी, सॉल्टेड बटर २ चमचे, बेकिंग पावडर अर्धा चमचा, दूध अर्धी वाटी, तेल पाव वाटी.

कृती :- मदा, कोको पावडर, पिठीसाखर, मिल्क पावडर व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. नंतर यात सॉल्टेड बटर व थोडे दूध घालून मिश्रण भिजवून घ्या. नंतर त्याची पोळी लाटा व मध्ये पोळीवर तेल लावा. त्यावर थोडा मदा भुरभरावा. घडी करून परत लाटा. नंतर याचे हव्या त्या आकारात शंकरपाळे कापून मंद आचेवर तळा.

चॉकलेट लाडू

साहित्य – पोळ्या ८-१० नग, बदाम, पिस्त्याचे तुकडे १ वाटी, गूळ अर्धी वाटी, चॉकलेट ग्रॅन्युअल १ वाटी, चॉकलेटचे मोठे बार २ नग, तूप ४ चमचे.

कृती – पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये गूळ, तूप, सुका मेवा घालून मिश्रण एकत्र करा. सर्वात शेवटी चॉकलेट ग्रॅन्युअल घालून छोटे-छोटे लाडू वळा. चॉकलेट सॉस थोडे कोमट करून त्यामध्ये हे लाडू बुडवून साखरेवर घोळवा. फ्रिजमध्ये थंड करून खायला द्या.

बदाम चिली रॉक्स

साहित्य : भाजलेले बदाम १ कप, डार्क  चॉकलेट १ कप, वाळवलेल्या क्रॅनबेरीज १/३ कप, मिरची पावडर (तिखट) चिमूटभर.

कृती : एका बाऊ लमध्ये चॉकलेट व लोणी घेऊन मायक्रोवेव्हमध्ये गरम करून चॉकलेट वितळवून घ्या. वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बदाम आणि क्रॅनबेरीज घाला. ट्रेला तेल लावून ग्रीस करून घ्या. ट्रेमध्ये एक टेबलस्पून मिश्रण घेऊन बदाम रॉक्सचा एक भाग बनेल याची काळजी घ्या. तुम्ही हे मिश्रण मोल्डमध्ये किंवा छोटय़ा पेपर कप्समध्येही घालू शकता. सेट होईपर्यंत थंड होऊ  द्या आणि सव्‍‌र्ह करा बदाम चिली रॉक्स..

चॉकलेट ब्राऊनी

साहित्य – मदा अर्धा कप, कोको पावडर पाव कप, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ पाव चमचा, साखर १ कप, बटर किंवा मार्गारीन अर्धा कप, अंडे २ नग.

कृती – ओव्हन ३५० डिग्री फॅरनहीटवर गरम करा. ९ इंचाचा बेकिंग ट्रे  ग्रीस करून घ्या. बटरमध्ये साखर, अंडी मिसळून मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. नंतर मदा, कोको पावडर, बेकिंग पावडर व मीठ एकत्र करून चाळून घ्या. यात वरील तयार केलेले मिश्रण मिसळा. तयार झालेले मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये टाकून १८० डिग्री फॅरनहीटवर २५ मिनिटे बेक करा.

चॉकलेट बर्फी

साहित्य – कोको पावडर अर्धी वाटी, पांढरा खवा २ वाटय़ा, पिठीसाखर दीड वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी.

कृती – सर्वप्रथम खवा भाजून त्यामध्ये कोको पावडर मिसळून थंड करा. नंतर यात मिल्क पावडर व पिठीसाखर घालून एकत्र करा. साच्यामध्ये टाकून वडय़ा पाडा.